काळ तर मोठा कठीण आला ! 

डॉ. नंदकुमार मोरे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

काळाने प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे. चालले आहे, ते बरे की वाईट हेच लक्षात येत नाहीये. त्यामुळे प्रत्येक घटना-घडामोडींवर विसंगत प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत. सत्तास्थानी असलेले आवाज खूप उंचावताहेत, काही दाबले जाताहेत. आजूबाजूच्या कोलाहलात काही आवाज ऐकूही येत नाहीत, तर काही ऐकूनच घेतले जात नाहीत. 

मानवी इतिहासात वर्तमान सर्वाधिक गतिमान झाले आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सर्व पातळ्यांवर उत्थान - पतनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया दृश्‍य - अदृश्‍य दोन्ही रूपात चाललेली असल्याने जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये उलथापालथ होतेय. या उलथापालथीत अनेक घडामोडी घडताहेत. त्यातील अनेक गोष्टी सामान्य माणसाच्या आकलनकक्षेत येत नाहीत. काळाने प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे. चालले आहे, ते बरे की वाईट हेच लक्षात येत नाहीये. त्यामुळे प्रत्येक घटना-घडामोडींवर विसंगत प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत. सत्तास्थानी असलेले आवाज खूप उंचावताहेत, काही दाबले जाताहेत. आजूबाजूच्या कोलाहलात काही आवाज ऐकूही येत नाहीत, तर काही ऐकूनच घेतले जात नाहीत. 

संवादमाध्यमे वाढताहेत. मोबाईलक्रांतीने जग परस्परांशी जोडले गेल्याचा दावा केला जातोय. परंतु, जवळच्या माणसाशी संवाद संपत चालला आहे. दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांचा विचार करण्याइतका आपल्याकडे सध्या वेळ शिल्लक नसतो. सध्या वेळ हाही एक प्रश्नच आहे. कारण वेळच वेळ असणारे आणि अजिबातच वेळ नसणारे एकाच वेळी दिसताहेत. दोघांच्या समस्या वेगवेगळ्या. आपल्या आजूबाजूला सध्या काय चाललेय? याविषयी कधीतरी स्वत:शी संवाद केला, म्हणजे मात्र आपण अस्वस्थ होतो. कारण सदासर्वदा ठीक चालावे, काही प्रश्नच पडू नयेत, असा आजचा काळ राहिलेला नाही. आपल्यासमोर प्रश्नांचा मोहोळच उठलेला दिसतो. आपण ज्या समाजाचे घटक असतो, त्या समाजातच काही बरे चाललेले नसेल, तर आपले कसे बरे चालणार? आपण अतिशय गोंधळलेल्या आणि संभ्रमाच्या काळात वावरतो आहोत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी केवळ संभ्रमच निर्माण व्हावा, अशा काळात आपण जगतो आहोत. परस्परांवरचा विश्वास संपत चाललेल्या काळाचे आपण घटक आहोत. संभ्रम आणि गोंधळ, अनाकलनीयता आणि त्यातून येणारी अस्वस्थता हेच आजचे वर्तमान बनले आहे. 

अस्वस्थता आणि संभ्रम सर्वच क्षेत्रात 
आपण काळाच्या गतीबरोबर धावत असतो. काळच आपल्याला गती देतो, रेटतो. माणूस भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळांविषयी एकाचवेळी विचार करत असतो. म्हणून तो अधिक दु:खी असतो. वर्तमानातील प्रश्न आणि भविष्याविषयीच्या चिंता त्याचा सतत पिच्छा पुरवत असतात. त्यातून निर्माण होणारे प्रश्न व्यक्तीनुसार भिन्न असतात. आज आपण सारेच ज्या परिस्थितीतून जात आहोत आणि ज्या प्रश्नांना तोंड देत आहोत, त्यांच्या मुळांचा शोध घेण्यासाठी आपल्याला काही वर्षे मागे जावे लागते. आपल्या राज्यकर्त्यांनी मागील काही वर्षांमध्ये राबवलेली धोरणे, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पातळीवर काही वर्षांपासून चाललेल्या घडामोडी या साऱ्यांचाच वर्तमानावर प्रभाव असतो. आज कोणत्याही क्षेत्रात अस्वस्थता आणि संभ्रम दिसतो. अनेक गोष्टी आकलनाच्या टप्प्यात येत नाहीत. एकूणच काही बरे चालले आहे, असे आजचे चित्र नाही. 

