शिवछत्रपती आणि गनिमी कावा

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक लढाया ‘गनिमी काव्या’चा वापर करून केल्या. ‘गनिमी काव्या’चा जनक म्हणून मलिक अंबरला श्रेय दिले जाते.
Pratapgad
PratapgadSakal
Summary

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक लढाया ‘गनिमी काव्या’चा वापर करून केल्या. ‘गनिमी काव्या’चा जनक म्हणून मलिक अंबरला श्रेय दिले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक लढाया ‘गनिमी काव्या’चा वापर करून केल्या. ‘गनिमी काव्या’चा जनक म्हणून मलिक अंबरला श्रेय दिले जाते; मात्र तंत्राचा कौशल्यपूर्वक उपयोग शिवाजी महाराजांनी केला. मोंगल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रूंशी सामना करताना शिवछत्रपतींचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य कमी पडत होते; मात्र महाराजांनी सह्याद्रीच्या दुर्गमतेचा उपयोग करत ‘गनिमी काव्या’चे युद्धतंत्र अवलंबून शत्रूला जेरीस आणले आणि हिंदवी स्वराज्य विस्तारले...

शिवछत्रपती आणि गनिमी कावा या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा समज मराठी मनांमध्ये आजही खोलवर रुजलेला दिसतो आणि त्याहीपेक्षा गनिमी कावा म्हणजे लबाडीचे युद्ध, शत्रूला फसवून केलेले युद्ध अशीही समजूत आढळून येते. आघाडीचे लेखक-इतिहासकार सदानंद कदम ‘गनिमी कावा’ या संकल्पनेची उत्पत्ती आणि इतिहास आपल्या ‘कहाणी शब्दांची - मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या प्रसिद्ध ग्रंथात पुढीलप्रमाणे मांडतात. - ‘मराठ्यांच्या इतिहासाच्या पानापानांवर दिसणारा शब्द म्हणजे गनिमी कावा. शिवाजी महाराजांनी या गनिमी काव्याचा पुरेपूर वापर केला असला, तरी ही अनोखी पद्धत विकसित केली ती मलिक अंबरने. मलिक अंबरच्या मूळच्या प्रदेशानं त्याला विकसित करण्याला भाग पाडलं. हा शब्द आज मराठीत स्थिरावला असला, तरी तो आहे अरबी-फारसी यांतला. अरबीतला गनिमी म्हणजे अचानक हल्ला आणि फारसी ‘कावा’ म्हणजे ठकबाजी. आडमार्गाने शत्रूला जेरीस आणणे, अचानक हल्ला करणे आणि लबाडीची युक्ती या अर्थाने आपण तो वापरत असतो.’ अशाच प्रकारचा विचार गनिमी काव्याबाबत ब्रिगेडिअर वा. ग. पित्रे यांनी ‘मराठ्यांचा युद्धेतिहास’ या आपल्या ग्रंथात मांडला होता.

गनिमी कावा म्हणजे काय?

‘गनिमी कावा’ हे एक प्राचीन युद्धतंत्र आहे. त्याचा उगम हिंदुस्थानात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सापडतो. म्हणजे, हे युद्धतंत्र शिवकाळाचा विचार करीत असताना १९००-२००० वर्षांपूर्वी त्यासंबंधी लिहिले गेले. हे तंत्र भातवडीत (अहमदनगरनजीक) १६२४मध्ये निजामशाहीचे वझीर मलिक अंबरने मोंगल आणि आदिलशाही यांच्या विरोधात महाराष्ट्रात प्रथम वापरले. या युद्धात शहाजी महाराजांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. याचा अर्थ हे युद्धतंत्र शहाजी महाराजांना ज्ञात होते. ते तंत्र शहाजी महाराजांनी शिवाजी राजेंना कदाचित शिकविले असावे!

मोंगल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रूंशी प्रारंभीच्या काळात सामना करीत असताना शिवाजी राजे आणि त्यांची मराठा फौज यांचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य खूपच कमी पडत होते. परिणामी त्यांच्याशी लढताना शिवछत्रपतींनी ‘गनिमी काव्या’चे युद्धतंत्र अनेक वेळा हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना उपयोगात आणले होते.

‘आपल्यापेक्षा ताकदवान शत्रूला जेरीस आणण्यासाठी गुप्तपणे शत्रूवर हल्ले करण्याचे तंत्र म्हणजे ‘गनिमी कावा’ अशी एक साधी, सोपी आणि आकलनीय व्याख्या त्यासंबंधी मांडता येईल.’

