भारतीय नद्या प्रदूषणमुक्त करूया

भारतातील उल्हास, मिठी, पंचगंगा आदी नद्यांच्या प्रदूषणात वाढ, मुळा-मुठेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, अशा बातम्या ऐकून आता कंटाळा आला आहे.
Artificial weightland
Artificial weightlandsakal
Summary

भारतातील उल्हास, मिठी, पंचगंगा आदी नद्यांच्या प्रदूषणात वाढ, मुळा-मुठेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, अशा बातम्या ऐकून आता कंटाळा आला आहे.

- डॉ. प्राक्तन वडनेरकर

भारतातील उल्हास, मिठी, पंचगंगा आदी नद्यांच्या प्रदूषणात वाढ, मुळा-मुठेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, अशा बातम्या ऐकून आता कंटाळा आला आहे. आता प्रदूषणावर बोलण्याऐवजी त्यावरील सोल्युशनवर बोलण्याची गरज आहे. या प्रदूषणावर उपाय करायचा म्हणजे जागोजागी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे बांधायची; पण हे जागोजागी महागडे प्रकल्प बांधणे खरंच शक्य आहे का? महागड्या आणि यांत्रिकी पाणी-सांडपाणी केंद्रांना काही नैसर्गिक पर्याय असू शकतो का? या प्रश्‍नांची उत्तरं शोधताना नद्यांसाठी आमूलाग्र बदल घडवणारे अनेक उपाय आहेत, जे प्रदूषण नियंत्रक ठरू शकतात, त्याविषयी...

दीतील नैसर्गिक हायड्रोलॉजिकल, फिजिकल, जैविक आणि केमिकल प्रक्रिया, नदीकाठची माती आणि वनस्पती यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा पाण्यातील प्रदूषक काढून टाकण्यासाठी नदीच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. कोणतीही एक विशिष्ट प्रक्रिया हे सर्व काही करू शकत नाही, म्हणूनच अनेक प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. पाण्यावर केली जाणारी प्रक्रिया ही पाण्याच्या प्रदूषणावर आणि किती प्रमाणावर हे प्रदूषण होते, यावर अवलंबून असते. या प्रक्रिया प्रभावीपणे करण्यासाठी प्रदूषण करणाऱ्या घटकांची योग्य माहिती असणे आवश्यक असते.

हे उपचार घरापासून ते शेतापर्यंत, पाणलोटापासून ते प्रादेशिक स्तरावर केले जाऊ शकतात. घरापासून ते बांधापर्यंत प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केल्यानंतर गरज असते, ती प्रादेशिक स्तरावर उपाय करण्याची. मोठ्या नदीमध्ये प्रदूषित पाणी जाण्याआधीची ही शेवटची प्रक्रिया असते. जगात असे कोणते स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर आपल्या नदीचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी होऊ शकतो, त्याचा थोडक्यात आढावा घेऊया-

लाकडी किलच्यांचे खड्डे

गावातून, शहरातून सांडपाण्यामुळे होणाऱ्या नदीच्या प्रदूषणाचे निराकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच पद्धतींपैकी एक, म्हणजे सहज सोप्पे आणि स्वस्त लाकडी किलच्यांचे खड्डे. लाकडी किलच्यांचा प्रथम वापर सन १९९५ मध्ये अमेरिकेत भूजलाचे नायट्रोजनपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केला गेला. कालांतराने त्याचा वापर हा शेती आणि मानवी मलमूत्रापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जास्त केला जाऊ लागला. हे खड्डे अनेकदा ९९ टक्के प्रदूषण कमी करतात. जगभरात प्रदूषण रोखण्यासाठी याचा वापर वाढत आहे. अमेरिकेतील सेंट्रल ओवामध्ये सन २००९ मध्ये १०० m3 क्षमतेचा (३०.५ मी. लांब, ३.७ मी. रुंद आणि १ मी. खोल) लाकडाच्या किलच्यांचा खड्डा बांधला गेला. या खड्ड्यात ९.६ mg/L N कॉन्सट्रेशनचे सांडपाणी सोडले जात होते आणि ते पाणी खड्ड्यातून ९६ टक्के (०. ८ mg/l N) शुद्ध होऊन बाहेर पडत होते. नंतर नदीत सोडले जात होते. त्यानंतर युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रलियातील अनेक भागांमध्ये असे अनेक खड्डे बांधले गेले.

