'नीट'नेटकी संधी (डॉ. पंडित विद्यासागर)

डॉ. पंडित विद्यासागर
रविवार, 15 जुलै 2018

मनुष्यबळ विकास मंत्रालयानं "आयआयटी जेईई' आणि "नीट' या प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. "नेट', "जीपॅट'सारख्या काही परीक्षाही नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येणार असून, त्या पूर्णपणे संगणकीकृत असणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नक्की अर्थ काय, ते घेण्याची पार्श्‍वभूमी काय, विद्यार्थ्यांना त्यांचा कसा फायदा होईल, इतर तांत्रिक गोष्टी कोणत्या आदी गोष्टींचा ऊहापोह.

मनुष्यबळ विकास मंत्रालयानं "आयआयटी जेईई' आणि "नीट' या प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. "नेट', "जीपॅट'सारख्या काही परीक्षाही नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येणार असून, त्या पूर्णपणे संगणकीकृत असणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नक्की अर्थ काय, ते घेण्याची पार्श्‍वभूमी काय, विद्यार्थ्यांना त्यांचा कसा फायदा होईल, इतर तांत्रिक गोष्टी कोणत्या आदी गोष्टींचा ऊहापोह.

मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जॉइंट एंट्रन्स एक्‍झामिनेशन (एकत्रित प्रवेश परीक्षा- जेईई) आणि नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा- नीट) या प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येतील, असा निर्णय घेतल्यामुळं या प्रवेश परीक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दोन्ही परीक्षांची व्याप्ती खूपच मोठी आहे. जेईई या परीक्षेत देशभरातून बारा लाख विद्यार्थी आणि नीट परीक्षेसाठी साधारणपणे तेरा लाख विद्यार्थी अर्ज भरतात. विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम करणारा हा निर्णय असल्यामुळं याचा अधिक तपशीलात जाऊन विचार करणं प्राप्त आहे. साधारणपणे स्पर्धा परीक्षा म्हटली, की आयएएस, आयपीएस या परीक्षांकडं निर्देश केला जातो. मात्र या परीक्षांव्यतिरिक्त तांत्रिक आणि वैद्यक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि नीट या परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेईई या परीक्षेचा विचार केल्यास ही परीक्षा भारतातलं उच्च प्रतीचं शिक्षण देणाऱ्या आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य आहे. भारतीय तंत्रशिक्षणात आयआयटीचं महत्त्व असाधारण आहे.

आयआयटीचा दबदबा
भारताच्या औद्योगिक विकासासाठी लागणारं मनुष्यबळ तयार करण्यासाठी उच्च प्रतीचं शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण करण्याचा विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीपासूनच सुरू झाला. त्याला मूर्त स्वरूप 1956 मध्ये प्राप्त झालं. त्या वर्षी खरगपूर इथं पहिल्या भारतीय तंत्रशिक्षण संस्थेची (आयआयटी) स्थापना झाली. त्यानंतरच्या काळात याच धोरणानुसार मुंबई, चेन्नई, कानपूर आणि दिल्ली या ठिकाणी अशा संस्थांची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारनं या संस्थांच्या निर्मिती आणि विकासामध्ये विशेष रस घेतल्याचं दिसून येतं. या संस्थांना शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. त्यामुळं कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय या संस्थांचा विकास झाला. या संस्थेचं व्यवस्थापन मंडळ निर्णय घेऊन ते अंमलात आणण्याचं कार्य आजही करतं. या संस्थांनी आपला शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवला आहे. या संस्थांना दिलेलं आर्थिक पाठबळ त्याचप्रमाणं त्यांना शैक्षणिक क्षेत्रातून मिळणारं उत्पन्न यामुळं तिथल्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पात्रताधारक शिक्षक नेमण्यात कुठलाही अडचण येत नाही. शिवाय या संस्थांमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचं गुणोत्तर हे 1ः6 किंवा जास्तीत जास्त 1ः8 एवढं आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; त्याचप्रमाणं शैक्षणिक शुल्कामध्ये सवलत देण्याची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अद्ययावत वसतिगृहांची सोय आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी कार्यक्रम राबवले जातात. या सर्वांचा एकत्रित परिणाम आणि निवड करताना विद्यार्थ्यांची असणारी गुणवत्ता यामुळं या संस्थांचा दबदबा केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही आहे. या संस्थांमधून पदवीधर होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी असते. परंतु त्याबरोबर परदेशातही त्यांना चांगली मागणी आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात आतापावेतो 25 हजारांहून अधिक आयआयटी पदवीधर स्थायिक झालेले आहेत. त्यामुळं आयआयटीची तुलना बऱ्याच वेळा एमआयटी, हॉर्वर्ड यांसारख्या संस्थांबरोबर केली जाते. अशा प्रकारचं वलय आणि मान्यता असणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा सर्वच तरुण विद्यार्थ्यांमध्ये असते आणि ती सहाजिकच आहे. यामुळं या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे.

