टिळक विरुद्ध टिळकतत्त्व (डॉ. सदानंद मोरे)

टिळक विरुद्ध टिळकतत्त्व (डॉ. सदानंद मोरे)

‘टिळक आणि टिळकतत्त्व’ हा अच्युतरावांनी केलेला भेद फार महत्त्वाचा आहे. हा भेद असा होता ः टिळकतत्त्वाची मांडणी स्वतः टिळकांनीच केली असली, तरी टिळक ही व्यक्ती वेगळी आणि त्या व्यक्तींनं सांगितलेलं तत्त्व वेगळं. व्यक्ती आणि तत्त्व यांच्यात विसंगती दिसली, तर व्यक्तीला गौण समजून तत्त्वाला प्राधान्य द्यावं. त्यासाठी व्यक्तीशी संघर्ष करायची वेळ आली, तरी तो करावा. त्यामुळं त्या व्यक्तीविषयीच्या आदरात काही कमतरता यायचं कारण नाही. टिळक आणि अच्युतराव यांच्यातला संघर्ष हा ‘टिळक विरुद्ध टिळकतत्त्व’ यांच्यातला संघर्ष होता.

महाराष्ट्रातल्या निःपक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करणाऱ्यांच्यात अच्युतराव कोल्हटकरांचं नाव ठळकपणे झळकतं याबद्दल कुणाचंही दुमत व्हायचं कारण नाही. अच्युतरावांनी लोकमान्य टिळकांचं अनुयायित्व पत्करलं असलं, तरी टिळकसंप्रदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तुळापासून ते फटकूनच राहिले. त्यामुळं टिळकांवर टीका करण्याचं त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं. या वर्तुळातल्या लोकांचं जाऊ द्या; पण वेळ आली तर खुद्द टिळकांशीही दोन हात करण्याचं स्वातंत्र्य अच्युतरावांनी घेतलं. ही खरी पत्रकारिता.

ब्रिटिश न्यायालयानं टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून सहा वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी ब्रह्मदेशातल्या मंडाले इथल्या तुरुंगात पाठवलं. त्याच वेळी सरकारनं महाराष्ट्रातली वृत्तपत्रं व नाटकं यांच्यावर कडक बंधनं घातली. सशस्त्र क्रांतिकारकांच्या, त्यांच्या आप्तेष्टांच्या व सहकाराऱ्यांच्या मुसक्‍या बांधल्या. त्यामुळं या सहा वर्षांच्या काळात विशेष असं काहीच घडलं नाही. १९१४ मध्ये टिळकांची सुटका झाली, ते पुण्यात परतले व थोड्याच दिवसांत पहिलं महायुद्ध सुरू झालं. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा टिळकांनी अत्यंत चातुर्यानं घेतला व जुळवाजुळव करून पुन्हा एकदा डाव मांडला. या डावात पत्रकार या नात्यानं अच्युतरावांचा लक्षणीय सहभाग होता. १९१५ मध्ये टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा अच्युतरावांनी ‘संदेश’ पत्राचा विशेषांक काढून टिळकांचा गौरव केला. याच अंकात त्यांनी टिळक व त्यांचे कुटुंबीय यांचं एकत्रित छायाचित्रही छापलं.

दरम्यान, टिळकांनी ॲनी बेझंट बाईंशी हातमिळवणी करून होम रूल लीग तथा स्वराज्य संघाची चळवळ सुरू केली. स्वराज्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. त्यांच्या वऱ्हाड प्रांतातला दौरा खूपच गाजला, या दौऱ्यातल्या कार्यक्रमांचं व भाषणांचं वृत्त वेळेवर व तपशिलानं देता यावं म्हणून खास फिरत्या छापखान्याची व्यवस्था करण्यात आली होती. या दौऱ्यात अनंत हरी गद्रे पत्रकार म्हणून नावारूपाला आले, ते अर्थातच अच्युतरावांच्या तालमीत तयार झाल्यामुळं.
महायुद्धाचा फायदा घेऊन स्वराज्याची मागणी पुढं रेटता येत होती. हे खरं असलं तरी त्यासाठी दुसरीकडं आपण युद्धकार्यात व प्रयत्नात सहभागी आहोत, असं दाखवणं भाग होतं, तेव्हा टिळकांनी लष्करभरतीचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र, त्यामुळं सरकारची टिळकांच्या हेतूविषयीची शंका दूर झाली नाही. अगदी युद्धपरिषदेत भाषण करतानासुद्धा टिळक स्वराज्याचा मुद्दा आणायचे. एकदा तर गव्हर्नर विलिंग्डन यानं युद्धपरिषदेतलं भाषण अर्ध्यावरच बंद पाडलं होतं. परिषदेतल्या टिळकांबद्दलच्या बातम्या टिळकपक्षाची पत्रं आपल्या पद्धतीनं छापतील, हे पाहून राज्य सरकारचे चीफ सेक्रेटरी रॉबर्टसन यांनी त्या वर्तमानपत्रांना युद्धपरिषदांच्या बातम्या छापायला मनाई करण्याची शिफारस केली होती. अच्युतरावांच्या ‘द मेसेज’ या पत्राचाही त्यात समावेश होता.