नेहमीच्या बोलीभाषेत ‘कावा’ म्हणजे लबाडी, फसवेगिरी, लुच्चेगिरी असा अर्थ घेतला जातो; परंतु ‘कावा’ या शब्दाचा अर्थ घोड्यावर आपले पूर्ण नियंत्रण असावे. मांड असावी म्हणून त्याला जे विशिष्ट प्रकारे फेरे काढून प्रशिक्षण दिले जाते त्यालाच ‘कावा’ असे म्हणतात. घोडा हा प्राणी म्हणजे मराठा सैनिकांचा जणू दुसरा प्राणच! तो वेगात असताना घोडेस्वार त्याला आपल्या मनाप्रमाणे कसेही वळवू किंवा थांबवू शकतो. त्यामुळे शत्रूला घोड्याच्या हालचालीबाबत काही अंदाज बांधता येत नाही; परंतु घोड्याचा वेग कमी केल्यास तो कोणत्या बाजूस वळणार किंवा थांबणार याचा अंदाज समोरच्या शत्रूला बांधता येणे शक्य असते. रणांगणावर घोडा धावत असताना नेमक्या त्याच्या हालचाली कशा राहतील यासंबंधी कोणत्याही प्रकारचे अंदाज शत्रूला बांधता येऊ नयेत, असे जे प्रशिक्षण त्याला दिले जाते किंवा वखर वाड्.मयात यासंबंधी ‘उंट कलावर बसणे’ असा एक वाक्प्रचार येतो. त्याचा अर्थ उंट जमिनीवर बसताना पुढचे पाय आधी वाकवेल, की मागचे पाय आधी वाकवेल हे सांगता येत नाही. रणांगणातील घोड्याचे वागणे जेव्हा ‘उंट कलावर बसणं’ असे होते, तेव्हा त्याला ‘कावा’ असे म्हणता येईल. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेत मराठे आपल्या घोड्यांचा उपयोग करून लढत. त्यामुळेच मराठ्यांच्या शत्रूंनी विशेषतः मुस्लिमांनी त्याला ‘कावा’ हे नाव दिले. थोडक्यात ‘कावा’ म्हणजे गनिमांशी-शत्रूची केलेली फसवणूक नव्हे, तर ते एक युद्धतंत्र आहे. याच तंत्राचा वापर करून जावळीच्या मस्तवाल चंद्रराव मोऱ्यांना शिवाजी महाराजांनी पूर्ण पराभूत केले. जावळी ताब्यात घेतली. सुप्याच्या मोहिते मामांना नमविले. प्रतापगडावर बढाईखोर अफझलखानाचा खातमा करून त्याला गडाच्या पायथ्याशी कबरीत कायमचे झोपविले!

उदाहरणे गनिमी काव्याची!

बादशहा औरंगजेबाचा मामा शाईस्तेखान मावळ प्रदेशात-पुण्यात ९ मे १६६०पासून ५ एप्रिल १६६३पर्यंत म्हणजे सुमारे तीन वर्षे दीड लाख सैन्यासह मुक्काम ठोकून होता. त्याचे तेथील लोकांवर अन्याय-अत्याचार सुरूच होते. त्याचा हा धुमाकूळ संपविण्यासाठी शिवाजीराजेंनी ६ एप्रिल १६६३च्या पहाटे खुद्द आपण लाल महालात शिरून त्याला ठार मारण्याचे अपूर्व अकल्पित असे धाडस केले होते; परंतु खानाच्या सुदैवाने त्याच्या प्राणावरचे बोटावर निभावले. या सर्व हल्ल्यात महाराजांनी ‘गनिमी काव्या’चा पुरेपूर वापर केला होता. यावेळी मराठ्यांनी लग्नाचे वऱ्हाड-वाजंत्री बनून पुणे शहरात प्रवेश मिळविला होता. इतकेच नव्हे, तर शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हाही एक पूर्वनियोजित आणि अपूर्व असा ‘गनिमी कावा’च होता. याखेरीज १६७२मध्ये (फाल्गुन वद्य त्रयोदशी शके १५९४) मराठ्यांनी पन्हाळगड ‘गनिमी कावा’ वापरून जिंकल्यानंतर आदिलशहाने संतापून बहलोलखानास पन्हाळा पुन्हा जिंकून घेण्यास पाठवून दिले. तेव्हा बहलोलखानाचा तळ विजापूरपासून २७ मैलांवर असणाऱ्या उमराणी येथे एका तळ्याकाठी पडला होता. त्यावेळी बहलोलखानाशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांची नेमणूक केली होती. याही युद्धात त्यांनी ‘गनिमी काव्या’चा कसा वापर केला होता याचा समग्र वृत्तांत आपणास शिवकालीन कवी जयराम पिंडे यांच्या ‘पणलिपर्वत ग्रहणाख्यान’ या काव्यात वाचावयास मिळतो.

