तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारा नेता

दुसरीकडे काँग्रेस स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत महत्त्वाचे काम करणारा पक्ष होता.
sharad pawar
sharad pawarsakal

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात जवळपास ६५ वर्षांहून अधिक काळ आपली विचारधारा कायम ठेवून समाजातील उपेक्षित, कष्टकरी व लहान लोकांच्या जीवनाशी समरस होणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय डॉ. एन. डी. पाटील होय. राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक महत्त्वाकांक्षा असतात; पण त्या पूर्ण करताना आपल्या तत्त्वाशी आणि भूमिकेशी कधीही तडजोड करायची नाही, हा विचार त्यांनी शेवटपर्यंत तडीस नेला. त्यांच्या निधनाने सीमावासीय पोरके झाले आहेत.

डॉ. पाटील यांची कारकीर्द बघितली तर त्याचे दोन भाग करता येतील. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते. हा पक्ष एकेकाळी महाराष्ट्रात प्रभावी विरोधी पक्ष होता. दुसरीकडे काँग्रेस स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत महत्त्वाचे काम करणारा पक्ष होता. त्या पक्षाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटक स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि काँग्रेस विचारावर आधारित राज्य शासन सत्तेवर आले. त्यांची एकत्रित ध्येय धोरणे बघितली तर कष्टकरी, शेतकरी, सामान्यांच्या हिताची जपणूक करणारे होते. हा वर्ग ज्या काँग्रेसच्या एकंदरीत धोरणावर अस्वस्थ होता. त्या अस्वस्थतेतूनच त्यांची व्यथा काँग्रेसमध्ये मांडण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यातून पुरोगामी विचाराच्या वेगळ्या संघटनेची गरज वाटू लागली आणि त्यातून नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथे अशा नाराज काँग्रेसजनांची बैठक झाली. त्यात केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख, भाऊसाहेब राऊत, अण्णासाहेब गव्हाणे, उद्धवराव पाटील यांनी एकत्र येऊन उद्याच्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या राजकारणाची दिशा काय असावी यावर प्रबंध लिहला. हाच प्रबंध पुढे दाभाडी प्रबंध म्हणून पुढे आला.

या नव्या विचारधारेमुळे काँग्रेसमधून काही लोक बाहेर पडले. त्यांनी कष्टकरी, शेतकरी, सामान्यांच्या प्रश्‍नावर भर देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. राज्यातील १९५२ व ५७ च्या विधानसभेच्या निवडणुका या पक्षाने लढवल्या. या दोन्हीही निवडणुकीत महाराष्ट्रात या पक्षाला विशेषतः ग्रामीण भागात चांगले यश मिळाले. त्यात कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा, नगर, ठाणे, रायगड, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यात या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला. विधानसभेत शेकापच्या नव्या पिढीच्या नेतृत्वाची फळी उभी राहीली. त्यामुळे काही तरुण नेते या पक्षाकडे आकर्षित झाले, त्यात डॉ. एन. डी. पाटील यांचा समावेश होता. या पक्षात अनेक नवे नेतृत्व तयार होत असताना त्यात एन. डीं. चे नेतृत्व प्रभावी होते. हीच विचारधारा त्यांनी शेवटपर्यंत जपली, कधीही पक्षांतर केले नाही.

या तत्त्वाशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यातून विधानसभेत एकदा व विधानपरिषदेत दोनवेळा त्यांना संधी मिळाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रभावी कामाच्या बाबतीत एन.डींचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. संसदीय प्रश्‍नावरही त्यांची पकड होती. विधिमंडळात प्रभावीपणे मांडणी करणारे म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. हे करत असताना त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा किंवा आततायीपणाची भूमिका न घेता कोणत्याही प्रश्‍नाचा अभ्यास करून त्याची सखोल मांडणी करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. त्याच पद्धतीने ते आयुष्यभर काम करत राहिले.

माझ्या नेतृत्वाखाली राज्यात १९७८ मध्ये पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन झाले. त्यात त्यावेळच्या राजेंद्रप्रसाद यांचा जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी पक्ष सहभागी झाले होते. याशिवाय राजारामबापू पाटील यांच्यासारखे काँग्रेस विचारांचेही लोक होते. या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद घ्यावे, अशी माझी इच्छा होती. एस. एम. जोशी व इतरांनीही त्यांना हे सांगितले. ही सूचना स्वीकारून त्यांनी सहकार खात्याची जबाबदारी स्वीकारली. मंत्रिमंडळात काम करताना त्यांनी दोन गोष्टीवर अधिक लक्ष दिले.