हा काळ लोकमान्य टिळक आणि गांधीजी यांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचा होता. टिळकांचे इतर अनेक अनुयायी गांधीजींबद्दल साशंक असले, तरी अच्युतराव मात्र निःशंक होते. त्यांनी ‘विजयाचा टिळा अथवा संगीत मोहनमाळ’ हे नाटक लिहून या सहकार्याला पाठिंबा व्यक्त केला. या नाटकात त्यांनी टिळकांच्या तोंडी घातलेलं एक वाक्‍य फार महत्त्वाचं आहे. टिळक म्हणतात ः ‘‘मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यांप्रमाणे ही तापी-नर्मदाही मला प्रिय झाली आहे. आता माझी राष्ट्रदेवतेजवळ
एवढीच प्रार्थना आहे, की हे राष्ट्रदेवते, जर यापुढं तुझ्या कार्याच्या प्रीत्यर्थ मला पुन्हा तुरुंगात जाण्याची पाळी आली, तर तुझ्या कुडीला याच पवित्र गुर्जरभूमीचा स्पर्श होऊ दे व मुळा-मुठेकाठच्या येरवड्याप्रमाणे नर्मदाकाठच्या साबरमती जेलमध्ये माझी रवानगी होऊ दे.’’

अच्युतरावांची भूमिका आणि दृष्टी व्यापक असल्यामुळं की काय, ते अशा प्रकारच्या समन्वयाची स्वप्नं पाहू शकत असावेत. टिळक व गांधीजी हे दोघं निदान स्वराज्याच्या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन कार्य करत होते. भेद त्यांच्या साधनांमध्ये होता. शाहू छत्रपतींच्या ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात मात्र असं काही म्हणायची सोय नाही; पण तरीही अच्युतरावांना टिळक व शाहूमहाराज यांच्यात सहकार्य व्हावं असं वाटत असे. त्यासाठी त्यांनी ‘विस्कटलेली वेणी’ या नावाची कथा लिहिली. कथानक अर्थातच पुण्यात घडतं. पुण्यात ब्राह्मणेतर चळवळीचे एक कार्यकर्ते ‘मजूर’ नावाचं पत्र काढत असत. या पत्राचे अंक विकणारा पोऱ्या सकाळी ‘भटाच्या पाठीत सोडगा’ असं ओरडत पत्राची विक्री करत चाललेला असतो. त्याचं पर्यवसान ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातल्या मारामारीत होतं. पोलिसपार्टी येते. या पोलिसांचा प्रमुख असलेला ब्रिटिश अधिकारी त्यामुळं खूष होतो व तो म्हणतो ः ‘‘वा ! ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत असेच तंटे लागले, तर फार चांगलं होईल. मग पुण्याची आपल्याला कधीच भीती वाटायला नको. या पुण्यातल्या लोकांची डोकी मोठी विलक्षण. इंग्रज सरकारला त्यांचं फारच भय! हे लोक डोक्‍यातून अशी शक्कल काढतील, की क्षणात इंग्रजांचं राज्य उलथंपालथं होऊन जाईल; पण आता ही भीती नको. आता यांची डोकी आपापसांतच फुटणार आणि इंग्रज सरकारचं राज्य इथं कायमचं टिकणार !’’
हाच म्हणजे ‘स्वराज्याच्या साधनेसाठी पुणे आणि कोल्हापूर यांच्यात सामंजस्य व सहकार्य हवं’ हा सिद्धान्त अच्युतरावांनी ‘कोल्हापूरच्या आक्कासाहेब’ या कादंबरीत मांडला आहे. कादंबरीत कोल्हापूरच्या अक्कासाहेब आणि पुण्याच्या ताईसाहेब यांच्यातला हा संवाद ः

