
कोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरणाचं महत्त्व आपल्या मनावर चांगलंच बिंबवलं गेलं आहे.
- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com
निर्जंतुकीकरण (Sterilisation) म्हणजे जिवाणू-विषाणू इत्यादी सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नाश करणं. एखादी वस्तू, जागा निर्जंतुक करणं याचा अर्थ तिथून सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट करणं.
ही प्रक्रिया ‘शंभर टक्के’ असते. यात ‘थोड्या प्रमाणात’, ‘काही प्रमाणात’, ‘बऱ्याच प्रमाणात’ असं नसतं. अनेक साधनांचा, रसायनांचा किंवा भौतिक प्रक्रियांचा वापर निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. कितीही प्रमाणात सूक्ष्मजीव असले तरी व्यवस्थित प्रक्रिया करून ते प्रमाण शून्यावर आणणं हा निर्जंतुकीकरणाचा उद्देश असतो. या प्रक्रियेतून एखादा जरी जिवाणू तसाच राहिला तरी तो काही वेळातच वाढतो आणि पुन्हा तेच चक्र सुरू होतं. त्यामुळे जेव्हा निर्जंतुकीकरण करायचं असेल तेव्हा जिवाणूंची संख्या, वातावरण, परिस्थिती आणि निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध साधनं या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो.
हात निर्जंतुक करण्यासाठी लागणारी साधनं, पद्धती आणि शस्त्रक्रिया करण्याचं ठिकाण निर्जंतुक करण्यासाठी वापरली जाणारी साधनं व प्रक्रिया यांत खूप फरक असतो. उद्देश मात्र एकच असतो. सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नाश! या प्रक्रियेत चांगलं-वाईट, जास्त कमी असा विचार नसतो.
कोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरणाचं महत्त्व आपल्या मनावर चांगलंच बिंबवलं गेलं आहे. आपण एरवीही हात धूत होतोच, चांगले साबणानं धूत होतो; परंतु त्यामागं ‘स्वच्छता’ हाच उद्देश असायचा; ‘निर्जंतुकीकरण करणं’ याचं महत्त्व फारसं ज्ञात नव्हतं. कोरोनाच्या विषाणूनं याची जाणीव करून दिली व महत्त्व पटवून दिलं. विविध प्रकारचे साबण, रासायनिक व नैसर्गिक रीतीनं तयार केलेले सॅनिटायझर आपण वापरले. वाफारा घेण्याचेही असंख्य प्रयोग झाले. त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोगही झाला आणि त्यामुळे अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते भिंतीला लावण्याच्या रंगापर्यंत सर्वच गोष्टींत निर्जंतुक पर्याय उपलब्ध झाले.
निर्जंतुकीकरणाच्या विविध पद्धती वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रचलित आहेत. यात भौतिक व रासायनिक दोन्ही प्रकारच्या पद्धती आहेत. भौतिक पद्धतीत सर्वप्रथम म्हणजे सूर्यप्रकाश...सूर्यप्रकाशात उष्णता व अतिनील किरण दोन्ही असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा नैसर्गिकरीत्या निर्जंतुकीकरणासाठी उपयोग होतो. यात प्रामुख्यानं विविध प्रकारचे पाण्याचे साठे, उदाहरणार्थ ; तळी, सरोवरं - यासाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग होतो. त्याच्या प्रभावामुळे या साठ्यातील जिवाणू मारले जातात.
उष्णतेचा किंवा वाढलेल्या तापमानाचा निर्जंतुकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. विविध प्रकारच्या प्रक्रियांमध्ये याचा उपयोग केला जातो. सर्वात चांगली व खात्रीशीर पद्धत म्हणून उष्णतेचा उपयोग होतो. ज्या वस्तूवर उच्च तापमानाचा विपरीत परिणाम होत नाही त्यासाठी तर ही पद्धत फारच परिणामकारक ठरते आणि ज्या वस्तू उच्च तापमानात टिकत नाहीत त्यासाठी कमी तापमानाचा जास्त वेळ उपयोग करता येतो. याशिवाय, ज्या प्रकारचे जिवाणू असतील त्याप्रमाणे, जिवाणूंच्या संख्येनुसार आणि कुठल्या प्रकारची उष्णता - कोरडी की ओली - या सर्व बाबी निर्जंतुकीकरणासाठी लक्षात घ्याव्या लागतात.
