जन पळभर म्हणतील!

Rajkavi Bha. ra. tambe.
Rajkavi Bha. ra. tambe.esakal

रसिका! भा. रा. तांबे म्हणत, 'माझ्या सोबतीनेच माझी कविता विकसित होत आली आहे'. त्याचेच दर्शन या काव्यात घडते. तांब्याच्या काळी बहुतेक कवी वयाच्या तिशी चाळिशीच्या आसपासच इहलोक सोडून गेले होते. केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक, दत्तकवी, बालकवी एक ना अनेक. त्यामुळे वयाच्या ४९ व्या वर्षीच कवीला मृत्यू अन् मरणाच्या कल्पना येऊ लागल्या. ज्यावेळी अशा कल्पना येतात, तेंव्हा त्या दोन प्रकारच्या असतात. एक मरणोत्तर जीवन असेल का? असेल तर कसे असेल ? अन् दोन; आपल्या माघारी, आपल्या परिवाराचे कसे होईल? आपल्या जीवन कार्याचे कसे होईल? जीवन कार्य हे ध्येय असते. त्यासाठीच मनुष्य झटत असतो, जगत असतो.

नीट पाहिले तर पहिला प्रश्न हा एकप्रकारे अज्ञात भविष्याची चिंता दर्शवित गूढतेत विरणारा असतो. तर दूसरा कळत नकळत माझ्यामागे काय होणार याची चिंता दाखवित आत्मप्रौढी मिरविणारा असतो. त्यात 'माझ्या नंतर कसे होणार तुझे?' चा अहंकार पोसणारा आत्मकेंद्रित भाव असतो. प्रस्तुत कवितेत कविने वरील पैकी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले दिसते. कवितेच्या धृपदातच कवी,

जन पळभर म्हणतील 'हाय! हाय!'
मी जाता राहील कार्य काय!!

'माझ्या मृत्यूनंतर लोक पळभर म्हणजे अगदी थोडा काळ दुःख करतील. माझ्या जाण्याने जगाचे कोणते काम राहील' अशी पृच्छा करताना, प्रश्नातच जगाचे कोणतेच काम माझ्यामुळे राहणार नाही. हे दडलेले उत्तर सहजपणे रसिकाला कळावे, या खुबीने कवी धृपदाची रचना करतो.

Rajkavi Bha. ra. tambe.
कृतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते : आचार्य विनोबा भावे

महान चिनी नीतिशास्त्रवेत्ता कन्फ्युशिअस जेव्हा राजदरबारात जाई तेंव्हा चिनी सम्राट त्याच्या स्वागताला उभा राही. तो एकदा गूढवादी लाओत्सेला भेटायला गेला होता. त्यावेळी लाओत्से त्याला पाहून उठला ही नाही अन् त्याच्या स्वागतासाठी त्याने त्याला आसन ही दिले नाही.
कन्फ्युशिअसच्या अहमला ही एकप्रकारे ठेचच होती. पण करणार काय ? नाईलाज होता. तो स्वतः होऊन लाओत्सेला भेटायला आला होता. तो बसण्यासाठी त्या ओसाड खोलीत इकडे तिकडे पाहू लागला. तसा लाओत्से बोलला, 'कन्फ्युशिअस कुठेही बैस ! तुझ्या कुठेही बसण्याने जमिनीला काहीही फरक पडणार नाही. 'खरेच होते ते! जमिनीला, आकाशाला, वाऱ्याला कोणी असले काय अन् नसले काय, काहीच भेद पडत नाही. याच नैसर्गिक तथ्याला व्यक्त करताना कवी म्हणतो, 'सूर्य उगवत राहतील, चंद्र झळकतील, तारे आपला मार्ग चालत राहतील, वाहणारे वारे आता वाहताहेत तसेच वाहतील, ढग नेहमी सारखाच वर्षाव करतील, शेतं सुद्धा पिकत राहतील, नद्या दुधडी भरून आनंदाने वाहत राहतील. यापैकी कोणाला ही मी नसल्याने काहीही फरक पडणार नाही.' कवीला वाटते एकवेळ ठीक आहे, निसर्गच तो ! त्याने कोणा कोणाच्या मरणाचा शोक करावा? पण ज्यांच्या साठी मी खस्ता खाल्या, जे रक्तामांसाच्या नात्याने माझ्याशी जोडले गेले आहेत, ते माझे नातेवाईक, सगे सोयरे, आप्त बांधव त्यांचे काय?