‘‘अक्कासाहेब म्हणाल्या, ‘लोकांस गुलामगिरीचा अजूनही कंटाळा आलेला दिसत नाही. कारण, तसं असतं तर माझ्या कोल्हापूरच्या संतानांनी...’’
पुण्याच्या ताईसाहेब मध्येच बोलल्या, ‘‘माझ्या पुण्याच्या पुत्रांनी...’’
‘‘भांडणात वेळ कधीच घालवला नसता’’ अक्कासाहेब पुन्हा बोलू लागल्या, ‘‘ही वेळ भांडणाची नाही. ही वेळ एक होण्याची आहे. माझ्या कोल्हापूरच्या लाडक्‍यांनी समाजस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा झेंडा उभारला आहे.’’
‘‘आणि माझ्या पुण्यातल्या लाडक्‍यांनी लोकस्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, राष्ट्रस्वातंत्र्य यांचा झेंडा उभारला आहे.’’

‘‘हे दोन झेंडे एक होऊ द्या,’’ कोल्हापूरच्या अक्कासाहेब पुढे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूचा जरीपटका आणि पुण्याचा भगवा झेंडा एक होऊ द्या, म्हणजे त्यांना जगात कुणीही अटकाव करणार नाही! पण तेच एकमेकांशी भांडले, तर एखादी अल्प शक्तीही दोघांच्या डोक्‍यावर नाचू लागेल.’’

अच्युतरावांनी अशा प्रकारे शाहूमहाराज, कोल्हापूर यांची केलेली भलामण पाहून, अच्युतरावांना विरोध करणाऱ्या टिळकानुयायांच्या हातात चांगलंच कोलीत मिळालं असणार, हे सांगायची गरज नाही. भरीत भर म्हणून शाहूमहाराजांनी अच्युतरावांना चार हजार रुपयांची मदत केली, असा बोभाटा झाला. मग काय, ‘अच्युतराव शाहूमहाराजांना विकले गेले,’ असं म्हणणं फारच सोपं होतं; पण इकडं टिळकांचे अनुयायी ३५०० रुपयांसाठी अच्युतरावांची अब्रू चव्हाट्यावर आणण्याच्या प्रयत्नात असताना शाहूमहाराज मात्र त्यांच्या मदतीला धावून येतात, हा मुद्दा नजरेआड करता कामा नये.

