सूक्ष्मजीव संसर्गरोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microbial infections

जिवाणूंमुळे होणाऱ्या; पण लसीकरणामुळे टाळता येऊ शकणाऱ्या घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात या तीन (ट्रिपल) संसर्गजन्य रोगांची माहिती गेल्या वेळच्या लेखात आपण पाहिली.

सूक्ष्मजीव संसर्गरोग

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

जिवाणूंमुळे होणाऱ्या; पण लसीकरणामुळे टाळता येऊ शकणाऱ्या घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात या तीन (ट्रिपल) संसर्गजन्य रोगांची माहिती गेल्या वेळच्या लेखात आपण पाहिली. एमएमआर या लशीद्वारे टाळता येऊ शकणाऱ्या तीन विषाणूजन्य आजारांची, गोवर-गालगुंड-रुबेला (जर्मन गोवर), माहिती या लेखात घेऊ या.

एमएमआर ही लस साधारणतः दोनदा दिली जाते. एकदा बाळ बारा ते पंधरा महिन्यांचं असताना आणि मग चार ते सहा वर्षांच्या दरम्यान असताना. आपल्याकडे भारतात, बाळ नऊ महिन्यांचं झालं की पहिला डोस दिला जातो.

एमएमआरमधला पहिला आजार म्हणजे मीजोल्स किंवा गोवर. हा एक विषाणूजन्य आजार आहे. गोवर या रोगाचा पहिला वैद्यकीय अहवाल हा साधारणतः सन १६२९ मधला आहे. सन १८४६ मध्ये गोवराच्या उद्रेकाची नोंद ही, तशा परिचित नसलेल्या फारोआ बेटामधली (नॉर्वे या देशाजवळ) आहे. हा विषाणू पॅरामिक्सोविरिडी या परिवारातील आरएनए जनुकीय सामग्रीचा आहे.

संपूर्ण जगात गोवराचे रुग्ण आढळतात. उन्हाळ्याच्या आसपास याचा संसर्ग जास्त असतो. एक ते पाच वर्षांच्या बालकांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. जन्मानंतर सहा महिने आईकडून मिळालेल्या प्रतिपिंडांमुळे (Antibodies) आजार होत नाही. नंतर लसीकरण केलं जातं. एकदा गोवर होऊन गेला की आयुष्यात पुन्हा होत नाही, इतकी चांगली प्रतिकारशक्ती एकदा झालेल्या आजारानंं तयार होते.

माणसांमध्ये हा संसर्ग आढळतो. इन्क्युबेशन पीरिअड साधारणतः नऊ ते अकरा दिवसांचा असतो. आजाराची प्रत्यक्ष लक्षणं दिसण्याआधी अस्वस्थता येणं, ताप येणं, नाक वाहणं आणि खोकला येणं या गोष्टी होतात. त्यानंतर दोन दिवसांनी शरीरावर पुरळ दिसायला लागतं.

साधारणपणे कपाळापासून सुरुवात होऊन पुरळ शरीरभर पसरतं व चार ते सहा दिवसांत त्याच दिशेनं संपतं. पुरळ दिसल्यावर दोन दिवसांत आधीची सर्व लक्षणं दिसेनाशी होतात.

सर्वसाधारणपणे रुग्ण कुठलीही गुंतागुंत न होता बरे होतात. काही वेळा ब्राँकायटिस, न्यूमोनिया किंवा क्वचित् मेंदुज्वर होऊ शकतो. विषाणूचा शरीरात प्रवेश हा श्वासाद्वारे आणि कंजक्टिवाद्वारे होतो. मग हे विषाणू रक्ताभिसरणातून शरीरभर पसरतात. जेव्हा विषाणू तोंडात स्थिरावतात तेव्हा तिथं निळसर पांढरे ठिपके दिसतात. प्रयोगशाळेत निदान करता येतं. सर्वात वेगवान निदानतंत्र आरटीपीसीआर हे आहे. लक्षणांवर आधारित औषधोपचार केले जातात; पण लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे.

