सिनेमा-नाटकांचे आधेअधुरे जग

एका चित्रपटात काही आक्षेपार्ह दृष्यं होती. ती पाहण्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी होत होती. तेव्हा आम्ही ठरवलं की, चित्रपटाविरोधात निदर्शनं करायची... तेव्हा एक लक्षात आलं की, कलेचं विश्लेषण करणं योग्य आहे.
cinema drama entertainment
cinema drama entertainment sakal

एका चित्रपटात काही आक्षेपार्ह दृष्यं होती. ती पाहण्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी होत होती. तेव्हा आम्ही ठरवलं की, चित्रपटाविरोधात निदर्शनं करायची... तेव्हा एक लक्षात आलं की, कलेचं विश्लेषण करणं योग्य आहे; परंतु त्याबाबत हुकूमशाही करावी, असं कधीच वाटत नव्हतं. म्हणून आम्ही निदर्शनांपासून थोडं लांबच राहिलो. नवीन बदल घडवण्यासाठी काही प्रश्न निर्माण केलेले असावेत. त्यांची चुकीची उत्तरं देण्यापेक्षा काही प्रश्न अनुत्तरीत सोडले तरी चालेल.

महिलांविषयी बोलताना किंवा विशेषतः माध्यमांशी संबंधित चर्चा सुरू झाली की, त्याचं करण्यात आलेलं वर्णन नेहमीच एक वादग्रस्त मुद्दा राहिला आहे. एक तर, स्त्रीच्या छळाच्या कथा व त्यावरील नाटकं, व्यसनाधीनतेमुळे तिच्या जीवाचे होणारे हाल, बालविवाहाच्या विरोधातील ‘संगीत शारदा’सारखं नाटक इत्यादी मुद्द्यांवरून बरीचशी जागृतीही झालेली आहे.

त्याचबरोबर विशेषतः काही चित्रपट आणि नाटकांत स्त्रीच्या अत्याचाराला, तिच्यावर होणाऱ्या जुलमांना आणि तिच्याविरुद्ध होणाऱ्या आरोपांना कुठे तरी समाजाचा पाठिंबा मिळतो काय, अशी शंका वाटावी, अशा प्रकारचं चित्रणही केलेलं दिसतं.

विशेषतः आजही काही नाटकं आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं की, जेव्हा एखादी स्त्री दुष्कृत्यं करत असते तेव्हा तिला होणारी मारहाण किंवा तिच्या श्रीमुखात भडकावल्याचा सीन असेल तर टाळ्यांचा कडकडाट होतो. त्या काळात शिकलेली व अशिक्षित बायको अशा थीमवर काही नाटक-सिनेमे होते.

नाटकांमध्ये तर पाहायला मिळतं की, शिकलेली महिला पतीला गुलाम करण्याचा प्रयत्न करते; पण शेवटी तो तिला चाबकाने मारतो आणि सरळ करतो... मग सगळे प्रेक्षक खूश होऊन जातात. अशी थीम किंवा असं सूत्र नेहमीच होतं.

आजही आपण असं टीव्हीवरील मालिकांमध्ये पाहतो. बऱ्याचदा उकळत्या तेलात हात घालणं, भाजलेल्या वस्तूवरून चालायला लावणं, हाताला धरून घराबाहेर काढणं, तेल आणि पाणी टाकणं जेणेकरून ती स्त्री घसरून पडेल इत्यादी प्रकारची हिंसा अत्यंत बोथटपणे किंवा निगरगट्ट म्हणता येईल अशाप्रकारे दाखवलेली आपल्याला दिसून येते. त्याला दुर्दैवाने चांगला टीआरपी म्हणजे प्रेक्षक वर्गही मोठा मिळतो, असंही चित्र दिसतं.

मला १९९० चा काळ आठवतो. तेव्हा ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘सत्यम शिवम सुंदरम’ नाव ठीक असलं तरीसुद्धा त्यात नायिकेच्या देहाचं प्रदर्शन करणारं चित्रण दाखवण्यात आलं होतं. ते दृष्य पाहण्यासाठीच प्रेक्षकांची गर्दी होत होती. तेव्हा आम्हा स्त्रियांच्या संघटनांची एक कृती समिती होती. ती आजही काही प्रमाणात कार्यरत आहे.

संघटनेच्या स्त्री आंदोलन संपर्क समितीने आणि सर्वांनी मिळून ठरवलं की, ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटाविरुद्ध जाऊन निदर्शनं करायची. मला स्वतःला एक लेखिका म्हणून हा अश्लीलतेचा प्रश्न व त्यातील सगळी गुंतागुंत पाहिली तर नेहमीच वाटत आलेलं होतं की, तो अत्यंत सापेक्ष विषय आहे. दुसरं म्हणजे, जे पूर्वीच्या काळात लोकांना आक्षेपार्ह वाटायचं त्यात काही वर्षांनी त्यांनाच आक्षेप घेण्यासारखं वाटत नाही.