याच लढाईत प्रतापरावांच्या बलिदानानंतर बहलोलखानाचा पूर्ण पराभव आनंदरावांनी केला. त्याला पळता भुई थोडी असे करून सोडले. (मार्च अखेर १६७४).

थोडक्यात. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक लढाया या ‘गनिमी काव्या’चा वापर करून केलेल्या आढळतात. ‘गनिमी काव्या’चा जनक म्हणून मलिक अंबरला श्रेय दिले जात असले तरी या तंत्राचा विकास शिवाजी महाराजांनी केला.

तंत्र गनिमी काव्याचे

  • आपल्या हेर खात्यामार्फत शत्रूबाबत इत्थंभूत माहिती प्रथम प्राप्त करणे. बहिर्जी नाईक-जाधव हे हेर खात्याचे प्रमुख आणि हिरोजी फर्जंद यांच्यासारखे इतर हेर शिवाजी राजेंकडे ही जबाबदारी कुशलतेने सांभाळत होते.

  • ‘गनिमी कावा’ हे तंत्र वापरण्यासाठी तातडीने निर्णय घेणारा प्रतिभावंत आणि धाडसी असा शिवाजी राजेंसारखा नेता असावा लागतो.

  • निश्‍चित अशा प्रकारचे राष्ट्र-ध्येय ठरवून पुढील पाऊले उचलावी लागतात. ‘हिंदवी स्वराज्य’ निर्मिती हेच त्यांचे राष्ट्र ध्येय होते.

  • अशा प्रकारचे तंत्र वापरत असताना त्वरित निर्णय विद्युत वेगाने घेणे आणि शत्रूला न कळता हालचाली कराव्या लागतात.

  • हे तंत्र उपयोगात आणले जात असताना तेथील प्रजेचा पाठिंबा असावा लागतो. यासंदर्भात भारतीय स्वातंत्र्य युद्धात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या प्रतिसरकारचे (पत्री सरकार) उदाहरण लक्षात घेता येईल.

  • ‘गनिमी काव्या’मध्ये शत्रूची दिशाभूल करावी लागते. सूरत लुटीबाबत महाराजांनी आपण खरे कोण आहोत हे न सांगता मोंगलांचे सरदार आहोत आणि अहमदाबादकडे चाललो आहोत, अशी वार्ता सर्वत्र परसवली होती.

  • शत्रूला आपण माघार घेत आहोत असे भासविणे आणि आपला पाठलाग करण्यास त्यांच्यापैकी काही सैन्याला भाग पाडणे. नंतर उरलेल्या शत्रू सैन्यावर पाठीमागून हल्ला करणे.

  • शत्रू सैन्यात गोंधळ उडवून देण्यासाठी नेता किंवा इतरांनी वेषांतर करणे. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जात असताना शिवा काशीद या शूर वीराने शिवाजी बनून आत्मबलिदान केले होते.

  • शत्रू सैन्याची दिशाभूल करण्यासाठी रात्रीच्या अंधारात बैलांच्या शिंगांना मशाली लावून त्यांना भलत्या वाटेने पळवून लावणे हा प्रकार मराठ्यांनी अनेकदा उपयोगात आणला होता.

  • शत्रू पक्षात रणांगणावर पिसाळलेला हत्ती किंवा नजीक असणाऱ्या जलाशयातील पाण्याचा प्रवाह सोडून गोंधळ माजविणे.

  • गनिमी काव्यासाठी डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगले, नद्या, ओढे, घाट यांसारख्या अडचणींचे प्रदेश अधिक उपयोगी पडतात. म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपले बहुसंख्य किल्ले सह्याद्रीच्या कुशीत बांधले होते. सह्याद्री त्यांचा नित्याचा सखा आणि पाठीराखा होता. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचा विस्तार कोकणासारख्या डोंगराळ, जंगलमय आणि सागर किनारी जाणीवपूर्वक त्यांनी केला होता.

  • गनिमी काव्याने शत्रू पक्षाचे सर्वच दृष्टिकोनातून अधिकाधिक नुकसान होईल आणि या उलट आपले मात्र कमीत कमी नुकसान होईल, अशा सावधानतेने हालचाली कराव्यात लागतात.

यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे शिवछत्रपतींच्या गनिमी काव्याची बीजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सापडतात.

