‘स्वामी’कारांची ‘प्रभू-छाया’!

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘स्वामी’मुळे रणजितदादांना दिगंत कीर्ती मिळाली. साहित्य अकादमी, पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळाले.
‘स्वामी’कारांची ‘प्रभू-छाया’!
Summary

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘स्वामी’मुळे रणजितदादांना दिगंत कीर्ती मिळाली. साहित्य अकादमी, पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळाले.

.... AND THE PLAINS OF PANIPAT

WERE NOT MORE FATAL TO THE

MARATHA EMPIRE THAN THE EARLY

END OF THIS EXCELLENT PRINCE - GRANT DUFF

(या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानिपताचा आघात काहीच नव्हे.)

ज्या ऐतिहासिक मोलाच्या साहित्यकृतीमुळे कोवाडसारख्या एका दूरच्या टोकावरील खेडेगावातील इनामदार-सरकार घराण्यातील एक तरुण प्रतिभावंत लेखक ‘स्वामी’कार रणजित देसाई म्हणून मराठी साहित्यात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवतो, त्या कादंबरीच्या सुरुवातीचं हे वचन!

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘स्वामी’मुळे रणजितदादांना दिगंत कीर्ती मिळाली. साहित्य अकादमी, पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळाले. प्रचंड मोठा वाचकवर्ग मिळाला. ‘स्वामी’च्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ‘ऋण’ व्यक्त करताना रणजितदादा लिहितात, ‘ही माझी पहिली ऐतिहासिक कादंबरी. थोरल्या माधवरावांच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी आज प्रकाशित होत असली, तरी या विषयावर कादंबरी लिहिण्याचा मनोदय माझ्या आधी ती. वि. स. खांडेकरांनी जाहीर केला. आगामी प्रकाशनांत ‘अजिंक्य’ या नावाने त्यांची जी कादंबरी जाहीर झालेली आहे, ती माधवरावांच्याच आयुष्यावर आधारलेली आहे. तेव्हा मी प्रथम ती. भाऊसाहेब खांडेकरांकडे गेलो. कादंबरीसाठी त्यांनी मला आनंदाने संमती दिली. एवढंच नव्हे, तर कादंबरीच्या अभ्यासासाठी अनेक पुस्तकं सुचविली. कादंबरी मांडण्याच्या दृष्टीने आपले मोलाचे विचार सांगितले. माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या मनाची माणसं मी फार थोडी पाहिली. ती. भाऊसाहेब खांडेकरांनी मला संमती दिली नसती, तर मी ही कादंबरी लिहावयास घेतली नसती.’

मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठाचा सन्मान मिळवून देणारे भाऊसाहेब तथा वि. स. खांडेकर आणि रणजितदादा यांचं नातंच या मनोगतावरून दिसून येतं. कोल्हापूर, चंदगडचा, कोवाडचा परिसर म्हणजे दादांच्या जडणघडणीचा परिसर.

बेळगावहून अगदी अर्ध्या तासावर वसलेलं कोवाड हे गाव आणि हा सारा चंदगड तालुकाच इतका निसर्गसमृद्ध आहे की, इथलं एकेक गाव, किल्ला, शेतमळे, नदीकाठ म्हणजे एकेक पर्यटनस्थळच जणू. दादांचं जन्मगाव कोवाड ऐन ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेलं.

आजूबाजूला हिरवेगार ऊसमळे आणि गर्द आमराया. काजूचा घमघमाट आणि अनेकविध पक्ष्यांची टिपेनं साद घालणारी गगनबोली! इथं काही चित्रपटांचं चित्रीकरणही झालंय; परंतु मराठी साहित्यसृष्टीत कोवाड म्हणजे रणजितदादा हीच ओळख झाली आहे.

रणजित देसाई म्हणजे कोवाडचे ‘सरकार’, वाचकांचे ‘स्वामी’ अन्‌ परिचयातल्या आप्तांचे ‘दादा’! माणूस, प्राणी, निसर्ग आणि पुस्तकांमध्ये आपलं ‘सरकार’पण हरवणारे दादा सर्वात आधी कसबी शेतकरी अन्‌ मगच लेखक, गायक वगैरे. ‘प्रभुछाया’ हा त्यांचा ऐन गावातला वाडा म्हणजे अनेकांची आधारवास्तू! एखादा सन्मान, पुरस्कार मिळाला की, दादा कोवाडातल्या वाड्यात पोचल्यावर थेट अभ्यासिकेत संत ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर श्रद्धेनं उभं राहून काही म्हणायचे.