स्त्रीच्या अत्याचाराचं व्यापारीकरण करण्यासाठी केलेलं चित्रण कुठलं हे ठरवणं अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठी संवेदनशील दिग्दर्शक, त्याचबरोबर अत्यंत प्रभावी अभिनेत्री किंवा अभिनेता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या चित्रपटाचा आशय अन् त्या कलाकृतीचा शेवट अशा अनेक गोष्टींच्या समीकरणावरही ते अवलंबून असतं. कलेच्या क्षेत्रात आपण अशा अपेक्षा ठेवणं इथपर्यंत योग्य आहे.

विश्लेषण करणंही योग्य आहे; परंतु कलेला आदेश देणं, कला कशी असावी, याबद्दल इतरांनीच कला क्षेत्रातल्या मंडळींना अथवा नागरिकांनीही तशी हुकूमशाही करावी, असं मला कधीच वाटत नव्हतं. त्यामुळे आम्ही त्या निदर्शनांपासून थोडं लांबच राहिलो. आम्ही सगळ्या संघटनेतील महिलांना म्हटलं की, तुम्ही ठरवा जायचं की नाही... सर्व जणींचा आक्षेप होता की, आपण कलाकृतीच पाहिली नाही तर विरोध कसा करायचा?

मग कलाकृती बघायला गेलो तरीही पंचाईत. काही जण म्हणतात की, तुम्ही ज्या कलाकृतीवर आक्षेप घेत आहात ती मोफत पाहण्यासाठीच तुमचं कारस्थान आहे काय? कलाकृती पाहिली तरी पुढचा-मागचा संदर्भ सांगा म्हटलं तरी प्रश्न येतो की, त्यात सुरुवातीला आणि नंतर काय दाखवलं आहे... हे बघून आणि अर्थ समजून त्याच्याबद्दलचे प्रश्न पुन्हा अजून गुंतागुंतीचे होतात.

साहजिकच आमच्या सदस्यांपैकी बऱ्याच जणींचं असं म्हणणं पडलं की, निदर्शनांमुळे सिनेमाची प्रसिद्धी होईल आणि त्यामुळे न जाणं चांगलं. इतर महिला संघटनांना तो विषय अश्लीलतेचा व्यापार म्हणून महत्त्वाचा वाटला होता. त्याच्यात आमच्या एक-दोन कार्यकर्त्या गेलेल्या होत्या.

चित्रपटाविरोधात ठिकठिकाणी निदर्शनं झाली तेव्हा त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तो डब्यात गेला असता; परंतु प्रसिद्धीमुळे त्याला गर्दी वाढायला लागली. ‘त्या’ दृश्याची जाहिरात झाली. कशासाठी निदर्शनं झाली हे प्रेक्षक बघतानाही कोणीतरी विरोध केला एवढाच संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो. कारण चित्रपटांना जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी त्या निदर्शनांना मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे हे अशा प्रसंगातून एक चांगलं निरीक्षण आमच्यासमोर आलं.

दुसरं एक लक्षात आलं की, चित्रपट-नाटकावर अशी चर्चा करणं गरजेचं आहे की त्यातून काय संदेश मिळतोय... फक्त निदर्शनं करून त्यातून काही मार्ग निघणार नाही. कारण लेखकाने कोणत्या भूमिकेतून ते लिहिलेलं आहे याची आपल्याला तेवढी कल्पना नसते.

‘हॉस्टेल गर्ल’ नावाचं असंच एक नाटक तेव्हा आलं होतं. नाटकाचा विषय होता हॉस्टेलमध्ये राहणारी एक मुलगी उशिरापर्यंत भटकत असते. गुपचूप त्यातून मार्ग काढत असते, कारण तिचं हॉस्टेलच्या वॉचमनशीच लव्ह-अफेअर दाखवलं होतं... त्यातून आम्हाला एक जाणवलं की, अशी नाटकं व्हायला लागली तर पालक मुलींना शिक्षणासाठी कसं काय पाठवतील? स्त्री-स्वातंत्र्य तर दूरच राहील!

मग आम्ही संबंधित लेखक आणि दिग्दर्शकांना पत्र पाठवून भेटायला बोलवलं. निदर्शनं करण्यापेक्षा तुमचा हेतू काय आहे? असं नाटक करताना तुम्हाला वाटत नाही का की, मुलींच्या शिक्षणावर अशा गोष्टींमुळे विपरीत परिणाम होऊ शकेल, अशा काही मुद्द्यांवर आम्ही संवाद साधायचं ठरलं. नाटकाच्या लेखकांचं म्हणणं होतं की, अशी घटना झालेली नसेल का? मग ते आम्ही सत्य दाखवायचं नाही का? सत्य तुम्ही दाखवायला पाहिजे हे बरोबर आहे.