जमिनीत मोठ्या प्रमाणावर नायट्रोजनचे वायूमध्ये रूपांतर करणारे सूक्ष्मजीव (Denitrifying bacteria) असतात. या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कार्बनची आवश्यकता असते. त्यासाठी ते लाकडी किलच्यांचा वापर करतात. अशा खड्ड्यात शक्यतो ऑक्सिजन कमी असतो. हे सर्व या सूक्ष्मजीवांना खतांमधील नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.

लाकडी किलच्यांच्या खड्ड्यांसाठी जास्त जागा लागत नाही. स्वस्त, सोपे, शेतीतील टाकाऊ वस्तूंपासून बनणारे लाकडी किलच्यांचे खड्डे हे नदीसाठी वरदान आहेत. असे जर खड्डे आपण प्रत्येक छोट्या ओढ्यांवर बांधले, तर लवकरच भारतातील नद्याही मोकळा श्वास घेऊ शकतील आणि युरोप अमेरिकेतील नद्यांप्रमाणे प्रदूषणमुक्त होतील.

कृत्रिम वेटलँड

नदीच्या, ओढ्याच्या, तलावाच्या या दलदलीच्या प्रदेशांच्या काठालगत असलेला प्रदेश म्हणजेच नदीची फुप्फुसे. आज आपल्या नद्यांची फुप्फुसे सुजलेल्या शहरांमुळे, माणसाच्या अतिक्रमणामुळे आणि नदीचा प्रवाह धरणांसाठी अडवल्यामुळे संसर्गित झाली आहेत.

हा प्रदेश असा असतो जिथे पाण्यातील पर्यावरण जमिनीवरील पर्यावरणात विलीन होते. याला इंग्रजीमध्ये रायपेरिअन प्रदेश म्हणतात. लॅटिन भाषेत राईप म्हणजे किनारा. जरी एकूण जामिनीचा आकार विचारात घेतला, तर त्यांनी व्यापलेला प्रदेश तसा फार कमी आहे; पण ते ज्या सोयी पुरवतात त्यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते. वरवर पाहता हे जरी सोप्पं दिसत असलं तरी येथील पर्यावरण हे नक्कीच अधिक वैविध्यपूर्ण आणि जटील असतं. या भागातील जैविक रचना, भूगोल (मॉर्फोलॉजि), हायड्रोलॉजी (जलविज्ञान), मायक्रोक्लीयमेट (वातावरण), अन्नसाखळी आणि केमिस्ट्री ही भवतालच्या भागापेक्षा वेगळी असते.

अनेकदा या भागात आढळणाऱ्या वनस्पती ही मातीतील ओलावा जास्त असल्याने आणि सुपीक गाळाचा हा प्रदेश बनला असल्याने जास्त दाट आणि कधी कधी उंच असतात. जर आपण ड्रोनमधून वा सॅटेलाईट इमेजेसमधून पाहिलं तर हा प्रदेश हिरव्या रक्तवाहिन्याप्रमाणे वाटतो. हे प्रदेश जैवविविधतेने समृद्ध असतात आणि त्यांच्या जवळच्या प्रदेशातील क्षेत्रापेक्षा सुपीकदेखील. पूरनियंत्रण करणे, पाण्याचा वेग कमी करून भूजलाची पातळी वाढवणे यांसारख्या अनेक सेवा हे प्रदेश देतात. हे प्रदेश जमिनीवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणापासून नदीला वाचवण्याची शेवटची ढाल असतात. ते एक प्रकारे अडथळे आणि मोफत फिल्टरचे काम करतात.

जमिनीवरून येणाऱ्या प्रदूषणापासून नदीला वाचवण्यासाठीच एक स्वस्त आणि सहज असलेला उपाय म्हणजे नदीकाठी स्थानिक झाडे लावून प्रतिबंधात्मक पट्टी तयार करणे. या पट्ट्या सामान्यतः प्रवाहाला लंब स्थितीत असतात. त्यामुळे जमिनीवरून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन मातीचीही धूप रोखली जाते.

फ्लोटिंग वेटलँड

फ्लोटिंग वेटलँडमध्ये पाण्यावर एक प्रकारची गादी तयार करून, विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली जाते. ही पाण्यावरील तरंगणारी झाडे सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि जैविक प्रक्रिया सुलभ करतात आणि त्याअनुषंगाने पाणी स्वच्छ होते. त्याचबरोबर पाण्याबरोबर वाहून येणारी माती सेटल होण्यास यापासून मदत होते.