महत्त्वाची "नीट'
जेईईप्रमाणंच नीट या परीक्षेस त्यामुळंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैद्यकीय शिक्षणातून एमबीबीएस; त्याचप्रमाणं दंतचिकित्सक पदवीसाठी अनेक विद्यार्थी आणि पालक उत्सुक असतात. जीवनामध्ये स्थैर्य, संपत्ती, मान आणि व्यवसायाचा आनंद या सर्व कारणांमुळं वैद्यक शिक्षणाकडे अनेकांचा ओढा असतो. भारतामध्ये दरवर्षी तीस हजारहून अधिक वैद्यक पदवीधर तयार होतात. त्यामुळं या वैद्यक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते.
सुरवातीच्या काळात वैद्यक महाविद्यालयातले प्रवेश हे ती-ती महाविद्यालयं बारावीतल्या गुणांच्या आणि प्रवेश परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे ठरवत असत. मात्र, ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शी नसल्यामुळं यामध्ये अनेक प्रकारचे दोष दिसून आले. या प्रवेशांसाठी पैशाचा व्यवहारही केला जातो, असा आक्षेप होता. यावर उपाय म्हणून भारतीय वैद्यक मंडळानं 2011 मध्ये नीट (अंडर ग्रॅज्युएट) ही परीक्षा घेण्यास सुरवात केली. सुरवातीला ही परीक्षा अनिवार्य नसल्यामुळं अनेक राज्यांनी स्वतंत्र परीक्षा घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्‍चित केले; मात्र आता ही परीक्षा सर्वांसाठी अनिवार्य झाली आहे. नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) अनिवार्य करण्यामागं अनेक कारणं आहेत. ही परीक्षा सुरू करण्यापूर्वी देशात 25 प्रवेश परीक्षा घेतल्या जात. एक विद्यार्थी कमीत कमी आठ ते नऊ परीक्षा देत असे. या सर्व परीक्षांच्या अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांवर येई. कारण सर्व परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिकांचं स्वरूप सारखं नव्हतं. अभ्यासक्रमातही एकवाक्‍यता नव्हती. प्रत्येक परीक्षेचा फार्म आणि परीक्षा शुल्काचा भुर्दंड पालकांना भरावा लागे. शिवाय प्रवासखर्च आणि राहण्या-खाण्याचा खर्च वेगळाच. "नीट'मुळं या सर्व जाचातून विद्यार्थी आणि पालकांची सुटका झाली.

प्रवेश परीक्षांचं नवीन धोरण
या नवीन धोरणानुसार, जेईई ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये, तर नीट ही परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाईल. जेईई ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यामध्ये जेईई (मेन) आणि जेईई (ऍडव्हान्स्ड) असे दोन भाग आहेत. जेईई ही परीक्षा बारावीमध्ये असलेला अथवा उत्तीर्ण विद्यार्थी देऊ शकतो. ही परीक्षा वर्षातून एक वेळा घेतली जात होती. आतापर्यंत ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीनं घेतली जात असे. जेईई (मेन) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एनआयटी) आणि सेन्ट्रली फंडेड टेक्‍निकल इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नोलॉजीमध्ये (आयआयटी) प्रवेश घेता येतो. मात्र, आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (ऍडव्हान्स्ड) ही परीक्षा देणं आवश्‍यक असतं. जेईई (मेन) या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना जेईई (ऍडव्हान्स्ड) परीक्षेला बसता येतं. त्यामुळं जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसासाठी जेईई (मेन) या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्‍यक ठरतं. जेईई (मेन) आणि जेईई (ऍडव्हान्स्ड) या परीक्षांची काठिण्यपातळी इतर परीक्षांच्या तुलनेनं खूपच अधिक आहे. पूर्वी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेचा कस शोधणाऱ्या अनपेक्षित प्रश्‍नांचा समावेश होता. आता बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्‍नांचा समावेश असल्यामुळं या परीक्षांची काठिण्यपातळी कमी झाली आहे, अशी खंत व्यक्त केली जाते. तरीसुद्धा या परीक्षा आव्हानात्मक असल्यामुळं यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक खासगी संस्था निर्माण झाल्या असून, त्यांचा होणारा आर्थिक व्यवहार शेकडो कोटी रुपयांमध्ये आहे. त्यामुळं या परीक्षांचा ताण विद्यार्थी आणि पालक या दोन्ही घटकांवर असतो. त्यातच या परीक्षांचा ताण सहन न झाल्यामुळं अनेक विद्यार्थी जीव संपवत असल्याचीही उदाहरणं आहेत.

