गोडवा जपणारं गाव!

खिद्रापूर-कुरुंदवाड ही युद्धभूमीही असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत सापडतात.
Dr Sagar Deshpande writes about World Heritage Kurundwad village
Dr Sagar Deshpande writes about World Heritage Kurundwad village sakal
Summary

देश-विदेशांत वाजवणाऱ्या ख्यातनाम मंडळींची जन्मभूमी म्हणजे कुरुंदवाड सर्वार्थाने समृद्ध असलेलं एक खानदानी गाव.

कृष्णा आणि पंचगंगेच्या कुशीत शेकडो वर्षांपासून नांदत असलेली समृद्धी, काळी कसदार, नद्यांच्या गाळामुळे झालेली सुपीक शेतजमीन, गवतांच्या कुरणांमुळे आणि दुभत्या जनावरांमुळे दूध-दुभत्याच्या पोषणाने घडवलेले ख्यातनाम मल्ल, वांगी-काकडीसह सदैव ताजा हिरवा भाजीपाला, बासुंदीसह खवा, पेढे, बर्फी या सर्वार्थाने गोडवा वाढवणाऱ्या ताज्या पदार्थांची सदैव उपलब्धता, घोड्यांपासून चपलांपर्यंत आणि शिक्षणापासून ते सर्कशीतल्या नकलांपर्यंत, तसंच जागतिक वारसा लाभलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वरापासून ते दोन संस्थानांच्या राजधानीच्या ठिकाणापर्यंत आणि अध्यात्म्यापासून ते गायनकलेपर्यंत अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा डंका देश-विदेशांत वाजवणाऱ्या ख्यातनाम मंडळींची जन्मभूमी म्हणजे कुरुंदवाड सर्वार्थाने समृद्ध असलेलं एक खानदानी गाव.

इथल्या कृष्णा घाटाजवळ असलेली आनंदवन महाराजांची समाधी, नैर्ऋत्येस असलेली संत एकनाथ महाराजांचे नातू संतकवी श्री मुक्तेश्वर महाराजांची समाधी, कृष्णा घाटावर असलेली हिंदवी स्वराज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांची समाधी यांसह असंख्य हिंदू आणि जैन मंदिरांचं सान्निध्य या कुरुंदवाड गावाला आणि परिसराला लाभलं आहे. खिद्रापूर-कुरुंदवाड ही युद्धभूमीही असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत सापडतात.

सुमारे हजार वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेलं कुरुंदवाड हे मूळ कापशीकर घोरपडे यांचं. रत्नागिरीपासून अकरा मैलांवर असलेल्या कोतवडे या गावातील पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभटबाबा यांचे तिसरे सुपुत्र त्रिंबकपंत ऊर्फ अण्णासाहेब हे अक्कलकोटच्या भोसले यांच्या पदरी होते, ते नेहमी कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कपाशीला जात. पुढं कापशीकर राणोजी घोरपडे यांनी त्रिंबकपंतांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपोटी त्यांना कुरुंदवाड गाव इ. स. १७३८ मध्ये इनाम लिहून दिल्याचा उल्लेख सापडतो. पुढं ही पटवर्धन मंडळी सांगली, मिरज, कुरुंदवाड, तासगाव संस्थानांमध्ये विभागली गेली. त्यानंतर १८५५ च्या दरम्यान कुरुंदवाड सीनियर आणि ज्युनिअर अशी विभागणी झाली. कुरुंदवाड सीनियर स्टेटमध्ये बेळगाव, कोल्हापूर, सांगली, मिरज परिसरातील ३७ गावं होती; तर ज्युनिअर स्टेटमध्ये बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर स्टेट परिसरातील ३४ गावं होती. भालचंद्र ऊर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांच्या निर्णयानुसार १ जून १८८३ रोजी कुरुंदवाड नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेच्या १८८३-८४ च्या जमा-खर्चात २०२१ रु. जमा, ११९४ रु. खर्च आणि ८२७ रु. शिल्लक दिसून येते. भालचंद्र महाराजांच्या काळातच सध्याचं भालचंद्र नाट्यगृह, घाटावरचं गणपती मंदिर, कुस्तीचा आखाडा, दवाखाने, पूल, शाळा उभारल्या गेल्या. सुमारे पाच हजार रुपये खर्चून त्यांनी ग्रंथालयासाठी इमारत बांधून एक हजारावर ग्रंथ उपलब्ध करून दिले. तत्पूर्वी राजवाड्याच्या परिसरातच ही स्टेट लायब्ररी (१८९८) होती. १९४२ मध्ये राजा सर रघुनाथराव पंडित असं या संस्थेचं नामकरण झालं. दुर्मीळ हस्तलिखितांसह या वाचनालयातील मौल्यवान ग्रंथसंपदा ही वाचनसमृद्ध करणारी आहे.