टिळकांना निद्रिस्त लोकांना जागं करून स्वातंत्र्याची चळवळ करायची होती; त्यामुळं अनुयायांच्या गुण-दोषांचा विचार न करता, त्यांनी येईल त्याला जवळ केलं व त्यांच्या मगदुराप्रमाणे त्यांच्याकडून कामही करून घेतलं. टिळकांच्या ‘लोकसंग्राहक’ वृत्तीचा हा लाभ खराच; पण त्याचे तोटेही टिळकांना सहन करावे लागले. या अनुयायांचे दोष टिळकांना संसर्गजन्य आजाराप्रमाणे चिकटल्याशिवाय राहिले नाहीत. दुसरं असं, की या अनुयायांची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या चुकीच्या हट्टांनाही मान तुकवणं टिळकांना कधी कधी भाग पडायचं. अच्युतरावांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं असणार. आपल्या अनुयायांपैकी बहुसंख्य लोक अच्युतरावांच्या विरुद्ध आहेत, हे लक्षात आल्यावर टिळकांनी अच्युतरावांची निष्ठा वगैरे बाजूला ठेवून अनुयायांची बाजू घेतली. अच्युतरावही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. ते पक्‍क्‍या गुरूचे म्हणजे टिळकांचेच अनुयायी; तसेच करारी व हट्टी. बरं, तत्त्वाच्या संदर्भात पेच निर्माण झाला की डॉ. भांडारकर, रानडे अशा वंदनीयांनासुद्धा परखड बोल सुनावता येतात, याचा अनुभव अच्युतरावांनाही आला होताच. हेच तत्त्व त्यांनी आपल्या गुरूला, म्हणजे स्वतः टिळकांनाच लागू केलं, तर ते सुसंगतच म्हणावं लागेल. अनुयायांच्या भीडेला बळी पडून, आपला थोरपणा बाजूला ठेवून अच्युतरावांशी वाकडं घेण्याचं खरं तर टिळकांना काही कारण नव्हतं. रानडे, आगरकर, भांडारकर, गोखले यांच्यासंदर्भातली गोष्ट वेगळी; ते तुल्यबळांचे सामने होते. तसं अच्युतरावांच्या संदर्भात म्हणता यायचं नाही.
अच्युतरावांच्या ३५०० रुपयांचं प्रकरण उद्‌भवण्याचं कारण म्हणजे, टिळकांना अर्पण करण्यासाठी पर्स फंड जमा करण्याची मोहीम आणि अच्युतरावांनी त्यांच्या ‘मेसेज’ पत्रासाठी निधी जमा करण्याचे प्रयत्न एकाच वेळी सुरू झाले. इतकंच नव्हे तर, एका विशिष्ट बिंदूवर त्यांचा एकमेकांना स्पर्शही झाला. ‘मेसेज’साठी मिळालेल्या पैशातून ३५०० रुपये पर्स फंडासाठी द्यावेत, असं सांगण्यात आल्यानं अच्युतरावांनी तसं केलं व काही दिवसांनी ते पैसे ते परत मागू लागले. त्यावरून ते आणि टिळकांचे केळकर, नेने असे अनुयायी यांच्यात वादाची ठिणगी पडली. अच्युतराव एकीकडं व विरुद्ध बाकीचे सगळे दुसरीकडं असा हा सामना रंगला. फक्त दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांनी अच्युतरावांची पाठराखण केली.

मात्र, हे प्रकरण तिथंच थांबणारं नव्हतं. टिळकांना निधी गोळा करण्याच्या प्रत्यक्ष समारंभाची पटकथा अशी लिहिली गेली, की जिच्या उत्कर्षबिंदूत शेवटच्या उत्तरादाखलच्या भाषणात खुद्द टिळकांनाही अगोदरच्या वक्‍त्यांनी केलेल्या अच्युतरावांच्या निंदेच्या सुरात सूर मिळवणं भाग पडेल ! तसंच झालं.
या सगळ्या प्रसंगाचं वर्णन आपल्या कैफियतीसह करणारी ‘फंडगुंडपुराण’ या नावाची ओवीबद्ध रचनाच अच्युतरावांनी सिद्ध केली. टिळकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अनुयायांनी त्यांना साकडं घालण्याचं कटकारस्थान केलं, असं अच्युतरावांचं म्हणणं होतं. या पुराणातल्या संबंधित ओव्या पुढीलप्रमाणे-

‘करोनि गुप्त कट एकांती । टिळक गेले शरण अंती ।
म्हणती सांभाळा गा प्राणान्ती । दुःख झाले आमुते ।।
बाळ टिळक शंभूसमान । भोळा पाहून भक्तगण ।
म्हणा उठा अभयवचन । दिले प्रसन्न मनाने ।।
मग हितगुज कथिले कानात ।
पाहिजेच ऐसे झाले, म्हणत।
टिळक शंभू मान डुलवीत ।
म्हणे योजीन युक्ती युक्ती।।

खरंतर टिळकांसारखी गुरुस्थानी असलेली एवढी जबरदस्त व्यक्ती विरोधात गेल्यावर एखाद्यानं हबकून हाय खाल्ली असती; पण ‘टिळकांचा सच्चा चेला’ असल्याचं अभिमानानं मिरवणारे अच्युतराव न डगमगता उभे ठाकले. त्यांनी टिळकांशीच दोन हात करायचा निर्णय घेतला. ‘टिळक विरुद्ध अच्युतराव’ ही विषम लढाई महाभारतकाळातल्या कृष्ण व अर्जुन यांच्यातल्या युद्धाची आठवण करून देणारी होती, यात शंका नाही. या लढाईचं वर्णनही अच्युतरावांच्या ‘फंडगुंडपुराणा’त वाचायला मिळतं.

