दापोली भारतरत्नांची भूमी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Famous
दापोली भारतरत्नांची भूमी!

दापोली भारतरत्नांची भूमी!

महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या खेड्यांना, गावांना मोठा इतिहास आहे. त्यांची म्हणून एक परंपरा आहे. ही गावं किंवा खेडी बदलत्या जीवनप्रवाहाची साक्षीदारदेखील आहेत. या सदरातून अशा गावांचा मागोवा.

निसर्गसौंदर्यानं नटलेलं कोकण ही महाराष्ट्राची जणू स्वप्नभूमीच आहे. समृद्ध निसर्ग, पर्यटकांना आकर्षण ठरणारे समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक ठिकाणं, या सगळ्यापेक्षाही जीवनाच्या विविध क्षेत्रांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांगीण योगदान देणाऱ्या स्त्री-पुरुषांची भूमी म्हणून कोकणचं वेगळंच वैशिष्ट्य सांगता येईल. कोकणातल्याच रत्नागिरी जिल्ह्यातला दापोली तालुका या सगळ्या वैशिष्ट्यांसह आणखी एका, कदाचित अशा एकमेव कारणानं भारतभरात स्वतंत्र ओळख ठेवून आहे. ती ओळख म्हणजे या एकाच तालुक्यानं आपल्या देशाला तीन भारतरत्नं दिली आहेत.

स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि दीन-दलित-वंचितांचे कैवारी म्हणून विश्ववंद्य असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी आयुष्यभर त्यागपूर्वक प्रचंड योगदान देणारे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि धर्मशास्त्राचा इतिहास अनेक खंडांच्या स्वरूपात लिहिणारे डॉ. पां. वा. काणे या तीन भारतरत्नांसह त्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या महापुरुषांचा तालुका म्हणून दापोलीचा परिसर सर्वपरिचित झाला आहे. लोकमान्य टिळक, कवी केशवसुत, साने गुरुजी, रँग्लर परांजपे, प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे आणि अशा कितीतरी दिग्गजांची मूळ गावं याच दापोली परिसरातली, आजही त्यांच्या आठवणी जागवणारी; त्यांच्या वास्तू नि वस्तू जपून ठेवणारी!

ही सगळी दिग्गज माणसं जन्मली ती बहुतांशी खेडेगावांमध्येच. सगळ्याच प्रकारची प्रतिकूलता आणि त्या परिस्थितीशी संघर्ष करताना करावं लागणारं स्थलांतर, ज्या भागात जाऊ तिथं पुन्हा पाय रोवून उभं राहण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्यातून पुढं शिक्षणासह जगण्यासाठी, देशकार्यासाठी करावा लागणारा संघर्ष... याच परिस्थितीतून या बहुतेक महापुरुषांना जावं लागलं आहे. त्यांच्या दापोली परिसरातल्या मूळ गावी पोहोचलं की, थोरा-मोठ्यांकडून ऐकलेला, पुस्तकांतून वाचलेला, नाटक-चित्रपटांतून पाहिलेला सारा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो.

दापोली-दाभोळ रस्त्यावरचं ‘वळणे’ हे छोटंसं गाव. ‘एक तुतारी द्या मज आणुनि’, ‘एक खेडं’ या कवितांसह अजरामर झालेले कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुतांचं हे मूळ गाव. नदीकाठची वस्ती, रहाटगाडग्याच्या विहिरी, जुनी कौलारू घरं, कड्यांचा करकर आवाज करणारे झोपाळे, विहिरीवरची दगडी डोण.... कवितेतल्या खेड्याचं वास्तव दर्शन घडवणारं हे गाव. या गावी केशवसुतांचं मूळ घर. त्या काळात मराठी साहित्यात केशवसुतांच्या कविता हा एक मानदंडच होता. मंगेश पाडगावकरांच्या वडिलांचं नावही केशव! केशवसुतांच्या कवितांचा उल्लेख करताना त्यात आपल्या नवऱ्याचंही नाव घ्यावं लागेल, म्हणून पाडगावकरांच्या बालपणी त्यांची कविताप्रेमी आई, ‘‘मंग्या, तू आता ये. तुका मी दामल्यांची कविता वाचून दाखवते हां!’’ असं म्हणायच्या, अशी मजेदार आठवण मला खुद्द पाडगावकरांनीच सांगितली होती. अशा कितीतरी आठवणी मग जाग्या होतात. कोकण मराठी साहित्य परिषदेनं गणपतीपुळ्यानजीक मालगुंड इथं केशवसुतांचं स्मारक उभारलं आहे, तेही पाहण्याजोगं आहे.

