दिग्गजांचं वास्तव्य आणि सृष्टिसौंदर्य !

एखाद्या परिसराला, गावाला निसर्ग इतकं भरभरून देतो की, निसर्गाची ती सर्वांगसुंदर समृद्धी तिथल्या प्रत्येक गोष्टीत प्रतिबिंबित होत असते.
दिग्गजांचं वास्तव्य आणि सृष्टिसौंदर्य !
Summary

एखाद्या परिसराला, गावाला निसर्ग इतकं भरभरून देतो की, निसर्गाची ती सर्वांगसुंदर समृद्धी तिथल्या प्रत्येक गोष्टीत प्रतिबिंबित होत असते.

एखाद्या परिसराला, गावाला निसर्ग इतकं भरभरून देतो की, निसर्गाची ती सर्वांगसुंदर समृद्धी तिथल्या प्रत्येक गोष्टीत प्रतिबिंबित होत असते. आंबा, काजू आणि फणस, नारळीच्या बागा; रमणीय समुद्रकिनारे आणि नद्या, हिरवीगार शेतं आणि लाल कौलारू घरं, प्रसन्न प्रशस्त स्वच्छ देवळं, परंपरेने चालणारे सण-समारंभ, जीवनाच्या हरेक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या मंडळींची अक्षरश: भव्य प्रभावळ आणि या सगळ्याला असलेली ऐतिहासिक पण गूढ रम्य वातावरणाची किनार, आपल्याला बहुधा तळकोकणातील बहुतांशी गावांच्या परिसरात जाणवतेच. या सर्व वैशिष्ट्यांसह आपलं देखणेपण अबाधित ठेवून आधुनिक काळाशी सांधा जोडणारं गाव म्हणजे वेंगुर्ले!

‘पोटाक पेज नि माथ्याक तेल’ एवढी साधी आरोग्यविषयक म्हण हेच जगण्याचं सूत्र मानून एकीकडे दारिद्र्याचे दशावतार भोगणारे सामान्य लोक आणि दुसरीकडे इराणचं आखात - युरोपात निर्यात होणाऱ्या मालाच्या व्यापारामुळे समृद्ध झालेलं बंदर आणि व्यापारी अशी दोन्ही टोकं इथं दिसून येत. अनेक परकीय सत्तांचं वर्चस्व सहन केलेल्या वेंगुर्ल्याचा हा परिसर विजापूरकरांच्या काळात सावंत - भोसले घराण्यांच्या आधिपत्याखाली आला. दक्षिण कोकणात सावंतांचं एक जणू छोटं राज्यच होतं. वेंगुर्ले हे त्यातलं प्रमुख बंदर आणि सावंतवाडी ही राजधानी. इतिहासाचार्य राजवाडेंसह अनेक संशोधकांनी वाचलेला, वेंगुर्ल्याच्या मांगल्याच्या मठातील एका देवळात कोरलेला शके १३१७ मधला शिलालेख आणि अशाच अनेक प्राचीन, अर्वाचीन इतिहासाच्या खुणा इथं जागोजागी दिसून येतील.

कुडाळी आणि मालवणी बोलीभाषा बोलणाऱ्या वेंगुर्ल्याच्या नावाबाबत अनेक कहाण्या आहेत. पाश्चात्त्य लोक त्याला ‘सेसेकीएनी’ म्हणत. दक्षिण भारतातील वेंगीं नावाच्या गावातील लोकांनी कधीकाळी इथं येऊन वसाहत केली असावी म्हणून वेंगुर्ले. आणखी एक म्हणजे, कदंबाच्या सैनिकांना मालवणपर्यंतचा हा सगळा टापू ताब्यात घ्यायचा होता; पण त्यांच्या ‘वेंगे’तून सुटला म्हणून वेंगुर्ले. शिवपूर्वकाळापासून ख्याती पावलेल्या याच वेंगुर्ले बंदरातून विजापूर दरबारची बडी साहेबीण इ.स. १६५२ मध्ये मक्केला गेली होती, असं सांगण्यात येतं.

