श्रमिक महिलांच्या जगात

उदगीरमध्ये असताना हुसेनबी नावाची महिला नवऱ्याला घेऊन मला भेटायला आली. ती नवऱ्यावर फारच भडकली होती.
Women
Womensakal
Updated on

उदगीरमध्ये असताना हुसेनबी नावाची महिला नवऱ्याला घेऊन मला भेटायला आली. ती नवऱ्यावर फारच भडकली होती. घरात पैसे देत नाही, दारू पितो, लेकराबाळांचे काही करत नाही, असे ती तावातावाने सांगत होती. आनंद तिच्या नवऱ्याला एवढे दारू पिणे बरे नाही वगैरे, असे जमेल तेवढे समजावत होता.

त्यातच हुसेनबीने सांगितले, ‘शराब पिता है, पिच्चर देखता है, मै भी समझती हुं, लेकिन बोलता है अब दस रुपयेंका तिकट लेकर कॅबरे देखने जाएगा!’ या कॅबरेविरुद्धचा लढा, तिथल्याच महिलांच्या सोबतीने काढला, त्याची ही गोष्ट...

उदगीरला खादी ग्रामोद्योग केंद्रातील महिला कामगारांची माझी ओळख झाली. आमच्या नई आबादी परिसरातील एका मोठ्या शेडमध्ये शंभर-सव्वाशे महिला दिवसभर त्या हातमागांवर काम करत असायच्या. त्यात ३५-४० वयाच्या एकल महिला व त्यातही बऱ्याचशा मुस्लिम महिला होत्या. काही सांभाळायला घरी कोणी नव्हते म्हणून मुलांना घेऊन यायच्या. ती तान्ही बाळे जमिनीवरच चिटकुरावर कोपऱ्यात झोपलेली असायची.

११-१२ वर्षांच्या मुलीदेखील शाळेत न जाता आईला मदतीला येऊन चरखा चालवत असत. त्यांना दिवसाचे ६०-७० रुपये मिळत. कोणाची तरी कामगार युनियन होती; पण ती नावापुरती होती. खादी ग्रामोद्योग ही विश्वस्त संस्था असल्याने कायद्यानुसार कामगार संघटना स्थापन करणे योग्य नव्हते. म्हणून मग आम्ही चार-पाच जणींनी खादी हातमाग कामगार महिला संघटना तयार केली.

दर शुक्रवारी महिलांची गेट मीटिंग घेऊ लागले. त्यांना कमी पैशात दवाखान्याचेही महत्त्व वाटत होते. मुख्यत: आठ-नऊ तास हातमाग चालवून त्या थकून जात असत. त्यांच्यापैकी काही जणींचे पती सायकलरिक्षा चालवीत असत. उदगीरमध्ये ५००-७०० सायकल रिक्षा होत्या. त्यापैकी बहुतेक रिक्षात दोन माणसे व एक मूल बसत असे. पाच-सात रुपये दर असे. त्यातही माणसे घासाघिस करत.

सायकलरिक्षावाल्यांची युनियन आनंदने करायला सुरुवात केली होती. पोलिसांचा त्रास व दारूचे व्यसन हे या रिक्षावाल्यांचे मुख्य प्रश्न होते. पत्नी खादी हातमाग कामगार व नवरा रिक्षावाला अशा दहा-बारा जोडप्यांची आमची ओळख वाढली. आनंदने सायकलरिक्षावाल्यांचे सर्वेक्षण केले.

त्यात दिसून आले की, बरेचसे सायकलरिक्षावाले तीन-चार तास रिक्षा चालवून १५-२० रुपये मिळाले, की घरी पाच-दहा रुपये किंवा वस्तू आणून देत. पाच रुपयाची दारू व चार-पाच रुपयांचे जेवण करत. एका-दोन रुपये वाचवून रोज सिनेमा पाहणारेही बहुसंख्य होते. हे आम्हाला थोडे आश्चर्यकारक वाटले. लेकराबाळांना काही देण्यापेक्षा आजचा दिवस मजेत घालवायचा, हे त्यांना आवडत होते.

आम्ही हे सर्व पाहून काय करावे, हा विचार करत होतो. त्यातच हुसेनबी तिच्या नवऱ्याला घेऊन मला भेटायला आली. ती नवऱ्यावर फारच भडकली होती. घरात पैसे देत नाही, दारू पितो, लेकराबाळांचे काही करत नाही, असे ती तावातावाने सांगत होती. आनंद तिच्या नवऱ्याला एवढे दारू पिणे बरे नाही वगैरे असे जमेल तेवढे सांगत होता.

त्यातच हुसेनबीने सांगितले, शराब पिता है, पिच्चर देखता है, मै भी समझती हुं , मर्द है तो दिल बैलाने (बहेलाने) कु कुछ तो चाहिए। लेकिन हरामी बोलता है अब दस रुपयेंका तिकट लेकर कॅबरे देखने जाएगा! मैं तो मर गयी अल्ला, अब ईस ऊम्र के नंगे औरतों को देखने की पडी है!’’ मला काही कळेच ना!

