भारतीय स्त्री : कवितेचा समकालीन स्वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book
भारतीय स्त्री : कवितेचा समकालीन स्वर

भारतीय स्त्री : कवितेचा समकालीन स्वर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. पृथ्वीराज तौर drprithvirajtaur@gmail.com

देशातील विविध भाषांमधील स्त्रियांनी आपल्या कवितांमधून धर्म, भाषा, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन आपले विचार व्यक्त केले आहेत. डॉ. पृथ्वीराज तौर व स्वाती दामोदरे या दोघांनी या कवितांचा अनुवाद करून स्त्रीकोश हा कवितासंग्रह केलाय. या संग्रहाची ओळख....

विशिष्ट भाषेतील एकाच काळातील कवितेचा चेहरा सारखा नसतो. आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर कविता निराळी असतेच, शिवाय कवीची विचारप्रणाली, व्यक्तिमत्त्व, कवीनं उपयोजिलेली प्रतिमासृष्टी, कवितेची आंतरिक अंगभूत लय अशा अनेक स्तरांवर ती भिन्न असते. भाषा, प्रदेश, काळ, राजकीय सत्ता यांमुळे जशी कविता बदलते तशीच ती लिंगभेदामुळेही वेगळी होते.

भिन्न भिन्न भारतीय भाषेतील कविता समजून घेताना स्त्री आणि पुरुषांच्या अभिव्यक्तीमधील फरक तीव्रपणे लक्षात येतो. इम्तियाज धारकर (इंग्रजी), प्रतिभा शतपथी (उडिया), तरन्नुम रियाज (उर्दू), पन्ना नायक (गुजराती), पद्मा सचदेव (डोगरी), कनिमोझी करुणानिधि, सलमा (तमिळ), ए. जयप्रभा (तेलगू), निरुपमा दत्त (पंजाबी), नवनीता देव सेन (बंगाली), सुगत कुमारी (मल्याळी), विम्मी सदारंगानी (सिंधी), अनामिका, गगन गिल, निलेश, सुप्रिया अंबर (हिंदी) या नव्या-जुन्या कवयित्रींची कविता त्या त्या भाषेतील पुरुषांच्या अभिव्यक्तीपेक्षा प्रचंड निराळी आहे. जो आवाज शतकानुशतके आतल्याआत गुदमरत राहिला होता, जो केवळ लोकगीतांमधून रूपकात्मक पद्धतीने व्यक्त झाला होता, ते शब्द, निडर होऊन उच्चारण्याचे धाडस स्त्री कवितेने केले आहे. खरेतर भारतीय स्त्री - कविता ही त्या भारतीय माणसांचे प्रतिनिधित्व करते, ज्यांचे माणूसपण कधीही ठळकपणे लक्षात घेतले गेले नाही. या कवितेतून निम्मा भारत बोलतो.

घर, कुटुंब, नाते या बाबींकडे पाहण्याची आधुनिक स्त्रीकवितेची दृष्टी अत्यंत टोकदार आणि स्पष्ट आहे. परंपरेने युगानुयुगे लादलेली ओझी नाकारण्याचे धाडस आणि नातेसंबंध व उत्तरदायित्वाची पुर्नचिकित्सा करण्याची मागणी स्त्री- कविता करते. अवर्जित क्षेत्रात प्रवेश करून तेथील राजकारणावर भाष्य करण्याचा निडरपणा अधोरेखित करण्यासारखा आहे. समकालीन स्त्रीकविता ही एका अर्थाने विचारकविता आहे. समकालाचा, विज्ञाननिष्ठ युगाचा, समता व न्यायाचा, भागिनीभावाचा स्वर व्यक्त करताना ती नव्या लयी व नव्या वाटा निर्माण करत जाते.

