चिंतन ‘राष्ट्रवादा’चं

राष्ट्रवाद म्हणजे काय, हा एक अतिशय रोचक; परंतु तितकाच कठीण प्रश्न आहे.
Nationalism
Nationalism sakal
Updated on
Summary

राष्ट्रवाद म्हणजे काय, हा एक अतिशय रोचक; परंतु तितकाच कठीण प्रश्न आहे.

- दुलारी देशपांडे

इतिहास विषयात ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएच‌.डी.पर्यंतचे शिक्षण घेतलेले डॉ. रॉबर्ट अपटन सध्या ‘१९२० ते १९३९ या कालखंडातील महाराष्ट्रातील राष्ट्रवाद’ या विषयावर संशोधन करीत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठ परिसरातील ‘द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’मधून मराठी भाषेचे शिक्षण घेतले.

रॉबर्ट मराठी उत्तम वाचू शकतात. भारतीय राजकारण आणि समाजकारणात ‘राष्ट्रवाद’ वारंवार कानावर येतो, त्याची नेमकी उकल, संशोधनामागची भूमिका आणि ‘राष्ट्रवाद’ म्हणजे नेमके काय, यांसह अनेक मुद्द्यांवर डॉ. रॉबर्ट अपटन यांची घेतलेली ही विस्तृत मुलाखत...

तुम्ही ‘राष्ट्रवादा’ची व्याख्या कशी कराल?

राष्ट्रवाद म्हणजे काय, हा एक अतिशय रोचक; परंतु तितकाच कठीण प्रश्न आहे. अनेक जण त्यांच्या रोजच्या बोलण्यामध्ये तसेच पत्रकारितेत ‘राष्ट्रवाद’ हा शब्द सहज येता-जाता ‘फेकताना’ दिसतात; परंतु वेगवेगळ्या संदर्भांमध्ये ‘राष्ट्रवाद’ शब्दाचा अर्थ खूप वेगवेगळा होऊ शकतो.

आज अगदी निश्चितपणे ‘राष्ट्रवाद’ हा शब्द काही ठिकाणी कथित अतिशयोक्तीपूर्ण देशभक्तीच्या संदर्भात किंवा एका राष्ट्रातील लोकांच्या दुसऱ्या राष्ट्रातील लोकांपेक्षा श्रेष्ठत्वाच्या आक्रमक कल्पनांकरिता वापरला जातो. यूकेमध्ये आज खरोखरच एक असे ठिकाण आहे, जिथले लोक ‘ब्रेक्झिट राष्ट्रवाद’, ‘इंग्लिश राष्ट्रवादा’वर टीका करताना दिसतात.

(आणि स्कॉटिश फुटीरतावादीदेखील हा शब्द जरा बिचकूनच वापरताना दिसतात.) आपण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील भारताच्या संदर्भात जेव्हा या शब्दाचा विचार करतो, तेव्हा या शब्दाचा अर्थ पुन्हा बदललेला दिसतो. त्या काळात अनेक जण ‘राष्ट्रवाद’ हा शब्द, घातक परकीय सत्तेपासून स्वातंत्र्याची मागणी करताना लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वापरताना दिसत होते.

एखादा राष्ट्रीय समुदाय कोणत्याही अर्थाने ज्यामुळे एकत्र बांधला जातो- मग तो वांशिकतेचा बंध असो वा एखाद्या समान सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेल्या नागरी संस्थांचे पालन करण्याचा बंध असो- राजकीयदृष्ट्या या नागरी संस्था एकसंध आणि स्वायत्त असू शकतात आणि स्वतंत्र राज्याकडून त्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात, असे म्हटले जाते.

(बरेचदा म्हणूनच राष्ट्र-राज्य अशी संज्ञा वापरली जाते.) यातली उपहासाची निश्चित गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादींना बऱ्याचदा ‘राष्ट्र’वादाची भावना बिंबवण्याकरिता ‘राज्या’चा वापर करणे भाग असते. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, राज्याचे अस्तित्व नेहमीच पहिल्या स्थानावर असते! (१९६० मध्ये नव्यानेच एकसंध झालेल्या इटलीच्या सिनेटरने लिहिले आहे, ‘‘आम्ही इटली घडवली, आता आम्हाला इटालियन्स घडवावेच लागतील.)

