धरणामुळं वसलेलं गाव

विजेचं एक बटन दाबल्याक्षणी सारा परिसर उजळतो, वातानुकूलन यंत्रामुळे खोली थंड होते, रोषणाईमुळे उत्सवात शान येते; पण हीच वीज आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते, याचा विचार करू लागलो.
Koyananagar
KoyananagarSakal
Summary

विजेचं एक बटन दाबल्याक्षणी सारा परिसर उजळतो, वातानुकूलन यंत्रामुळे खोली थंड होते, रोषणाईमुळे उत्सवात शान येते; पण हीच वीज आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते, याचा विचार करू लागलो.

विजेचं एक बटन दाबल्याक्षणी सारा परिसर उजळतो, वातानुकूलन यंत्रामुळे खोली थंड होते, रोषणाईमुळे उत्सवात शान येते; पण हीच वीज आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते, याचा विचार करू लागलो, तर हा दिव्य प्रवास किती रोमांचकारी आणि त्याचवेळी हजारो श्रमिकांमुळे कसा शक्य झाला, तेही समजू लागेल.

प्रश्न विजेचा निघाला की, आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं विशाल कोयना धरणाचं दृश्य आणि कोयनेकाठी वसलेलं ‘कोयनानगर’! जुनी झालेली, धरण आणि रिसॉर्टकडे घेऊन जाणारी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेली सुमारे ६०-६५ वर्षं योगदान देणारी एक टुमदार वसाहत. प्रचंड धोक्याच्या वातावरणात, कधी पुरेसा प्राणवायू नसताना, हजारो श्रमिक स्त्री-पुरुषांनी, बुद्धिमान आणि कष्टाळू अभियंत्यांनी, तसंच महाराष्ट्राचं नंदनवन फुलावं या भावनेतून या प्रकल्पासाठी आपला भरलेला संसार उलगडून सुपीक - पिकाऊ जमिनींचा, घरादाराचा, गावाचा, आपल्या परिसराचा त्याग करणाऱ्या सर्वांनी उभारलेलं विकासशिल्प म्हणजे हे कोयना धरण आणि त्या धरणामुळे हे अस्तित्वात आलेलं कोयनानगर!

स्वातंत्र्यपूर्वकाळात १९०८-०९ च्या दरम्यान मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्याचे एक अधिकारी एच. एफ. बील यांनी ‘कोयने’सह ३२ योजनांचा अहवाल सरकारला सादर केला; पण काही घडलं नाही. त्यानंतर सह्याद्रीच्या उंचीचा उपयोग करून जलविद्युतनिर्मिती करण्याच्या कोयनेसह अन्य काही योजना जगप्रसिद्ध उद्योजक टाटांनीही सरकारकडे मांडल्या. मात्र, १९३० ची जागतिक महामंदी आणि दोन्ही महायुद्धं यामुळे सर्व योजना बाजूला पडल्या.

स्वातंत्र्योत्तर काळात मात्र महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी कोयना योजनेची मागणी उचलून धरली. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेऊन पाठपुरावा सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून ऐन जंगलात हेळवाक इथं कोयनाकाठीच सर्वपक्षीय परिषद १९५२ मध्ये १६ मार्चला घेण्यात आली. पंडित नेहरूंचे सहकारी आणि केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ, आचार्य प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कर्मवीर भाऊराव पाटील, ज्येष्ठ संपादक शंकरराव किर्लोस्कर, पां. वा. गाडगीळ, अप्पासाहेब खाडिलकर, ‘मराठा चेंबर्स’च्या माध्यमातून या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे आ. रा. भट, शंतनुराव आणि यमुताई किर्लोस्कर यांच्यासह सुमारे ६०० ते ७०० जण या परिषदेस उपस्थित होते.

