"मराठी'चे समकालीन वास्तव - भाग 1 

डॉ. नंदकुमार मोरे 
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

ही सुमारे अकरा कोटी लोकांची भाषा आहे. ती व्यवहार, ज्ञाननिर्मिती, साहित्यनिर्मिती, शिक्षण अशा कोणत्याही बाबतीत मागे नाही. ती एवढा मोठ्या लोकसंख्येची भाषा असल्याने जागतिकीकरणानंतर अनेक उद्योग-व्यवसायिकांना ती व्यवसायवृद्धीचे एक साधन वाटते आहे. त्यातून तिचे व्यावसायिक उपयोजन सुरू झाले आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये विविध उत्पादकांच्या मराठीमध्ये दिसणाऱ्या जाहिराती याची साक्ष देतात. जगातील एक महत्त्वाची भाषा म्हणून मराठीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे. ​

भाषा ही कोणत्याही समाजाचे संचित असते. मानवी जीवनाचा विचार भाषा, साहित्यादि कला, संस्कृती या गोष्टींशिवाय करताच येत नाही. भाषेचा इतिहास अभ्यासताना आपण मराठी भाषेला मराठी म्हणून रूप प्राप्त झाले तो काळ यादवांचा काळ असे मानत आलो. तिचा उगम संस्कृतोद्भव मानला. त्यामुळे संस्कृत-प्राकृत-अपभ्रंश-महाराष्ट्री अपभ्रंश-मराठी अशी तिची परंपरा गृहित धरून तिचा इतिहास रचला गेला. कोणत्याही भाषेची अशी एकरेषीय वाटचाल सांगणेच मुळी अशास्त्रीय आहे; हे विसरून आपण मराठी भाषेचा इतिहास हजारएक वर्षांचा मानत आलो. मराठी भाषेचा, तिच्या इतिहासाचा अनेक अभ्यासकांनी स्वतंत्रपणे केलेला अभ्यास आपण दुर्लक्षित करीत राहिलो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी तिच्या प्राचीनत्वाविषयी नव्याने शोध घेतला गेला. शासनाकडूनच तिच्या प्राचिनत्वाविषयी आपले अभ्यास, संशोधन शासनाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्वानांनी पूर्वीच करून ठेवलेले आणि अलक्षित राहिलेले मौलिक संशोधन विचारात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मराठी ही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची भाषा आहे, हे अनेक सक्षम पुराव्यांच्या आधाराने सिद्ध केले गेले. विशेष म्हणजे या अहवालातून तिचा यापूर्वीच केला गेलेला सर्व अभ्यास पुढे आणण्याचे काम झालेले आहे. 

मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही - नेमाडे 
मराठीतील अनेक उच्चार हे संस्कृत परंपरेतील नसून मराठी ही स्वतंत्र भाषा आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक भालचंद्र नेमाडे यांनी मांडले आहे. मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही, ही गोष्ट अनेक पुरावे देत नेमाडे वेळोवेळी आपल्या भाषणांमधून, मुलाखतींमधून सांगत राहिले आहेत. कोल्हापूरच्या श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या त्यांच्या "प्रादेशिक ते जागतिक' या व्याख्यानात त्यांनी काही हजार वर्षांपासून अस्तित्वात असणारा "जोहार' हा शब्द आणि च्‌, छ्, ज्‌, झ्‌ या "च'वर्गीय व्यंजनांबद्दल विवेचन केले. आर्यांचा, त्यांच्या भाषा-संस्कृतीचा इतिहास तीन हजार वर्षांपेक्षा मागे जात नसून मराठीचे पुरावे त्यापूर्वी शेकडो वर्ष मागे जाणारे आहेत. त्यामुळे मराठी ही स्वंयसिद्ध, समृद्ध परंपरा असलेली भाषा आहे हे अधोरेखित केले. नेमाडे यांच्या या विवेचनाच्या अनुषंगाने आज कोणी विचार करतेय काय, मराठीची आज काय अवस्था आहे, आपल्या मनात तिचे स्थान कोणत्या प्रकारचे आहे, तिच्यासाठी आपण काय करतो आहोत अशा गाष्टींवर यानिमित्ताने आपल्याला चिंतन करता येईल. 