‘सामुदायिक भावना’ या अर्थाने महत्त्वाची असते; परंतु बरेचसे ‘राष्ट्रवाद’ राष्ट्राकडे, व्यक्तीला तिच्या समुदायात विकास करण्याकरिता पुरवण्यात येणारी ‘चौकट’ म्हणून लक्ष केंद्रित करताना दिसतात आणि जे आदर्श संस्कृतीला आकार देतात आणि समुदायाला एकत्र बांधून ठेवतात, ते आदर्श घडवण्यातल्या व्यक्तीच्या सहभागावर जोर देऊ शकतात. वांशिकतेवर आधारित राष्ट्रवादाच्या संदर्भात हा मुद्दा नक्कीच कमी महत्त्वाचा असू शकतो.

ऐतिहासिकदृष्ट्या यात फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही की, या एकाच कारणामुळे आपल्याला बरेचदा १९ व्या शतकात लोकशाही तसेच राष्ट्रवादी कल्पनांचा एकत्रित विकास झाल्याचे आढळून येते. म्हणून राष्ट्रीय समुदाय हा सार्वभौम असायला हवा; परंतु नक्कीच तिथे लोकशाहीतर मार्गही आहेत. ही कल्पना त्यातदेखील मांडता येऊ शकते.

विसाव्या शतकातील राष्ट्रवादी हुकूमशहांकडून ही कल्पना अशाच कुप्रसिद्ध पद्धतीने मांडण्यात आलेली आहे. राष्ट्रवादाचा विचार करताना आपल्याला त्याचा, आंतरिकदृष्ट्या डाव्या की उजव्या विचारसरणीच्या राजकारणाशी संबंध आहे, या दृष्टीनेही विचार करावा लागेल.

ऐतिहासिक दृष्टीने तो समजून घेताना -तो राज्याला प्रेरक होऊ शकतो किंवा राज्याकडे आर्थिक उद्धाराच्या आणि पुनर्विभागणीच्या सामाजिक प्रणालींचा पाठपुरावा करण्याची मागणी करू शकतो आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील वैयक्तिक नियंत्रणापेक्षा राज्याचे समर्थन करू शकतो- याकडे ‘समाजवादी’ किंवा ‘डाव्या’ विचारसरणीची कार्यसूची म्हणून पाहण्यात येते.

१९२० ते १९३९ या विशिष्ट काळातील ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादा’वर संशोधन करावे, असे तुम्हाला का वाटले?

१९२० ते १९३९ या कालखंडातील महाराष्ट्रातील राष्ट्रवादावर संशोधन करण्याचा निर्णय मी माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून घेतला. मी टिळकांवर पीएच्.डी.साठी केलेल्या संशोधनातून माझ्या असे लक्षात आले की,

टिळकांचे राजकारण हे खूपसे १९ व्या शतकातील नीतिनियम आणि कल्पनांवर आधारित आहे. टिळक हे नंतरच्या महाराष्ट्रातील बुद्धिवाद्यांपेक्षा किती वेगळे होते, हे मला सुरुवातीला लक्षात आले नव्हते. टिळक हे विशेषत: १९२० च्या तसेच १९३० च्या काळातील महाराष्ट्रातील हिंदू राष्ट्रवाद्यांपेक्षा वेगळे होते.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या दृष्टीने १९२० ते १९३९ या काळाचे ऐतिहासिकदृष्ट्या काय महत्त्व आहे?

१९२० ते १९३९ हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा कालखंड असून, या काळातील महाराष्ट्रातील राजकारण अनेक अर्थाने सकारात्मक दृष्टीने सुधारले. ही गोष्ट संपूर्ण भारतभर घडून आली. पहिल्या महायुद्धानंतरची राजकीय सत्य वेगळी होती.