एकूण किती हॉस्टेलमधल्या मुलींचं असं वॉचमनबरोबर प्रकरण झालेलं तुम्हाला दिसलं, असा प्रश्न आम्ही केला. एखाद्या प्रकरणावरून कसं काय ते प्रातिनिधिक करता येईल? आमच्या मुद्द्यांवर नाटकाच्या लेखकांचं म्हणणं होतं की, असं प्रातिनिधिक नसलं तरी ते सत्य असेल तर अपवादात्मक घटना म्हणून दाखवायचं नाही का? मी त्यांना म्हटलं, आमचेही मुद्दे परिणामाचे आहेत.

आम्ही तुमच्यासमोर ते मांडतोय, कारण आम्हाला ती चिंता वाटते. तुम्ही त्याच्यावर विचार करा... त्यानंतर मग ते लेखक आठ-दहा दिवसांनी मोठ्या उत्साहाने आम्हाला पुन्हा भेटायला आले. ते म्हणाले, ‘‘ताई आता आम्ही तुम्ही अगदी खूश व्हाल, असं नाटक लिहिलेलं आहे.’’ त्यानंतर ते नाटक संघटनांच्या मीटिंगमध्ये वाचलं. मीही ते तपशीलवार वाचलं तेव्हा हतबुद्ध झाले!

कारण आता त्यात दाखवलं होतं की, ती मुलगी समाजसेविका झालेली आहे आणि तो वॉचमन वारकरी दाखवला आहे. त्यांच्यात काहीही प्रेम वगैरे नाही; पण सगळे दादा-ताई असं संबोधताहेत! याला काय म्हणावं? असं वास्तव सगळ्या हॉस्टेलमध्ये तरी असेल का? तुमच्या एकांगी चित्रणाला आम्ही विरोध केला याचा अर्थ तुम्ही असं सगळं काल्पनिक काहीतरी दाखवावं असं नाही.

तुम्ही हॉस्टेलमधल्या मुलींचे जे काही प्रश्न असतील, तिथली व्यवस्था वा सुरक्षा याबाबत लिखाण का करू शकत नाही? आमच्या प्रश्नावर मग लेखक म्हणाले, ‘‘तुम्ही मला सांगा स्क्रिप्ट... नाहीतर तुम्हीच लिहा, मी त्यावर नाटक करतो!’

मला असा मुद्दा मांडायचा आहे की, कलात्मक आणि सर्जनशील अशा कलाकृतीवर आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो. समाजाचं प्रतिबिंब त्यातून हळूहळू स्पष्ट व्हायला लागतं. तशी नंतर अनेक नाटकं आणि सिनेमे आले. अगदी ‘उंबरठा’चं उदाहरण झालं. त्यानंतर ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ आहे.

अगदी ‘देवबाभळी’सारखी कलाकृती आहे. मीना नाईक यांनी केलेली ‘अभया’, ‘सातवी फ’ इत्यादींसारखी नाटकं असोत किंवा ‘बाई पण भारी देवा’सारखा चित्रपट असो... अनेक चित्रपट व नाटकं नंतरच्या गेल्या काही वर्षांमध्ये आली.

एका अर्थाने स्त्रीच्या बदलत्या प्रतिबिंबांचं आणि भावनांचं आरशासारखं चित्रण अत्यंत प्रभावीपणे समोर येताना आपल्याला दिसायला लागलं. हिंदीत ‘द पिंक’सारखा सिनेमाही आहे. आपण त्याला थोडंसं बटबटीत किंवा त्याच्यात काही त्रुटी म्हणू शकतो. तरीसुद्धा त्याच्यात बलात्कारासारखे मुद्दे दाखवलेले आहेत. ते पाहिल्यावर केवळ सनसनाटी करण्यासाठी तो चित्रपट केलाय, असं वाटत नाही. ॲसिड हल्ल्यासंदर्भातही बरेच चित्रपट नंतर आलेले आहेत.

आम्ही कलाकृतीकडे बघत असताना ती वास्तववादी असावी; पण त्याचबरोबर विचाराला प्रवृत्त करणारी असावी. नवीन बदल घडवण्यासाठी त्यांच्यात काही प्रश्न निर्माण केलेले असावेत. त्यांची चुकीची उत्तरं देण्यापेक्षा काही प्रश्न अनुत्तरीत सोडले तरी चालेल.

किंबहुना प्रश्नांचं स्वरूप समोर येण्यासाठी ती कलाकृती किती प्रभावीपणे माणसाच्या मनाच्या संवेदना छेडते हे महत्त्वाचं वाटतं. अशा प्रकारच्या कलाकृतीची अपेक्षासुद्धा आम्हाला अनुभवातून जाणवायला लागली आणि त्यामधून आमच्या कामादरम्यान चित्रपट-नाटक पाहणं आणि त्यावर चर्चा-संवाद करणं आमच्या कायमचा प्रबोधनाचा भाग ठरला.

neeilamgorhe@ gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com