आदिलशहाच्या परवानगीने डच व्यापाऱ्यांनी वेंगुर्ले बंदराचं महत्त्व लक्षात घेऊन १६३८ मध्ये वखार उभारण्यास परवानगी मागितली. १६४६ मध्ये इथं एक तात्पुरत्या स्वरूपाची इमारत उभारली. पुढं ती कोसळली, मग इथल्या वखारीचा व्यापारीप्रमुख लिडर्ट जान्स याने वरिष्ठांनी परवानगी नाकारल्यानंतरही आपल्या अधिकारात तीन हजार गिल्डर ( तीन हजार तोळे सोने) पेक्षा अधिक रक्कम खर्चून तटबंदीयुक्त किल्ल्याच्या आकारातील वखार उभारली. वखारीपर्यंत खाडीचा विस्तार असल्याने १० तोफा आणि २०० बंदुकांचा त्या वेळी इथं पहारा होता. पोर्तुगिजांच्या छळाला कंटाळून गोव्यातील बरेच लोक इथं कामाला येत.

इ.स. १६८० मध्ये वखारीसमोर खंदक खोदून त्यावर पूल उभारण्यात आला. शत्रूचा हल्ला झालाच तर हा पूल वरती उचलता येत असे. इथल्या तोफांवर आफ्रिकन गुलामांची, तर पहाऱ्यावर भारतीय सैनिकांची नेमणूक होती. तत्कालीन भारतातील अनेक राजकीय मुत्सद्दी चर्चेसाठी इथं येत. गोव्याइतकंच हे बंदर विख्यात झाल्याने जपान, सिलोन, बटेव्हिया, इराणी आखातातून इथं जहाजं येत. प्रामुख्याने वेलदोडे, मिरी, लाख, धान्य, कापड, रेशीम, मलमल युरोप आणि इराणकडे निर्यात होत असे. डच फॅक्टरी म्हणून ओळखली जाणारी आणि पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील ही ऐतिहासिक वास्तू आता इतिहासजमा झाली आहे. औरंगजेबाचा दुसरा मुलगा अकबर डचांच्या आश्रयासाठी इथल्या वखारीत आल्याचं समजल्याने शहाआलम या मुलाने वेंगुर्लेच पेटवून टाकलं होतं, अशी नोंद आहे.

समृद्ध बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या वेंगुर्ल्याच्या नाना पंडितांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात तात्या टोपेंच्या सैन्यातून भाग घेतला होता. १९३०-३१ चा शिरोड्याचा गाजलेला मिठाचा सत्याग्रह, १९४२ चा लढा, गोवा मुक्ती संग्राम यांतही वेंगुर्ल्याच्या लोकांचा सहभाग होता. १८५० च्या दरम्यान इथं जुन्या पद्धतीच्या पंतोजींच्या शाळा होत्या. १८६५ मध्ये सेकंड ग्रेड व्हर्न्यक्युलर, तर १८७८ मध्ये मुलींची शाळा सुरू झाली. १९२१ च्या आकडेवारीनुसार मराठी जाणणारे सात हजार आणि इंग्रजी अवगत असलेले एक हजार विद्यार्थी या तालुक्यात होते. १९१३ मध्ये कोल्हापूर चर्च कौन्सिलने इथं वेंगुर्ले हायस्कूलची स्थापना केली. भारतीय नौदलाचे एकेकाळचे प्रमुख ॲडमिरल रामदास यांचे वडील प्रि. रेव्ह. एस. जे. आर. रामदास यांनी इथं बऱ्याच सुधारणा केल्या. १९२६ मध्ये स्थानिक मंडळींनी वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इथलं खर्डेकर महाविद्यालय नामांकित आहे. १८७१ मध्ये नगर वाचनालयाची स्थापना झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंदांनी या वाचनालयाला भेट दिली होती. ‘संचित प्रारब्ध व क्रियमाण’ यावर स्वामीजी हिंदीतून बोलले होते.

शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ परुळेकर, समाजसेवक केशवराव धुर्ये, मुंबई राज्याचे आरोग्य संचालक अण्णासाहेब दाभोलकर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन प्रल्हाद आनंद धोंड, एम्समधील प्रो. डॉ. नंदकिशोर गाडेकर, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे जनरल जगन्नाथराव भोसले अशा दिग्गजांचं शिक्षण वेंगुर्ल्यातच झालं. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर हे शिरोड्याला अनेक वर्षं अध्यापन आणि लेखन करीत.

इचलकरंजी संस्थानचे अधिपती घोरपडे म्हणजे मूळ जोशी, ते मूळचे म्हापणचे; तर कुडाळ देशकर ज्ञातीचे महत्त्वाचे श्रद्धास्थान म्हणजे दाभोलीचा पूर्णानंद स्वामींचा मठ. आद्य शंकराचार्यांच्या आज्ञेने स्थापन झालेल्या या मठासाठी प्रसिद्ध अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी प्रारंभी उत्पन्नाची व्यवस्था केली होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे, तारापूर अणुकेंद्राचे पद्मश्री व्ही. आर. वेंगुर्लेकर, चित्रपट क्षेत्रातील दादासाहेब तोरणे, वेदाचार्य फाटक, पं. नेहरूंचे आर्थिक सल्लागार प्रा. पी. बी. आडारकर, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बी. एन. आडारकर, यंदा ज्यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजवादी नेते बॅ. नाथ पै, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक दीना खटखटे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, रमाकांत देसाई, विजय मांजरेकर, ‘मनोरंजन’कार का. र. मित्र, प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर, साहित्यिक जयवंत दळवी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे बंधू, गणपतीच्या चित्रांमुळे जगभरात नामांकित झालेले अरुण दाभोलकर, लोणची - मसाले उत्पादक विजयराव कुबल, भारतीय बनावटीच्या पहिल्या ऑफसेट छपाई यंत्राचे निर्माते अप्पासाहेब मराठे, विद्यमान मंत्री उदय सामंत, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर (खानोली), जगप्रसिद्ध चित्रकार साबाजी पोळजी (आसोली), दशावतारी कलामंडळाचे मामा मोचेमाडकर (मोचेमाड), कृषिरत्न काकासाहेब चमणकर, साहित्यिक डॉ. गंगाधर मोरजे (उभादांडा), राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निर्मलग्राम पारबवाडा, उत्तर ध्रुव पादाक्रांत करणारे डॉ. शिवप्रसाद प्रभू आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त अंकुश वैद्य (मातोंड), हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध होते असे वजराट गाव, मंगलोरी कौलांचे कारखानदार जी. एस. नाईक (आडेली) द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रघुनंदन गोखले (दाभोली), क्वेट्टा इथं हॉस्पिटल उभारणारे डॉ. रामजी खानोलकर, त्यांचे सुपुत्र, कॅन्सरवरील संशोधक डॉ. अनंत आणि दुसरे सुपुत्र मेजर जनरल विक्रम खानोलकर (खानोली), प्रख्यात साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर (वायंगणी - कोंडुरा), शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळूसकर (केळूस), प. पू. भालचंद्र महाराज आणि सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर (म्हापण), बालमोहनचे प्राचार्य दादासाहेब रेगे (खेचरे) अशा दिग्गजांची मूळ गावं ही वेंगुर्ले तालुका आणि परिसरातीलच आहेत. एका लेखात वेंगुर्ला मावणारच नाही. दिग्गज प्रतिभावंतांच्या या परिसराची ओळख होण्यासाठी महाग्रंथाचे खंडच साकारावे लागतील.

(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com