उच्च दर्जाचे युद्धतंत्र

‘गनिमी काव्याची लढाई हे एक कपटयुद्ध असते, असा आभास मराठ्यांच्या शत्रूने निर्माण केला असला तरी ते एक युद्धतंत्र आहे. त्यात कौशल्याचा भाग आहे, कपटाचा लवलेश नाही. उभय पक्ष देश-काळाची घोषणा करून लढण्यासाठी रणभूमीवर आमने-सामने आल्यावर जे युद्ध होते ते प्रकाशयुद्ध. प्रकाशयुद्ध करणे जेव्हा दोहोंपैकी एका पक्षास शक्य नसते तेव्हा कूटयुद्ध म्हणजेच ‘गनिमी कावा’ उपयोगात आणावा,’ असे कौटिल्य सांगतो. ‘गनिमी काव्या’चा उगम जवळजवळ १९००-२००० वर्षांपूर्वी शिवकाळाच्या आधी झाला. हे युद्धतंत्र कौटिल्याने मांडले, हे जरी खरे असले तरी हे युद्धतंत्र कौटिल्याच्याही पूर्वी सुमारे ३००-४०० आधी ग्रीक देशात पुराण कथेच्या स्वरूपात का असेना मांडले गेले होते. इ. स. पूर्व ७०० वर्षे ग्रीक देशात जे ‘ट्रोजन वॉर’ झाले त्यामध्ये ग्रीक सैनिकांनी टोरी शहरात लाकडी घोड्यांच्या आत लपून बसून प्रवेश केला होता. त्यांना मेनेलेऊसची पत्नी हेलेनचा शोध घ्यावयाचा होता. तिचे अपहरण झाले होते. शेवटी पुराणकथा काही आभाळातून पडलेल्या नसतात! त्यांनाही वास्तवतेचा आधार असतो! थोडक्यात ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र खूपच प्राचीन असून शिवछत्रपतींचे शत्रू जसे समजतात तसे ते लबाडीचा किंवा फसवणुकीचा प्रकार नसून, उच्च दर्जाचे युद्धतंत्र आहे, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.

शिवछत्रपतींच्या सर्वच शत्रूंनी विशेषतः मोंगलांनी आपण सर्वच बाजूंनी ‘बलाढ्य’ असताना अनेक युद्धांत दगलबाज शिवाजी आपला पराभव करतो, तो पराभव लपविण्यासाठी म्हणजेच त्यावर पांघरूण घालण्यासाठी दुष्ट शिवाजी ‘गनिमी कावा’ करून लढतो. तो आमच्याशी लबाडीचा-फसवणुकीचा डाव खेळतो, असा आरोप करून शिवछत्रपतींचे हे परकीय शत्रू आपला ‘बचाव’ करतात. हेच शिवछत्रपतींच्या बहुचर्चित ‘गनिमी काव्या’चे ‘उघड गुपित’ आहे!

शिवाजी महाराजांनी ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राचा वापर कुशलतेने करून हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी अनेक पराभवांचे विजयात आणि लहान विजयाचे महान विजयात रुपांतर केले होते. यातच ‘गनिमी काव्या’ची महती आपल्या लक्षात यावी असे मनःपूर्वक प्रस्तुत अभ्यासकाला वाटते!

संदर्भ

१) कृ. पा. कुलकर्णी, मराठी व्युत्पति कोश, पृ. २४२

२) य. ना. केळकर, ऐतिहासिक शब्दकोश - प्रस्तावना

३) सदानंद कदम, मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी शब्दांची पृ. ७७

४) ब्रिगेडिअर का. ग. पित्रे, मराठ्यांचा युद्धेतिहास (१६००-१८१८) पृ. १८-१९

५) डॉ. श्रीनिवास सामंत, वेध महामानवाचा पृ. १४

६) श्रीधर रं. कुलकर्णी, शिवकालीन राजनीती आणि रणनीती (आज्ञापत्राच्या संहितेसह पृ. १०४)

७) सदानंद कदम, मराठी भाषेच्या जडणघडणीची- कहाणी वाक्प्रचारांची, पृ. ५१

८) उपरोक्त कुलकर्णी, पृ. १०३

९) डॉ. रमेश जाधव, युगप्रवर्तक छत्रपती शिवराय, पृ. २३ (अप्रकाशित)

१०) कवी जयराम पिंडे, पणलिपर्वत ग्रहणाख्यानम सं.स.म. दिवेकर, पृ. ३८-५०

११) उपरोक्त डॉ. जाधव, पृ. २४

१२) प्रा. र. पं. कंगले, कौटिलीयम अर्थशास्त्रम, पृ. ४२९

१३) तत्रैव, पृ. ४२८

१४) उपरोक्त कुलकर्णी, पृ. १०९

१५) S. M. Hawkins, The Oxford Reference Dictionary P. 880 And 882

(लेखक इतिहास, मराठी व इंग्रजी साहित्याचे संशोधक व अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com