‘नवरा’ हे एक नाते घेतले तरी यासंदर्भानं भारतीय स्त्री कविता निषेध, नकार आणि बंधमुक्तीचे जे गाणे गाते त्यावरून तिचे वेगळेपण लक्षात येईल. वर्रे राणी (तेलगू) यांनी ‘माझा अजगर/ पँट घालतो / इंग्रजीही बोलतो / साहित्यचर्चेत भाग घेतो/ पण मला चार भिंतीत कोंडतो’ असे नव-याबद्दल लिहिले आहे. तर मंजीत टिवाणा (पंजाबी) यांनी ‘नवरा एक भुकेला लांडगा आहे’ असा अनुभव मांडला आहे. दैनंदिन आयुष्यात अगदी नेहमीच वाट्याला येणाऱ्या अनुभवांचे दाखले देत सावित्री (तेलगू) यांनी विवाहसंस्थेचे खरे रूप शब्दबद्ध केले आहे,

‘तेव्हा मला कळून आले

लग्न म्हणजे एक सजा आहे

आणि नवरा म्हणजे तो

जो तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेतो’

अर्थात विरोधासाठी विरोध अशी भूमिका या कवितांमध्ये नाही तर सहजीवनाचा, सहप्रवासी असण्याचा, सोबत करण्याचा तिचा आग्रह आहे. ‘स्व’च्या स्वतंत्र अस्तित्वाचा बळी देऊन संसार करावा हे मात्र तिला मान्य नाही. भारतीय कवितेतून वाचायला मिळणारा स्त्री कवयित्रींचा शब्द एकटीदुकटीचा नाही तर तो व्यापक समुहाचा प्रतिनिधी आहे. व्यक्ती म्हणून स्त्रीचे परस्परांना समजून घेणे व समोरच्या स्त्रीच्या वेदनेवर फुंकर घालणे हे मानवी भावनेतून घडत जाते. धर्म, भाषा, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन स्त्री कविता स्वत:ला व्यक्त करते. ती केवळ कागदावर उतरून थांबत नाही तर वाचकांच्या सद् सद् विवेकाला विचार करायला भाग पाडते, पुरुषांना आपल्या वर्तनाविषयी, कृतीच्या परिणामांविषयी भान यावे हा तिचा प्रयत्न आहे. वेश्यागृहात विकल्या गेलेल्या बेबी हाल्दार यांच्याविषयी सहानुभाव व्यक्त करणारी अनामिका (हिंदी) यांची कविता वाचकाला घुसमटून टाकते. या कवितेतील चौदा वर्षांची सेक्सवर्कर ग्राहकाला ‘अंकल! तुम्हाला मुलगी आहे का? हो का, काय आहे तिचं नाव? माझ्यासारखीच गोड गोड आहे का तीही, सांगा नं?’ असे जे प्रश्न विचारते ते अस्वस्थ करतात आणि व्यवस्थाबदलाविषयी कृती करण्याची वेळ आली आहे, याबाबत सूचन करतात. मंजरी श्रीवास्तव (हिंदी) यांची ‘ब्रोथेल’ही कविता किंवा रेमिका थापा (नेपाळी) यांची ‘हेलन केलर’ ही कविता व्यापक मानवी सहानुभावातून निर्माण झाल्या आहेत.

स्त्री - कविता पुरेशी सामाजिक नाही, असा आरोप तिच्यावर पुष्कळदा केला जातो. या आरोपात फारसे तथ्य नाही. स्मिता सहगल (इंग्रजी) यांची ‘काबुल २०२१’ ही कविता अगदी ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबद्दल आहे. इश्मीतकौर चौधरी (पंजाबी) यांची ‘सद् गती लाभो’ ही कविता १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंग्यांच्या ओल्या जखमा दाखवते. ममंग देई (आदी), नसीम शफाई (काश्मिरी), शेफाली देबबर्मा (कॉकबराक), मीता दास (बंगाली) यांच्या कवितांमध्ये अरुणाचलप्रदेश, काश्मीर, त्रिपुरा, बंगाल या प्रांतातील अस्वस्थता टोकदारपणे व्यक्त झाली आहे. भारतीय दलित स्त्री - कविता आणि आदिवासी स्त्री - कविता या सुरुवातीपासूनच सामाजिक दुभंगलेपणाच्या विरोधात उभ्या आहेत. ही कविता जागतिकीकरण आणि शोषणाचे नवे मार्ग यांच्यावर बोट ठेवते. सुनीता, पूनम तुषामड, रमणिका गुप्ता, वंदना टेंटे, निर्मला पुतुल, सुष्मिता हेम्ब्रम, तेमसुला आओ, रोज केरकेट्टा, ग्रेस कुजूर, ज्योती लकडा, मिलनरानी जमातिया, इस्टरीन इरालू, जन्सिता केरकेट्टा यांच्या दलित-आदिवासी कविता हिंदी किंवा कुडुख, कॉकबराक, खडिया, नागा, बोडो, संथाली या आदिवासी भाषेतून लिहिल्या जात आहेत. सांस्कृतिक पटलावर स्वत:च्या भाषेला प्रतिष्‍ठित करण्याचे कार्यही यामुळे ओघानेच घडत आहे.

