निर्जंतुकीकरण (भाग २)

निर्जंतुकीकरणासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा - ज्यांत प्रामुख्यानं उष्णतेचा उपयोग केला जातो - आढावा गेल्या वेळच्या लेखात आपण घेतला.
Disinfection
Disinfectionsakal
Summary

निर्जंतुकीकरणासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा - ज्यांत प्रामुख्यानं उष्णतेचा उपयोग केला जातो - आढावा गेल्या वेळच्या लेखात आपण घेतला.

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

निर्जंतुकीकरणासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा - ज्यांत प्रामुख्यानं उष्णतेचा उपयोग केला जातो - आढावा गेल्या वेळच्या लेखात आपण घेतला. उष्णतेचा किंवा वाढीव तापमानाचा उपयोग अनेक ठिकाणी आणि अनेक प्रकारे केला जातो. आपणही कळत-नकळत हे प्रयोग करत असतो. बऱ्याच वेळा उष्णता काही गोष्टींचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी निरुपयोगी ठरते तेव्हा अन्य साधनांचा उपयोग करणं अपरिहार्य होतं.

अनेक ठिकाणी विविध उत्सर्जनकिरणांचा प्रयोग केला जातो. यात अल्फा, बीटा, गामा व अतिनील किरणांचा (Ultraviolet Rays) समावेश होतो. अर्थात्, यांचा उपयोग मर्यादित आहे. मुख्य म्हणजे यांचा वापर खूप महाग पडतो. शिवाय, शरीराला हानिकारकही ठरू शकतो. जर जिवाणूंच्या भवती कुठल्याही प्रकारचं आवरण/अच्छादन तयार झालेलं असेल तर यापैकी बरेच किरण जिवाणूपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे जिवाणूंवर त्यांचा थेट परिणाम होत नाही व ते मारले जात नाहीत. मात्र, अनेक प्रयोगशाळांमध्ये - जिथं विविध प्रयोगांसाठी निर्जंतुकीकरण महत्त्वाचं असतं तिथं - तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व अत्यंत नियंत्रित वातावरणात गरजेनुसार या किरणांचा उपयोग केला जातो.

अन्नप्रक्रिया-उद्योगांमध्ये जेव्हा वाढीव तापमान निर्जंतुकीकरणासाठी निरुपयोगी ठरतं तेव्हा योग्य किरणांचा (बऱ्याच वेळेला अतिनील किरण) वापर केला जातो, तसंच शस्त्रक्रियेची ठिकाणं, रुग्णालयातील विशिष्ट वापराच्या खोल्या इथंही किरणांच्या नियंत्रित वापरानं निर्जंतुकीकरण केलं जातं. अतिनील किरण पृष्ठभागाच्या वरून फार आतपर्यंत प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे आतील भागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते परिणामकारक ठरत नाहीत, तसंच काही जिवाणूंमध्ये अशी प्रणाली विकसित आहे की, जिच्यायोगे अतिनील किरणांद्वारे झालेली हानी ते दुरुस्त करू शकतात आणि त्यामुळे ते जिवाणू संपवण्यासाठी या किरणांचा उपयोग होत नाही.

पाणी आणि अन्य बऱ्याच प्रकाराच्या द्रवपदार्थांसाठी गाळण्याची प्रक्रिया शुद्धीकरणासाठी वापरली जाते, यात पदार्थातून जिवाणू वेगळे केले जातात. मात्र, अन्य प्रकारासारखे ते मारले जात नाहीत. यामध्ये जिवाणू जाऊ शकणार नाहीत अशा सूक्ष्म जाळ्यांचा प्रयोग केला जातो. द्रवपदार्थ वेगळा होतो आणि जिवाणू वेगळे केले जातात. अनेक आकारांच्या अशा जाळ्या उपलब्ध असतात. या जाळ्या निर्जंतुक करून पुनःपुन्हा वापरता येऊ शकतात, तसंच जाळ्यांद्वारे वेगळे केलेले जिवाणू प्रयोगशाळेत तपासताही येतात. हवा शुद्ध करण्यासाठी, म्हणजेच हवेतले जिवाणू दूर करण्यासाठीही, अशा विशिष्ट जाळ्यांचा उपयोग करता येतो. अर्थात्, यालाही मर्यादा आहेत.