मग डोळेकाकु, निटुरेकाकू, विजय चिल्लरगे, लहुजी सर्वांकडून कळले की आंध्र सीमेवरून एक फिरता कॅबरे करणाऱ्या मुलींचा खेळ येत असे. त्या नाचताना थोडे फार कपडे उतरवीत असत व ते पाहायला १५-२० हजार लोक जमत असत. चार-पाच दिवसांनी तो नाच होणार होता.

नवरा कॅबरेवर पैसे उधळतोय म्हणून वैतागलेल्या महिलांना एकत्र केले. काही जण म्हणत होते त्या स्वखुषीने नाचत आहेत, तुम्ही त्यांना अडवणाऱ्या कोण? तर काही म्हणत होते, तुम्ही त्या मुलींना खेटराने सडका! आम्ही यामध्ये बघ्या लोकांना आवाहन करायचे ठरवले. कॅबरेला परवानगी देऊ नका, असे पत्र मी पोलिस स्टेशनला दिलेच होते. पोलिसांचे म्हणणे होते की, आम्ही वर (एस.पी.) विचारतो.

उदगीरमधला हा पहिला महिलांचा सार्वजनिक हुंकार होता. पहिला मोर्चा होता. महिलांपैकी अनेक जणी मोर्चात यायला तयार होत्या. आमचे आवाहन व पत्रक फार भारी होते. पत्रकाचा मथळा होता, ‘नंगे नाचना बेशरमी है, लेकिन नंगे को देखना बडी बेशरमी है!’ थोडक्यात पैशांसाठी बायकांना कपडे काढायला लावून त्याचे जाहीर वस्त्रहरण पाहायला जाणाऱ्यांना आम्ही थांबवायचा प्रयत्न करत होतो.

संध्याकाळी चार-पाच वाजले. सर्व शहर स्वत:च्या घराच्या दारात उभे होते. मोर्चातील महिलांना पहायला! मी, कलावती, माझी कम्पाऊंडर दोन-तीन मध्यमवर्गीय युक्रांद कार्यकर्त्यांच्या पत्नी, भाग्यवती बजाज अशा चार-सहा जणी निघालो. पाहतो तर काय! खादी ग्रामोद्योग केंद्राच्या दारात ३०/४० बायका काम सोडून बाहेर आल्या होत्या.

मोर्चात सामील व्हायची वाट पाहत होत्या! ‘डागटरीन अपने लिये आयी है, हमारे लिए! हम कायकु रें पिछे रहेंगे? खड्डे में जाने दो मजुरी!’ असे म्हणून त्या बॅनर घ्यायला पुढे सरसावल्या.

मोर्चात मी पाहिले तर मला आश्चर्य वाटले, कारण त्यात काही पुरुषही होते. मी महिलांना विचारले की, हे कोण लोक आहेत? त्यावर हुसेनबी लाजली व म्हणाली, मेरा मरद है! कामगार महिलांचे भाऊ, वडील, मुले अशीही मोर्चात आली होती. आम्हा ४०-५० जणींचा मोर्चा चौकापर्यंत पोचला. एका सायकलरिक्षाला आम्ही भोंगा लावला होता. त्यावर आम्ही घोषणा देत होतो.

काही प्रेक्षक कॅबरेच्या कनातींकडे निघाले होते; पण स्वत:चा चेहरा रुमालाने झाकून आपण त्या बाजूला न जाता दुसरीकडेच बेमालूम जाऊ लागले. आमच्या मोर्चाला पाहायला १० ते १५ हजारांचा मॅाब जमत चालला होता. आता तणाव होऊन लोक आम्हा महिलांना धुडकावून कॅबरेला जाणार, असे वाटायला लागले होते. तेवढ्यात पोलिस इन्स्पेक्टर आले व आम्हाला सांगितले कॅबरेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे!

मोर्चा संपायच्या ठिकाणी आमचे युक्रांदचे सहकारी कार्यकर्ते आले होते. मनोहर हिबारे, आनंद करंदीकर, रंगा राचुरे, लहुजी गंगापुरे, गोविंद केंद्रे, विजय चिल्लरगे, शिवाजी गुरुडे, अशोक पुदाले, माधव कोणे असे अनेक जण तिथे होते. आम्ही सर्वजण फार खुष होतो. तालुकाभर महिलांच्या या मोर्चाची चर्चा होती. खादी ग्रामेद्योगमधील महिलांची कॉलर टाईट झाली होती. मोर्चात जाण्याला नावे ठेवणारे लोकही आमचे कौतुक करत होते!

त्या कॅबरेला परत कधीही परवानगीही मिळाली नाही, कोणी कंत्राटदाराने कॅबरे ठेवायचा प्रयत्नही केला नाही. किंबहुना महाराष्ट्राच्या हद्दीत तो प्रकार आणलाच गेला नाही. कालांतराने काही काळ खादी ग्रामोद्योग केंद्र बंद पडले. नंतर सुरू झाले; पण यांत्रिक हातमाग आले. काही काळ त्या कामगार स्त्रियाही मला भेटत होत्या. महिला कामगारांचे रजा व वेळेवर कामाचा मोबदला हे प्रश्न मार्गी लागले. या कामातून कामगारांचे प्रश्न व विश्व मात्र माझ्या अंतकरणाशी कायम जोडले गेले.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com