अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व 

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व 

भाषा ही मानवी समाजजीवनाचे वैशिष्ट्य असल्याने "बोलतो तो माणूस' अशी माणसाची एक व्याख्या प्रचलित आहे. समाजात राहणे, संपर्क साधणे या मानवी गरजा आहेत. भाषेची विविधता मानवी समाज जीवनाचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. भारतातील भाषिक विविधता तर सर्वज्ञात आहे. येथील भाषा, भौगोलिक पार्श्वभूमी, संस्कृती या बाबतीतील प्रदेश विशिष्टता भारताच्या बहुसांस्कृतिकतेला जन्म देणारी ठरली आहे. त्यामुळेच भारतात भिन्नभाषिक संस्कृती नांदताना दिसते.

प्रदेशानुसार भाषा बदलत असल्यामुळे परस्पर संस्कृती परिचयासाठी अनुवादाला पर्याय नाही. अनुवादप्रक्रिया ही सर्जकतेला वाव असलेली बौद्धिक कसरतीची गोष्ट आहे. अनुवाद ज्ञानक्षेत्राच्या विस्तारासाठी अत्यावश्‍यक असून, अनुवादाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत नेणे, ही गोष्ट वरून वाटते इतकी सहजसोपी नाही. त्यासाठी भाषा ज्या मातीत आकाराला आलेली आहे, तेथील संस्कृतीसंदर्भ, तिची म्हणून असलेली एक घडण विचारात घ्यावी लागते. भाषेची सांस्कृतिक पार्श्वभूमी विचारात घेऊनच अनुवादाचे काम करावे लागते. अन्यथा शब्दाच्या जागी पर्यायी शब्द असे यांत्रिकपणे हे काम करता येऊ शकले असते. 

सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विविध समाजगट अस्तित्वात आल्यामुळेच जगभरात अनेक भाषा-बोलींचा उदय झालेला आहे. एकूण मानवी समाज जीवनाचा विचार करता, अस्तित्वात आलेल्या विविध भाषा-बोलीच परस्परसंवाद प्रस्थापनेसाठी बऱ्याच वेळा एक अडथळा बनतात. भारतात हा अनुभव सतत येत राहतो. येथील शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा अनेक बाबतीत अडचणी या भाषिक पातळीवरच्या असतात. भारताच्या बहुभाषिकते संदर्भातील आपले निरीक्षण नोंदविताना मॅक्‍सीन बर्नसन लिहितात, "आपल्याकडे जशी सामाजिक उतरंड दिसते, तशी भाषांच्या बाबतीतही दिसते. या उतरंडीमध्ये सगळ्यात खाली म्हणजे आदिवासी भाषा. त्यांच्यावर वेगवेगळ्या राज्यभाषा. उत्तरेकडे त्यावर हिंदी भाषा व सगळीकडे एकदम वर म्हणजे इंग्रजी जसजसे आपण वर जातो तसतसे त्या भाषेला जास्त प्रतिष्ठा असते. आदिवासी भाषेला सगळ्यात कमी प्रतिष्ठा, मग राज्यभाषा, त्यावर हिंदी व सर्वात वर इंग्रजी.' भाषा ही अस्मितेशी आणि संस्कृतीशी बांधून ठेवणारी गोष्ट असल्याने दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषेला विरोध झालेला आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातील लोकांना दक्षिणेतील लोकांशी संपर्क साधताना येणारा अडथळा हा भाषिक पातळीवरचा असतो. 