लोकमान्य टिळकांचा जन्म जरी रत्नागिरीतला, तरी त्यांचं मूळ गाव दापोली तालुक्यातलं चिखलगाव. त्यांच्या मूळ वास्तूच्या ठिकाणी आज स्मारकाच्या स्वरूपात लोकमान्यांचा पुतळा उभा आहे. त्यांचं लग्नही याच गावात झाल्याचे संदर्भ सापडतात. कारण त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचं गावही जवळचंच लाडघर. तिथल्या बाळ घराण्यातल्या माहेरच्या त्यांच्या आठवणीही सांगण्यात येतात. गावातील नाटकात लोकमान्यांचा सहभाग असलेला फोटो न. र. फाटक यांच्या पुस्तकात असल्याचा संदर्भ आवर्जून दिला जातो. चिखलगावाचं लक्ष्मीनारायण हे टिळकांचं कुलदैवत. टिळकांची मूळ जमीन जयंतराव टिळक यांनी लोकसाधना ट्रस्टला दिली; पण त्याच्या आसपासची जागा घेऊन डॉ. राजा दांडेकर, रेणू दांडेकर दाम्पत्यानं चिखलगावात उभारलेलं शिक्षण आणि समाजविकासाचं काम हे लोकमान्यांचं स्मारक म्हणता येईल. डॉ. दांडेकरांचे आजोबा रामचंद्रबुवा दांडेकर हे कीर्तनकार होते. लोकमान्यांशी त्यांचा स्नेह होता. टिळकांनी सही केलेली ‘गीतारहस्य’ची प्रत दांडेकरांच्या संग्रही आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू इथं झाला; पण त्यांचं मूळ गाव आंबवडे हे याच तालुक्यातलं. तिथल्या प्राथमिक शाळेनंतर दापोलीतल्या ए. जी. हायस्कुलात त्यांचं शिक्षण झालं, तिथल्या वसतिगृहात ते राहात असत. कोट्यवधी वंचितांना प्रेरणा देणाऱ्या या महामानवाच्या या मूळ भूमीत आलं की, अक्षरशः त्या वास्तू पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.

इथूनच जवळ महर्षी कर्वे यांचं मूळ गाव मुरुड. त्या मुरुडला जाताना वाटेत लागणारं वणंद हे गाव म्हणजे आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचं मूळ गाव. शासनानं इथं त्यांचं स्मारक केलंय. बालपणाची काही वर्षं आपल्या मुरुड या गावी घालवून पुण्यात आलेले महर्षी कर्वे यांचा वाडा नामशेष झालाय. त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याजवळ गल्लीच्या टोकाशी असलेल्या प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर महर्षींचा छोटासा पुतळा बसवण्यात आला आहे, तीच त्यांची आठवण. पुण्यात गेल्यावर विधवा विवाह केला म्हणून, त्यावेळच्या रूढी-परंपरा मोडल्या म्हणून ग्रामस्थांचा महर्षी कर्वे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही राग होता. वडिलांच्या पुनर्विवाहाचा त्रास त्यांचे सुपुत्र रघुनाथ यांनाही भोगावा लागला. पुढे ‘भारतरत्न’ सन्मान मिळाल्यावर महर्षींचा मुरुडवासीयांनी आवर्जून सत्कार केला. पण, तोपर्यंत त्यांना हयातभर उपेक्षा सहन करावी लागलीच. आता मुरुडमध्येच एका खासगी पर्यटक निवासात महर्षी कर्वे स्मृती संग्रहालय उभारण्यात आलं आहे. मुरुडकडे जाताना आणि तिथून पुढं हर्णेच्या परिसरातील अनेक आठवणी आपल्याला ‘गारंबीच्या बापू’सह श्री. ना. पेंडसे यांच्या साहित्यकृतींपर्यंत आपसूक नेऊन पोचवतात.

जवळच्याच पालगडमध्ये साने गुरुजींचं घर आणि शाळा. हर्णेहून नव्या खाडी पुलावरून गेलं की आंजर्ले आणि तिथून जवळच असलेलं मुर्डी हे गाव म्हणजे रँग्लर परांजपे यांचं गाव. गणितज्ञ आणि पुढं रँग्लर पदवी मिळवलेल्या र. पु. परांजपे यांचंच नाव इथल्या प्राथमिक शाळेला देण्यात आलं आहे. पालगडमध्येच साने गुरुजींचं ज्या शाळेत शिक्षण झालं, तिथल्या जनरल रजिस्टरवर त्यांच्या नावाची नोंद आहे. आता त्यांच्या मूळ जन्मघरात गुरुजींचं स्मारक करण्यात आलं आहे. पुढं साने गुरुजी खानदेशातील अमळनेर इथं राहिले, ती त्यांची कर्मभूमी झाली.

खुद्द दापोलीमध्ये ब्रिटिशांनी थंड हवेचं ठिकाण म्हणून आपला कॅम्प ठेवला होता. अनेक ब्रिटिश वरिष्ठ अधिकारी इथं राहात. ‘फॅमिली माळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इथं एक इमारत आहे (मंजिल म्हणून ती ओळखली जाते), ते म्हणजे भारतरत्न पां. वा. काणे यांचं घर. त्यांचं शिक्षण इथंच झालं. पुढं मुंबईतून एम.ए. झाल्यावर ते रत्नागिरीत शिक्षक म्हणून काम करू लागले. पाच खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला धर्मशास्त्राचा इतिहास आणि त्यांचं अन्य संशोधन म्हणजे एखाद्या मोठ्या संस्थेइतकंच काम होतं. तीन भारतरत्नांचा तालुका ही ओळख म्हणजे चिरंजीवच राहणारी आहे.

(सदराचे लेखक डॉ. सागर देशपांडे पत्रकार, लेखक आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dapolisaptarang
loading image
go to top