सर्वहारांच्या चळवळीतला रणमर्द

एनडी गेल्यानं आवाज नसलेल्या-सर्वहारा घटकांना आपलं कोणीतरी सख्खं गेल्याचं दुःख होतं
dr n. d. patil
dr n. d. patilsakal
Summary

एनडी गेल्यानं आवाज नसलेल्या-सर्वहारा घटकांना आपलं कोणीतरी सख्खं गेल्याचं दुःख होतं

ए न. डी. सरांनी कधीतरी त्यांच्या आवडीच्या कवितेच्या ओळी सांगितल्या होत्या, ती कविता रॉबर्ट फ्रॉस्टची,

Two roads diverged in a wood, and I -

I took the one less traveled by,

And that has made all the difference

त्यांनी निवडलेला रस्ताच त्यांचे वेगळेपण सांगणारा होता. एन. डी. राजकारण, समाजकारणात वेगळ्या वाटेचे प्रवासी होते. ती वाट त्यांनी स्वतःहून निवडली. एकदा निवडलेल्या मार्गावर त्याचे परिणाम काही होवोत, ते चालत राहिले. निवडणुकांगणिक झेंडा, नेता आणि पक्ष बदलण्याच्या काळातही अविचल निष्ठा ठसठशीतपणे दिसणारी. ती दुर्मिळ होती... आहे म्हणूनही त्याचं प्रतिनिधीत्व करणारे एनडी आता नसणार, हे अधिक तीव्रतेनं जाणवणार.

वेगळी वाट तारुण्याच्या जोशात निवडणं सोपं, पण ती आयुष्यभर तुडवणं कठीण. एनडी गेल्यानं आवाज नसलेल्या-सर्वहारा घटकांना आपलं कोणीतरी सख्खं गेल्याचं दुःख होतं, ते या वेगळ्या वाटेवरच्या प्रवासामुळं. एक नेता, कार्यकर्ता, एक बुद्धिमंत गेला इतकंच एन. डीं.च्या जाण्याचं स्वरूप उरत नाही. अनेकांना आपल्या जगण्यातलं काही गमावल्यासारखं वाटतं, ते या वेगळ्या वाटेच्या प्रवासामुळं. काय होती ही वेगळी वाट? ती अनेकदा प्रवाहाच्या विरोधात, सत्तेवर- अधिकाराच्या पदांवर असलेल्यांच्या, तर बहुतेक वेळा विरोधातच होती.

ती धर्माच्या ठेकेदारांच्या विरोधात होती, ती शोषणाची व्यवस्था टिकवू पाहणाऱ्यांच्या विरोधात होती, अमर्याद भांडवलशाहीच्या विरोधात होती, ती विषमतेच्या भिंती घट्ट करू पाहणाऱ्यांच्या विरोधात होती, ती समाजाला जागं करण्यासाठीची होती. ज्या समाजाला त्याचं हित कशात, हे पटवून देणंही सोपं नव्हतं. इतकंच नाही, तर काही वेळा ही वाट आपल्याच माणसांच्या, त्यांच्या भावनांच्या विरोधातही जाणारी होती. या मार्गावरची प्रत्येक लढाई विषम होती. अमर्याद साधनं विरुद्ध अविचल विचारनिष्ठा असंच त्याचं स्वरूप बहुधा असायचं. अशा लोकचळवळींच्या लढाईत हयातभर पंचहत्यारं घेऊन तळपत राहिलेला रणमर्द म्हणून एनडी सर कायमचे नोंदले गेले आहेत.

एन.डी. अनेक अर्थांनी वेगळे होते. सार्वजनिक व्यासपीठांवर सुधारकी गप्पा मारल्या तरी व्यक्तिगत जीवनात रुढी परंपरांचं जोखड सहजी चुकत नव्हतं. अशा काळात ते आपल्या घरचा हौद दलितांना खुला करीत होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत इंग्रजांच्या दमनशाहीला न जुमानता मोर्चा काढत होते. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात त्याचं वैचारिक भरण-पोषण होत असताना डाव्या विचारांकडं ते आकृष्ट होणं स्वाभाविक होतं. ही त्यांनी निवडलेली आणखी एक वेगळी वाट.