संवाद-संपर्क हा केवळ एक उद्देश झाला. याव्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये भाषेची मदत महत्त्वाची ठरते. अलीकडे उद्योग-व्यवसायाच्या वृद्धीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांना भाषा महत्त्वाची वाटू लागली आहे. त्यातून त्यांना स्थानिक भाषा-बोलींची धरावी लागलेली कास अनुवादप्रक्रियेला गती देणारी ठरते आहे. भाषा भूमीशी जोडून ठेवणारी गोष्ट असते, याचे भान उद्योग व्यावसायिकांना आलेले आहे. अनेक कंपन्यांनी जाहिरातींसाठी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा घेतलेला आधार लक्षात घेण्यासारखा आहे. अनेक जाहिरातींवरून असे लक्षात येते की, उत्पादकांना वस्तू विकण्याबरोबच त्या वस्तुविषयी एक भाव ग्राहकाच्या मनामध्ये बिंबवायचा असतो. कारण त्यांना वस्तू एकदा विकून चालत नाही. त्या वस्तुचा एक ग्राहकवर्ग तयार करायचा असतो. म्हणून मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये "उठा उठा दिवाळी आली. मोती स्नानाची वेळ झाली' हा ग्राहकाच्या मनात बिंबविला जाणारा भाव संस्कृतीसंदर्भयुक्त असतो. 

येथील वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती, विविध धर्म, जाती, पोटजाती, समाजगटांनुसार रुजलेले उद्योग व्यवसाय, विविध स्तरांनुसार झालेली समाजाची विभागणी अशी अनेक कारणे येथील बहुसांस्कृतिकतेच्या आणि भाषा-बोलींच्या निर्मितीमागे आहेत. भारतात मान्यताप्राप्त सर्वच प्रादेशिक भाषांमधून ज्ञानार्जनाची प्रक्रिया चालते. प्रथम भाषा म्हणून मातृभाषा शिकविली जाते. त्यामुळे देशातील बहुतांश भाषा-बोलींमधून आज साहित्यनिर्मिती होते. या भाषांना एक परंपरा आणि ज्ञानभांडाराचे संचित आहे. त्यामुळे भारतातच भाषांतर कार्यासाठीची मोठी संधी उपलब्ध आहे. येथे हे काम योग्य पद्धतीने सुरू झाले तर, निरनिराळे सांस्कृतिक-भौगोलिक पार्श्‍वभूमी असलेले अनुभवविश्व आणि आपल्या भाषेत नसणारे ज्ञानभांडार उपलब्ध होईल. या प्रक्रियेमुळे अनुभवाच्या कक्षा विस्तारण्याबरोबरच परस्परांविषयीची समज वाढेल, गैरसमज दूर होतील आणि आपलेपणाची भावना वाढीस लागेल. 

देशांतर्गत ऐक्‍य वाढेल आणि सांस्कृतिक आदान-प्रदानामुळे दोन भिन्न समाजगटांमधील अंतरही कमी होईल. अशा उद्देशानेच साने गुरुजी यांनी भारताचे÷नय सांगणारी "आंतरभारती' ही संस्था स्थापन करून भाषांतराचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. वि. का. राजवाडे यांनी जानेवारी, 1894 ला याच हेतूने "भाषांतर' हे मासिक सुरू केले होते. त्याच्या उपोद्‌घातामध्ये हे मासिक सुरू करण्यामागे आपला उद्देश स्वभाषेची सेवा आणि त्यायोगे होणारी देशसेवा असा सांगितला आहे. ते लिहितात, "भिन्न देशांत, भिन्न काळीं, ज्या भिन्न ग्रंथांच्या वाचनानें समाजावर महत्कार्ये घडलेलीं असतात, ते ग्रंथ जसेच्या तसे भाषांतर केले असतां स्वदेशातील समाजावर तशीं किंवा त्यासारखी कार्यें घडून येण्याचा साक्षात किंवा परंपरा संभव असतो. तसेंच उत्तमोत्तम ग्रंथ स्वभाषेंत आयतेच तयार होतात व स्वभाषची सुसंपन्नता पाहून देशांतील लोकांस उत्तरोत्तर अभिमान वाटूं लागतो. परकी लाकांनाही आपल्या भाषेसंबंधी अधि:कारपूर्वक बोलण्याची पंचाईत पडते व आपल्या देशाची व आपल्या भाषेची निंदा जसजशी कमी होत जाते तसतसा आपल्यालाही आपल्या सामर्थ्याचा कैवार घ्यावासा वाटतो.' हे राजवाडे यांचे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचे विचार सांस्कृतिक आदान प्रदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. 