तसाचि त्या गुंडांनी । चढविले टिळकांलागोनी ।
म्हणती खोट्या हरभऱ्यावर चढोनी ।
करा मात संदेशावर ।।
टिळक जरी ते निग्रही । संदेश त्यांचाच भक्त पाही ।
गुरूशी सामना देताही । हटेल ना कदापि ।।
टिळक सदगुरू म्हणोनि ।
पहिले दोन बाण टाकिले वंदनी ।
पुढे ठेला रणांगणी । झुंज खेळाया भयंकर ।।

या सर्व प्रकारात अच्युतराव कुठं फसले असतील, तर त्यांनी टिळक हे लंडनमध्ये असताना त्यांना पाठवलेल्या एका न वटणाऱ्या चेकमुळं. या चेकचं छायाचित्रच टिळकांनी ‘केसरी’त छापलं. त्यामुळे अच्युतरावच दोषी आहेत असा अनेकांचा समज झाला; पण त्यामुळंसुद्धा विचलित न होता उलट अच्युतरावांनी औपरोधिक लेख लिहून टिळकांवरच टीका केली. त्यामुळं टिळकभक्तांची नाराजी अधिकच वाढली. मात्र, तरीही अच्युतरावांनी आपली विजयध्वजा फडकवायची ती फडकवलीच. ती अशी ः
संदेशाचा झाला जय । टिळकतत्त्वाचा तो विजय ।
संदेश धरी टिळकपाय । हृदयी याच कारणे ।।
जरी आज वाद निघाला । तरी संदेश टिळकांला ।
सोडील, ही बात गाळा । संदेश सदा टिळकभक्त ।।
टिळकतत्त्व संदेशा मान्य । म्हणोनि तो झाला धन्य ।
जय । जय । जय । जय ।
लोकमान्य । टिळकतत्वांचा विजय हो ।।


‘टिळक आणि टिळकतत्त्व’ हा अच्युतरावांनी केलेला भेद फार महत्त्वाचा आहे. टिळकतत्त्वाची मांडणी स्वतः टिळकांनीच केली असली, तरी टिळक ही व्यक्ती वेगळी आणि त्या व्यक्तींनं सांगितलेलं तत्त्व वेगळं, व्यक्ती आणि तत्त्व यांच्यात विसंगती दिसली तर व्यक्तीला गौण समजून तत्त्वाला प्राधान्य द्यायचं, त्यासाठी व्यक्तीशी संघर्ष करायची वेळ आली तरी तो करायचा; त्यामुळं त्या व्यक्तीविषयीच्या आदरात काही कमतरता यायचं कारण नाही. टिळक आणि अच्युतराव यांच्यातला संघर्ष हा ‘टिळक विरुद्ध टिळकतत्त्व’ यांच्यातला संघर्ष होता.

याचा प्रत्यय थोड्याच दिवसांत यायचा होता. आपल्या अखेरच्या दुखण्यात टिळक मुंबईतल्या सरदारगृहात उपचार घेत होते. त्या वेळी अच्युतरावांनी ‘संदेश’चे खास अंक काढून टिळकांच्या प्रकृतीमधले चढ-उतार लोकांना त्वरित कळावेत अशी व्यवस्था केली होती. ही गोष्टही विरोधी गटाला रुचली नाही. हा भाग वेगळा.
ता. १ ऑगस्ट १९२० या दिवशी टिळकांचा देहान्त झाल्यानंतर अच्युतरावांनी लिहिलेल्या मृत्युलेखाविषयी आचार्य अत्रे म्हणतात ः ‘‘अच्युतराव कोल्हटकरांनी ‘संदेश’पत्रात जो बत्तीसस्तंभी अग्रलेख त्यांच्या तेराव्या दिवशी लिहिला, तसा मृत्युलेख अद्याप मराठी भाषेत तरी कोणी लिहिलेला नाही. ‘१३ ऑगस्टच्या अंकासाठी अच्युतराव हे लोकमान्यांवर अग्रलेख लिहिण्यासाठी बसले आहेत,’ ही बातमी मला त्याच दिवशी दुपारी समजली. ‘संदेश’ कचेरीत उपसंपादकाचे काम करणारे माझे एक मित्र होते, त्यांनी मला ही बातमी सांगितली. ते म्हणाले, ‘लोकमान्यांवर अच्युतराव सकाळपासून अग्रलेख लिहावयास बसले आहेत. तुम्ही येत असाल तर या माझ्याबरोबर.’’