कामगारकेंद्री डावा विचार शेती व्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेत ते ओढले गेले. शेतकरी कामगार पक्षाचे पाईक झाले. त्या काळात शेतकरी कामगार पक्ष हा तरुणांना आदर्शवाद देणारा, प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं बळ देणारा होता. एका बाजूला सर्वदूर प्रभाव असलेली काँग्रेस, दुसरीकडे वैचारिक आर्थिक पर्याय देऊ पाहणारे डावे. यात डावाच; पण मातीशी अधिक नाळ जडलेला शेकापचा प्रवाह स्वीकारणं हे वेगळा रस्ता निवडणंच होतं. पुढे पक्षाचे अनेक मोठे नेते बाहेर पडले. महाराष्ट्रातील बेरजेचं राजकारण नावाच्या प्रकरणानं या पक्षावर अनेक आघात केले. त्या प्रवाहात एनडी सहजपणे मिसळू शकले असते. त्यांनी जाणीवपूर्वक दुसरा रस्ता निवडला. त्याच पक्षात राहण्याचा, सत्यासाठी संघर्ष करायचा. एनडी इतरांहून इथे वेगळे होते.

मुळात ज्यांच्याकडं काहीच नाही अशा ‘नाही रे’ वर्गासाठी कसलीच अपेक्षा न ठेवता लढत राहणं हाच वेगळा रस्ता. सार्वजनिक जीवनातील चारित्र्य, नीतिमत्ता आणि विचारनिष्ठा याबाबतीत ते वेगळ्या वाटेचे प्रवासी राहिले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलने अनेक होतात. एन. डी. पाटलांनी तर आयुष्यभर आंदोलनं केली. ते असतील तिथं आंदोलनाला, त्यातल्या मागण्यांना आणि प्रसंगी कराव्या लागणाऱ्या तडजोडींनाही नैतिकतेचं अधिष्ठान होतं. त्यांचा सहभाग असलेल्या आंदोलनांच्या हेतूबद्दल कधी कुणाला बोट दाखविता आलं नाही. ते वेगळ्या वाटेचे प्रवासी होते. १९७२ च्या आंदोलनात त्यांच्यावर पोलिसांनी भयंकर लाठीमार केला.

आंदोलकांवरील गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. त्याआधी वयाच्या १६ व्या वर्षी ते पहिल्यादा तुरुंगात गेले. दारूच्या दुकानाला विरोध केला म्हणून लाठीहल्ला असो की अनेक वेळचा तुरुंगवास. एनडी डगमगले नाहीत किंवा राजकीय करिअरसाठी या बाबींचा मेडलसारखा वापरही त्यांनी केला नाही. जी भूमिका पटली, त्यासाठी कर्तव्यबुद्धीनं उभे राहिले, इतकीच त्यामागची त्यांची भावना. हे एनडींचं वेगळेपण. ते विधान परिषदेवर आमदार झाले, विधानसभेवर आमदार झाले, मंत्रीही झाले. तिथंही वेगळी वाट चोखाळत राहणं सुटलं नाही.रयत शिक्षण संस्था हा एन.डींच्या जीवनकार्याचा भाग होता. व्यावसायिक अभ्यासक्रमांपासून संस्थेला दूर ठेवत शिक्षणप्रसाराचं, गुणवत्ता वाढीचं मूलभूत काम ते करीत राहिले. ते करताना शिक्षकांची, शिक्षण क्षेत्रातील ध्येयवेड्या कार्यकर्त्यांची एक फळीच त्यांनी उभी केली.

एन.डीं.ना बराच काळ आजारपणानं ग्रासलेलं होतं. एक प्रदीर्घ इनिंग ते खेळले होते. ते अशावेळी गेले, जेव्हा त्यांच्यासारख्या विचारनिष्ठ कृतिवंतांची कधी नाही इतकी गरज आहे. समाजातील ज्या प्रकारच्या फुटीविरोधात ते कायम शड्डू ठोकून उभे राहिले, ती अधिक गडद होते आहे. तशी व्हावी असे वाटणारे बळजोर होत आहेत. सर्वसमावेशकता आणि बहुसंख्याक वादातील लढाईला तोंड फुटले आहे. अशावेळी आपल्या नैतिकतेच्या आणि घटनादत्त मूल्यांवरील निष्ठेच्या बळावर प्रतिगामी प्रवाहाला भिडण्याची क्षमता असलेल्या एन.डीं.चं जाणं हा मोठाच झटका आहे. या लढाई करणाऱ्यांना त्यांची आठवण येत राहील, जिथं-जिथं कष्टकरी, शोषित, पीडितांसाठी आवाज उठवण्याची वेळ येईल, तिथं एन.डी. आठवत राहतील. कारण त्यांनी निवडलेली वेगळी वाट! अशी वेगळी वाट निवडण्याचं धाडस असलेल्या आणि किंमत मोजूनही त्याच वाटेवर चालण्याचीच जिद्द असणाऱ्या लढवय्याला सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com