ज्ञाननिष्ठेचा वैश्‍विक आदर्श (डॉ. रवींद्र बेम्बरे)

dr ravindra bembre
dr ravindra bembre

सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी होऊन ज्ञानाचा भार वाहण्यात धन्यता न मानता ज्ञान कृतीत उतरवून मानवी जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न केला. आज (रविवार, ता. चौदा एप्रिल) साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या या ज्ञानव्रतावर एक नजर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्त्व जनमनात अनंत पैलूंनी आदर्शाची रुजवणूक करतं. त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वातला एक लक्षणीय पैलू म्हणजे अपार ज्ञाननिष्ठा. सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श बाबासाहेबांनी उभा केला. ज्ञानाचा कोणताही वारसा नसताना सर्वोच्च शिखरावर विराजमान होऊन या महामानवानं जगाला एक नवा वारसा दिला. म्हणून चरित्रकार धनंजय कीर यांनी एका वाक्‍यात या क्रांतिपुरुषाचं अनोखेपण सांगितलं आहे. ते म्हणतात ः "धुळीत जन्माला येऊन जगातील धुरंधर पुरुषांच्या मालिकेत जाऊन बसला.' हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी होऊन ज्ञानाचा भार वाहण्यात धन्यता न मानता ज्ञान कृतीत उतरवून मानवी जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न केला. स्वतःप्रमाणं समाजाच्या सर्व स्तरापर्यंत ज्ञानगंगा पोचवून त्यातून प्रगल्भ समाजाची निर्मिती झाली पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका होती. बाबासाहेबांच्या जीवनप्रवास म्हणजे एक अखंड ज्ञानयज्ञच होता. "माझे पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे,' या त्यांच्या विधानातूनच अढळ ज्ञाननिष्ठेचं दर्शन घडतं. "मानवतेच्या उन्नयनासाठी माणसानं ज्ञानाची कास धरली पाहिजे. ज्ञानाशिवाय माणूस म्हणजे पशूच. शरीरसंवर्धनासाठी जशी अन्नाची गरज आहे, त्याचप्रमाणं मन, बुद्धी आणि आत्म्याच्या उन्नयनासाठी ज्ञानाची गरज आहे,' असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण संस्थेचे संस्थापक, वंचितांचे उद्धारक, मानवतेचे पथदर्शक, भारतीय घटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे मंत्री या विविध भूमिकांत वावरताना त्यांच्या ज्ञाननिष्ठेचं दर्शन घडतं.
घरातल्या प्रतिकूल परिस्थितीमुळं दहावी झाल्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी नऊ वर्षांच्या रमाईसोबत बाबासाहेबांचा विवाह झाला. पुढं वडिलांचंही छत्र हरवलं. तरीही ज्ञान मिळवण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळं कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत बाबासाहेबांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. प्रत्येक समस्येवर मात करत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सहकार्यानं ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात गेले. बाबासाहेबांची ही अमेरिकेतली ज्ञानसाधना म्हणजे एक कठोर तपश्‍चर्याच होती. बाबासाहेबांच्या अमेरिकेतल्या वास्तव्याबाबत त्यांचे मित्र लिहितात ः "आयुष्यात मिळालेल्या संधीचा भरपूर लाभ घेण्यासाठी आंबेडकर यांनी प्रत्येक क्षण सोन्याचा कण मानून अभ्यासासाठी व्यतीत केला. धनाचा प्रत्येक कण योग्य ठिकाणी लावला.' ज्या काळात अन्य विद्यार्थी सिनेमा आणि इतर गोष्टींवर आपला पैसा उधळत, त्या काळात बाबासाहेब पुस्तकांव्यतिरिक्त कोणताच खर्च करत नव्हते. आयुष्यात दारू-सिगारेटचा त्यांना कधीही स्पर्शही झाला नाही. अमेरिकेतल्या वास्तव्यात रोज अठरा तास अभ्यास करून दोनच वर्षांत "प्राचीन भारतातील व्यापार' (एन्शन्ट इंडियन कॉमर्स) या विषयावर सन 1915मध्ये प्रबंध लिहून एमएची पदवी संपादन केली.

"भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा ः एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन' (नॅशनल डिव्हीडंड ऑफ इंडिया-ए हिस्टॉरिकल अँड ऍनॅलिटीकल स्टडी) नामक प्रबंधासंबंधी संशोधन वरील प्रबंधाच्या सोबतच चाललं होतं. अथक परिश्रमातून हा प्रबंध त्यांनी पूर्ण करून सन 1916 मध्ये कोलंबिया विश्‍वविद्यालयात सादर केला. या मौलिक संशोधनाबद्दल कोलंबिया विश्‍वविद्यालयानं त्यांना "डॉक्‍टर ऑफ फिलॉसॉफी' ही अत्युच्च पदवी दिली. प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रा. सेलीग्मन लिहितात ः "या विषयाचा इतका सखोल आणि सांगोपांग अभ्यास अन्य कोणी केल्याचे आपणास माहीत नाही.' सेलीग्मन यांच्यासारख्या विख्यात विद्वानाचं हे विधान म्हणजे बाबासाहेबांच्या ज्ञानाचं वैश्‍विक मानांकनच होतं. तीन वर्षांतले अफाट परिश्रम, बुद्धिमत्तेची झेप यांमुळं प्रभावित होऊन विद्यापीठातले कला विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांतर्फे मेजवानी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्राप्त पदव्यांपेक्षा दुप्पट ज्ञानाचा साठा बाबासाहेबांच्या संग्रही होता. त्यांचं ध्येय अमेरिकेतली मोठ्यातली मोठी विश्‍वविद्यालयीन पदवी मिळवणं एवढ्यापुरतं सीमित नव्हतं. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि मानववंशशास्त्र इत्यादी विषयांचा तळ गाठून सखोल ज्ञान मिळवणं हे होतं. या ध्येयामुळंच शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांची ज्ञानलालसा कायम राहिली. ता 12 एप्रिल 1933 रोजी परळ इथं बाबासाहेबांचा सत्कार झाला, त्या प्रसंगी खंत व्यक्त करताना ते म्हणतात ः "माझं आयुष्य विद्यार्थी म्हणून जावं अशी माझी इच्छा होती; परंतु मला अस्पृश्‍याच्या चळवळीत पडावं लागलं. व्यवस्थेनं अस्पृश्‍य ठरवलेल्या महार जातीत जन्माला येऊनही जो सन्मान आपल्याला मिळाला तो केवळ विद्वत्तेमुळंच.'