‘प्रभुछाया’मधील दादांची अभ्यासिका म्हणजे स्वच्छ, देखणी, खानदानी, पेशवाई थाटातली बैठक. कलाकुसरीमुळे नजर खिळवायला लावणारे अस्सल शिसवी लाकडी कॉर्नर; संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दकोश आणि ग्रंथांनी भरगच्च अशी जुन्या थाटाची काचेची कपाटं, अनेक ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ, जुन्या पोथ्या, जंगल, निसर्ग, चित्रकला आदी विषयांवरची समृद्ध ग्रंथसंपदा पाहून आपण हरवूनच जातो. याशिवाय शिवराईपासून विविध दुर्मीळ नाणी, अनेक प्रकारचे अडकित्ते, दांडपट्टा, ढाली आणि जुन्या तलवारी, चिलखताचा तुकडा, तोफगोळा, जुनी मोठी कुलुपं असा

संग्रह, ‘बारी’ ते ‘शेकरा’पर्यंतच्या त्यांच्या ग्रंथांची हस्तलिखितं, राजा रविवर्मा यांच्या शिळा प्रेसमध्ये १९०७ ला छापलेलं दुर्मीळ पुस्तक, शहामृगाच्या अंड्यापासून खास बनवून घेतलेली सतार असं सगळं वस्तुसंग्रहालय रणजितदादांकडं असल्याचं समजल्याने पुण्यातील ख्यातनाम केळकर वस्तुसंग्रहालयाचे संस्थापक राजा केळकर मुद्दाम कोवाडला आले होते.

याशिवाय निसर्ग, प्राणी-पक्ष्यांचं जबरदस्त प्रेम रणजितदादांना होतं. कोवाडच्या ‘प्रभुछाया’मधील अकरा कुत्री, मांजरं, माकड, मोर, लांडोर, ससे, कबुतरं, भेकर, कोंबड्या अशा कितीतरी प्राण्यांना दादांचा विलक्षण लळा होता.

कोवाडच्या वाड्यातील हे सारं अदबशीर, खानदानी वातावरण! ते सहा महिन्यांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपलं. मग आजीनं त्यांना अक्षरशः फुलासारखं वाढवलं. आठव्या वर्षी चिखलीकर बुवांकडं गाणं शिकायला जाणाऱ्या आपल्या लाडक्या नातवासाठी आजीने खास सतार शिक्षक नेमले. कोल्हापूरला इंटरपर्यंतचं शिक्षण पूर्ण करतानाच गाणं, सतारीबरोबरच त्यांना वाचनाचीही गोडी लागली. रणजितदादांनी अवघ्या सोळाव्या वर्षी बैलांच्या शर्यतींवर आधारित लिहिलेली ‘भैरव’ ही कथा ७८ वर्षांपूर्वी पुण्याच्या ‘प्रसाद’ मासिकाच्या कथास्पर्धेत पहिली आली आणि त्याकाळात त्यासाठी दादांना दीड हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला होता. दादांपेक्षा सहाच वर्षांनी मोठ्या असलेल्या इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांनीही त्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ‘रणजित यांची कथा वाचून आपण अक्षरशः भारावून गेलो होतो’ असं स्वतः बाबासाहेबांनीच मला अनेकदा सांगितलं होतं. पण, त्या तरुण वयात नातवाचं एका बाजूला गाणं, सतारवादन आणि वाचन-लेखनाची वाढती आवड पाहून आजी गोंधळून गेली. त्यांनी दादांना जवळ बसवून विचारलं, ‘बाळ तुम्हाला आयुष्यामध्ये काय व्हायचंय?’ रणजितदादा लगेच उत्स्फूर्तपणे म्हणाले,

‘लेखक व्हायचंय!’

त्या क्षणी आजीने सांगितलं की, गाणं-वाद्य वगैरे छंद बाजूला ठेवून प्रचंड वाचन करा, डोळसपणे आपला देश फिरून या. इतकंच नव्हे, तर त्या आजीने आपल्या नातवासाठी सोन्याच्या बांगड्या विकून निसर्गाचा अभ्यास व्हावा म्हणून त्यांना काश्मीरला पाठवलं. निसर्ग, संगीत यावर लेखन करावं आणि साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवावा ही आपल्या आजीची इच्छा दादांनी शंभर टक्के पूर्ण केली. स्वामी, राधेय, श्रीमान योगी, पावनखिंड, राजा रविवर्मा, माझा गाव, बारी, समिधा, लक्ष्यवेध अशा त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती. ६४ वर्षांच्या आयुष्यात १२ कादंबऱ्‍या, १७ कथासंग्रह, १४ नाटकं आणि ४ चित्रपट अशी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या रणजित देसाई यांनी मराठी साहित्यसृष्टीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

