‘अर्थ’पूर्ण जीवनाचा मंत्र!

‘औष्णिक ऊर्जे’च्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून अजोड कामगिरी करीत असलेले प्रथितयश उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक.
book gost paishyapanyachi
book gost paishyapanyachisakal
Summary

‘औष्णिक ऊर्जे’च्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून अजोड कामगिरी करीत असलेले प्रथितयश उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक.

- डॉ. रघुनाथ कडाकणे

‘औष्णिक ऊर्जे’च्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून अजोड कामगिरी करीत असलेले प्रथितयश उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक मराठी माणसांना अर्थसाक्षर बनविण्याच्या सद्हेतूने सिद्ध झाल्याचं दिसतं. एकंदरीत मानवी जीवनाला व्यापून राहिलेला व्यवहार आणि त्यात पैशाला प्राप्त झालेलं महत्त्व हे पुस्तक ठळकपणे अधोरेखित करतं. पण, त्याच्या बरोबरीनेच मानवी जीवनात नेमकी कशाला ‘किंमत’ असते आणि कशाला ‘मूल्य’ असतं याविषयीचे समज-गैरसमजही ते स्पष्ट करतं. पैसा मिळवायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे याचं प्रबोधन यातून अगदी सहजपणे घडतं. अखंड शिक्षण, सुसंगती, माणुसकी, साधेपणा, बचतीची सवय, संयम, मेहनत, वक्तशीरपणा, कालसुसंगत वर्तन, संकटाचा सामना करण्याचं धैर्य, देशविदेशांतील भ्रमंतीतून येणारी अनुभवसंपन्नता आणि या सगळ्यांतून आकाराला येणारं असामान्य जीवन अशा कितीतरी गोष्टी हे पुस्तक उलगडून दाखवतं.

विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे या पुस्तकात मांडलेली सगळी जीवनमूल्यं लेखकाने स्वतः आपल्या अंगी बाणवलेली आहेत आणि त्यांचा अवलंब आपल्या व्यवसायात निरपवादपणे केलेला आहे. तारमास्तर वडील आणि शेतकरी आईच्या पोटी कुठल्याशा खेड्यात जन्मलेल्या मराठी मुलाने आपल्या जिद्दीच्या, बुद्धीच्या आणि तत्त्वांच्या बळावर औष्णिक ऊर्जेसारख्या अल्पपरिचित क्षेत्रात इतकं उज्ज्वल यश मिळवावं ही गोष्ट निश्चितच ऊर्जा देणारी आहे. महत्त्वाचं म्हणजे, केवळ कोरडे धडे देण्याचा प्रयत्न इथे केलेला नाही, तर वाचकाला भावुक आणि रोमांचित करणारे लेखकाचे जीवनानुभवही प्रभावीपणे कथन केलेले आहेत. वयाच्या तेविसाव्या वर्षी सुरू केलेल्या पहिल्याच व्यवसायात आलेलं दारुण अपयश, त्यासाठी गमवावं लागलेलं घर, ऐन सणासुदीच्या दिवसांत हाती असलेला प्रोजेक्ट पूर्ण केल्याचं बक्षीस म्हणून कंपनी मालकांनी देऊ केलेलं पाकीट नम्रपणे नाकारण्याची नैतिकता, थरमॅक्स कंपनीच्या प्रमुख अनु आगा यांचा इकॉनॉमी क्लासचा विमानप्रवास आणि त्यांच्याच कंपनीचे कर्मचारी म्हणून लेखकाचा त्याच विमानातील बिझनेस क्लासमधून घडलेला प्रवास आणि त्या दरम्यान झालेली प्रचंड घालमेल... हे सगळे प्रसंग जितके हृदयद्रावक, तितकेच प्रेरणादायी आहेत.