ज्ञाननिष्ठेतूनच ग्रंथ आणि ग्रंथालयाबद्दल त्यांच्या मनात कमालीची ओढ होती. याबद्दल त्यांचे चरित्रकार लिहितात ः "विद्यार्थीदशेत आंबेडकर पोटास चिमटा काढून जेवढे ग्रंथ विकत घेता येणे शक्‍य असे तेवढे विकत घेत असत. प्रवासाकरिता खर्च न करता वाचनालयातून दुर्मिळ ग्रंथ मिळवण्याकरिता ते मैलोन्‌मैल पायपीठ करीत असत.' प्रचंड काटकसर करून अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी दोन हजार ग्रंथ घेतल्याचं सांगितलं जातं; पण ते ग्रंथ मायदेशी आणता आले नाहीत, याबद्दल तीव्र खंतही त्यांच्या मनात होती. आपली ग्रंथसंपदा बाबासाहेबांनी प्राणाच्या पलीकडं जपली. आपलं सर्वस्व गेलं तरी चालेल; पण ग्रंथाला कुणी हात लावता कामा नये ही त्यांची भावना होती. आपल्या ग्रंथसंपदेबद्दल त्यांच्या मनात विलक्षण अभिमान होता. मात्र, बाबासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या या देशात आज शिक्षक, प्राध्यापकांचा किती पैसा ग्रंथखरेदीवर खर्च होतो, हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. ही ग्रंथाची ओढ बाबासाहेबांना तरुण वयातच किती होती, याची कल्पना त्यांनी "बॉम्बे क्रॉनिकल'ला पाठवलेल्या पत्रावरून दिसून येते. "मेहतांचे स्मारक निव्वळ पुतळा म्हणून न उभारता एखाद्या सार्वजनिक वाचनालयाच्या स्वरूपात असावे. कोणत्याही देशाच्या बौद्धिक, सामाजिक प्रगतीत ग्रंथालयाचा फार मोठा वाटा असतो, त्यामुळे लोकांना त्याचा उपयोगही होईल व स्मृती म्हणून हे स्मारक चिरंतनही राहील.' यातून तरुणवयातल्या त्यांच्या विचाराची झेप लक्षात येते.

अमेरिकेतल्या वास्तव्यात लाला लजपतराय यांनी बाबासाहेबांना राष्ट्रीय राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला; पण विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन सोडून राजकारणात उतरणं बाबासाहेबांच्या विवेकाला पटलं नाही. म्हणून ते नम्रपणे लाला लजपतरायांना नकार देताना म्हणाले ः ""इतर सर्व गोष्टींचा विचार बाजूस ठेवला, तरी बडोदानरेशांनी मला अपरिमित साह्य केलं आहे. त्यांना दिलेलं वचन न मोडता आपला अभ्यास पुरा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे.'' अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन मायदेशात परत आल्यानंतर मुंबई इथं संभाजी वाघमारे आणि त्यांच्या इतर चाहत्यांनी बाबासाहेबांचा सत्कार करून मानपत्र देण्याचं ठरवलं. संमती घेण्यासाठी जे जेव्हा आले, तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले ः ""मला मानपत्र नको. मी तुमच्यावर उपकार करण्यासाठी शिकलो नाही. परमेश्‍वरकृपेनं संधी मिळाली म्हणून मी शिकलो. माझ्याप्रमाणं इतरांना संधी मिळाली, तर तेही माझ्याप्रमाणं मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण होतील. यास्तव तुम्ही माझ्या मानपत्रासाठी जो पैसा जमवला असेल तो आपल्या अस्पृश्‍य जातीतल्या लायक विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देण्यासाठी उपयोगात आणा.'' त्यांच्या प्रत्येक कृतीला ज्ञानाचं आणि विवेकाचं असणारं अधिष्ठान या प्रसंगातून निदर्शनास येतं. ज्ञानप्रसाराचा केवळ उपदेश करण्यावरच धन्यता न मानता बाबासाहेबांनी "पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या संस्थेच्या ध्येय आणि उद्दिष्टांतून बाबासाहेबांच्या मनातल्या ज्ञाननिष्ठेचं दर्शन घडतं.

बाबासाहेबांच्या विचारांकडं दुर्लक्ष करून त्यांची प्रतिमा घेऊन मिरवणं आत्मघात ठरणार आहे. बाबासाहेबांच्या या विचारापासून कित्येक मैल लांब जाऊन केवळ त्यांच्या नावाचा जयजयकारात आपण आज धन्यता मानत आहोत. ""केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीनं अत्यंत मोलाची आहे, त्यासाठी प्राणाच्या मोलानं तुम्ही झटा,'' असा बाबासाहेबांचा संदेश होता. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केवळ उत्सवात हरवून न जाता त्यांनी प्रस्थापित केलेला ज्ञाननिष्ठेचा आदर्श आपल्या अंगी बाणवणं नितांत गरजेचं आहे. तीच बाबासाहेबांना सार्थ आदरांजली ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com