महत्त्वाची भाषा म्हणून श्रेष्ठत्व

ही सुमारे अकरा कोटी लोकांची भाषा आहे. ती व्यवहार, ज्ञाननिर्मिती, साहित्यनिर्मिती, शिक्षण अशा कोणत्याही बाबतीत मागे नाही. ती एवढा मोठ्या लोकसंख्येची भाषा असल्याने जागतिकीकरणानंतर अनेक उद्योग-व्यवसायिकांना ती व्यवसायवृद्धीचे एक साधन वाटते आहे. त्यातून तिचे व्यावसायिक उपयोजन सुरू झाले आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये विविध उत्पादकांच्या मराठीमध्ये दिसणाऱ्या जाहिराती याची साक्ष देतात. जगातील एक महत्त्वाची भाषा म्हणून मराठीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे. मराठीतून लिहिणारे ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून आजचे ढसाळ-चित्रे-नेमाडे यांनी तिचे थोरपण अधोरेखित केले आहे. 

शासनाची दुटप्पी भूमिका मराठीसाठी घातक 
भाषेतून शिक्षण घेतलेले अनेक लोक विविध क्षेत्रात आंतराष्ट्रीय स्तरावर काम करताहेत. या लोकांचा पाया मातृभाषेतील शिक्षणामुळे अधिक मजबूत झालेला आहे. संकल्पनांची स्पष्टता जशी मातृभाषेतून होते, तशी परकीय भाषेतून होऊ शकत नाही. हे मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांच्या अनुभवांवरून सांगता येईल. एकीकडे मातृभाषेचे महत्त्व जाणून जाणीवपूर्वक मराठीतून शिक्षणासाठी आग्रह करणारे पालक दिसतात. ते भाषेविषयीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होताहेत. तर दुसरीकडे अनेक पालक इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा अट्टाहास धरताहेत. शहरातून तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांचे पीक जोरदार तेजीत आहे. पालकांसमोर त्यांनी अनेक पर्याय दिलेले आहेत. इंग्रजीचे अतिरेकी आकर्षण खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले आहे. इंग्रजी शाळांच्या आकर्षनामुळे खेड्यातील अनेक कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी छोट्या छोट्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. शिवाय तालुका पातळीवरही इंग्रजी शाळा सुरू झालेल्या आहेत. ही शाळा कोणत्या हेतूने सुरू केलेली आहे, तेथील अध्यापक कोण आहेत, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे, त्यांना खरच मुलांच्या भविष्याचा विचार आहे का, त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहे का अशा कोणत्याही गोष्टींचा विचार न करता; आंधळेपणाने अशा शाळांमध्ये प्रवेश घेतला जात आहे. जागतिकीकरणातून पुढे आलेल्या उद्योग-व्यवसायात आपले पाल्य टिकावे असा भाबडा समज, इंग्रजी भाषेचे आकर्षन, प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना अशी विविध कारणे यामागे आहेत. हा समज करून देणारी व्यवस्था मोडीत काढण्याऐवजी शासनाकडून अनुदान द्यावे लागत नाही या कारणास्तव इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी देण्याचा सपाटा सुरू आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षणाचा प्रसार करण्यापेक्षा एकप्रकारे मराठीची गळचेपी करायला सुरुवात झाली आहे. एकीकडे मराठीच्या मुद्यांवर सवंग चर्चा करायची, राजकारण करायचे आणि दुसरीकडे तिला मारक ठरतील अशी धोरणं राज्यात राबवायची ही दुटप्पी भूमिकाच मराठीसाठी घातक आहे. 