या पार्श्‍वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतलेला निर्णय स्वागतार्ह ठरतो. या निर्णयानुसार जेईई (मेन) परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाईल. शिवाय ही परीक्षा देण्याची जबाबदारी स्वतंत्र संस्थेकडं म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडं (एनटीए) देण्यात आली आहे. ही परीक्षा अनेक केंद्राद्वारे घेतली जाणार असून, ती पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाईल. या परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध करून दिले जातील.

एखाद्या विद्यार्थ्याने पूर्वी भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये (आयआयटी) प्रवेश घेतला असेल किंवा प्रवेश केंद्रावर प्रवेश स्वीकारला असेल, तर तो विद्यार्थी जेईईसाठी अपात्र ठरतो. प्रवेश घेऊन तो रद्द झाला असला, तरीही अपात्र ठरतो. भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये तयारी वर्गात सामील झालेला विद्यार्थी मात्र जेईई ऍडव्हान्स्डसाठी पात्र असतो. एखाद्या विद्यार्थ्यानं जागास्वीकृतीचं शुल्क भरलेलं असूनसुद्धा ती जागा प्रवेश केंद्रावर उपस्थित राहून स्वीकारली नसेल, तर तो विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा देण्यास पात्र ठरतो.

त्याप्रमाणं वैद्यकीय परीक्षेमध्ये होणारी नीट ही परीक्षासुद्धा दोनदा घेतली जाईल. याद्वारे 66 हजार जागांचा एमबीबीएस आणि दंतचिकित्सा पदवीसाठी प्रवेश निश्‍चित केला जाईल. नीट या परीक्षेद्वारे सुमारे 355 एमबीबीएस वैद्यकीय महाविद्यालयं आणि तीनशे दंतचिकित्सा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. या परीक्षेमध्ये एकच टप्पा असतो. ही परीक्षा तीन तासांची असून, यात बहुपर्यायी 180 प्रश्‍न असतात. बरोबर उत्तरासाठी चार गुण आणि चूक उत्तरासाठी वजा एक गुण असतो. यातल्या 15 टक्के जागा शासकीय वैद्यक महाविद्यालयासाठी असतात. प्रवेशासाठी कमाल वय 25 वर्षं असतं. राखीव प्रवर्गासाठी पाच वर्षं अधिक मिळतात. राज्य अखत्यारीतल्या जागांसाठी कमाल वयाची अट असत नाही. बारावीला गणित विषय घेण्याची अट नाही. बारावीच्या परीक्षेला बसलेला, उत्तीर्ण झालेला; तसंच समकक्ष पात्रता धारण केलेला विद्यार्थी नीट परीक्षा देऊ शकतो. ही परीक्षा किती वेळा द्यावी यावर बंधन नाही. नीट ही परीक्षा देण्यासाठी इंग्लिश, हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ, आसामी, कन्नड, मराठी, ओडिया आणि तेलगू या भाषांचा वापर करता येतो. एक पाहणीनुसार ऐंशी टक्के विद्यार्थी इंग्लिशमधून, 11 टक्के हिंदीमधून, 4.3 टक्के तमिळमधून ही परीक्षा देतात. मराठी भाषेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे, हे ओघानं आलेच. एआयआयएमएस, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल अँड रिसर्च आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रीसर्च या नीटच्या कक्षेत येत नाहीत.