या लशीद्वारे सुरक्षितता मिळते, तो दुसरा आजार म्हणजे मम्प्स किंवा गालगुंड. हा विषाणू साधारणपणे आकारानं गोल आणि जनुकीय सामग्री म्हणून आरएनए असलेला. सामान्यपणे लहान मुलांमध्ये आढळणारा हा संसर्ग. पॅरोटिड ग्रंथींना सूज येणं हे या रोगाचं ठळक लक्षण. या विषाणूंचे व्हेरिअंट आढळत नाहीत. विषाणू साधारणपणे श्वासाद्वारे किंवा क्वचितप्रसंगी कंजक्टिवामधून शरीरात प्रवेश करतात. हा विषाणू श्वासनलिकेत वाढतो आणि रक्तप्रवाहातून शरीरात पसरतो. बारा ते पंधरा दिवसांचा इन्क्युबेशन पीरिअड असतो. पॅरोटिड ग्रंथींची सूज हे प्राथमिक लक्षण असतं; पण त्याचबरोबर ताप, ग्रंथींच्या ठिकाणी, म्हणजेच कानाच्या खाली, सूज येणं आणि तो भाग संवेदनशील होणं ही लक्षणंही दिसतात (म्हणूनच याला ‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ असंही म्हणतात). कुठंही जखम किंवा पू होत नाही. साधारणतः एका आठवड्यात आजार बरा होतो. दहा ते पंधरा टक्के रुग्णांमध्ये काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊन मेंदुज्वर होऊ शकतो. तसा जगभरात आढळणारा हा आजार. मात्र, लसीकरणाच्या विस्तारामुळे आता तो अभावानंच आढळतो. हा आजार केवळ माणसांमध्ये आढळतो, प्राण्यांमध्ये आढळत नाही. या आजाराचे ते वाहकही नसतात. रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे हवेतून किंवा रुग्णानं वापरलेल्या वस्तूंच्या संपर्कामुळे हा आजार पसरतो.

गालगुंड एकदा होऊन गेल्यावर त्यासंंबंधीची चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि पुन्हा हा आजार होत नाही. आईकडून बाळाकडे प्रतिपिंडे दिली जातात आणि त्यामुळे नवजात बालकांना सहा महिन्यांपर्यंत आजाराची शक्यता नसते; म्हणून, लसही सहा महिन्यांनंतरच दिली जाते.

प्रयोगशाळेत या आजाराचं निदान करता येतं; परंतु आरटीपीसीआर हे सर्वात वेगवान तंत्र आहे. लक्षणांवर आधारित औषधोपचार केले जातात. विषाणूजन्य संसर्ग असल्यामुळे प्रतिजैविकांचा (Antibiotics) उपयोग होत नाही. व्यवस्थित आणि वेळेवर लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय.

या तीन विषाणूजन्य आजारांपैकी तिसरा आजार म्हणजे रुबेला किंवा जर्मन मीजोल्स/गोवर. हा आजार ‘टोगाविरिडी’ या परिवारातला आहे आणि त्यात आरएनए या प्रकाराची जनुकीय सामग्री असते. तसा हा आजार सौम्य असतो; परंतु आईला झाल्यास होणाऱ्या बाळात जन्मजात परिणाम दिसू शकतात. उदाहरणार्थ : मोतीबिंदू, बहिरेपणा किंवा हृदयाशी संबंधित दोष. या संसर्गाचा इन्क्युबेशन पीरिअड दोन ते तीन आठवड्यांचा असतो. सर्व शरीरभर पुरळ येतं. पहिल्यांदा कपाळावर आणि मग अन्य भागांवर. हाता-पायांच्या तळव्यांवर मात्र पुरळ दिसत नाही. साधारणपणे तीन ते चार दिवसांत पुरळ नाहीसं होतं.

गोवरासारखे तोंडातले ठिपके यात दिसत नाहीत. हा आजार लहान मुलांमध्ये आजार आढळतो; पण तो कोणत्याही वयात होऊ शकतो. स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. श्वासाद्वारे विषाणू शरीरात प्रवेश करतात. गर्भवती स्त्रियांमध्ये हा आजार झाल्यास, वर उल्लेखिलेले परिणाम बाळामध्ये दिसतात. रुबेला हा विषाणू रुग्णाच्या शरीरात सहा महिने ते एक वर्षापर्यंत राहू शकतो. या आजाराचं प्रयोगशाळेत निदान करता येतं. गर्भवती स्त्रियांमध्ये याचं निदान वेळेत होणं हे पुढचे गंभीर परिणाम टाळण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. लक्षणांसाठी औषधोपचार केले जातात; परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसीकरणच.

या तीन विषाणूजन्य रोगांची माहिती आज आपण घेतली. जिवाणूंमुळे होणारा आणखी एक गंभीर आजार म्हणजे टीबी किंवा क्षयरोग. त्याविषयी पुढील लेखात...

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)

Web Title: Dr Pragati Abhyankar Writes Microbial Infections Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bacteriasaptarang