आंतरराष्ट्रीय पातळीपासून गाव-वाड्यावस्त्यांपर्यंत प्रश्नच प्रश्न आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक-जातीय, पर्यावरणीय, आरोग्य अशी प्रश्नांची यादी मारूतीच्या शेपटासारखी वाढती आहे. हे प्रश्न, झपाट्याने बदलणारा सभोवताल, मानवाने केलेले निसर्गावरील अतिक्रमण,जीवसृष्टीविषयक सद्‌भाव, मानवी मनात वसणारे आणि सतत फोफावते द्वेष, मत्सर, कटुता यासारखे स्वभावधर्म, स्वत:चे आणि समाजाचे स्वास्थ्य हिसकावून घेत आहेत. समाजातील अनेक प्रश्नांच्या दाबानंतर राजकीय, सामाजिक उद्रेक होण्याची शक्‍यता निर्माण होते. दीर्घकाळ सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे सरकार जाऊन झालेले राजकीय परिवर्तन याचेच उदाहरण आहे. एवढे मोठे राजकीय परिवर्तन होऊनही अस्वस्थता संपण्याऐवजी वाढते आहे. नव्या सरकारच्या एकाधिकारशाहीची अनुभूती राजकारणात येत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीवर बंधने लादली जाताहेत. याविरोधात प्रतिक्रियाही उमटते आहे. जेष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी सुरू केलेली "दक्षिणायण' ही देशपातळीवरील चळवळ ही या विरुद्धची सर्वात मोठी प्रतिक्रिया आहे. लेखक, कलावंत पुरस्कार परत करताहेत. माध्यमे ताब्यात घेतली जात आहेत. त्यावर अनुकूल तेवढेच दाखवले जातेय. विरोधकांची शक्ती हरण केली जातेय. वाढती अशांतता, धार्मिक-जातीय तेढ, दुष्काळ, पूर, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, दहशतवादी हल्ले, धर्म-जातीनुसार निघणारे लाखोंचे मोर्चे, प्रतिमोर्चे अस्वस्थता वाढवताहेत. नवनवे प्रश्न निर्माण करताहेत. 

विकास म्हणजे काय ? 
समाजातील बदल एकाएकी घडून येत नसतात. आज संगणक, माहितीतंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातील नवनवे शोध, त्याचबरोबर सत्ताधारी घेत असलेले निर्णय आजच्या बदलांना कारणीभूत ठरताहेत. या बदलांना वरकरणी "विकास' असे नाव दिले जात असले तरी, या विकासाच्या पडद्यामागील बाजू विचारी माणसाला अस्वस्थ करणारी आहे. समाजात विकासाची व्याख्या सोयीची आणि हितसंबंधी राजकारणाभोवती फिरणारी आहे. एकीकडे या विकासाने माणसाचा सर्वनाश आरंभला असताना, दुसरीकडे याचे भानच येऊ नये, अशी व्यूहरचना केली जात आहे. विकासाच्या मोठमोठ्या गप्पा चाललेल्या जगात, खूप लोक प्राथमिक गोष्टींच्या पूर्ततेसाठी झगडत आणि खितपत पडलेले असताना, जग आधुनिक - उत्तरआधुनिक झाले, असे म्हणणे हास्यास्पद ठरते आहे. वास्तवित विकास हा संपूर्ण जीवसृष्टीच्या कल्याणाचा विचार करणारा असला पाहिजेत. परंतु, आज विकास आणि आधुनिकेतून आलेल्या अनेक गोष्टी निवडक लोकांचे हितसंबंध जोपासताना दिसतात. विकासाच्या नावाखाली सृष्टीला ओरबाडून खाण्याची सध्या अहमहमिका लागली आहे. या चढाओढीत आपणच आपल्या अस्तित्वावर उठलो आहोत, याचेच भान राहिलेले नाही. सृष्टीवरील आक्रमणाची गती आणि त्यासाठीची विकृत चढाओढ दृर्लक्ष करण्यासारखी राहिलेली नाही. विकासाच्या नावाखाली डोंगर पोखरले जाताहेत. नद्या उपसून रेती काढली जातेय. दगड फोडून गिट्टी बनवली जातेय. विहिरींना पाणी लागत नाही म्हणून भारंभार बोअर मारल्या जाताहेत. सुपीक शेतांमधून रस्त्यांचे काळेशार गालीचे अंथरले जाताहेत. हे सारे कोणासाठी चालले आहे? हा मुख्य प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या जमिनी हिसकावून धनिकांकडे सुपूर्द केल्या जाताहेत. त्यांच्या अलिशान गाड्या गरीबांच्या जमिनीवर बनलेल्या रस्त्यांवर पळताहेत. अशा वर्तमान वास्तवाविरुद्ध सामान्य माणूस उभा राहिलाच तर, त्याचा आवाज जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातोय. 

