घातकी क्षयरोगाचं आव्हान

जगभरात क्षयरोगाचं प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक येतो, हे अत्यंत विदारक सत्य आहे.
tuberculosis
tuberculosissakal
Summary

जगभरात क्षयरोगाचं प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक येतो, हे अत्यंत विदारक सत्य आहे.

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

संसर्गजन्य रोगांच्या या मालिकेत अत्यंत घातक अशा क्षयरोगाविषयीचा आपण जाऊन घेऊया. टीबी किंवा क्षयरोग हा तसा माहीत असलेला, जुन्या हिंदी सिनेमांतून ओळखीचा झालेला, मायकोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होणारा हा रोग. विश्व स्वास्थ्य संस्थेच्या अहवालाप्रमाणे २०२० मध्ये साधारणपणे पंधरा लाख लोकांचा क्षयरोगाने जगभरात मृत्यू झाला (यांपैकी २.१४ लाख लोक एच.आय.व्ही.ग्रस्त होते). जगभरात क्षयरोगामुळे मृत्यूच्या प्रमाणाचा क्रमांक तेरावा लागतो. कोरोनाच्या महासाथीनंतरचा संसर्गजन्य रोग म्हणून क्षयरोगाचा क्रमांक येतो (एच.आय.व्ही.पेक्षाही वरचा). क्षयरोग सर्व देशांमध्ये व सर्व वयोगटांमध्ये दिसतो. या रोगाचा प्रसार कितीही असला, तरी क्षयरोग पूर्णपणे बरा होतो आणि त्याला प्रतिबंधही करता येतो.

जगभरात क्षयरोगाचं प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक येतो, हे अत्यंत विदारक सत्य आहे. यानंतर चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स, पाकिस्तान व अन्य देश येतात. असं असलं तरी, आधुनिक उपचारपद्धती, जागरूकता व स्वास्थ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या सर्व गोष्टींमुळे क्षयरोगाच्या प्रसारात प्रतिवर्षी साधारण दोन टक्क्यांनी घट होत आहे. क्षयरोगावरचे खर्चीक व बराच काळ चालणारे उपचार, हा जगातील क्षयरोग्यांची संख्या कमी होण्यात संपूर्ण यश न मिळण्यामधील प्रमुख अडसर आहे. जगातून इसवी सन २०३० पर्यंत क्षयरोग संपूर्णपणे नाहीसा करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वास्थ्यसंबंधी उद्दिष्टांपैकी प्रमुख उद्दिष्ट आहे.

रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञानं १८८२ मध्ये प्रथम क्षयरोगाचा जिवाणू शोधून काढला. माणसांमध्ये हा रोग २ स्पीशीजमुळे होतो; परंतु आता अन्यही काही स्पीशीजचा शोध लावण्यात आला आहे, जे क्षयरोग पसरविण्यास कारणीभूत ठरतात. हा जिवाणू एखाद्या लहान रेषेसारखा किंवा आकाराने थोडासा वक्र असा असतो. सूक्ष्मदर्शकाखाली बघण्यासाठी याला थोडी वेगळी प्रक्रिया करावी लागते आणि त्या पद्धतीला अॅसिद फास्त स्टेनिंग(Acid fast Staining) असं म्हणतात. कारण ह्या जिवाणूचं बाह्य आवरण विशिष्ट पद्धतीचं असतं व सल्फ्युरिक आम्लाचा वापर करून ही प्रक्रिया करण्यात येते.

प्रयोगशाळेत याच्या वाढीचा वेग अत्यंत कमी असतो व दृश्यस्वरूपात दिसण्यासाठी दोन ते आठ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. ६० ०C आणि त्याच्या वरच्या तापमानाला हे जिवाणू मारले जातात, तसंच बऱ्याच सामान्य जंतुनाशकांमुळेही हे मारले जाऊ शकतात. प्रयोगशाळेत यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. सामान्यतः हा जिवाणू माणसांमध्ये संसर्ग करताना आढळतो; परंतु माणसांशी निगडित अन्य प्राणी - जसं कुत्रे आदींमध्ये यांचा संसर्ग दिसून येतो. काही पक्ष्यांमध्येही हा रोग आढळून आला आहे.