दैनंदिन बोलण्यातून लुप्त झालेल्या संस्कृतसारख्या भाषेत, सिंधी-नेपाळी-उर्दू सारख्या भारतभर विखुरलेल्या व विस्तारलेल्या भाषेत, मैथिली, कोंकणी, डोगरी, अंगिका, ब्रज, भोजपुरी या स्वत:च्या नव्या अस्मिता शोधणाऱ्या भाषांमध्ये आणि राजस्थानी ते आसामी व गुजराती-कानडी ते मणिपुरीपर्यंत भिन्न भिन्न प्रादेशिक भाषेत भारतीय स्त्री - कविता लिहिली आज आहे.

‘स्त्री- कोश’ या संग्रहात मी आणि स्वाती दामोदरे यांनी बत्तीस भाषांतील सव्वादोनशे कवयित्रींच्या साडेतीनशे कविता अनुवादित केल्या आहेत. गेली पंचवीस वर्षे मी भारतीय कविता वाचत, अभ्यासत आणि मराठीत अनुवादित करत आलो आहे. बहुतेक भारतीय भाषेच्या सांस्कृतिक व प्रादेशिक परंपरांशी गेल्या दोन दशकात माझा जवळून परिचय झाला. ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकासाठी संथाली कवयित्री निर्मला पुतुल यांच्या कवितांचे मराठी अनुवाद वीस वर्षांपूर्वी मी केले होते. काश्मिरी आणि पंजाबी भाषेतील शंभरावर कवी मी आजवर मराठीत अनुवादित केले आहेत. ‘होरपळलेल्या माणुसकीची कविता’(२००३) आणि ‘कवितांजली’(२०१७) हे माझे दोन अनुवादित कवितांचे संग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. स्वाती दामोदरे यांच्या नावावर ‘डोळे मोनालिसाचे’(२०१८) हा अनुवादित कवितासंग्रह आहे, साडेतीन वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी ‘स्त्रीकोश: भारतीय स्त्री कविता’ या संग्रहासाठी अनुवादाचे काम सुरु केले. बहुतेक भारतीय भाषेतील साडेआठशे कवयित्रींच्या हजारपेक्षा जास्त कवितांचे अनुवाद ‘स्त्रीकोश’साठी केले. चारशे पृष्ठांच्या पुस्तकात मात्र केवळ सव्वादोनशे कवयित्रींचा समावेश आहे.

भारतीय स्त्री- कविता मराठीत एकत्रितपणे उपलब्ध करून देणारा ‘स्त्रीकोश’ हा पहिला कवितासंग्रह आहे. या अनुवादांनी मराठी कवितेचे वर्तुळ विस्तारण्यास आणि स्त्री च्या जगण्याचे नवे पैलू उजेडात येण्यास नक्कीच मदत होईल.

पुस्तकाचं नाव : स्त्रीकोश : भारतीय स्त्रीच्या कविता

अनुवाद : पृथ्वीराज तौर, स्वाती दामोदरे

प्रकाशक : हस्ताक्षर प्रकाशन, नांदेड (९०९६९९९८६५)

पृष्ठं : ४००

मूल्य : ५०० रुपये.

loading image
go to top