भारतीय परंपरेचा विसर 
मनुष्याचा हव्यास न संपणारा आहे. आपल्या वाढत्या गरजांसाठी त्याच्याकडून सृष्टीचा अनन्वित छळ सुरू आहे. आधुनिक आणि प्रगत होण्याची घाई स्वास्थ्य हिरावते आहे. परंपरेपासून तोडते आहे. भारतीय परंपरेत पर्यावरणीय दृष्टिकोण ओतप्रोत भरलेला असताना, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. माणूस भान हरपून सृष्टीला ओरबाडतो आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर सृष्टीचे आरोग्य धोक्‍यात आणतो आहे. साधनसंपत्तीच्या नाशामागे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे. "वापरा आणि फेका' संस्कृतीने नानाविध प्रश्न तयार झाले आहेत. त्यातून माणसाचा जीवसृष्टीविषयक सद्‌भाव संपत चालला आहे. म्हणूनच महात्मा गांधींनी या संस्कृतीला "सैतानी संस्कृती' म्हटले आहे. या सैतानी संस्कृतीने सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा केला आहे. या सैतानी संस्कृतीने सुखाच्या कल्पना बदलल्या आहेत. अवाढव्य लोकसंख्येच्या आपल्या देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीतील अनेक कल्पना साधनसंपत्तीचा विध्वंस करताहेत. आपले भूमीशी असलले सनातन नाते तोडताहेत. अशा तुटत जाण्याच्या काळातच आपला वावर आहे. 

जीवसृष्टीवर माणसाचे अतिक्रमण 
आपल्या आजूबाजूला वावरणारी जीवसृष्टी सारीच या भूमीची लेकरं आहेत. या साऱ्यांचे भूमीशी, माणसाशी असलेले नाते सनातन आहे. सृष्टीतील लहानसहान जीव क्षुल्लक वाटत असले तरी, त्यांची म्हणून या जीवसृष्टीत एक जागा आहे. माणसाने स्वत:च्या आनंदासाठी त्यांच्या जीवनात शिरकाव केला आहे. त्यांना त्यांच्या जागेवरून हटवल्यास साऱ्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याविषयी कमालीची बेफिकीरी आहे. जीवसृष्टीचे अस्तित्व परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे. पृथ्वी राहण्यालायक बनवण्यात साऱ्याच जीवांचे योगदान आहे. म्हणून सर्वांचे महत्त्व सारखे आहे. मात्र हे भान अलीकडे सुटते आहे. जीवसृष्टीवर माणसाने अतिक्रमण केले आहे. माणसाने उर्मटपणे यांच्या स्वयंभू जगाचा विध्वंस सुरू केला आहे. हा विध्वंस केवळ त्यांचा नसतो, तर तो आपलाही असतो, हे अलीकडे अनेक घटनांनी दाखवून दिले आहे. जंगली श्वापदांबरोबर, त्यांचे जगण्याचे स्रोतच माणसाने संपवल्याने, उरलेसुरले जीव मानवी वस्तीकडे आगेकूच करू लागले आहेत. आपण अधिवासातील जीवसृष्टीवर आक्रमण करून माणूस थांबला नाही, तर त्यांच्या अस्तित्वासाठीचे मूलस्रोतही हिसकावून घेतले आहेत. सारे नैसर्गिक स्रोत प्रदूषित केले आहेत. हे आजचे भयावह वास्तव आहे. माणसाने भौतिक प्रगतीचे कितीही गोडवे गायले तरी, सृष्टी हीच आपले पालनपोषण करते, हे तो विसरतो आहे. तिच्यापासूनच स्वत:ला तो तोडत निघाला आहे. त्याच्या वर्तनाने पाण्यासारखा मूलस्रोतच इतका दूषित झाला आहे, की आता डोळे मिटून आपण पाणी पिऊ शकत नाही. पिण्यासाठी पाण्याला आता बाटलीबंदच व्हावे लागते. 

