संगम परंपरेचा-नवतेचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pritisangam

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं कऱ्हाडची ओळख देशाच्या नकाशावर ठळकपणाने झाली.

संगम परंपरेचा-नवतेचा!

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं कऱ्हाडची ओळख देशाच्या नकाशावर ठळकपणाने झाली. त्याचबरोबर कऱ्हाडचा प्राचीन इतिहास आणि तिथल्या मंडळींचं  जीवनाच्या विविध क्षेत्रांतील योगदान हे अक्षरशः थक्क करणारं आहे. ‘अवतीभोवतीची भाबडी गावं कुशीत घेऊन भीतभीत मोठं होणारं शहर’ असं  शंकरराव करंबेळकरांनी वर्णन केलेलं कऱ्हाड हे महत्त्वाचं शहर आहे. ग्रामदैवत कृष्णाबाई आणि उत्तरालक्ष्मीच्या छात्रछायेतील, कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील, चारही बाजूंनी ऐतिहासिक गडकोटांच्या सोबतीने वसलेलं कऱ्हाड म्हणजे सुसंस्कृत, समृद्ध आणि देशभक्तांच्या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. 

ज्येष्ठ संशोधक - संपादक डॉ. अरुण टिकेकर यांनी नमूद केलेलं कऱ्हाडचं महत्त्व तर विलक्षणच. ‘‘काश्मिरी पंडित बिल्हण, ज्याला विद्यापती म्हटलं गेलं आहे, याच्या ‘विक्रमाङ्कदेवचरिता’त शिलाहार कुलाच्या मारसिंह राजाच्या चंद्रलेखा नामक अतिसुंदर कन्येच्या स्वयंवराची कथा दिली आहे. (११-१२ वं शतक) हे स्वयंवर कऱ्‍हाडला झालं हे वाचून आजच्या कऱ्‍हाडकरांना आश्चर्याचा धक्का बसेल. या स्वयंवरासाठी देशाच्या अनेक भागांतून विविध राजे आले होते. बिल्हणाने चंद्रलेखेच्या सौंदर्याचं वर्णन करताना आपलं सारं भाषापटुत्व पणाला लावल्यासारखं दिसतं. या स्वयंवराइतकी मोठी घटना कऱ्‍हाडला घडली असेल, तर शिलाहारांच्या काळी हे नगर महत्त्वाचंच असणार. शे-दोनशे राजे, त्या प्रत्येकाचा लवाजमा एवढा भार सोसण्याइतपत सुविधा तिथं नक्की असणार. रावबहादूर चिं. वि. वैद्यांच्या मतानुसार कऱ्‍हाड ही शिलाहारांची राजधानी होती.’

अशा प्रकारच्या अनेक राजवटी अनुभवलेल्या कऱ्हाडचा उल्लेख करहकट, करहाडक, करहाटक (महाभारतात), कलहराबाद (मुसलमान काळात), कल्हार, करहाट, करहाड, कऱ्हाड, कराड इतक्या नावांनी केला जातो.

शिवछत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे नजीकच्या तळबीडचे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची दुसऱ्या अली आदिलशाहाबरोबर १६६१ ला इथल्या इदगामाबळावर लढाई झाली होती. १८५५ मध्ये हा भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला, त्याच वर्षी नगर परिषदेची स्थापना झाली, दोन वर्षांनी रेल्वे स्टेशन सुरू झालं.

जिच्या नावे एकही अभंग नसला तरी भक्तिसंप्रदायात मोलाचं स्थान असलेली संत सखू, प्रतिभावान पंडित विठोबा अण्णा दप्तरदार, सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान भाऊसाहेब कळंबे मास्तर, देशसेवक गणेश सदाशिव आळतेकर, पांडुअण्णा शिराळकर, बाबूराव गोखले, देशाचे नेते यशवंतराव चव्हाण, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, उद्योगपती नीळकंठराव कल्याणी, आधुनिक कऱ्‍हाडचे शिल्पकार आणि चाळीस वर्षांहून अधिक काळ नगराध्यक्षपद भूषविणारे पी. डी. पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सारे नामवंत कऱ्‍हाडचेच.

लोकमान्य टिळक यांच्या अध्यक्षतेखाली १९०६ मध्ये ११ फेब्रुवारी रोजी कोटाखालच्या धर्मशाळेत शि. म. परांजपे यांचं ‘स्वदेशी’वर भाषण झालं. याच स्वदेशीचा भाग म्हणून नागूदादा ओगलेंनी कऱ्हाड स्टेशनजवळ काचसामानाचा मोठा उद्योग उभारला. श्रीपाद प्रभाकर ओगलेंनी पुढं ‘ओगले ग्लास वर्क्स’ हा कारखाना काढला. औंधच्या पंतप्रतिनिधींनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना मदत केली. १९२३ मध्ये त्यांनी ‘प्रभाकर कंदील’ तयार केला.

कंदील तयार करणारा हा भारतातील पहिला आणि एकमेव कारखाना. युद्धकाळात ब्रिटिश लष्कराला हे कंदील पुरवले जात असत. टिळकांपासून प्रेरणा घेऊनच १९०६ मध्ये पंताच्या कोटात डेक्कन मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (आगपेट्यांचा कारखाना) सुरू झाला, तर हणमंत वामन फडके यांनी बडोद्याहून तंत्रविद्या प्राप्त केल्यावर कऱ्हा‍डात येऊन अनेक प्रकारची यंत्रं तयार केली, विव्हिंग मिल आणि फौंड्री उद्योगही उभारला. प्रा. वि. पु. गोखले आणि प्रा. का. धों. देशपांडे यांनी अनेक वर्षं प्रचंड परिश्रम घेऊन साकारलेला ‘कऱ्हा‍ड समग्र दर्शन’ हा ग्रंथ या शहराविषयी अभ्यासकांना ऊर्जा देणारा आहे.