(आपल्याला येथे १९१७ च्या माँटेग्यू ठरावाचा आणि या ठरावातील अंतिम स्वायत्त सरकार बनवण्याचे वचन, या गोष्टीचाच फक्त विचार करणे गरजेचे आहे. पहिल्या महायुद्धामुळे जो बदल झाला होता तो समजण्याची सुरुवात या गोष्टीपासून करता येईल.) गांधींच्या उदयामुळे या काळात राजकीय चित्र बदलले. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर महाराष्ट्रात त्यामुळे विभाजन घडताना दिसले. जुन्याच जहाल, मवाळची अधिस्वीकृती होताना दिसली.

१९२० ते १९३९ या काळात महाराष्ट्रात कोणते महत्त्वाचे राष्ट्रवादी नेते होते? त्यांच्या राष्ट्रवादी विचारधारा काय होत्या? या नेत्यांच्या राष्ट्रवादी विचारधारांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर काय परिणाम झाला?

महाराष्ट्रात १९२० ते १९३९ या काळात अनेक महत्त्वाचे राजकीय नेते झाले. एका लहानशा उत्तरात त्या सर्वांना न्याय देणे केवळ अशक्य आहे. माझ्या स्वत:च्या याविषयीच्या संशोधनाच्या आधारावर, हिंदू राष्ट्रवादी विचारवंत वि. दा. सावरकर, बी. एस. मुंजे, के. बी. हेडगेवार हे नेते महत्त्वाचे वाटतात.

इथे या गोष्टीवर भर द्यावासा वाटतो की, सावरकरांनी १९२३ मध्ये खरोखरच पहिल्यांदा हिंदू वांशिकतेला केंद्रस्थानी ठेवून हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवादाची कल्पना मांडली. या काळात बी. एस. मुंजे हे प्रदीर्घ काळाकरिता हिंदू महासभेतले एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्यामुळे कदाचित, हिंदुत्वाच्या कल्पनेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये वाढवण्याकरिता सुरुवातीला अंतर्गत आणि नंतर बाहेरून राजकीय दबाव आणण्यात आला असावा.

हिंदू राष्ट्राच्या जोडीला, हिंदू समाजाला सुधारण्यासाठी, तसेच समाजाच्या पुनर्रचनेकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श निर्माण करणाऱ्या के. बी. हेडगेवारांना मुंजे यांनी प्रेरणा दिली. १९२५ नंतर झालेली ही एक मुख्य सुधारणा होती. ही प्रेरणा सुरुवातीच्या हिंदू (तसेच इतर भारतीयांच्या) आध्यात्मिकदृष्ट्या स्वत:ला ऊर्जावान बनवण्याच्या आणि शारीरिक शिस्तीच्या प्रयत्नांच्या पलीकडे जाणारी होती.

अधिक स्पष्टपणे सांगायचे तर, महाराष्ट्रातील जाती-पातीवर आधारित राजकारणाचा गांधींच्या राष्ट्रवादावर, तसेच हिंदू राष्ट्रवादावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. पुढे बी. आर. आंबेडकरांच्या राजकारणाचा उदय झाला.

ज्याचा जाती-पातीच्या राजकारणावर आणि स्वतंत्र भारतातल्या संविधानाने दिलेल्या हक्कांच्या संपूर्ण प्रश्नावरच सखोल प्रभाव पडला. महाराष्ट्रातील, सुरुवातीचे हिंदू राष्ट्रवादी नेते आणि आंबेडकरांचे जातीय राजकारण यांच्या आपापसातील ‘राजकारणा’चा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला, असे म्हटल्यास कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. माझे या विषयाचा अभ्यास करण्यामागचे हे सर्वांत पहिले कारण होते.

‘हिंदू राष्ट्रवाद’ म्हणजे काय? भारताच्या स्वातंत्र्य-संग्रामात त्याचे काय महत्त्व आहे? ‘हिंदू राष्ट्रवादा’चा १९२० ते १९३९ मधील राजकीय गणितांवर काय परिणाम झाला?

आपण हे समजून घेतले पाहिजे की, ‘हिंदू राष्ट्रवाद’ ही संज्ञा बहुमुखी संज्ञा आहे. इतर कोणत्याही वैचारिक चळवळीत ज्याप्रमाणे त्यांच्या विविध पुरस्कर्त्यांच्या दृष्टिकोनांचा समावेश असतो, तसाच तो ‘हिंदू राष्ट्रवादा’तही आहे.