स्थानिक लोक या प्रकल्पास विरोध करणार नाहीत हे स्पष्ट करून, महाराष्ट्रातील माणसं केवळ एक वेळ जेवून हे धरण बांधण्यासाठी या खोऱ्यात येतील, असं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले. या परिषदेनंतर या प्रकल्पाची गरज सर्वांच्या लक्षात यावी म्हणून कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर ‘दख्खनची दौलत’ हे एक प्रदर्शन भरवण्यात आलं. लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळणकर यांच्यासह अनेक मान्यवर त्यासाठी आले. प्रकल्पाची गरज आणि विस्थापितांच्या प्रश्नासाठी पुन्हा एक परिषद झाली, तिला वसंतदादा, बाळासाहेब देसाई, लालासाहेब पाटणकर, कर्मवीर यांच्यासह गाडगे महाराजही उपस्थित होते. पुढं यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे यांच्या समन्वयाने काकासाहेब गाडगीळांनी दिल्लीत या प्रकल्पाला गती दिली. महाराष्ट्राचं शिष्टमंडळ येऊन ते नेहरूंना भेटलं.. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष के. टी. कृष्णम्माचारी, अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचाही पाठिंबा मिळाला.

अखेर १९५४ मध्ये मोरारजी देसाईंच्या हस्ते भूमिपूजन, तर ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. त्या वेळी ३२ कोटी २२ लाख रुपयांचा हा प्रकल्प होता. यशवंतराव चव्हाण - बाळासाहेब देसाईंनी अनेक बैठका घेऊन प्रकल्पग्रस्तांची समजूत काढली. स्वतः यशवंतरावांनी त्याकाळात १९ वेळा ‘कोयने’ला भेटी देऊन कामाला गती मिळवून दिली. महाबळेश्वरजवळ उंच पर्वताच्या कुशीतून उगम पावणाऱ्या कोयना नदीचं मात्र वैशिष्ट्य असं की, ती सह्याद्रीच्या जवळजवळ समांतर अशी ६५ किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. चार हजार ते सहा हजार मिलिमीटर इतकं प्रचंड पर्जन्यमान आणि सदाहरित जंगलांमध्ये अरुंद खिंडीच्या जागी कोयनेला अडवून १०३ मीटर उंचीचा व २ हजार ७९७ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा निर्माण केलेला ‘शिवाजी सागर’ जलाशय पाहिला की असं वाटू लागतं, ‘कोयनेने जणू सह्याद्रीशी खेळच मांडलाय!’

अधूनमधून चकवा देत, हुतुतू खेळत जेव्हा ही कोयना शिवाजी सागर जलाशयातून खाली परशुराम भूमीकडे कोकणात अरबी समुद्राला मिठी मारण्यासाठी झेपावते... त्यातील रोमांच तर अनुभवण्याजोगा आहेच; पण त्याहीपेक्षा झेपावणाऱ्या कोयनेला आता चार टप्प्यांमध्ये संयमित करून ठेवण्यासाठी अभियंत्यांनी केलेली जादू अधिक रोमांचकारी वाटते.

कोयना धरण हे रबल काँक्रीटचं भारतातील एकमेव धरण आहे. जर्मनीत अशी धरणं यशस्वीपणे उभारण्यात आली आहेत. धरण, धरणाचा भव्य जलाशय, नितांतसुंदर निसर्ग, रंगीबेरंगी फुलं आणि अवजड यंत्रसामग्रीची रात्रंदिवस ये-जा सुरू असतानाही जाणवणारी गूढरम्य शांतता असं जरी तिथं पोचल्यावरचं चित्र असलं, तरी जादू ही आहे की, धरण वगळता वीजनिर्मितीची सारी यंत्रणा मात्र जमिनीखाली आहे. धरणाचं पाणी विद्युतगृहापर्यंत नेणारे बोगदे, विद्युतनिर्मिती केंद्र साऱ्याची भव्यता, तांत्रिक करामती आणि कोट्यवधी मनुष्यतासांचं योगदान, अनेक श्रमिकांनी दिलेली प्राणांची आहुती हे सारं पाहिलं की, आपल्याला कायम प्रकाशात राहण्यासाठी कुणाकुणाला कशी आणि किती किंमत मोजावी लागली आहे, याची थोडीशी कल्पना येऊ शकेल.