सरदार भाऊसाहेब पाटणकर यांच्या पुढाकाराने १०३३ मध्ये कऱ्हाड इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी सुरू झाली. त्याचवेळी शाईचा, साबणाचा, चॉकलेटचा, बर्फाचा, हॅण्डमेड पेपर आणि स्टीलच्या बोटी तयार करण्याचा कारखानाही या परिसरात सुरू झाला. शेतीमध्ये अग्रेसर असलेल्या कऱ्हाडचा भुईमूग १८५१च्या सुमारास युरोपमध्ये जात होता. पण, वामनराव लांजेकरांनी १९३५ मध्ये शेंगांच्या फोलपटांपासून बाहुल्या आणि खेळणी तयार करण्याचा कारखाना काढला. भारतीय वेशभूषेतल्या या बाहुल्या त्या वेळी चीन आणि जपानला निर्यात होत असत, हे खूपच विलक्षण वाटतं.

कृष्णेवरील खोडशी धरण (१८६०) आणि कोयना प्रकल्पाच्या पूर्वतयारीचं मुख्य केंद्र कऱ्हा‍ड हेच होतं. १८५७ चं बंड, १९४२ ची चळवळ आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी उभारलेलं प्रतिसरकार (पत्री सरकार) ते गोवा मुक्ती संग्राम अशा सर्व प्रमुख लढ्यांमध्ये कऱ्हाडकर सहभागी होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, मदनमोहन मालवीय, राजेंद्र प्रसाद अशा दिग्गजांच्या ‍कऱ्हाडमध्ये सभा झाल्या. १९३७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू प्रचारासाठी कऱ्हाडला स्वामींच्या बागेत आले होते. मात्र, काही अडचणींमुळे मोटारीची सोय होत नव्हती. काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण यांनी विरोधी असलेल्या मुस्लिम लीगचे नगराध्यक्ष खानसाहेब अहमद कासमसाहेब कच्छी यांना शब्द टाकताच त्यांनी गाडी उपलब्ध करून दिली. इतकंच नाही, तर नगरपालिकेच्यावतीने पंडित नेहरूंचा सत्कार केला. या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच कऱ्हाडमध्ये ध्वनिक्षेपक वापरण्यात आला.

कला, शास्त्र, साहित्य, संगीत, ज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, नाट्य, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांत कऱ्हाडला फार मोठी परंपरा आहे. १३ व्या शतकातील वेदान्तविशारद चक्रपाणी राजनायक, ग्वाल्हेरला गेलेले गोपाळाचार्य घळसासी, वेदान्तावरील भाष्यकार वामनराव फणसळकर, नारायण दीक्षित ऊर्फ पूर्णानंद, निरंजनस्वामी कऱ्हाडकर, यज्ञेश्वर नारायण ढवळीकर, गोपाळाचार्य कालगावकर, रामचंद्र दैवज्ञ, आत्मारामबुवा चरेगावकर, कार्वे येथील शाहीर शेख सुलतान, पठ्ठे बापूराव, दादासाहेब आळतेकर, आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या संशोधक डॉ. अनंतराव आळतेकर अशी मोठी यादी आहे. १८५४ मध्ये शिक्षणप्रेमी नागरिकांनी सुरू केलेली शाळा, नेटिव्ह लायब्ररी (१८५७), मुलींच्या शिक्षणाची सोय (१८६९), सोमवार पेठेतील वेदपाठशाळा (१९०८ पूर्वीपासून), बनूबाई हवालदारांनी सुरू केलेली पहिली बालवाडी (१९४८) आणि तत्पूर्वीच लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेलं ख्यातनाम टिळक हायस्कूल यांसह आरोग्य, अभियांत्रिकी आणि इतर शाखांमधील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून कऱ्हाड पुढे आलं.

इ. स. १८८४ पासून कऱ्हाडमध्ये शिळा प्रेसची सोय होती. त्यावर साप्ताहिकं छापली जात असत. साप्ताहिक विदूषक (१८८४), चाफळच्या जगन्नाथ सप्रे यांचं चित्रगुप्त (१८८७), प्रताप (१९२५) यांसह आ. ह. खतीब यांचं मुसलमान अशी कितीतरी नियतकालिकं इथून प्रकाशित होत. स्वतः यशवंतराव चव्हाणांनी बातमीदार म्हणून तसंच संपादक मंडळ सदस्य म्हणून लेखन केल्याच्या नोंदी आहेत. उद्धव विष्णू रुईकर यांनी १४ व्या वर्षी ‘ गणित भास्कर ’ पदवी मिळवून सुरू केलेलं रुईकर पंचांग, रामचंद्र गिजरे यांची लोकमान्य रोजनिशी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या वडिलांनी सेवानिवृत्तीनंतर सुरू केलेला फोटो स्टुडिओ, तसंच ऐन आणीबाणीत दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाडमध्ये झालेलं ५१ वं अ. भा. मराठी साहित्य संमेलन या कऱ्हाडच्या खास नोंदी म्हणता येतील. खरं तर कऱ्हाडचा इतिहास आणि योगदान हा स्वतंत्र अभ्यास आणि संशोधनाचा विषय आहे.

(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षण-क्षेत्रातल्या घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :karadsaptarangHistory