पेशव्यांच्या लष्करात लौकिक संपादन करणाऱ्या पटवर्धनांपैकी चिंतामणराव ऊर्फ बाळासाहेब महाराजांनी संस्थानातील सर्व खात्यांमध्ये सुधारणा केल्या. दानशूर म्हणून ख्याती असलेले हे महाराज उत्तम वक्ते होते, त्यांना व्यायामाची आवड होती. हिंदुस्थानातील प्रख्यात पैलवानांना जसा त्यांनी आश्रय दिला, तसेच भूलोकीचे गंधर्व म्हणून ओळखल्या गेलेल्या रहिमत खाँ साहेबांची अखेरपर्यंत काळजी घेण्याची व्यवस्था केली. चिंतामणरावांचे ज्येष्ठ सुपुत्र भालचंद्र महाराजांनी मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय, एस. पी. हायस्कूल, गणेश बँकेची स्थापना, रयत दरबार, वॉटर वर्क्स असे उपक्रम यशस्वी केले. मुंबई कौन्सिलचे ते नामदार होते. त्यांनी संस्थान कर्जमुक्त केलं. त्यांच्या पश्चात श्रीमंत राणीसाहेब रिजंट म्हणून कारभार पाहात. विख्यात कायदेपंडित अनंत गोपाळ गानू, शेठ भिकूलाल छगनलाल, तात्यासाहेब चिवटे, दत्त विव्हिंग मिल्सचे मालक गोपाळ बाबाजी घोरपडे, पहिल्या हिंदू स्त्री-वैमानिक गीताबाई गाडगीळ, सिनेस्टार कु. वासंती आणि लीला घोरपडे, मानजी जाधव-पाटील, चित्रकार-मूर्तिकार ए. डी. पटवर्धन, बुद्धिबळपटू अप्पासाहेब पटवर्धन, नरगुंदच्या लढाईतील वीर जिवाजी पाटील, फोटोग्राफर विष्णुपंत माणगावकर, कोल्हापूर संस्थानचे भूतपूर्व पंतप्रधान आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पहिले चरित्रकार, दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे, अखिल भारतातील सर्कसचे जनक आणि उत्तम गायक प्रो. विष्णुपंत छत्रे, नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर या दिग्गजांचं कुरुंदवाडशी जन्मभूमी म्हणून किंवा आश्रयभूमी म्हणून जिव्हाळ्याचं नातं होतं.

कुरुंदवाड संस्थानच्या राजमाता विजयादेवी पटवर्धन याही उत्तम लेखिका होत्या. ‘नीरा ते कृष्णा’ या त्यांच्या आत्मचरित्रासह त्यांनी इतरही काही पुस्तकं लिहिली होती.वेदाचार्य घनपाठी सखारामभट बाळकृष्णभट येडूरकरशास्त्री कागलकर यांना टेंबे स्वामींचा आशीर्वाद लाभला होता. अत्यंत तल्लख बुद्धी लाभलेल्या शास्त्रीजींना वेदांतली दहा हजारांहून अधिक वेदपदं पाठ होती. भारत सरकारतर्फे वेळोवेळी त्यांचा माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, डॉ. राधाकृष्णन, व्ही. व्ही. गिरी, विजयालक्ष्मी पंडित यांच्याहस्ते सत्कार झाला होता. ‘पृथ्वीवर इतकं मोठं पाठांतर दुसरं कुणी करू शकणार नाही’ असं म्हणत आचार्य अत्रेंनी त्यांना दंडवत घातला होता. नेमबाज दत्तोबा बळवंत चव्हाण, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. पां. ना. कुलकर्णी, देशाचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, सूर्याची उष्णता आणि वाढत्या तापमानासंबंधी अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहून संशोधन करणारे प्रख्यात शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी, ज्येष्ठ संपादक पां. वा. गाडगीळ, प्रख्यात विचारवंत प्राध्यापक स. रा. गाडगीळ, बिहार प्रांताचे माजी पोस्ट मास्तर जनरल एल. पी. कुलकर्णी, लक्ष्मण माळी, महंमद पाथरवट आणि ज्ञानोबा ओतारी हे मूर्तिकार, दांडपट्टा खेळणारे कोठावळे गुरुजी, गायक गिरधर बुवा, तबलजी रामभाऊ गुरव, कुरुंदवाडला महापुराचा वेढा बसत असल्याने बोटी बांधण्याचा कारखाना सुरू करणारे, ‘संगम’ साप्ताहिकाचे संस्थापक चिंतामण गोरे वकील, आमदार कृष्णा नाना पाटील, नाटककार गणेश फाटक, स्टेट शिक्षणाधिकारी विनायक परांजपे, स्टेटचे कारभारी जी. बी. दुग्गे वकील, चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. गो. वि. वैद्य, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक एस. ए. रामतीर्थकर, प्रसिद्ध लेखिका शांता बुद्धिसागर अष्टपुत्रे, कीर्तनकार इंदूताई कुलकर्णी, डॉ. मुकुंद दातार, हिंदी समीक्षक-लेखक डॉ. एस. व्ही. मुदगल अशी कुरुंदवाडशी संबंधित विविध क्षेत्रांतील कितीतरी नामवंत मंडळी सांगता येतील.

कुरुंदवाडच्या शूरवीरांनी हैदराबादच्या स्वारीपासून ते गोवा मुक्ती संग्राम आणि आझाद हिंद सेनेत पराक्रम गाजवला आहे. कुस्ती, मल्लखांब यांसह अनेक देशी खेळांमध्ये इथल्या खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलं असून घोड्यांचा, चपलांचा व्यापार, हातमाग - यंत्रमागांमुळे हा परिसर सर्वांगाने समृद्ध आहे. कुरुंदवाड आणि परिसरात हिंदू आणि जैन बांधवांची मंदिरं, मुसलमानांचे दर्गे अशी ६० हून अधिक प्रार्थनास्थळं असून, इथले नद्यांचे घाट प्रेक्षणीय आहेत. भारतातल्या ‘चंद्रलेखा’ या पहिल्या मूकपटापासून ते ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या बोलपटापर्यंत अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचं चित्रीकरण या परिसरात झालं आहे. देश-विदेशांतील दिग्गजांनी कौतुक केलेलं हे छोटंसं कुरुंदवाड संस्थान तिथल्या प्रख्यात बासुंदीसह आपल्या अगत्याचा गोडवा आजही बाळगून असलेलं पाहायला मिळतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com