त्यात शेतकऱ्यांना शेतमालाच्या उत्पादनावर आधारित दर मिळाला पाहिजे, यासाठी ते आग्रही राहिले. त्यासाठी त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले. खानदेश, मराठवाडा व विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी कापूस एकाधिकार योजना पुनर्जिवित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. या सर्व भागात रात्रभर मार्केटमध्ये फिरून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो का?, याची खात्री ते करत. पुणे येथे शहराच्या मध्यवस्तीत शेतमालाची विक्री होत होती, मात्र ही जागा अपुरी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता. यावर व्यापाऱ्यांचा विरोध पत्करून पुणे-सातारा महामार्गाजवळ बाजार समितीसाठी नवी जागा निवडली. दिवसभर मंत्रालयात काम करायचे आणि रात्री उशिरापर्यंत याठिकाणी येऊन या कामाची पाहणी करायची असा त्यांचा दिनक्रम राहिला. यातून बाजार समिती उभी केली.

त्यांची विचारधारा ही शासनाने दिलेल्या अधिकारातून प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा उपयोग केला. शेतकऱ्यांचा वीज प्रश्‍न असो किंवा शेतमालाला भाव मिळण्याचे आंदोलन असो यासाठी त्यांनी योग्य व आग्रही भूमिका मांडली. महाराष्ट्राची निर्मिती झाली; पण सीमा भागातील मराठी भाषकांना न्याय मिळाला नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातही एन. डी. पाटील सीमावासीयांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्या जाण्याने सीमा भागातील मराठी भाषकांचा आधार हरपला आहे. सीमावासीयांच्या अंतःकरणात हे दुःख नक्कीच असेल.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवणारे नेतृत्व शिक्षण क्षेत्रात एन. डी. पाटील यांच्या रूपाने उभे राहिले. ते कर्मवीरांचे लाडके विद्यार्थी होते. कर्मवीरांचे विचार सर्वत्र गेले पाहिजेत, यासाठी ते अखेरपर्यंत झटत राहिले. रयतच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करण्याचे काम त्यांनी आपल्या कृतीतून केले. त्यासाठी उभे आयुष्य खर्ची घातले. रयतच्या कौन्सिलचे ते अनेक वर्षे सदस्य होते. हे ज्ञानदान कसे विस्तारेल, नवी पिढी कशी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठीचे एन. डी. यांचे योगदान विसरता येणार नाही. रयतच्या महाविद्यालयात त्यांनी अध्यापक म्हणूनही काम केले. आता त्यांच्या जाण्याने रयतचा एक बलवान आधारवड गेल्याने आम्ही पोरके झाले आहोत. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची विचारधारा, सामान्य माणसाविषयी असलेली त्यांची बांधिलकी, कर्मवीरांच्या विचारावर असलेली त्यांची निष्ठा आम्हाला अखेरपर्यंत मार्गदर्शक राहील, याचा मला विश्‍वास आहे.

आमच्या दोघांच्याही विचारधारा वेगळ्या पण, त्याचा कौंटुबिक संबंधांवर कधी परिणाम झाला नाही. वैयक्तिक काम वेगळे आणि कुटुंब वेगळे, हीच त्यांची भूमिका राहीली, त्याच्याशीही त्यांनी कधी तडजोड केली नाही. मी घर चालवण्यासाठी काही करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच घरी सांगून ठेवले होते. आपल्याला मिळणारे वेतन ते कष्टकरी, शेतकरी यांच्या मुलांवरील शिक्षणासाठी खर्च करून लागले, पण त्यामुळेही कधी कौटुंबिक कटुता निर्माण झाली नाही. एक दिवस इस्लामपूर येथे शेतकरी प्रश्‍नावर एन. डी. यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यावेळी मी राज्याचा गृहमंत्री होतो. या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या पुतण्याचे निधन झाले. त्यांचा पुतण्या हा नात्याने माझा भाचाच. त्यावेळी ते विरोधी पक्षाचे नेते म्हणून सभागृहात होते. दुसऱ्या एका विरोधी पक्षाच्‍या नेत्यांनी सभागृहात माझी अवहेलना ‘कंस मामा’ म्हणून केली, पण स्वतःचा पुतण्या गोळीबारात गेला असून त्यांनी माझ्यावर कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.

सरकार आणि गृहमंत्री यांच्या धोरणावर त्यांनी टीका करून आपला मुद्दा विधिमंडळात व्यवस्थित मांडला. रयत शिक्षण संस्थेत आम्ही एकत्र काम करत होतो. तिथे कधीही आतापर्यंत निवडणुका झालेल्या नाहीत. पहिल्यांदा ‘रयत’ चे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली, तर चेअरमनपदाची जबाबदारी एन. डी. यांच्यावर सोपवण्यात आली. कै. चव्हाण यांच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील अध्यक्ष झाले. वसंतदादा पाटील हयात असेपर्यंत या संस्थेचे अध्यक्ष राहीले, त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्यावर आली. रयतच्या अध्यक्षांचे मार्गदर्शन घेऊन प्रशासकीय कामात त्यांची भूमिका येईल असाच दृष्टिकोन चेअरमन या नात्याने एन. डी. यांनी आयुष्यभर जपला. त्यांच्या निधनाने केवळ पुरोगामी चळवळीचेच नव्हे तर राज्यातील तमाम कष्टकरी, शेतकरी व सामान्यांबरोबरच सीमावासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

(शब्दांकन : निवास चौगले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com