लोकोत्तर चमत्कार : ‘हतभागिनी’

Dr Neeraj Dev writes about the poems of Vinayak Janardan Karandikar
Dr Neeraj Dev writes about the poems of Vinayak Janardan Karandikar
Updated on


रसिका, कवी विनायकाचे नाव तू ऐकलंस कां? बहुधा नसशील. पण अदमासे दोन पिढ्यांपूर्वी कवी विनायकांना राष्ट्रीय बाण्याचे कवी म्हणून ओळखले जाई. त्यांचे पूर्ण नाव विनायक जनार्दन करंदीकर (१८७२ - १९०९) होते. त्यांचे मूळगाव अलिबागजवळील नागाव असले, तरी त्यांचा जन्म धुळ्याचा होता व संपूर्ण जीवन खानदेशातच व्यतीत झाले होते. शालेय जीवनात त्यास फारशी गती नव्हती. १८९१ - ९२ला फायनल परीक्षेस ते मुंबईस गेले असता, केशवसूत त्यांना भेटायला आले. बोलण्याच्या ओघात विनायकाला परीक्षेला जाण्याचे, तर केशवसूत यांना नोकरीवर जाण्याचे भान राहिले नाही. परिणामी, विनायक शाळेची फायनल परीक्षा नापास झाला. ती त्याने पुढे कधीच दिली नाही. विनायकाच्या चरित्रकाराला हे जातिवंत कवीचे वर्तन वाटते. १८९३ मध्ये विनायकाचे लग्न एरंडोल येथील रंगो पटवर्धनांची कन्या सरस्वतीबाईशी झाले. विनायकांनी इंग्रजांच्या पोलिस खात्यात काही काळ नोकरी केली. कसला तरी आरोप आल्याने वा त्यात रमण्याची वृत्ती नसल्याने त्यांना ती सोडावी लागली. त्याच काळात त्यांना वेश्या व दारूचे व्यसन लागले. त्यात त्यांचा संसार उद्‌ध्वस्त झाला. स्वतःच्या चरित्राविषयी ते लिहितात, ‘माझे चरित्र इतके विचित्र आहे, की कोणी (ऐकू नये) ऐकिल्यास माझी कविता तो वाचणारच नाही’ विनायकाचे नशीब असे, की वयाच्या ३७व्या वर्षी त्यांची पत्नी सरस्वतीबाई त्यांना पुन्हा भेटली. तिला पाहताच आपण तिच्यावर केलेला अन्याय आठवून त्यांना रडू कोसळले. त्यांनी साश्रुनयनांनी तिची क्षमा मागितली अन् दुसऱ्याच दिवशी तिच्या मांडीवर डोके ठेवलेले असताना त्यांचा मृत्यू झाला.

त्यांचे जीवनचरित्र कितीही विचित्र न्‌ तिरस्करणीय वाटत असले, तरी त्यांची कविता मात्र सतेज व निष्कलंक आहे. स्वतः कवीची याकडे पाहण्याची दृष्टी कशी होती, हे त्यांनी लिहिलेल्या एका पत्रावरून कळते. त्यात ते लिहितात, ‘कविता म्हणजे फकिरी आहे. तिच्या नादाला लागल्यावर तुम्हास ऐहिक वैभवावर पाणीच सोडावे लागेल किंवा त्याचा तुम्हास आपोआपच वीट येईल.’ कवीच्या या विधानाशी कोणी सहमत होवो वा न होवो, पण हे मान्यच करावे लागते, की महाराष्ट्र लक्ष्मीचे वर्णन करताना त्यांनी रचलेल्या
पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भाविकाळ,
बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ’
या ओळी सुभाषिताचे मोल घेऊन उरल्यात. तर त्यांची देशभक्तांचा सन्मान करणारी एकश्‍लोकी कविता
देशभक्ता प्रासाद बंदिशाळा । शृंखलांच्या गुंफिल्या पुष्पमाला ।
चिता सिंहासन शूल राजदंड । मृत्युदैवत दे अमरता उदंड ।।
पारतंत्र्यात खितपत पडलेल्या कोणत्याही राष्ट्रातील देशभक्तांना ललामभूत वाटावी, अशीच ही कविता आहे. महाराणी पद्मिनी, देशासाठी आपल्या लहानग्याला मृत्यूच्या तोंडात देणारी पन्नादाई, देशधर्मासाठी बलिदान देणारी संयोगिता, हिरकणी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक देशमातांवर विनायकाने काव्यरचना केलेली आहे. मराठ्यांचा विजयी इतिहास कवीला काव्यरचनेस पोषक वाटलेला आहे म्हणून प्रा. भवानीशंकर पंडितांनी विनायकाच्या काव्यास मराठीतील राष्ट्रीय स्फूर्तिकाव्याचा पहिले आणि श्रेष्ठ उद्‌गाते म्हटले आहे. हे संपूर्णपणे सत्याला धरून नसले, तरी विनायकाच्या मनात पारतंत्र्याविषयी असलेली चीड नि स्वातंत्र्याचे प्रेम त्याच्या काव्यात स्पष्टपणे उमटलेले सापडते. ‘हतभागिनी’ ही विनायकाची कविता त्याचे उत्तम उदाहरण ठरावी.
महाराष्ट्राचे स्वातंत्र्यप्रेम तसे जगजाहीर आहे. पण, १८१८ पासून ही महाराष्ट्र माता परवश झालेली विनायकाला दिसते. तिचे वर्णन करताना
तळहाती टेकुनी ही स्वशिरातें बैसली !