श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा 
आजूबाजूला काय चालले आहे, हेच समजणे आणि समजून घेणे कठीण झाले आहे. निवडून येणारे नेते, त्यांचे वर्तन, बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी वक्तव्ये चिंताजनक आहेत. ते कोणत्याही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर भूमिका घेताना दिसत नाहीत. आपल्या भूमिकेमुळे कोणी दुखावेल, आपली वोटबॅंक जाईल हीच त्यांची चिंता असते. जे काही करायचे ते वोटबॅंकेसाठी. माणसापेक्षा त्याचे मत मोठे झाले आहे. त्यामुळे कोणत्याही धोरणात्मक कामांपेक्षा मंडळांचे उत्सवी कार्यक्रम, वेगवेगळे फेस्टिव्हल, प्रदर्शने, दहीहंडी, गणपती, नवरात्र अशा उत्सवांमध्ये ते व्यस्त आहेत. या कार्यक्रमांमधून मिरवून घेणे आणि वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठ्या बातम्या छापून घेणे हे त्यांचे महत्त्वाचे काम झाले आहे. त्यांना सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांचे काही देणेघेणे नाही. या लोकांना महत्त्व देणारी वृत्तपत्रेही हवे ते आणि हवे तसे देण्यात धन्यता मानताहेत. महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा जाहिरातींवर डोळा ठेवून बातम्या देणे, प्रतिक्रिया देणे सुरू असते. इतर दृक्‌श्राव्य माध्यमेही हेच करू लागली आहेत. रात्रंदिवस चालणाऱ्या गोडगोड मालिका, ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली दाखवल्या जाणाऱ्या भडक आणि सवंग बातम्या, तेथे सतत सुरू असलेल्या बाष्कळ चर्चा, रिऍलिटी शो या साऱ्यांमध्येच लोक अडकले आहेत. आपल्या घरात काय चालले आहे त्यापेक्षा "बिग बॉस'च्या घरात काय चालले आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आपल्या घरात बसून बिग बॉसच्या घरात चाललेले बीभत्स प्रकार, भांडणे बघण्यात सध्या लोक धन्यता मानू लागले आहेत. 