कवी म्हणतो, 'ते क्षणभर दुःखी होऊन, डबडबलेले त्यांचे डोळे पुसतील, पुन्हा त्यांच्या कामाला लागतील. एकमेकांना भेटतील, हसतील, खिदळतील माझ्या जाण्याने त्यांचे काय जाणार आहे?' येथे कवी कोण जाणार असा प्रश्न न विचारता काय जाणार असा प्रश्न विचारतो. कोणचे उत्तर सहज देता येते. पण कायचे उत्तर 'काहीच जाणार नाही' असेच येते. तेच कवीला अपेक्षित आहे. आपले म्हणणे नेमके ठसावे, यासाठी तो विचारतो,

राम-कृष्णही आले; गेले!
त्याविन जग का ओसची पडले?
कोणी सदोदित सूतक धरिले?

येथे पहिल्या चरणात 'आले' नंतर अर्धविराम आहे, तर 'गेले' नंतर पूर्णविराम आहे. याचा सरळ अर्थ येणे क्षणिक तर जाणे स्थायी असते हेच दाखविणे हा आहे. विचक्षण रसिकाला या ठिकाणी कविकुलगुरु कालिदासाच्या 'मरणं प्रकृतिर शरीराणां ' या शाश्वत सत्य सांगणाऱ्या पंक्तीची आठवण झाल्याविना राहत नाही.

कवी म्हणतो 'एकवेळ सग्या सोयऱ्यांचे ठीक, पण राम-कृष्ण म्हणजे आत्माच. त्यांच्यासाठी आजही जीव वेचावा, प्राण त्यागावा इतके ते अभिन्न वाटतात! खरेतर त्यांच्या पाठोपाठ जगाने जायला हवे होते. तसे जग गेले असते तर आज जग ओसच पडलेले दिसले असते. पण रामकृष्ण आदि गेल्यावर ही जग इथेच राहिले. बरे इथे राहूनही कोणी सदोदित ते गेल्याचे दुःख बाळगले नाही. मग माझ्या जाण्याने जगाचे काय अडणार आहे. येथे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की, राम कृष्ण हे धर्म संस्थापकांचे प्रतिनिधी आहेत. ते केवळ राम, कृष्ण यांनाच नाही तर शंकर, बुद्ध, महावीर, नानक, येशू, मुहम्मद इ साऱ्यांना लागू होणारे आहे. हे तथ्य उमगल्याने कवी म्हणतो,

'या अशा जगासाठी कुढत बसण्यात अर्थ नाही, कोणाच्या मोहपाशात गुंतून राहणे कामाचे नाही आणि हरीदूताला टाळणे बरोबर नाही. 'कवी मृत्यूच्या दूताला यमदूत नाही, तर हरीदूत म्हणतो. त्याला सामोरे जाणे त्याला केवळ अटळच नाही, तर शांतीमय वाटते, स्वाभाविक वाटते.

Rajkavi Bha. ra. tambe.
दुनियादारी : एक देव असा पण...

प्रस्तुत कविता वरवर जरी निराशावादी वाटत असली तरी ती तशी नाही किंवा केवळ गूढ गुंजन करणारी ही नाही. तर ती आत्मप्रबोधन करणारी आहे. कवी जन व जग दोहोंच्या अलिप्त भावाचे वर्णन करीत असला, तरी त्यात कोठेही दूरावा नाही. जग, जनाविषयी राग, द्वेष तर मूळीच नाही. उलट 'मी नसलो तर काय ?' चा अहंभाव रुपी विंचू उतरवणारा हा मंत्र आहे. तो जनरुपी जनातील प्रत्येक व्यक्तीला लागू होणारा आहे. माधुर्य नि गेयता यांनी व्यापलेली ही कविता वाचताना वाचक कवीच्या मी शी सहजपणे तदृप होतो. कवीच्या मी त रसिकाचा मी एकरूप होतो. त्यामुळे शंभर वर्षे जुनी असलेली ही कविता आजही एकदम ताजीतवानी वाटते. किंचित उदास करीत असली तरी शाश्वत सत्याचा उद्घोष करीत, रसिकांचे आत्मभान जागवत, मनामनात घोळत राहते. कळत नकळत रसिक या कवितेच्या ओळी गुणगुणत राहतो.

(लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com