सर्वदूर झालेल्या शिक्षण आणि साहित्याच्या प्रसारामुळे सर्व स्तरातील लेखक आज प्रादेशिक भाषा-बोली साहित्यनिर्मितीसाठी वापरू लागले आहेत. मराठीतील ग्रामीण, दलित, आदिवासी हे साहित्यप्रवाह भाषिक विविधतेच्या यासंदर्भात पाहता येतील. या प्रवाहातील कलाकृतींचे अनुवाद हे एक मोठे आव्हानच आहे. त्याचबरोबर एखादी इंग्रजी कादंबरी मराठीमध्ये अनुवाद करीत असताना मूळ कलाकृतीतील बोली, संभाषणे यामध्ये असणारी व्यक्‍तीविशिष्टता, समाजविशिष्टता अनुवाद करताना मराठीतील कोणती बोली स्वीकारावी हा एक प्रश्‍नच असतो. असे अनेक प्रश्‍न अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये असले तरी, या भाषा-बोलींचा अनुवाद अशक्‍य मात्र नाही. खरे तर जगातील कोणत्याही भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत अभिव्यक्‍त करण्याची क्षमता असते. अभिव्यक्‍तीच्या बाबतीत प्रत्येक भाषा स्वयंपूर्ण असते. त्यामुळे हा प्रवास खडतर असला तरी अशक्‍य नाही. त्यासाठी परस्पर संस्कृतीचा घट्ट परिचय करून घेणे आवश्‍यक आहे. तसा तो झाला तर ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. 

अलीकडे सर्वच क्षेत्रांमध्ये भाषांतराची गरज अधोरेखित झालेली आहे. विविध नियतकालिके, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट यासारख्या प्रसारमाध्यमांचा वाढता प्रसार-प्रभाव अनुवादकार्यासाठीची मोठी संधी आहे. मुलांसाठीचे "टॉम ऍण्ड जेरी', "ऑगी ऍण्ड कॉकरोज', "चार्ली चॅपलिन' हे जगभर लोकप्रिय कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण करण्यास वाहिन्या उत्सुक आहेत. त्यांना अडचण आहे ती प्रादेशिक भाषांमध्ये हे कार्यक्रम नेऊ शकणाऱ्या अनुवादकांची. त्यांनी यावर एक मार्ग म्हणून हिंदी भाषेत आपले प्रसारण सुरू केले आहे. या कार्यक्रमांतून होणारे सांस्कृतिक संक्रमण दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. 

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या विस्तारासाठी आपले जाळे जगभरातील विविध देशांमध्ये पसरवित आहेत. आपली उत्पादने विकण्यासाठी त्यांना जगातील विविध भाषांची मदत घ्यावी लागते. यासंदर्भातील सर्वपरिचित उदाहरण म्हणून मोबाईल क्रांतिनंतर दूरचित्रवाणीवरील विविध जाहिराती पाहता येतील. "आयडिया'ने भारतातील भाषिक प्रश्‍नांवरच स्वत:च्या जाहिराती विकसित केल्या आहेत. त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक काळात विकासातील भागीदार म्हणून भाषा आणि अनुवादाकडे पाहिले जाते. 

अनुवादप्रक्रियेमुळे संस्कृती परिचय वाढतो. भिन्न भाषिकांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होते. परस्परांचा परिचय वाढतो, नवे अनुभवविश्व प्राप्त होते. यासंदर्भाने मराठीत इतर भाषांमधून भाषांतरित होऊन आलेले साहित्य विचारात घेता येईल. शरदबाबू, रवींद्रनाथ टागोर यांचे बंगाली लेखन, शिवराम कारंत, यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, गिरीश कार्नाड यांचे कन्नड साहित्य, शेक्‍सपिअरची नाटके, तसलिमा नसरीन यांचे बांग्लादेशी साहित्य मराठीत अनुवादित झाल्याने नवे अनुभवविश्व आणि विविधांगी संस्कृतीचा परिचय आपण अनुभवतो आहेच. अनुवादाविषयी विविध मतप्रवाह आणि मतभिन्नता दिसते. तथापि अनुवादाचे वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक महत्त्व आता सर्वमान्य झाले आहे. 