अशा वातावरणात अनेक प्रवृत्ती सभोवताली वाढताहेत. वास्तविक त्या वेढाच घालताहेत. त्यामध्ये जात, धर्माचे भांडवल करत फोफावलेले बुवा-महाराज तर समाजाचे दुसरे नियंत्रकच होऊ पाहताहेत. या महाराजांमुळे अध्यात्म शिकवणुकीऐवजी धार्मिक अस्मिता प्रबळ बनत चालल्या आहेत. श्रद्धेची जागा अंधश्रद्धेने घेतली आहे. जातीय, धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या, धर्माच्या नावाखाली लोकांना बांधून ठेवणाऱ्या संघटना आपली ताकद वाढवताहेत. या संघटनातून वाढणाऱ्या प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता भोगावे लागताहेत. देशात होणारे हिंदू-मुस्लिम दंगे, त्यातून जाणारे नाहक बळी, देशाच्या साधनसंपत्तीचा होणारा नाश समोर आहेच. अनेक बुवा, महाराजाचा उदय, त्यांच्यामागे लागलेला समाज हा चिंतनप्रवृत्त करणारा विषय आहे. या महाराजांच्या नादी लागलेला समाज दिवसेंदिवस वाढतो आहे. यांच्या आश्रमांमध्ये चालणाऱ्या अनेक वाईट गोष्टींच्या बातम्या सर्वांसमोर येऊनही त्यांच्याकडे जाणारे लोंढे आटत नाहीत. या बुवामहाराजांचे प्रस्थ गावात, वाडीवस्तीपर्यंत पोहोचले आहे. संमोहित केल्याप्रमाणे अनेक लोक आपले कामधंदे सोडून या महाराजांच्या भजनी लागताहेत. या महाराजांना दारिद्रय, दुष्काळासारखे प्रश्न नसतात. देशात दुष्काळ असताना लाखो लिटर पाण्याची ते रंगपंचमी खेळतात. सोयीच्या गोष्टी घेणे, श्रद्धेच्या नावाखाली समाजाला अंध बनवणे, इतिहासाचे विकृतिकरण, वास्तवापासून दूर ठेवणे असले उद्योग त्यातून वाढले आहेत. यांच्या विरोधात बोलणे म्हणजे धर्माविरुद्ध बोलणे ठरते आहे. यांनी पसरवलेला विकृत इतिहास आणि अंधश्रद्धेविरुद्ध बोलणे म्हणजे धार्मिक भावना दुखावणे झाले आहे. अशा अस्वस्थ वर्तमानात सारेच निराशजनक आहे, असे मात्र नाही. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने 
काही लोक निष्ठेने या साऱ्यांविरुद्ध लढताहेत. चळवळी उभा करताहेत परंतु, याविरुद्ध लढणारे, सत्य सांगू पाहणारे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांचे खून झाले आहेत. हे खून होऊन काही वर्षे उलटली तरी, खुनी सापडत नाहीत. अशी भरदिवसा चाललेली हिंसा वाढते आहे. आशा हिंसेचे फलित काय? याचे समाधानकारक उत्तर कोणाजवळही नाही. आज सत्ता हिंसेचे शस्त्र ठरतेय. त्यामुळे हिंसेतून घडणारा विध्वंस नित्य चित्र आहे. हिंसेतून भूमीबरोबर आपल्याही जीवनाची राख होतेय, याचे भान कोणालाही नाही. ही हिंसा म्हणजे आपल्याच शरीरात फोफावणारा कॅन्सर आहे, यावर कोणाचा विश्वास बसत नाही. उद्या सारेच हाताबाहेर जाणार आहे. मग त्यातून जे उद्‌भवणार आहे, ते मात्र खूप गंभीर असणार आहे. 

अशा हिंसेंमुळे व्यवस्थेविषयी संशयाचे वातावरण तयार झाले आहे. भयग्रस्तताही पसरली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली जाताहेत. अलीकडेच तमिळ लेखक पेरुमल मुरुगन या लेखकाने स्वत:चा मृत्यू घोषित केला. हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या कादंबरीवर घेतलेले आक्षेप आणि त्यातून झालेली त्यांची मुस्कटदाबी या घोषणेला कारणीभूत ठरली. एकीकडे खोटा इतिहास सांगणाऱ्या, इतिहासाचे विकृतिकरण करणाऱ्यांना समाजाच्या विरोधात जाऊन मोठ मोठे सन्मान दिले जाताहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार करणारी लोकशाही हे वास्तव आणि मुरुगनसारख्या लेखकाचा मृत्यू पाहत बसली आहे. 