अत्रे मित्राबरोबर तिथं गेले आणि त्यांनी एका कोपऱ्यात बसून अग्रलेख लिहिण्यात व्यग्र असलेल्या अच्युतरावांना डोळे भरून लांबून पाहून घेतलं. अत्रे वर्णन करतात ः ‘‘त्यांनी मखमली टोपी घातली होती. तळहाताच्या आकाराच्या लहान लहान कागदाच्या कपट्यांवर मोठ्या मोठ्या अक्षरांनी अग्रलेख लिहिण्याच्या त्यांचा शिरस्ता असे. अच्युतरावांच्या समोर कागदाच्या कोऱ्या कपट्यांचा मोठा ढीग पडला होता आणि त्यातील एकेक कपटा भराभर लिहून ते उजव्या बाजूला टाकत होते आणि एक गडी येऊन ते कागद कंपोझिंग खात्याला पोचवीत होता. कसल्या तरी एखाद्या शक्तीचा संचार अंगात व्हावा, तसा अच्युतरावांचा त्या वेळचा अवतार होता. रात्री ११ वाजता त्यांचा तो अग्रलेख अखेर संपला.’’

हा अग्रलेख म्हणजे संपादकीय लेखनचमत्काराचा उच्चांक होय, असा अभिप्रायही अत्रे यांनी व्यक्त केला आहे.
अत्रे यांच्याप्रमाणेच अच्युतरावांचं हे लेखन पाहण्याचे भाग्य नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांनाही लाभलं. त्यांनीही याविषयी अत्रे यांच्याप्रमाणेच लिहून ठेवलं आहे.
अर्थात या मृत्युलेखामुळं टिळकभक्त अच्युतरावांना क्षमा करणं शक्‍यच नव्हतं. टिळकांच्या मृत्यूच्या दहाव्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला शांतारामाच्या चाळीत शोकसभा होती. अच्युतराव बोलणार होते; पण अच्युतरावांना व्यासपीठावर पाहताच श्रोत्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यावर ‘‘मी लोकमान्यांचा शिष्य आहे आणि म्हणून त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मी येथे आलो आहे; तेव्हा या वेळी माझा कपाळमोक्ष झाला तरी बेहत्तर; पण मी येथून एक इंचसुद्धा हलणार नाही,’’ असे अच्युतरावांनी निक्षून सांगितले. त्यावर श्रोत्यांमधली काही उत्साही मंडळी व्यासपीठावर चढली व अच्युतरावांवर तुटून पडली. या सभेला प्रा. ना. सी. फडके उपस्थित होते. त्यांनी सांगितलेल्या हकीकतीनुसार, त्या निर्वाणीच्या प्रसंगी प्रसिद्ध मुस्लिम नेते मौलाना शौकत अली यांनी ‘अच्युतरावांना एखाद्या कोकराप्रमाणे काखेस मारले आणि बाहेर रस्त्यावर आणून सोडले.’’ शौकत अली बलदंड शरीरयष्टीचे होते.

मारहाण करणाऱ्यांनी अच्युतरावांची पाठ रस्त्यावरही सोडली नाही. सुदैवानं शांतारामाच्या चाळीतच प्रा. ना. के. बेहरे यांच्या सासूबाई मालतीबाई पटवर्धन राहत असत. त्यांनी मोठ्या शिताफीनं अच्युतरावांना आपल्या घरी आणलं. परिस्थिती शांत झाल्यावर तुळजापूरकरांनी त्यांना त्यांच्या घरी सोडलं.

त्यानंतर माधवबागेतल्या सभेत पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. त्या वेळी पोलिसांना बोलावून आणण्याची तत्परता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी दाखवल्यामुळं अच्युतरावांची सुटका होऊ शकली. १८ ऑगस्टच्या भायखळा इथल्या सभेत मात्र अच्युतरावांचं डोकं फुटून ते रक्तबंबाळ झाले होते.

विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या पत्रानं अच्युतरावांची बाजू घेऊन, त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक टीका केली होती. ‘मूकनायक’नं म्हटलं होतं ः ‘‘हा काय न्याय आहे? ही काय गुरुभक्ती आहे? नाही, हा केवळ द्वेष होय.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com