कामगारांसाठी लढणारे नारायण लोखंडे

कामगारांसाठी लढणारे नारायण लोखंडे

कामगारांसाठी ब्रिटिशांशी दोन हात करणारा मराठी माणूस 
गिरणी कामगारांच्या होणाऱ्या अनिर्बंध पिळवणुकीच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला, कामगारांना न्याय्य हक्क, अधिकार मिळावेत यासाठी ब्रिटिशांशी दोन हात केले. असे करणारा पहिला मराठी माणूस म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. "बॉम्बे मिल हॅंडस्‌ असोसिएशन' ही देशातील पहिली कामगार संघटना त्यांनी स्थापन केली. या संघटनेच्या आणि "दीनबंधु' पत्राच्या माध्यमातून त्यांनी कामगारांना साप्ताहिक सुटी, दुपारच्या जेवणाची सुटी, कामाच्या निश्‍चित वेळा, सर्वत्र सारखा पगार, प्रॉव्हिडंट फंड अशा विविध मागण्या मान्य करून घेऊन कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. बालकामगार मुक्तीचा नाराही त्यांनीच दिला. 

नारायण लोखंडे अत्यंत स्वाभिमानी, जिद्दी, हरहुन्नरी, कष्टाळू, अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व. महात्मा फुले यांच्या सहवासात त्यांना समाजस्थितीचे ज्ञान झाल्याने ते समाजकार्याकडे वळले. त्यांच्या रूपाने देशाला पहिला कामगार नेता, विकासदृष्टी देणारा संपादक, समाजसुधारक मिळाला. त्या काळात गिरण्यांमध्ये कामाच्या वेळा, पगार निश्‍चित नव्हते. दुपारच्या जेवणाची सुटी नव्हती.

सहा वर्षांच्या मुलालाही कामावर घेतले जाई. गिरणी व्यवस्थापकांकडून मनमानी पद्धतीने कामगारांची अनिर्बंध पिळवणूक केली जाई. कामगाराची जात पाहून काम दिले जाई. नारायण लोखंडे यांनी कामगारांवरील अन्यायाबाबत "दीनबंधु'तून लिहिण्यास सुरुवात करून सरकारचे, बुद्धिजीवी वर्गाचे याकडे लक्ष वेधले. कामगार ऍक्‍ट लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. कामगार ऍक्‍टमध्ये केवळ अल्पशा तरतुदी असल्याने सुधारित ऍक्‍टसाठी रेटा लावण्यास सुरुवात केली. लहान मुलांना कामावर घेऊ नये, अशी तरतूद करण्यास भाग पाडून लोखंडेंनी बालकामगार मुक्तीचा नारा त्यावेळी दिला. कामाच्या ताणामुळे बालकामगारांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक नुकसान होत असल्याचे लोखंडे वैज्ञानिक पद्धतीने पटवून देतात. कामगारांचे संघटन करून त्यांना त्यांचे हक्क, अधिकारांची जाणीव करून देत त्यांच्या सभा घेतल्या. या सभांना 10 हजारांहून अधिक कामगार उपस्थित राहत.

कामगारांना आठवड्यातून एकदा साप्ताहिक सुटी, दुपारच्या जेवणाची सुटी, कामगारांच्या कामाच्या निश्‍चित वेळा, सर्वत्र सारखा पगार, वेळेवर पगार, अपघात झाल्यास कामगार बरा होईपर्यंत पूर्ण पगार, औषधोपचाराचा खर्च द्यावा, मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबाला पेन्शन मिळावी, मुलांच्या शिक्षणाची सोय, 16 वर्षांखालील मुलांस बालकामगार समजावे, अशा विविध मागण्यांचा कायदा करण्याची मागणी लोखंडेंनी केली. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लोखंडेंनी "दीनबंधु' पत्रातून ब्रिटिशांवर प्रखर शब्दात प्रहार करून फॅक्‍टरी ऍक्‍ट लागू करण्यास भाग पाडले. पुढे या ऍक्‍टच्या अंमलबजावणीवरूनही लोखंडे ब्रिटिशांवर तुटून पडले. गिरणी मालकांनी रविवारी साप्ताहिक सुटी देण्यास विरोध दर्शविला.

कामगार महिन्यातून 5 ते 6 दिवस दांड्या मारतात, यंत्राच्या दुरुस्तीसाठी, तेलपाणी करण्यासाठी 15 दिवसांतून एक दिवस मशीन बंद असते. त्या दिवशी सुटी असते, अशी विविध कारणे गिरणी मालक देत. त्यावर लोखंडेंनी यंत्र दुरुस्तीवेळी तेलपाणी करण्यासाठी, झाडलोट करण्यासाठी कामगारांना कामावर यावे लागते, त्या दिवशी त्यांना सुटी मिळत नाही, उलट त्या दिवशी काम करूनही त्यांना पगारसुद्धा मिळत नसल्याचे लोखंडे यांनी पुराव्यासह दाखवून दिले होते. लोखंडेंच्या दबावामुळे कामगारांना साप्ताहिक सुटी सुरू झाली. 

लोखंडे कामगारांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर लढत राहिले. सनदशीर मार्गाने त्यांनी चळवळ उभी केली आणि चालवली. 1893 मध्ये काही कामगारांनी व्यवस्थापकास मारहाण केली असता लोखंडेंनी कामगारांची कानउघाडणी करत, जे काही करायचे आहे ते सनदशीर मार्गाने करा, कायदा हातात घेऊ नका, असा कडक इशारा दिला. कोणतीही व्यक्ती, समाजाच्या विचारांमध्ये बदल झाल्यास रक्तरंजित क्रांतीशिवाय परिवर्तन घडवता येऊ शकते, यावर लोखंडेंचा विश्‍वास असल्याचे यावरून दिसून येते.

आजची कामगारांची होत असलेली दयनीय स्थिती, कामगार कायद्याची होत असलेली पायमल्ली, शिक्षणासह सर्व क्षेत्रांत आलेल्या कंत्राटी तत्त्वामुळे एकाच कामासाठी मिळणारे विषम पगार, कामगारांची होत असलेली पिळवणूक पाहता लोखंडे यांच्यासारख्या नेतृत्वाची काळाची गरज बनली आहे. त्यासाठी लोखंडे यांचे कार्य, विचार आजही दिशादर्शक आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com