ना धड इंग्रजी, ना धड मराठी 
राज्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे कोणीही इंग्रजी माध्यमाची शाळा काढतो. अज्ञानीपणाने इंग्रजी भाषेतून शिक्षण कसे आवश्‍यक आहे, हे सांगत सुटतो. यामुळे मराठीचे न भरून येणारे नुकसान होते आहे. याचा परिणाम म्हणजे आपल्या मुलांना आता मराठीतून नीट विचार करता येत नाही. त्यांच्या कल्पकतेला, सर्जकतेला आपण मारून टाकतो आहोत. त्यांना केवळ इंग्रजी भाषा बोलता येणारी मशिन बनवतो आहोत. यातून त्यांना आपण मातृभाषेतील ज्ञानसंचितापासून आणि मोठया परंपरेपासून तोडतो आहोत. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बहुतांश मुलांची अवस्था ना धड इंग्रजी, ना धड मराठी अशी होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांच्या परिसरात मराठी बोलण्याला मज्जाव आहे. हे चित्र चिंताजनक आहे. महाराष्ट्रात मराठी बोलायला बंदी घालणाऱ्या या शाळा मराठी बोलणाऱ्याला मागास ठरवतात. हे मराठी भाषा, संस्कृतीच्या दृष्टीने मारक ठरणारे आहे. अशा शाळांवर वेळीच वचक ठेवला नाही, तर या शाळांमधून शिकणाऱ्या मुलांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. मातृभाषेच्या सन्मानासाठी त्यांना काही कार्यक्रम दिला पाहिजेत. त्यासाठी केंद्रिय अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमध्ये मराठीची सक्ती झाली पाहिजेत. इंग्रजी शाळा असली तरी तेथे मराठीचाही सन्मान झाला पाहिजेत. 

"भाषासंगम' ही अभिनव संकल्पना 
छोट्या छोट्या समुहांच्या बोलीभाषांचे महत्त्व लक्षात आल्याने युनो/युनोस्को या जागतिक संघटना मातृभाषांचा पाठपुरावा करताहेत. त्याचा काहीएक परिणाम जगभरामध्ये मातृभाषेंच्या म्हणजेच बोलीभाषांच्या अभ्यास, संशोधनावर झालेला आहे. मातृभाषांविषयीची जागृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक घटना मराठीच्या बाबतीतही घडताना दिसतात. मराठीच्या काही निवडक बोलींचा अभ्यास यापूर्वीच झालेला आहे. सर जॉर्ज ग्रिअर्सन यांनी केलेला व्यापक अभ्यास आपल्याला ज्ञात आहे. अलीकडच्या अनेक वर्षांपासून डॉ. गणेश देवी यांनी अदिवासी, छोट्या-छोट्या जाती, जमातींच्या बोलीभाषांचे महत्त्व जाणीवपूर्वक अधोरेखित करून त्यांच्या भाषांची जपणूक, दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वकांक्षी काम हाती घेतले. त्यातून तीनशे वीस भाषांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत 2010 ला बडोदे येथे "भाषासंगम' ही अभिनव संकल्पना साकारली गेली. देशभरातील अनेक भाषांचे आणि मराठीतील विविध बोलीभाषांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संकल्पनेतूनच मराठीच्या बोलीभाषांच्या अभ्यासाची नव्याने सुरुवात झाली. जवळपास सत्तर बोलीभाषांचा अभ्यास पूर्ण झाला. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या नावाने तो प्रसिद्ध झाला आहे. या प्रकल्पाचे मुख्य संपादक गणेश देवी असून महाराष्ट्रातील भाषांचे सर्वेक्षण पद्मगंधा प्रकाशनाचे अरूण जाखडे यांनी संपादन व प्रकाशन केले आहे. या प्रकल्पाला अभ्यासक, त्या त्या बोलीचे निजभाषक, शासन, सर्व माध्यमे अशा सर्वच पातळीवर प्रोत्साहन मिळाले. परिणामी बोलीभाषांविषयी सर्वसामान्यांच्या मनातदेखील सकारात्मक वातावरण तयार होण्याला मदत झाली. विविध विद्यापीठांमध्ये बोलीभाषांवर चर्चासत्रे झाली. पीएच. डी., एम. फिल. साठी बोलीभाषा, बोली भाषेचा अभ्यास ठरणारी लोकगीते यावर संशोधन सुरू झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेनेही बोलीभाषांचे कोश तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी काही कोशांचे प्रकाशन झाले. रमेश धोंगडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा भाषावैज्ञानिक भाषिक नकाशा सिद्ध करणारा प्रकल्प पूर्ण केला गेला. एकूणच मराठीच्या बोलींविषयी नवजागृती तयार झाली. त्यातून बोलींविषयीचे जुने समज बऱ्याच अंशी दूर होण्याला मदत झाली. आपल्या भाषेतून बोलायला लोकांना जी लाज वाटायची ती अलीकडच्या काही वर्षांमध्ये कमी झालेली आहे. 

(लेखक शिवाजी विद्यापीठात मराठी विभागात कार्यरत आहेत) 

Web Title: Dr. Nandakumar More article