असे कवी म्हणतो, तेव्हा हताश होऊन तळहातावर डोके टेकवून बसलेली माता वाचकांच्या डोळ्यांपुढे तरळू लागते. ते चित्र आणखीनच स्पष्ट करताना कवी सांगतो, ‘तिचे केस डोक्यावर इतस्ततः विखुरले आहेत, श्‍वासोच्छ्वास लक्षात येण्याजोगे चालले आहेत, डोळ्यांतून वाहणारे अश्रू गालावर ओघळताहेत, ती चिंताग्रस्त दिसते आहे. तिचा हताश भाव असा तंतोतंत वर्णन करून कवी मग तिच्या पेहरावाकडे वळतो. ‘तिची वस्त्रे अपुरी असून, जुनाट झालेली आहेत. वस्त्रांची अशी दशा असल्यावर गळ्यात सौभाग्याचे लेणे असलेला फुटका मणी तरी तिला कोठून लाभावा, अशी दीन दुःखी होऊन ती बसली आहे.’ दीन दुःखी असली, तरी ती शांत मात्र नाही,
हे दाखवताना कवी ‘दुःखाने कावली’ अशी शब्दयोजना करतो. याचा अर्थ ती तिच्या सध्याच्या दीन अवस्थेने केवळ दुःखी नाही, तर संतापलेली आहे. कारण ती पूर्वीपासूनच दरिद्री, हीन, दीन असती, तर तिला या अवस्थेचे काहीच वाटले नसते. पण काही काळापूर्वी ती सिंहासनावर होती, भाग्यशालिनी, विजयिनी म्हणून भारतभर मिरवीत होती. दुर्दैवाने तिला खाली खेचून तिची अन्नान्नदशा करण्यात आलेली आहे. तिने आजवर जे यश मिळविले होते त्याचे कारण सांगताना कवी गातो,
एकाश्रुबिंदुकारणे,
तियेच्या रणें, झुंजले मनें,
असे सूत व्याली-जयकालीं माऊली
तिच्या डोळ्यांतील एकेका अश्रूबिंदूसाठी रणांगणावर जाऊन लढणारे पुत्र तिने जन्माला घातले होते. त्यामुळेच ती सर्वत्र जयकाली माऊली म्हणून परिचित होती. कवीच्या या ओळी वाचताना वाचकाच्या डोळ्यांसमोर मराठ्यांचा दीड-दोनशे वर्षांचा जाज्वल्य इतिहास उभा राहतो. पण, तिची गत आज अत्यंत केविलवाणी झाली आहे, कारण
कारटी करंटी तिथे,
निपजलीं भुते! मातृशोणिते...
स्वतांला लाली आणाया- धांवली !
रसिका, कवी किती विदारक सत्य वर्णन करतो पहा, जिच्या डोळ्यातील एका अश्रूसाठी रण गाजविणाऱ्या पोरांच्या जागी आज आईच्या रक्ताने स्वतःला लाली आणणारी करंटी कारटी, कारटी कशाला भूतं तिच्या पोटी निपजली आहेत. त्यामुळेच तिची ही दैना झालीय. ती कारटी हिताहित काहीच जाणत नाहीत. ती स्वत्व, अस्मिता विसरून गेलीत. ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी परस्परांशी भांडताहेत. ‘वयम् पञ्चाधिकम् शतम्’चे सूत्र त्यांना आता स्मरत नाही. गेलेले दिवस आता परत येतील का? या शंकेने कवीला वाटते, की तिच्या मुलांचे वर्तन अद्यापि आत्मघातकीच दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्रमातेला ते गौरवाचे दिन पुन्हा लवकर लाभणार नाहीत. ती या गाळातच फसत जाणार. सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी विनायकाला दिसलेला महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र पाहता काय दिसते? समृद्धी आली, अलंकार आले; पण तो सिंहासनाधीश्‍वर होण्याचा मान महाराष्ट्राला अद्याप तरी लाभलेला नाही. कारण मुलांमध्ये एकता नाही, बंधुता नाही. जातपात विसरून ‘मी मराठी’ची हांक देणारे ते भारतव्यापी स्वत्व नाही. तो महाराष्ट्र धर्म नाही.

एका पूर्णाकडून दुसऱ्या विशालतर पूर्णाकडे कालमानाप्रमाणे होणारे स्थित्यंतर, एखाद्या कवितेने सहजी व्यक्त करणे. हे कवितेचा प्रसारित होणारा आवाकाच दाखवीत असते. यादृष्टीने पाहता विनायकाने केलेले ‘हतभागिनी’ महाराष्ट्रमातेचे वर्णन आजच्या युवकाला परतंत्र भारतमातेचे वाटते आणि ते भारतमाते संदर्भातही हुबेहूब बसावे, यातच कवीचे कर्तृत्व सामावलेले आहे. ही कविता अभ्यासल्यावर कोणीही रसिक विनायकाचे जीवनचरित्र विचित्र असले तरी काव्यजीवन लोकोत्तर आहे अशीच साक्ष देईल.
(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com