‘हिंदू राष्ट्रवाद’ या संज्ञेची गुणवैशिष्ट्ये काळाप्रमाणे निश्चितच बदलणारी आहेत. सावरकरांच्या कल्पनेचा गाभा, भारतीयांची वांशिक ओळख ‘हिंदू’ असून, तिचा विकास हिंदू राष्ट्रवाद्यांनी या काळात- १९३९ मध्ये लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते होऊ घातलेल्या एम. एस. गोळवलकरांच्या शब्दांत- काँग्रेसच्या, ‘राष्ट्र हे त्या विशिष्ट काळात, या ना त्या कारणाने देशात राहणाऱ्या सर्वांपासून बनते’- या आश्र्चर्यकारक सिद्धांताला विरोध करण्याच्या हेतूने, भारताला ‘एकसंध हिंदू राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टिकोनातून केला.

ही गोष्ट काँग्रेसच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनातून १९४७ नंतर, उदयाला आलेल्या नेहरूप्रणीत ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ या दृष्टिकोनाशी संघर्ष निर्माण करणारी होती; परंतु भारतातले आणि भारताबाहेरचे विद्वान, मागील वीस वर्षांत या दोन्ही गोष्टी परस्पर व्याप्त झाल्या असण्यावर भर देताना दिसतात.

१९३७ मध्ये या दोघांचे अधिकृत विभाजन झाले होते, तरी किमान हिंदू महासभेच्या प्रवृत्तीचा काँग्रेसअंतर्गत बराच प्रभाव होता. उदाहरणार्थ, गांधींच्या स्वत:च्या राजकारणातले हिंदू वा‍क्प्रचारांचे स्थान. एक प्रकारे याचे विश्लेषण करायचे म्हटले, तर ‘हिंदू राष्ट्रवादी चळवळ’ हा स्वत:च एक काँग्रेस राष्ट्रवादातला महत्त्वाचा घटक होता.

१९२० ते १९३९ या काळातील बंगालचा ‘आध्यात्मिक राष्ट्रवाद’ आणि ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवाद’ यात काय फरक आहे?

माझी याविषयीची भूमिका सावध असली, तरी बंगालचा आध्यात्मिक राष्ट्रवाद आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवाद हे माझ्या मते, एक रोचक द्वि-विभाजन आहे. १९२० ते १९३९ या व्यापक काळात, बंगालच्या राष्ट्रवादात अध्यात्माला खूपच महत्त्व होते.

एखाद्याने या संदर्भात १८९० मधल्या विवेकानंदांच्या लिखाणाचा किंवा अरविंद घोषांसारख्या राजकीय आंदोलकाच्या कारकिर्दीचा विचार करण्याची गरज आहे. अरविंद घोषांकरिता आध्यात्मिक गोष्टींचा पाठपुरावा हा अंतिमत: राजकीय कृतीपेक्षा महत्त्वाचा ठरला असल्याचे दिसते.

कारण स्वदेशी आंदोलनानंतर त्यांच्या पाँडिचेरीच्या आश्रमात त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतल्याचे दिसून येते; परंतु माझ्या टिळकांवरच्या अभ्यासातून मला, टिळकांच्या राजकारणावर असलेले विवेकानंदांच्या वैदिक विचारांच्या प्रभावाचे महत्त्व समजले. या गोष्टीचा परिणाम म्हणजे, राजकारणाचे ‘आध्यात्मिकीकरण’ किंवा कदाचित अध्यात्माचे ‘राजकारणीकरण’ म्हणता येईल.

मी उल्लेख केलेल्या काही हिंदू राष्ट्रवाद्यांवर या गोष्टीचा प्रभाव दिसून येतो. ‘बंगालच्या राष्ट्रवादा’कडून ‘राष्ट्रवादा’चे ‘आध्यात्मिकीकरण’ हा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादाला गतिमानता देणारा महत्त्वाचा मुद्दा आहे,असे मात्र म्हणता येणार नाही.