अनुवादाविषयीचा सकारात्मक विचार खूप अगोदरपासूच दिसतो. त्याचेच फलित म्हणून 1850 ते 1885 या कालखंडाकडे पाहता येते. या कालखंडाला मराठी साहित्यात "भाषांतरयुग' म्हटले जाते. या काळात भाषांतरित साहित्याच्या माध्यमातून जगाकडे पाहाण्याची एक नवी खिडकी येथील नवशिक्षितांना प्राप्त झाली. त्यामुळे या कालखंडामध्ये मराठीतील लेखक अनेक नव्या वाङ्‌मयप्रकारांमध्ये लिहू लागले. परंपरेला छेद देणारा विचार करू लागले. मराठी साहित्याच्या आजच्या वाटचालीलाही एकप्रकारे या कालखंडात इंग्रजी साहित्याशी येथील लोकांचा झालेला परिचय आणि त्यातून मोठ्या प्रमाणात झालेले भाषांतराचे काम हे आहे. अनेक प्रचलित वाङ्‌मयप्रकांच्या मुळाशी या कालखंडात झालेले भाषांतराचे काम आहे. बायबलसह पाश्‍चिमात्त्य साहित्याची भारतीय भाषांमधून झालेली भाषांतरे आणि प्राचीन भारतीय आर्ष महाकाव्यांबरोबरच अनेक ग्रंथांचे इंग्रजी भाषेमध्ये झालेल्या भाषांतरामुळे दोन भिन्न धर्म, समाज, संस्कृतीचा झालेला परिचय, त्यातून झालेले आदान-प्रदान आपण अनुभवतो आहोतच. भिन्न सांस्कृतिक-भाषिक पर्यावरणातील समाज जेंव्हा परस्परांशी संबंध प्रस्थापित करू पाहातात, तेंव्हा भाषांतरांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो आणि परस्परसंवादाची प्रकर्षाने निकड भासते तेंव्हा भाषांतराच्या प्रक्रियेला चालना मिळते. दोन परस्परभिन्न संस्कृती आणि भाषिक समाजांमध्ये संवाद प्रस्थापित होण्यासाठी भाषांतर पुलासारखे काम करते. 