मनाने ठरवलं तर अभावाकडून वैभवाकडे, विपन्नतेकडून संपन्नतेकडे जीवनप्रवास करणं कोणालाही शक्य आहे अशी उमेद हे पुस्तक वाचकांच्या मनात निर्माण करतं. तसंच, मिळविलेल्या पैशाचं भपकेदार प्रदर्शन कसं टाळलं पाहिजे याची शिकवणही ते देतं. एकदा का आपल्या गरजेपेक्षा अधिक धनप्राप्ती झाली, की मग योग्य त्या कार्यासाठी त्याचं दानही केलं पाहिजे, असा लेखकाचा आग्रह आहे; पण हा आग्रह लेखक केवळ इतरांनाच करतो असं नाही, तर स्वतःही तो पाळतो. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारं सर्व मानधन वाचनवृद्धीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना देणार असल्याचं लेखकाने आरंभीच नमूद केलेलं आहे, हे इथे लक्षात घ्यायला हवं. तसं पाहिलं तर, पैसा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो; पण हलक्याफुलक्या आणि आजच्या सामाजिक पर्यावरणात प्रचलित असलेल्या भाषाशैलीचा सहज-वापर करून तो या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे.

लहानपणापासून कुटुंबात रुजवली गेलेली परंपरागत जीवनमूल्यं समकालीन आणि मुक्तसंवादी स्वरूपात इथे मांडली असल्याने ती कमालीची आकर्षक आणि प्रत्ययकारी बनलेली आहेत. अल्पावधीतच या पुस्तकाने लोकप्रियतेचं शिखर गाठण्यामागे हेच गमक आहे.

वस्तुतः ‘यशाचे मंत्र आणि पैशाचे तंत्र’ शिकवणाऱ्या पुस्तकांची बाजारात वानवा नाही. परंतु एका बाजूला विषय मांडणीतली क्लिष्टता आणि दुसऱ्या बाजूला सवंग बाळबोधपणा ही दोन्ही टोकं टाळून मधल्या मार्गाने प्रवाहित झालेली ही ‘पैशापाण्याची गोष्ट’ नितळ, विशुद्ध पाण्याप्रमाणे थेट वाचकांच्या अंतःकरणात झिरपते.

पुस्तकाच्या अखेरीस ‘गोष्ट ऊर्जेची’ या प्रकरणात वायुगळतीमुळे उद्भवलेला लेखकाच्या आयुष्यातील एक थरारक प्रसंग वर्णन केलेला आहे. कामाच्या ठिकाणी उसळलेला आगडोंब शमविण्यासाठी लेखकाने स्वतः आगीत उडी घेणं, जिवाची पर्वा न करता ती विझवण्याची पराकाष्ठा करणं, तीत स्वतः होरपळलं जाणं या गोष्टी वाचताना अंगावर शहारे येतात. प्रतिकूल परिस्थितीच्या आगीत अक्षरशः तावून सुलाखून निघालेल्या आणि मागाहून जीवनसमृद्धीची ‘ऊब’ अनुभवणाऱ्या बावनकशी माणसाची ही सोनकहाणी आहे, असंच म्हणायला हवं. तात्पर्य, ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक सचोटीने पैसा कमावण्याचं तंत्र तर शिकवतंच; पण मिळालेल्या पैशांतून वैयक्तिक व सामाजिक समृद्धी साधण्याचा मंत्रही देतं.

ज्येष्ठ उद्योजक आनंद देशपांडे यांची प्रस्तावना या ग्रंथास लाभली असून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. सदानंद मोरे, हणमंतराव गायकवाड, राजीव खांडेकर आदी मान्यवरांचे प्रशंसोद्गार त्याची मौलिकता अधोरेखित करतात. सागर भागवत यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ अतिशय सूचक असून ‘सकाळ’ प्रकाशनाने नेहमीप्रमाणेच उत्तम निर्मितीमूल्यं जपत अत्यंत सुबक व वाचनीय स्वरूपात पुस्तकाची मांडणी केलेली आहे.

पुस्तकाचं नाव : गोष्ट पैशापाण्याची

लेखक : प्रफुल्ल वानखेडे

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (संपर्क : ०२० - २४४०५६७८, ८८८८८४९०५०)

पृष्ठं : १८४

मूल्य : २५० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com