सामाजिक विषमता वाढतेय 
महाराष्ट्र हे देशात प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. अशा या प्रगत राज्यातच जगाच्या पाठीवर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. दररोजच्या वर्तमानपत्रात अशा आत्महत्येची एखादी तरी बातमी वाचल्याखेरीज दिवसाची सुरुवात होत नाही. दुसरीकडे याच वर्तमानपत्रांमध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या याद्या प्रसिद्ध होतात. या यादीतील लोक महाराष्ट्रात राहतात. त्यांचे साठ साठ मजली महाल मुंबईच्या मलबार हिलला उभे राहतात. या कुबेरांची संपत्ती लहान लहान राष्ट्रांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त असते. आणि विशेष म्हणजे ती विलक्षण गतीने वाढत राहते. शहरातील बाजारपेठा नानाविध वस्तूंनी भरून ओसंडताहेत. धान्याची गोदामे व्यापारी-दलालांनी खचाखच भरून ठेवलेली आहेत. आणि दुसरीकडे लोक कुपोषणाने बळी जाताहेत. अन्न-अन्न करून मरताहेत. सारेच विसंगत आणि चक्रावून सोडणारे वास्तव समोर आहे. संपत्ती ठराविक मुठभर लोकांकडे एकवटत चालली आहे. आणि त्याच गतीने लोक दरिद्री बनून रस्त्यावर येताहेत. शासन काही धनिकांच्या सोयीची धोरणे आखते आहे. 
आज शहरांलगतची सुपीक शेती विकत घेण्यासाठी मोठमोठे बिल्डर, दलाल यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. शहरांच्या अंधानुकरणात खेडी गुंतलेली आहेत. तेथील राजकारणाने सगळे नीतिनियम आड्याला टांगले आहेत. माणसं गटातटात विभागली आहेत. एकत्र कुटुंबाला सडी लागली आहे. वाढत्या तोंडांमुळे शेतीचे तुकडे पडताहेत. एकूणच गावचे स्वास्थ हरवले आहे. भरीस भर म्हणून राजकारण चुलींपर्यंत पोहचले आहे. उपटसुंभांची फौजच्या फौज गावागावात तयार झाली आहे. गाव-तालुका पातळीवरील चिल्लर पुढाऱ्यांच्या मागे ही फौज रात्रंदिवस फिरताना दिसते आहे. या फौजांच्या सेवेसाठी दारूची दुकाने आणि धाबे गावच्या वेशीपर्यंत येऊन पोहचले आहेत. त्यातून नवी धाबासंस्कृती रुजली आहे. 

संस्था म्हणजे राजकारणाचे अड्डे 
महाराष्ट्रात रुजलेला सहकार आणि त्यातून निर्माण झालेले सहकारी संस्थांचे जाळे अशा रिकामटेकड्या उपटसुंभांची राखीव कुरणं बनलेली आहेत. गावची लोकसंख्या चार हजार पण दूधसंस्था चार, सेवा सोसायटी दोन, पतसंस्था चार-पाच आणि गल्ली बोळात फंड मंडळे हे प्रत्येक गावचे चित्र आहे. गावातील कोणतीही संस्था कोणालाही प्रामाणिक सहकार्य करताना दिसत नाही. कारण संस्थेत सत्ताधारी बनलेले लोक उदात्त हेतूने येत नाहीत. ते अक्षरश: घुसलेले असतात. या संस्था म्हणजे राजकारणाचे अड्डे बनले आहेत. आडल्यानडलेल्याला हेरायचे आणि पिळायचे. त्याचा दगडाखाली सापडलेला हात सोडवण्याऐवजी तो अधिक आत-खोलात रेटायचा. तो सुटूच नये याची दक्षता घ्यायची. अशा पिळवणूकीसाठी या संस्थांची अहमहमिका लागलेली दिसते. तालुका पातळीवरील मोठ्या संस्था, साखर कारखान्यांमध्ये मध्यस्थी करणारे दलाल गावागावात तयार झाले आहेत. कुणाचा ऊस कधी तोडायचा, कुणाचा वाळवायचा याचे ठोकताळे यांच्या डोक्‍यात पक्के तयार असतात. निवडणुका हे या मध्यस्थ लोकांचे सुगीचे दिवस. कोणावरच कोणाचे नियंत्रण नाही. प्लॉट, जमिनी खरेदी विक्रीचे लोन गावापर्यंत आले आहे. जमिनी, झाडाझुडपांच्या व्यवहारात मध्यस्थी करणारे एजंट गावंच्या गावं उजाड करायला बसले आहेत. 