अनुवाद, भाषांतर आणि रूपांतर हे शब्द अनुवादप्रक्रियेसंदर्भात वापरात असलेले दिसतात. भाषांतर चर्चेत हे शब्द खूपच सैलसर अर्थाने वापरले जातात. या तिन्ही प्रक्रियांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच प्रकारचे असले तरी, कार्यपद्धती आणि उद्दिष्टपूर्तीची सिद्धता मात्र भिन्न असते. बऱ्याच वेळा हे शब्द परस्परांचे पर्यायी शब्द म्हणून वापरले जातात. याचे कारण या संकल्पना परिचित नसणे व विशेषत्वाने रुजलेल्या नसणे हे आहे. मराठीमध्ये या अभ्यासक्षेत्राची पुरेशी सैद्धांतिक चर्चा दिसत नाही. आपल्याकडे अनुवादाची सैद्धांतिक चर्चा नाही, याचे कारण भालचंद्र नेमाडे आपल्या मानसिकतेमध्ये शोधतात. ते म्हणतात, "भाषांतरासारखे किचकट, वैतागजन्य आणि मेहनतीचे व या सर्वांच्या प्रमाणात अत्यंत कमी फायद्याचे काम आधीच बाजारी वाङ्‌मयीन जगात फारसे प्रतिष्ठेचे नाही. चांगले भाषांतर करण्यापेक्षा भिकार निर्मिती करणेच सर्वत्र महत्त्वाचे ठरते. भाषांतराचीचीही दशा तर भाषांतरावरील चर्चेचे जुजबी स्थान कां-हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे'. अर्थात भालचंद्र नेमाडे यांचे हे मत वाङ्‌मयीन कलाकृतींच्या भाषांतरासंदर्भात आणि भाषांतराच्या सैद्धांतिक मांडणीसंदर्भात आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रामध्ये भाषांतराचे काम झपाट्याने सुरू आहे. भिन्न भाषांवर प्रभुत्व मिळविलेले लोक अतिशय यांत्रिकपणे हे काम करताना दिसतात. प्रचंड मागणी असलेल्या दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, जाहिराती, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित आणि लोकप्रिय पुस्तकांचे अनुवाद जोराने सुरू आहेत. मागणी तसा पुरवठा हे तत्त्व समोर ठेवून हे काम चाललेले दिसते. येथे भाषिकसामर्थ्यांचा, भाषेच्या विविध अंगांचा विचार फारसा गांभीर्याने होताना दिसत नाही. यासंदर्भातील एक छोटे उदाहरण पाहाता येईल. सुधा मूर्ती यांच्या "वाइज अँड अदरवाइज' या पुस्तकाची अर्पणपत्रिका "For the 'shirtless people of India' who have taught me so much about my countryं' अशी आहे. या पुस्तकाच्या मराठी भाषांतरात लीना सोहनी यांनी अर्पणपत्रिकेचे भाषांतर "अंगात सदरा नसलेल्या ज्या माझ्या देशबांधवांनी मला शिकवलं... की माझा देश काय आहे...त्यांना अर्पण' असा केलेला आहे. वास्तविक "अंगावर पुरेसा कपडाही नसलेल्या ज्या गोरगरीब लोकांनी मला शिकवले की माझा देश काय आहे. त्यांना अर्पण..' असा केला असता; तर तो अधिक समर्पक झाला असता. असे शब्दश: होणारे भाषांतर, भाषेला असलेल्या सामाजिक संदर्भांची न राखलेली बूज ही सर्रास पाहायला मिळणारी बाब आहे. अनुवादाचे एक सांस्कृतिक महत्त्व असते, ही बाब प्रत्येक अनुवादात विचारात घ्यायला हवी. अनुवादाची ही बाजू भारतापेक्षा पाश्‍चात्त्य देशांना खूप अगोदर समजलेली आहे. पंचतंत्रातील गोष्टी सहाव्या शतकातच हिंदुस्थानातून युरोपभर पसरल्याचे म्नॅसम्युलर यांनी शोधून काढले आहे. अनुवादाची अशी प्राचीन उदाहरणे पाहिल्यास अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व युरोपियन राष्ट्रांनी खूप पूर्वीच ओळखले होते हे ध्यानात येते. 

भाषा अनेक वर्षांची परंपरा स्वत:मध्ये मुरवून घेऊन नदीप्रमाणे वहाती असते. त्यामुळे अनुवादाच्या प्रक्रियेत काही प्रश्‍न उभे राहातात. मराठी भाषेच्या संदर्भात हातावर तुरी देणे, शेंडीला गाठ मारणे, एका माळेचे मणी असणे, सटवाईची अक्षरे, हळद लागणे, हळद काढणे, इंगा फिरवणे, उदक सोडणे इत्यादी वाक्‍यप्रयोगांचे भाषांतर कसे करायचे हा मोठाच प्रश्‍न असतो. "कपिलाषष्ठीचा योग' या वाक्‍यप्रयोगाचा "A very rare apportunity' किंवा "पगडी फिरवणे' चे " To turn apon angrily' असे कले जाणारे भाषांतर मराठी भाषिकाला अपेक्षित अर्थ देईलच असे नाही. त्यामुळे भाषाभ्यासकाला, अनुवादकाला लक्ष्य आणि मूळ भाषांना असलेली सामाजिक-सांस्कृतिक संदर्भाची सूक्ष्म जाण महत्त्वाची आहे. त्यासाठी अनुवादकाला करावी लागणारी पूर्वतयारी महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर त्याचा व्यासंग, दृष्टिकोण, भूमिका, मूळ आणि लक्ष्य भाषेवरील त्याचे प्रभुत्व, या भाषा बोलणाऱ्या लोकांची, त्यांच्या राहाणीमानाची, विचारसरणीची किमान ओळख इत्यादी बाबी ही प्रक्रिया नैसर्गिक-स्वाभाविक होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 

( लेखक शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत) 
Email : nandkumarmore@ymail.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com