देशमुखवाडीला कोयना नदीवर धरण बांधायचं ठरलं आणि मग गर्द-घनदाट अरण्यात माणसांची, तंत्रज्ञांची, वाहनांची, अवजड यंत्रांची, श्रमिकांची रात्रंदिवस लगबग सुरू झाली. जळकेवाडी, देशमुखवाडी, कोळकेवाडी अशा छोट्या छोट्या टुमदार वाड्यांच्या जागी आता सर्व सुविधायुक्त अशी कोयनानगर ही छोटीशी नवी वसाहत तयार होऊ लागली. एस. टी. बसस्थानक, बाजार, शाळा, रुग्णालय, घरं अशा सोयी झाल्या. अधिकारी आणि कामगारांनी मनोरंजनासाठी खेळांचे क्लब सुरू केले. त्यातूनच बॅडमिंटनची सातारा जिल्ह्याची चॅम्पियनशिप कोयनेला मिळाली आणि त्यातल्याच एका अभियंत्याच्या घरातून प्रकाश पदुकोण हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॅडमिंटन चॅम्पियन उदयाला आला. इथल्या एका छोट्याशा वाचनालयात जगातली तंत्रज्ञानविषयक अद्ययावत मासिकं आणि जर्नल्स येत असत. त्याच दरम्यान एक प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि सैनिकी शाळाही इथं सुरू झाली.

१९६१ मध्ये १७ जूनला धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात पाणी भरण्यास सुरुवात झाली, तर १९६२ मध्ये १६ मे या दिवशी पहिलं ६० मेगावॉट क्षमतेचं विद्युत जनित्र सुरू झालं आणि त्या पाण्यातून पोफळीच्या केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही फार मोठी ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी आणि प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी कोयना प्रकल्पाचं फार मोठं योगदान आहेच; पण या राज्यातील कारखाने, उद्योगधंदे आणि मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या विभागांतल्या लोकांचं रोजचं जीवन प्रकाशमान राहातं ते केवळ कोयनेमुळेच. कोयना प्रकल्प आणि हे कोयनानगर म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या विकासाचा आधारवड आहे असं म्हटलं तर ते अधिक समर्पक ठरेल.

कोयनेच्या मुख्य जलाशयाला सुरुंग स्फोटाने मोठं भगदाड पाडून ते पाणी वेगळ्या मार्गाने दुसऱ्या विद्युतगृहात नेऊन वीजनिर्मिती करायची, हा या प्रकल्पाचा चौथा टप्पा. ‘लेकटॅपिंग’ या नावाने तो ओळखला जातो. आशिया खंडातील पहिलं लेकटॅपिंग कोयनेत १९९९ मध्ये १३ मार्चला करण्यात आलं. कोयना प्रकल्पाच्या उभारणीत अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं, तर १९६७ च्या भूकंपात उद्‌ध्वस्त झालेल्या कोयनानगरसह १८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्यानंतर पुन्हा कोयनानगर उभं राहिलं. कोकणात, धरणाकडे किंवा रिसॉर्टकडे जाताना एक विश्रांतीचा थांबा म्हणजे हे कोयनानगर.

‘कोयना हे स्वतंत्र भारतातील एक आधुनिक तीर्थक्षेत्रच आहे’ अशा शब्दांत पंतप्रधान पंडित नेहरूंनी गौरवोद्‌गार काढले. प्रख्यात अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी संस्कृतमधून ‘कोयने’वरती श्लोक लिहिला, तर कवी यशवंतांनी ‘कोयनेचे आमंत्रण’ ही सुप्रसिद्ध कविता लिहिली. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांसह इंदिरा गांधी, राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन, पूज्य श्रीधरस्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी इथं भेटी दिल्या. १९१८-१९ च्या दरम्यान कोयना प्रकल्पाला विरोध केला म्हणून ब्रिटिशांनी ग. ह. खरे यांच्यासह अनेकांना तुरुंगात डांबलं. तिथूनच खरे यांचं आयुष्य बदललं. खडी फोडण्याची सक्तमजुरीची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेले खरे पुढे पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात दाखल झाले आणि प्रख्यात इतिहास संशोधक बनले. कोयना धरण, कोयना भूकंप आणि कोयनेचं अभयारण्य यामुळे विस्थापितांनी तीन-तीनदा सोसलेल्या आघातांसह ‘कोयना’ हे केवळ धरण न राहता ते एक अभियंत्यांचं विद्यापीठ बनलं, कोयना ही एक वेगळीच निसर्गसंपन्न संस्कृती तयार झाली - कोयनानगर हे तिचं गावाच्या स्वरूपात दिसणारं ठळक अस्तित्व!

(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com