जिवाणू मारण्यासाठी जंतनाशकांचा उपयोग आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. कोरोनाच्या काळात तर आपण यांचा खूप उपयोग केला. सर्व प्रकारचे जंतुनाशक आपण वापरले. भरपूर जाहिरातींचा मारा केला गेला. कधी नव्हे ते ‘सॅनिटायझर’ हा आपल्या वापरातील परवलीचा शब्द झाला.

सॅनिटायझेशन हा शब्द सार्वजनिक स्वच्छतेच्या संदर्भात प्रामुख्यानं वापरला जातो. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशकांचा प्रयोग करायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी सर्व जिवाणू मारले जातील याची खात्री नसते किंवा ते अपेक्षितही नसतं. मात्र, जिवाणूंची संख्या निश्चितपणे कमी होईल व त्यांच्याद्वारे फैलावणारे रोग खात्रीनं आटोक्यात येतील एवढी ग्वाही देता येते.

जिवाणूंवर जंतुनाशक म्हणून अनेक प्रकारच्या रसायनांचा व रासायनिक मिश्रणांचा उपयोग करण्यात येतो. विविध प्रकारची रसायनं जिवाणूंचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात. त्यांचे उर्वरित जीवसृष्टीवर वेगवेगळे परिणाम होत असतात, म्हणूनच यांचा उपयोग सरसकट न करता अत्यंत विचारपूर्वक करायला हवा.

अल्कोहोल (Alcohol), फिनेल (Phenyle), फॉर्मलडिहाइड (Formaldehyde), हायड्रोजन पेरॉक्साइड (Hydrogen Peroxide), क्लोरिन (Chlorine), हॅलोजन (Halogen) तसंच इथिलिन ऑक्साईड (Ethylene Oxide) यांचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं जंतुनाशक म्हणून केला जातो.

काही रसायनं पाण्यात मिसळून जंतुनाशक म्हणून वापरली जातात. शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं, सामान इत्यादीसाठी फॉर्मलडिहाइडचा उपयोग केला जातो. त्याच्या धुरीचा (Vapors)उपयोग रुग्णालयातील खोल्या, शस्त्रक्रियांची ठिकाणं यांच्या निर्जंतुकीकरणासाठी होतो. क्लोरिनचा उपयोग पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. जलशुद्धीकरणकेंद्रात, तसंच पोहण्याचे तलाव निर्जंतुक करण्यासाठी याचा उपयोग सर्वज्ञात आहे. आयोडिनचं अल्कोहोलमधील मिश्रण जखमेवर लावलं जातं (आपल्या सर्वांच्या परिचयाचं लाल औषध). उघड्या जखमेत जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे वापरलं जातं.

इंजेक्शन देण्याआधी त्वचेचा तो भाग अल्कोहोलनं निर्जंतुक केला जातो. माऊथ वॉश आणि दंतमंजन यांत जंतुनाशकरसायनांचा वापर आढळतो. फिनेल आणि त्यापासून तयार झालेली अन्य संयुगं यांचा वापर मोठ्या प्रमाणात पृष्ठभागाच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जातो.

आपण हात निर्जंतुक करायला जे मिश्रण वापरतो ते प्रामुख्यानं अल्कोहोलपासून किंवा त्याच्या प्रकारापासून तयार केलेलं असतं. वापर करण्यापूर्वी ते कशापासून तयार केलं आहे, त्याचा वापर कसा करायचा व त्वचेवर त्याचे काय परिणाम होऊ शकतील याची माहिती अवश्य घ्यावी. चांगल्या साबणाचा वापरही जंतुनाशक म्हणून होऊ शकतो.

प्रत्येक प्रकारच्या जंतुनाशकाची परिणामकारकता प्रयोगशाळेत तपासलेली असते व त्याप्रमाणे निर्देश दिलेले असतात. तरी नुसतं जाहिरातींचं अंधानुकरण न करता विचारपूर्वक वापर करावा म्हणजे त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळता येतील.

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com