ही झाडे निवडताना अशी स्थानिक झाडे निवडली जातात, ज्यांची मुळे ०.६ ते ०.८ मीटरपर्यंत वाढतात. शक्यतो जागा अशी निवडली जाते, जिथे पाण्याची खोली साधारण खोली १ मीटरपेक्षा जास्त आहे आणि पाणी प्रमाणात संथ किंवा स्थिर आहे. साधारण ही झाडे पूर्ण वाढण्यास ६-१२ महिने लागतात.

पाण्यावर तरंगणाऱ्या झाडांच्या मुळांमधून विशिष्ट प्रकराची एंझिम्स (द्रव्ये) बाहेर पडतात. त्यातून बायोफिल्म तयार होते आणि ते फ्लोकुलेशन होण्यास (माती सेटल होण्याची प्रक्रिया) प्रोत्साहन देते. त्याचबरोबर ही तरंगती झाडे, त्यांच्या वाढीसाठी पाण्यातील न्यूट्रिएंट्स, मेटलचा वापर करतात. हे करताना पाण्यातील ऑक्सिजन वापरल्याने प्रदूषण कमी करणाऱ्या डिनायट्रिफिकेशनसारख्या प्रक्रिया होण्यास मदत होते. आजवर झालेल्या अभ्यासात साधारण २०-३० वर्षे या तरंगत्या वेटलँडचे आयुष्य असते.

२०१४ पूर्वी शहरातून येणाऱ्या पाण्यामुळे ऑस्ट्रेलियातील ब्लॅकटाऊन शहरातील अंगस नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत होते. यावर उपाय म्हणून सन २०१४ मध्ये स्थानिक महानगरपालिकेने अंगस नदीवर आयताकृती आकाराची तरंगती वेटलँड बांधण्याचे ठरवले. यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली. त्याचबरोबर नदीचे सौदर्यीकरणदेखील झाले. त्यानंतर असेच अनेक फ्लोटिंग वेटलँड ऑस्ट्रेलियातील सिडनी, कॅम्बेलटाऊन आणि पेनरीथसारख्या अनेक शहरांत बांधण्यात आली.

शेलफिश रिफ

समुद्रात असणाऱ्या शिंपल्यांची मशागत केल्यानेदेखील पाण्याची गुणवत्ता वाढवता येते. मुंबईमधील अनेक खाड्यांमध्ये जिथे शहरातून येणाऱ्या पाण्यापासून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते अशा ठिकाणी याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शिंपले हे प्रदूषणयुक्त पाण्याबरोबर येणाऱ्या प्रदूषकांचे आणि जैविक घटकांचे, तीन मायक्रो मीटर एवढ्या लहान होईपर्यंत विघटन करतात, त्यामुळे पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या पदार्थांचे विघटन होऊन, पाण्याचा गढूळपणा कमी होतो. सूर्यप्रकाश आतपर्यंत पोहोचल्याने पाण्यात वनस्पती वाढतात, ज्याला फायटोप्लँक्टन म्हणतात आणि ते पुन्हा डिनायट्रिफिकेशन या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. याचबरोबर या शिंपल्यांमुळे खाडीच्या किनाऱ्यांची होणारी धूप रोखण्यासही खूप मदत होते.

वास्तविक पाहता आपली सुजलेली शहरं, त्यातील लोकसंख्या, उद्योगधंदे, शेती आणि त्यामुळे झालेले प्रदूषण यांचा विचार करून तांत्रिकी महागडी सांडपाणी केंद्रे नकोच, असं म्हणणे काही योग्य नाही. नदीच्या पर्यावरणाचे स्वास्थ्य लाकडी किलच्यांचे खड्डे, फ्लोटिंग वेटलँड, शेलफिश रीफ, मानवनिर्मित वेटलँड यांसारख्या अनेक शाश्वत आणि स्वस्त उपचारांनी सुधारता येते आणि सांडपाणी केंद्रावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी करता येतो. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रलिया, स्वीडन आणि युनाइटेड किंग्डमसारख्या देशांनी हे दाखवून दिले आहे. आपणही या दृष्टीने विचार केल्यास भारतातील नद्या प्रदूषणमुक्त होतील.

(लेखक ऑस्ट्रेलियात पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com