मी बंगालमधील राष्ट्रवादाला कशामुळे गतिमानता मिळाली, या विषयावरचा तज्ज्ञ नाही; परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, महाराष्ट्रातील तथाकथित ‘जहालवादी’ विचारांच्या राष्ट्रवाद्यांचा बंगालमधल्या राष्ट्रवादावर काय प्रभाव पडला, या गोष्टीचा मागोवा घेणे योग्य ठरेल. आध्यात्मिकता हा राष्ट्रवादाच्या विपरीत नेहमीच एक संकुचित पंथ होता. बंगालच्या थोर आध्यात्मिक व्यक्तींपैकी रवींद्रनाथ टागोर यांच्या या विषयावरील विचारांचादेखील या बाबतीत विचार करता येईल.

आजच्या जगात ‘राष्ट्रवादा’चे काय स्थान आहे?

माझ्यासाठी ही फारच रोचक गोष्ट आहे की, ‘राष्ट्रवादा’ला गेल्या दोन-तीन दशकांपेक्षाही आजच्या काळात बरेच चांगले भवितव्य असल्यासारखे वाटत आहे. पूर्वी पाश्चात्त्य राष्ट्रांमधील सामाजिक शास्त्रांमध्ये सर्रास अशी टिपण्णी करण्याची पद्धत प्रचलित होती की, तीव्र गतीने वाढणाऱ्या या आंतरसंबंधीय आणि परस्परावलंबी जगात ‘राष्ट्र-राज्य’ ही कल्पना अप्रचलित कल्पना आहे.

यांतले बिनीचे खेळाडू म्हणजे आंतरराष्ट्रीय महामंडळे, ज्यांच्या तुलनेत राज्याचे सार्वभौमत्व ही फारच छोटी आणि जवळपास विलक्षण गोष्ट वाटते. गेल्या सात-आठ वर्षांत संपूर्ण जगाचा कल आपण ज्याला ‘राष्ट्रीय भावना’ म्हणू शकलो असतो, त्याच्या अगदी उलट दिशेने वळलेला दिसत आहे.

राष्ट्रीय ‘महानते’ला नुसते घोषित करणे किंवा प्रचारात आणण्याचा प्रयत्न करणे (जसे, डोनाल्ड ट्रम्पची अमेरिका किंवा शी जिनपिंगचा चीन किंवा पुतीनचा रशिया इत्यादी) मी या आधी ज्या राष्ट्रवादाचा विचार केला, त्यांत या गोष्टींचा समावेश होत नाही- निश्चितच यामागे राष्ट्रीय समुदायाची त्याच्या स्वत:च्या स्वायत्त राज्यावर नियंत्रण ठेवण्याची इच्छा असू शकते.

व्यापारावर तसेच स्थलांतरावर निर्बंध घालून, जे ट्रम्पनी केले त्यातून असे दाखवले गेले की, राज्याच्या स्वायत्ततेवर या आंतर संलग्नतेतून दबाव येतो. आणि नेमके त्याच वेळी, ब्रेक्झिटने युकेच्या त्याच्या कायद्यांवर, सीमांवर आणि युरोपियन युनियनकडून होणाऱ्या व्यापारावरील नियंत्रणाचा ठामपणे पुनरुच्चार केला.

त्या राज्याच्या स्वायत्तेचे वरिष्ठ- राष्ट्रीय मंडळाकडून पाय खेचले जाण्याला प्रतिबंध केला. जगभरात पुढे यासारख्या आणखी खूप घटना घडतील, अशी शक्यता नाही. (युरोपियन युनियनमधल्या -इतर राष्ट्रांपैकी- आजच्या इटली आणि हंगेरीतल्या सरकारांची याकडे बघण्याची वृत्ती आपल्याला दर्शवते की ब्रेक्झिट ही काही यादृच्छिक विसंगती नाही.)

राष्ट्र-राज्यांना मोठ्या मंडळांमध्ये एकत्रित करणे ही आणखी पुढची आवश्यक पायरी असेल, जी येणाऱ्या जगावर, लोकसंख्येच्या दृष्टीने आणि भौगोलिक दृष्टीने प्रचंड मोठ्या असलेल्या देशांचा प्रभाव वाढवेल, ही गोष्ट निश्चितच अवघड वाटते.