क्षयरोग झालेल्या व्यक्तीकडून अन्य व्यक्तींमध्ये हा रोग पसरतो. असा अभ्यास आहे की, भारतात क्षयरोगग्रस्त व्यक्ती मृत्यूपूर्वी किंवा पूर्णपणे क्षयरोगमुक्त होण्याआधी साधारणपणे २५ स्वस्थ व्यक्तींमध्ये हा रोग पसरवू शकते. सामान्यतः हवेतून पसरणारा हा रोग असून खोकणे, शिंकणे व बोलताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्मकणांमधून रुग्णाकडून समोरच्या व्यक्तीपर्यंत या जिवाणूंचा सहज प्रवास होतो.

जिवाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर आपल्या प्रतिकारशक्तीमुळे अनेक स्तरांवर याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही प्रविष्ट झालेल्या जिवाणूंची संख्या, त्यांची रोगनिर्मितीची शक्ती व व्यक्तीची साधारण परिस्थिती म्हणजे जनुकीय संवेदनशीलता, वय, क्षमता, आहार व अन्य काही रोगांचं सह-अस्तित्व यावर क्षयरोग होण्याची शक्यता व तीव्रता अवलंबून असते. माणसांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यास संसर्ग झालेल्या दहांपैकी एकाच व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याची शक्यता असते.

दारिद्र्य आणि क्षयरोग यांचं जवळचं नातं आहे. जीवनमान सुधारण्याचा क्षयरोगाचा संसर्ग कमी होण्याशी संबंध दिसून येतो. एच.आय.व्ही. आणि क्षयरोगाचाही जवळचा संबंध आहे. एच.आय.व्ही.च्या प्रसारामुळे विकसित राष्ट्रांमध्येही क्षयरोगाचा प्रसार वाढलेला दिसतो. अनेक प्रतिजैविकांना प्रतिकार करणारे क्षयरोगाचे जिवाणू (multiple drug resistant) यांची उत्पत्ती आणि प्रसारामुळे उपचारपद्धती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. गाई-गुरांमध्ये होणारा क्षयरोग दुधाद्वारे माणसांमध्ये पसरण्याची शक्यता असते.

क्षयरोग झालेल्या रुग्णांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेताना ताण जाणवणे, खूप दिवस असणारा खोकला व क्वचित त्यातून रक्त, थकवा, बारीक ताप, भूक न लागणे, अस्वस्थता, रात्री घाम येणे, वजन कमी होणे इत्यादी लक्षणे प्रामुख्याने आढळतात. काही वेळेला हे जिवाणू फुफ्फुसांव्यतिरिक्त शरीराचे अन्य अवयव जसं - अस्थिमज्जा आणि मूत्रपिंडांनाही संसर्ग करतात. याची लक्षणं आणि उपचार थोडे वेगळे असतात. क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी सामान्य काळजी, जसा चांगला आहार, स्वच्छता आणि स्वास्थ्यविषयक सामान्य ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.

क्षयरोगाला प्रतिबंध करणारी अत्यंत परिणामकारक लस म्हणजे बीसीजी (Bacille Calmette Guerin). ही लस १९२१ मध्ये कालमेट आणि गीवरिन या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. मायकोबॅक्टेरियम बोविस या जिवाणूपासून ही लस तयार केली जाते. साधारणपणे पंधरा वर्षं यामुळे संरक्षण मिळतं. लसीकरणानंतर काही किरकोळ बदल दिसतात. जसं - त्या ठिकाणी लालसरपणा, कधी किंचित सूज; पण हे सामान्य असतं. जन्मानंतर लगेच ही लस देतात. नाहीच दिली गेली, तर बाळ एक वर्षाचं होण्याच्या आत नक्की द्यावी.

उपचारांसाठी रिफॅम्पिसिन, पायरेजिनेमाईड व आयसोनियाजिड या औषधांचा उपयोग होतो. यापैकी एकच किंवा एकत्रित करून दिली जातात. रोग पूर्णपणे बरा होण्यासाठीचा कालावधी बराच मोठा असू शकतो; परंतु न कंटाळता संपूर्ण उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवायला हवं की क्षयरोग उपचारांनी पूर्ण बरा होतो.

गेल्या काही लेखांत अनेक रोगांची माहिती आपण घेतली. याचा उपयोग आपलं स्वतःचं आरोग्य सुधारण्यास नक्कीच करता येईल.

यापुढील भागात शेतीतील सूक्ष्मजीवांविषयी जाणून घेऊया.

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com