ओली उष्णता वस्तूच्या आत अधिक चांगल्या प्रकारे शिरकाव करू शकते आणि जिवाणूंचा नाश करू शकते. कोरड्या उष्णतेच्या योग्य परिणामासाठी तापमान अधिक लागतं. कोरड्या उष्णतेचा उपयोग विविध प्रकारे केला जाऊ शकतो. यात धातूच्या वस्तू लालबुंद(Red hot) होईपर्यंत तापवणं, गॅस किंवा अन्य प्रकारच्या ज्योतीमधून ती वस्तू (अर्थात्, वस्तूवर आगीचा परिणाम नको; फक्त जिवाणू मारले जावेत) आरपार नेणं (Flaming)किंवा काही वेळेला पूर्णपणे जाळून टाकणं (Incineration).
उदाहरणार्थ : वैद्यकीय कचरा, रुग्णालयात वापरलेलं ड्रेसिंग, चादरी इत्यादी. प्रयोगशाळेत, रुग्णालयात लागणाऱ्या; विशेषतः काचेच्या वस्तूंसाठी कोरडी हवा असलेल्या ओव्हनचा उपयोग केला जातो. याचं तापमान नियंत्रित करता येतं. कागदात गुंडाळून काचेच्या वस्तू यात ठेवल्या जातात आणि मग विशिष्ट तापमानाची आणि वेळेची सांगड घालून त्या निर्जंतुक केल्या जातात. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये या प्रकाराचा उपयोग जेवणासाठीच्या डिशेस, बाऊल किंवा काटेचमचे इत्यादींसाठी केला जातो. ओव्हनमध्ये १६० अंश सेल्सिअस तापमानावर ६० मिनिटं किंवा १७० अंश सेल्सिअस तापमानावर चाळीस मिनिटं किंवा १८० अंश सेल्सिअस तापमानावर वीस मिनिटं काचेच्या वस्तू ठेवल्या जातात. रबरी किंवा कापडी गोष्टींसाठी यांचा उपयोग करता येत नाही. अवरक्त किरणांचाही (Infrared) उपयोग निर्जंतुकीकरणासाठी केला जातो.
ओली उष्णता ही कोरड्या उष्णतेपेक्षा जास्त परिणाम साधते. पाश्चरायझेशनची प्रक्रिया याचं उत्तम उदाहरण होय. मुख्यत्वेकरून दूध, दुग्धजन्य पदार्थ व काही अन्नपदार्थांसाठी याचा उपयोग करता येतो. यात ६२.८ अंश सेल्सिअस तापमान तीस मिनिटांसाठी किंवा ७२ अंश सेल्सिअस पंधरा सेकंदांसाठी वापरलं जातं.
१०० अंश सेल्सिअसला वीस मिनिटं उकळलेलं पाणी हे जिवाणू-विषाणूंचा नाश करतं; परंतु काही बीजाणू मात्र यानं मरत नाहीत; त्यामुळे फक्त उकळणं हे पूर्ण निर्जंतुकीकरण असू शकत नाही. ‘टिंडलायजेशन’ या प्रक्रियेद्वारे बीजाणू बऱ्यापैकी मारले जातात; परंतु याला वेळ खूप जास्त लागतो. ओल्या उष्णतेचा अर्थात् वाफेचा उपयोग सर्वात चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरणासाठी ‘ऑटोक्लेव’ या उपकरणाद्वारे सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत, तसंच रुग्णालयात केला जातो. मोठ्या प्रेशर कूकरसारख्या दिसणाऱ्या; परंतु विजेवर चालणाऱ्या या उपकरणात वाफेचा दबाव व त्यायोगे तापमान नियंत्रित करता येतं व शंभर टक्के निर्जंतुकीकरण करता येतं. निर्जंतुकीकरणासाठी रसायनांचा उपयोग, तसंच सार्वजनिक ठिकाणांचं निर्जंतुकीकरण याविषयी पुढील लेखात...
(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.