गावागावात हेच चित्र 
गावातील सरकारचे प्रतिनिधी असलेले ग्रामसेवक, तलाठी यांनी तर गावची नसच ओळखली आहे. हे पुढाऱ्यांपेक्षा हुशार बनले आहेत. सरपंच आणि चारदोन सदस्यांना हाताशी धरले, त्यांची टक्केवारी पक्की केली म्हणजे गावच यांच्या मुठीत. हे म्हणतील ती पूर्व दिशा. सरकारी योजना आणायच्या आणि त्या टक्केवारीत संपवायच्या. तोंडं बघून काम करायचे. गावागावात हेच चित्र दिसते. पाण्याच्या, रस्त्यांच्या कामांपेक्षा गावात मंदिरांच्या मोठमोठ्या इमारती उभा करण्याची सध्या स्पर्धाच लागलेली आहे. गावातील चिल्लर पुढाऱ्यांच्याही वाढदिवसांनी गल्ली बोळ डिजीटल फलकांनी विद्रूप होताहेत. या फलकांवर शुभेच्छुकांच्या यादीत गावातील बेकारांची फौजच्या फौज एका रांगेत उभी आहे. गावातील बहुतांश तरुण बेरोजगार. नोकरीसाठी पुढाऱ्यांमागे भरकटत चाललेले. प्रत्येकाकडे एखाददुसऱ्या डिग्रीची भेंडोळी. ही भेंडोळी घेऊन ते गाव-तालुक्‍याच्या पुढाऱ्यांमागे फरफटताहेत. आश्वासनांची खैरात करून या बेकारांचा निवडणुकांपुरता वापर करून घ्यायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचे. हे बहुतांश तरुण बेकार. आईबाप शेतात, मजूरीला आणि हे सुशिक्षित म्हणून घेत कपड्यांची ईस्त्री न मोडू देता गावभर फिरणार. यांच्या हातात स्मार्ट फोन. हे रात्रंदिवस त्यामध्ये डोके घालून बसणार.

देशाचे नेतृत्वही "डिजीटल इंडिया'ची हाक देणारे. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कॉल आणि इंटरनेट देण्याची जाहिरात करणारे. एवढा मोठा देश, त्यामध्ये इतके लोक इंटरनेटचा वापर करणारे. मोठमोठे आकडे. उरलेल्या जनतेलाही या कक्षेत आणण्याची घोषणा. पण कशासाठी? हे लोक इंटरनेटवर रात्रंदिवस काय करताहेत? काय पाहताहेत? अशी कोणती माहिती मिळवताहेत; ज्यामुळे देशाचा विकास होतो आहे. वास्तविक लोकांना माहितीच्या महाजालात गुंतवून ठेवण्याचे नवे शस्त्रच सत्ताधाऱ्यांच्या हाताशी लागले आहे. महाजालातील माहितीच्या कचऱ्यातून काय मिळतेय, हे समजण्याआधीच सरकार रात्रंदिवस "देश आगे बड रहा है' अशा जाहिरातीही करते आहे. या परिस्थितीत देशाचे, तरुणांचे जीवन कसे बदलते आहे, देश कसा पुढे चालला आहे, हेच आकलनाच्या पलीकडचे आहे. 

संगणक, मोबाईलमुळे जगभरातील माहितीचा कचरा समोर पडतो आहे. कधीही न भेटणाऱ्या मित्रांशी "चॅटींग' चालले आहे. पण आपल्या आजूबाजूला काय जळतेय? याचे भान सुटले आहे. आपला संपन्न आणि समृद्ध परिसर उजाड होतो आहे. तो सतत ओरबडला जातोय. अविरत वृक्षतोडीने जंगले संपत चालली आहेत. जंगलातले रहिवाशी सैरभैर होऊन लोकांच्या वस्तीत घुसताहेत. सुपीक जमिनी मातीमोल किमतीने हिसकावून घेतल्या जात आहेत. त्या धनिक उद्योगपतींच्या घशात चालल्या आहेत. हे उद्योगपती जीवनाशी खेळणारे कारखाने गावागावात उभारताहेत. यांच्याकडून नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडून खाल्ली जातेय. जमिनीच्या पोटातील खनिजं, पाणी शोधत डोंगरच्या डोंगर पोखरले जात आहेत. याच्याच बळावर जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची घाई झाली आहे. कुबेरालाही लाजवेल असे उंच उंच शिशेमहल हे उद्योजक समुद्र किनारी बांधून स्वत: सुरक्षित जीवन जगताहेत. जमिनीवरचे प्रदूषण नको म्हणून ते या शहरातून त्या शहरात मालकीच्या विमानातून फिरताहेत. खाली रस्ते वाहनांनी ओसंडताहेत. इंधनाच्या अतिरेकी वापरामुळे हवेचा धूर झाला आहे. पर्यायाने ऋतूचक्र बिघडत चालले आहे. एकूणच आज काळ तर मोठा कठीण आला आहे! 

Email : nandkumarmore@ymail.com 
 

Web Title: Dr. Nandkuma More article