दिग्गजांचं ‘माशेल ’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raghunath Mashelkar Home
दिग्गजांचं ‘माशेल ’

दिग्गजांचं ‘माशेल ’

‘कसल्या तरी नादाने झपाटलं जाणं हे गोव्यातल्या भूमिपुत्रांचं एक वैशिष्ट्य आहे. गोव्यातल्या देवळातल्या जत्रांमध्ये ‘अवसर’ येतात. घुमटं दणदणू लागली, जगाटींचा आणि झांजांचा घणघणाट सुरू झाला, की काही माणसांच्या अंगात येतं. मग ती नाचू लागतात, घुमू लागतात. काही वेळाने तो भार उतरतो; पण आपले संस्कार ठेवून जातो. अवसराच्या जोडीला सगळीच माणसं कमी-अधिक प्रमाणात भारावलेली असतात, त्यांचा भार संपूर्णपणे उतरत नाही. जगण्याचं क्षेत्र कुठलंही का असेना, अंगात आल्यासारखं एखाद्या गोष्टीच मागे लागण्याचा गुण गोव्यात मला तरी अधिक आढळला. म्हणूनच जगावेगळं वेड घेतलेली माणसं गोव्याने अधिक दिली. खाप्रूमामा पर्वतकरांसारखा लयीच्या वेडाने भारावलेला माणूस, संगीताच्या अद्‍भुत आराधनेत वेडावलेले दीनानाथ मंगेशकर, इतिहास संशोधनात स्वतःला हरवून घेणारे पिसुर्लेकर, रंगरेषांत आयुष्य झोकून दिलेले दीनानाथ दलाल - एवढासा प्रदेश; पण कसल्यातरी अलौकिकाचा अवसर अंगात आल्यासारखं जगलेले कितीतरी कलावंत आणि ज्ञानवंत इथं निपजले, कसला तरी हट्ट घेतल्याशिवाय जगताच न येणारे!’’

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या संदर्भात पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या लेखात (संदर्भ - भावबंध पुस्तक) गोवेकरांचं हे खास वैशिष्ट्य सांगितलं आहे.

एवढ्याशा लहान गोमंतकाने विविध क्षेत्रांत जी दिग्गज मंडळी दिली, त्याबद्दल आपण कृतज्ञच असायला हवं. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञद्वय डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अनिल काकोडकर हे दोघेही मूळ गोमंतकीयच.

महाराष्ट्रात विशेषतः कोकण किनारपट्टीच्या प्रांतात अनेक ठिकाणी गावांच्या नावाने आडनावं पाहायला मिळतात. डॉ. माशेलकरांचं मूळ गाव माशेल हे असंच गोमंतकाच्या नकाशावरचं एक प्रमुख गाव, उत्तर गोवा जिल्ह्यातल्या फोंडा तालुक्यात असलेलं. अनेक दिग्गजांचं हे मूळ गाव. कला, साहित्य, समीक्षा, अध्यात्म, संगीत, नाट्य या क्षेत्रांमधील या छोट्याशा माशेल गावाची परंपरा विलक्षणच आहे.

संस्कृत आणि मराठीवर प्रभुत्व असलेले पं. महेश्‍वरभट्ट सुखटणकर (१७१८ ते १८९६) यांचा जन्म इथलाच. दोन्ही भाषांमध्ये त्यांनी ग्रंथनिर्मिती केली. १७५० मध्ये ‘अमरविवेक’ ही टीका त्यांनी लिहिली. जयदेव कवींच्या ‘गीत गोविंद’वर तसंच मोरोपंतांच्या ‘मंत्रभागवत’वरही त्यांनी टीका लिहिली. त्यांनी ‘सिद्धांत कौमुदी’चा पद्यमय मराठीत अनुवाद केला. त्यांचे पुत्र शिवरामशास्त्री यांनी ‘विवेक चुडामणी’ आणि ‘संध्यामंत्रार्थदीप’ हा ग्रंथ, तर नातू रघुनाथशास्त्री यांनी ‘शांतादुर्गा स्तोत्र’ लिहिलं. ‘नामचिंतामणी’ या ग्रंथाचे लेखक रामचंद्रपंत कामत, आपल्या कीर्तनांची ५० वर्षांची कारकीर्द पूर्ण करणाऱ्या‍ कीर्तनसम्राज्ञी राधाबाई कामत, दुर्गादत्त मंदिरात अखंड साधना करणारे दिगंबरदास याच भूमीतले. प्रख्यात संपादक, स्वातंत्र्यसैनिक बा. द. सातोस्कर, गोमंतकातील ज्येष्ठ तबलावादक पं. तुळशीराम नावेलकर हेही माशेलचेच.

गोमंतकीय नाट्यपरंपरा जपणाऱ्या कलाकारांत रामकृष्ण माशेलकर, गोविंद माशेलकर, हरी माशेलकर यांची प्रमुख नावं असून ‘मत्स्यगंधा’, ‘विद्याहरण’ ही त्यांची गाजलेली नाटकं. तसंच, नागेशकर संगीत मंडळीतील कलाकारांचे कोल्हापूर संस्थानात झालेले नाट्यप्रयोग पाहून राजर्षी शाहू महाराज आणि कागलच्या बापूसाहेब घाटगे महाराजांनी त्यांचं कौतुक केल्याच्या नोंदी आहेत.