दादांचा कोवाडचा वाडा म्हणजे विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांचं माहेरघरच! कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी ‘पॅरिस रीडस्‌’ची स्वरपेटी अक्कासाहेब महाराजांना भेट दिली होती आणि त्यांनी ती रणजितदादांना दिली. पु. ल. देशपांडे त्या हार्मोनियमला ‘बादशहा सलामत’ असं म्हणत. कोवाडला पु.ल. जेव्हा जेव्हा सुनीताबाईंसह येत, तेव्हा तेव्हा या हार्मोनियमवरून त्यांची जादूभरी बोटं फिरतानाच्या आठवणी अनेकांनी जपून ठेवल्यात. पारूअक्का आणि मधुमती या दादांच्या दोघी मुलींनी हे साक्षात अनुभवलंय. सुधीर फडके, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, लता मंगेशकर, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर, सी. रामचंद्र, शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्यासह मंगेश पाडगावकर, वसंत बापट, श्री. पु. भागवत, वसंतराव कानेटकर, बा. भ. बोरकर, शरच्चंद्र चिरमुले, पी. सावळाराम, विजया मेहता, राजदत्त, ना. स. इनामदार, इंदिरा संत, आनंद यादव, कुसुमाग्रज, चंद्रकांत मांडरे असे दिग्गज साहित्यिक कलावंत ‘प्रभुछाया’मधील मैफिलीत रमून आणि रंगून गेलेले कोवाडच्या गावकऱ्यांनी पाहिले आहेत.

याशिवाय माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, नरहर कुरुंदकर, निळू फुले यांनीही दादांच्या आग्रहाखातर कोवाडला भेट दिली आहे. विशेषतः यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांचे आणि रणजितदादांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘श्रीमान योगी’च्या प्रकाशनानंतर मुंबईत या दोघांनी सोन्याचं कडं हातात घालून दादांचा सत्कार केला होता. कोवाडच्या परिसरातील कुणालाही दादांच्या वाड्याचा आधार होता. गावातल्या रस्ते, वीज, पाण्याच्या समस्या असोत, की कुणाच्या नोकरी-व्यवसायाचा प्रश्न, कुणाचं शिक्षण असो की कुणाचं आजारपण; दादा आपल्याला नक्की मदत करणार या भावनेनं ‘प्रभुछाये’त येणारी मंडळी कधी निराश होऊन परत जात नसत. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर थेट कोवाडला प्रयाण केलं. रात्रभर गप्पांची मैफल जमली; पण गॅसबत्ती लावूनच. रणजित यांच्या गावात अजून वीज नाही हे समजल्यावर आश्चर्य व्यक्त करून मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बाळासाहेबांनी राजारामबापू पाटील यांना फोन केला, पुढच्या अवघ्या दोन महिन्यांत गाव विजेच्या प्रकाशाने उजळून निघालं.

दादांनी आपल्या ‘बारी’ या शेतातही विश्रांतीसाठी एक घर बांधलं. अनेक प्रकारची वृक्षराजी फुलवली. गणपती आणि विठ्ठल-रखुमाईचं मंदिरही उभारलं. १९८० मध्ये ‘भालू’ या चित्रपटाचं चित्रीकरण दादांच्या वाड्यात आणि शेतावर झालं. त्यानिमित्ताने राजदत्त, नाना पाटेकर, विक्रम गोखले, शाहू मोडक, रंजना, अशोक सराफ, उमा भेंडे, मोहन वाघ अशी नामवंत कलाकार मंडळी इथं मुक्कामाला होती. कोवाडच्या ग्रामस्थांनी दादांच्या निमित्ताने देशभरातील अशा नामवंतांचा सहवास अनुभवला.

दादांच्या दोन्ही कन्या, लेखनिक पांडुरंग कुंभार, पुत्रवत ज्यांच्यावर प्रेम केलं ते डॉ. रमाकांत जोशी, प्रकाशक अनिल मेहता, ‘प्रभुछाया’तील भोजनप्रमुख पुंडलिक महागावकर, अप्पाजी आणि नारायण वांद्रे, संता कांबळे, गंगूमावशी या आणि कोवाड परिसरातील अनेक जणांनी रणजितदादांच्या या साऱ्या आठवणी निगुतीनं जपून ठेवल्या आहेत. कोवाडच्या या वाड्यात सध्या दादांच्या नावे सार्वजनिक वाचनालय सुरू आहे. रणजित देसाई यांनी कोवाड-चंदगडच्या मातीत आपल्या प्रतिभेने मराठी भाषा-साहित्य समृद्धीसाठी कलासक्त बियाणं रुजत घातलं. उगवल्यावर त्याची वडिलकीनं निगाही राखली. ‘प्रभुछाये’बरोबरच दादांची ही अक्षरसावलीदेखील मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना सदैव साथ करत राहील. कोवाड ही या साऱ्याची अस्तित्वखूण आहे!

(सदराचे लेखक पत्रकार आणि शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com