(भारत आणि चीन यांत अग्रगण्य आहेत.) खरे म्हणजे, ज्या राष्ट्रवादी चळवळी मध्यम आकाराच्या आणि मोठ्या राज्यांपासून वेगळ्या होतात- त्यांची अगदी ब्रेक्झिट ब्रिटनच्या अंतर्गतदेखील भरभराट होऊ शकते. (तत्त्वत: स्कॉटलंड) सामान्यत: असं दिसतं की, एकजिनसी आणि आक्रसणाऱ्या जगाच्या दबावाखाली राष्ट्रीय (आणि इतर) सांस्कृतिक वैशिष्ट्यांची लाट उठलेली दिसते. (हे कदाचित पहिल्यांदा नसावं.)

आणि ही गोष्टदेखील राष्ट्रवादी राजकीय कृतींसाठी दबाव निर्माण करू शकते. खरे तर युक्रेनमधल्या युद्धाविषयी राष्ट्र-राज्याची वाढ-रशिया किंवा त्याचे स्वत:च्या भूमिकेचे समर्थन, या दृष्टिकोनातून वाचण्यापेक्षा, रशियाचे त्याच्या राष्ट्रीयत्वाचा भाग म्हणून युक्रेनसकटचे ऐतिहासिक भवितव्य समजून घेण्यासाठी वाचणे अतिशय योग्य ठरेल.

शी जिनपिंग तैवानबाबतदेखील (आणि इतरत्र) असाच विचार करत असल्याचे दिसणे, हे एक अशुभ लक्षण असल्याचे मानता येईल. भारतातल्या राष्ट्र-राज्याचा विचार करता, भारताची स्वत:ची एकात्मता टिकवण्यासाठी आणि फुटीरतावादी चळवळींच्या आणि भारताच्या बाहेरील विस्तृत जगाशी असलेल्या नात्याच्या संदर्भात ‘राष्ट्रवाद’ महत्त्वाचा ठरतो; मात्र यातला मूलभूत आणि महत्त्वाचा मुद्दा, भारतीय राष्ट्रीय समुदाय येत्या वर्षांमध्ये स्वत:ला कशा पद्धतीने परिभाषित करतो, हा असेल.

ओळख डॉ. रॉबर्ट अपटन यांची

डॉ. रॉबर्ट अपटन हे इटलीतल्या व्हेनिस शहरातल्या का’फोसकारी विद्यापीठाचे मारी क्युरी पोस्ट- डॉक्टरल फेलो आहेत. त्यांचे इतिहास विषयातले स्नातक पदवीपासून पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले आहे. जन्म ब्रिटनमध्ये झाला. तिथेच त्यांचे बालपणही गेले. रॉबर्ट जवळपास वीस वर्षे ‘भारतीय राजकारण आणि त्या अनुषंगाने बदलणारी भारतीयांची अस्मिता’ यांमधील दुव्यांचा शोध घेत आहेत.

स्नातक पदवीसाठी युरोपच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी युरोपच्या इतिहास अभ्यासाला रामराम ठोकला. तेव्हापासून ते अगदी आजच्या काळापर्यंत, त्यांनी त्यांचे सर्व लक्ष भारतीय राजकारणाच्या अभ्यासावर केंद्रित केले आहे. पीएच.डी.च्या संशोधनाकरिता रॉबर्ट यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करण्याचे ठरवले.

‘लोकमान्य टिलक ॲज रायटर ॲण्ड इंटेलेक्च्युअल इन द पॉलिटिकल कल्चर ऑफ लेट कोलोनिअल इंडिया’ या विषयाकरिता रॉबर्ट यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात पीएच.डी.साठी त्यांना पर्यवेक्षक म्हणून डॉ. रोझालिंड ओ’हॅनलॉन होत्या. त्यांना जगात महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचे तज्ज्ञ मानले जाते. भारतातल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे ‘द थॉट ऑफ बाल गंगाधर टिलक’ हे रॉबर्ट अपटन यांनी लिहिलेले पुस्तक या वर्षाच्या उत्तरार्धात प्रकाशित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com