खुद्द भारतरत्न लतादीदींनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांना एक आठवण सांगितली होती. त्यानुसार बाबा माशेलकर म्हणून ओळखले जाणारे डॉ. माशेलकरांचे पूर्वज, त्यांना संगीताची खूप आवड होती, ते गाणंही शिकवायचे. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांच्याकडे गाणं शिकायला जात. अगदी डोंगर पार करून दूर अंतरावरून जात असत. पोर्तुगिजांच्या तावडीतून आपले देव, देवस्थानं वाचावीत म्हणून सुरक्षित ठिकाण असल्याने या परिसरातील अनेक देवांच्या मूर्ती माशेलमध्ये हलवण्यात आल्या. त्यामुळे त्या देवालयांशी संबंधित मंडळी, कलाकार हेही तिथं गेले. इथलं देवकी-कृष्णाचं मंदिर खूप नावाजलेलं आहे. काळ्या पाषाणातील अशी सुंदर देवकी-कृष्णाची मूर्ती अन्यत्र कुठंही पहायला मिळत नाही.

देवकी-कृष्ण मंदिराचा भव्य परिसर, रवळनाथाचं देऊळ आणि वर्षानुवर्षं मायेची सावली देणारे पिंपळ, त्यांच्या सभोवतालचे मोठाले दगडी कट्टे, हा साराच परिसर पाहण्याजोगा आहे. मंदिरांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या‍ याच माशेलमध्ये या देवकी-कृष्णाच्या मंदिराच्या बाजूच्या एका लहानशा गल्लीत मध्यभागी एक छोटंसं कौलारू घर अजूनही उभं आहे, हेच डॉ. माशेलकरांचं घर. आजही ते सुस्थितीत पाहायला मिळतं. ग्रामस्थ अत्यंत अभिमानाने आलेल्या पाहुण्यांना हे घर दाखवतात.

ख्यातनाम वक्ते आणि माजी कुलगुरू शिवाजीराव भोसले यांच्याहस्ते २००३ मध्ये १२ एप्रिलला माशेलच्या ग्रामस्थांनी डॉ. माशेलकरांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा जाहीर सत्कार आपल्या गावी केला. याबाबत प्राचार्य भोसले यांनी लिहिलेल्या तपशिलानुसार, ‘‘माशेलकरांच्या मोठेपणामुळे गावकऱ्यांना गगन ठेंगणं वाटू लागलं. आपण या भूमिपुत्राचा सन्मान करावा, असं त्यांना वाटलं. गोमंतकाचे मुख्यमंत्री प्रजेच्या पाठीशी उभे राहिले. साक्षात सभापती सत्कारसभेचे सूत्रधार झाले. गरीब-श्रीमंत एक झाले. माशेल गाव उजळून निघालं. डॉ. माशेलकर यांचा जन्म माशेल या गावी १९४३मध्ये १ जानेवारीला झाला. वडिलांच्या निधनामुळे संसाराचा सगळा भार आईला पेलावा लागला. तिने माशेल सोडलं व मुंबईची वाट धरली. काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ केला. मुलाला त्यांनी आग्रहपूर्वक विद्याव्रती केलं. आई गरीब होती, फारशी शिकली नव्हती; पण मुलाने विद्यासंपन्न व्हावं, हा तिचा अट्टाहास होता. मातेची स्वप्नं साकार करणारा हा भगीरथ ज्ञानाची गंगा घेऊन पुढं जात राहिला.

माशेल या गावी देवकी-कृष्णाचं मंदिर आहे. या मंदिरासमोर विज्ञानयुगातील देवकी-कृष्णाचा सत्कार करावा, ही कल्पना लोकांना स्फुरली व ती साकार झाली. एक थोर शास्त्रज्ञ माशेलच्या पंचक्रोशीतील मुला-मुलींना दिसला, भेटला. त्याने मुला-मुलींशी मनोभावे चर्चा केली. निदान एखाद्या मुलाला पुढील शिक्षणासाठी आपल्याकडून मदत मिळावी म्हणून त्यांनी एक शिष्यवृत्ती देऊ केली, त्यासाठी पन्नास हजारांची ठेव गावकऱ्यांच्या स्वाधीन केली. इंग्लंडमध्ये संशोधन व अध्यापन करणारा हा शास्त्रज्ञ भारताच्या पंतप्रधानांचं आवाहन विचारात घेऊन फक्त अडीच हजार रुपये वेतनावर काम करण्याच्या निश्‍चयाने आपल्या उदारमनस्क पत्नीच्या अनुमतीने भारतात परत आला. देशासाठी आनंदाने गरिबी पत्करणारा व आपल्या संशोधनाने देश श्रीमंत करणारा हा मूळचा ‘माशेलकर’ माशेल गावाने भरल्या डोळ्यांनी पाहिला. माशेलकरांशी मनमोकळी चर्चा करणारी मुलं भान हरपून बोलत होती. बाळगोपाळांच्या डोळ्यांत माशेलकर होण्याची स्वप्नं तरळत होती.’’

अजूनही गोव्यात गेल्यावर हमखास वेळ काढून डॉ. माशेलकर आणि त्यांचे कुटुंबीय माशेलला जाऊन येतात. देवकी-कृष्णाचं दर्शन घेतात. परिचित ग्रामस्थ, तिथल्या शिक्षकांना भेटतात. डॉ. माशेलकरांचं चरित्र लिहिताना त्या परिसरातील काही

आठवणी, गोमंतकाने वेळोवेळी केलेले त्यांचे सत्कार आणि सुवर्णमहोत्सवी गोव्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार या साऱ्याविषयी ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं. डॉ. माशेलकरांचं आपल्या गावात केवळ सहा वर्षांचंच वास्तव्य होतं; पण अजूनही तो आठवणींचा कप्पा गावकऱ्यांनी मनाच्या गाभाऱ्‍यात जपून ठेवला असल्याचं जाणवतं.

(सदराचे लेखक पत्रकार आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raghunath Mashelkar
loading image
go to top