"नेट'ही आता एनटीएअंतर्गत
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) घेतली जाणारी नेट (राष्ट्रीय पात्रता चाचणी) परीक्षाही डिसेंबर 2018 पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) घेतली जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे. ही परीक्षा कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अथवा महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या पदासाठी पात्र ठरवण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेमार्फत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेतली जाते. यासाठी किमान पात्रता ही पदव्युत्तर परीक्षेत 55 टक्के गुण अशी आहे. राखीव वर्गासाठी ही पात्रता 50 टक्के अशी आहे. ही परीक्षा 84 विषयांसाठी देशातल्या 91 शहरांत दोन हजार केंद्रांवर घेतली जाते. गुणवत्तेनुसार यातले काही विद्यार्थी कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती आणि सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरतात. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी, विद्यापीठं, आयआयटी आणि राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये संशोधन करू शकतात. या परीक्षेला दहा लाख विद्यार्थी बसतात. त्यात विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असते.
सामान्य व्यवस्थापन प्रवेश परीक्षा (सीमॅट) ही परीक्षा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) या संस्थेमार्फत घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीची असून, या परीक्षेत उमेदवारांचं सांख्यिकीतंत्र, तर्कसंगत विचार, भाषेचं आकलन आणि सामान्यज्ञान तपासलं जातं. व्यवस्थापनशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातात. उत्तीर्ण विद्यार्थी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठांतले विभाग, संचलित आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात.

ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदतर्फे घेतली जाते. याद्वारे मास्टर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थी निवडले जातात. ही तीन तासांची एकच परीक्षा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था, संलग्न आणि संचलित महाविद्यालयं आणि विद्यापीठांतल्या विभागांत प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. या दोन्ही परीक्षा पुढील वर्षापासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातील.

अडचणी, ताण कमी होणार
या ताज्या निर्णयामुळं विद्यार्थी आणि पालकांच्या अडचणी कमी होण्याची शक्‍यता आहे. अनेक वेळा बारावीची परीक्षा, जेईई आणि इतर परीक्षा एकाच वेळी आल्यास त्याचा ताण विद्यार्थ्यांवर पडतो. ताज्या निर्णयामुळं विद्यार्थी आपल्या सोयीनुसार परीक्षेची निवड करू शकतील. काही विद्यार्थ्यांच्या मताप्रमाणं पहिली सराव परीक्षा म्हणून उपयुक्त ठरेल. त्यामुळे येणाऱ्या अडचणी आणि करावी लागणारी तयारी याची कल्पना विद्यार्थ्याला आल्यामुळं तो पुढची परीक्षा अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकेल. दोन्ही परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांपैकी अधिक गुण घेतले जातील. त्यामुळं विद्यार्थ्यांचा फायदा होईल. दोन वेळा परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग होणार नाही, असंही काही विद्यार्थ्यांचं मत आहे. या निर्णयामुळं काही अडचणीही निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही परीक्षांची काठिण्यपातळी समान राखणं हे परीक्षा घेणाऱ्या संस्थांपुढं आव्हान असणार आहे. दोन्ही परीक्षांची काठिण्यपातळी सारखी नसल्यास मिळणाऱ्या मार्कांची तुलना करून आवश्‍यक ते बदल करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी लागेल. हे काम तितकंसं सोपं असणार नाही. या निर्णयामुळं शिकवणी वर्गाच्या कालावधीत वाढ होऊन विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. अर्थात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार नाही.

केवळ हाच पर्याय नव्हे
आयआयटीमध्ये पदवी मिळवून जीवन घडवण्यासाठी निश्‍चितच खूप मोठ्या संधी आहेत. या संधींचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच सयुक्तिक आहे. मात्र, जीवनासाठी हाच एकमेव पर्याय आहे, अशी धारणा करून घेण्याची गरज नाही. या परीक्षा उत्तीर्ण होण्यास बुद्धिमत्तेची गरज असली, तरी ही परीक्षा उत्तीर्ण न होणारे बुद्धिमान नसतात असा समज करून घेण्याची आवश्‍यकता नाही. प्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ डॉ. व्यकंटरामन हे तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी ध्यानात घेऊन आपल्या अपयशामुळं निराश न होता जीवनामध्ये उपलब्ध इतर संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणंही आवश्‍यक आहे.

Web Title: dr pandit vidyasagar write jee neet examination article in saptarang