
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून वाहणाऱ्या कृष्णेच्या तीरावर वसलेल्या सैनिक टाकळीमध्ये गेलो होतो, त्या वेळी हे सगळं मनात एकदम दाटून आलं.
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानची एक घटना प्रसिद्ध कथाकार, लेखक व. पु. काळे यांनी सांगितली आहे. एका खंदकामध्ये दबा धरून बसलेल्या सैनिकाला अजिबात चाहूल लागू न देता शत्रुपक्षाचा सैनिक तिथं येऊन मागं उभा राहतो. तो बेसावध सैनिकाच्या पाठीत आपल्या संगिनीचं पातं खुपसण्यापूर्वी क्षणभरच त्याला वाटतं की, तो खंदकातील सैनिक काय करतोय ते पाहू या. तो पाहू लागतो, तर त्याला काळीज हेलावणारं दृश्य दिसतं. कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो हे गृहीत धरूनही त्या खंदकात लपलेला सैनिक आपल्या हातात आपल्या पत्नीचा आणि मुलीचा फोटो घेऊन ढसाढसा रडत असतो. ते पाहून ह्या दबा धरून बसलेल्या सैनिकाच्या पाठीत संगीन खुपसण्याच्या तयारीत असलेला शत्रुसैनिकही आपल्या खिशातून आपल्या पत्नीचा आणि मुलाचा फोटो काढतो, खाली खंदकात उडी घेतो आणि दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागतात, हा त्याचा आशय आहे.
कोणत्याही देशासाठी आणि तिथल्या सरकारसाठी युद्ध हा शेवटचा पर्याय असला तरी, तळहातावर आपलं शिर घेऊन, सीमेवर आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या आपल्या जवानांसाठी बऱ्याच वेळा युद्ध किंवा असा संघर्ष हे रोजचंच कर्तव्य होऊन बसतं. आपलेच हे बांधव मृत्यूसारख्या सर्वोच्च त्यागाला नेहमीच तयार असतात. म्हणून आपण कोट्यवधी भारतीय आपापल्या आयुष्यातील शक्य तितकं सुख, समाधान, आनंद प्राप्त करू शकतो.
‘When You Go Home,
Tell Them of Us And Say,
For Their Tomorrow,
We Gave Our Today.’
जॉन मॅक्सवेल एडमंड यांच्या कवितेच्या या चार ओळी मी ईशान्य भारतातील कोहिमा येथील स्मृतिस्तंभावर कोरलेल्या वाचल्या.
‘तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा त्यांना आमच्याबद्दल सांगा की, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिला आहे!’’ - असा त्याचा आशय आहे.
सर्वार्थाने अक्षर न् अक्षर सार्थ करणाऱ्या कवितेच्या या ओळी आपले सैनिक रोज जगत असतात. रोजच्या रोज त्यांचा संवाद सुरू असतो तो मृत्यूशीच. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून वाहणाऱ्या कृष्णेच्या तीरावर वसलेल्या सैनिक टाकळीमध्ये गेलो होतो, त्या वेळी हे सगळं मनात एकदम दाटून आलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील सुमारे हजारभर कुटुंबं नांदत असलेल्या या गावाने आपल्या देशाला सुमारे बाराशेपेक्षा अधिक जवान पुरवले आहेत. जवळपास प्रत्येक घरातली एक तरी व्यक्ती भारतीय लष्करात भरती होते, असा या गावाचा इतिहास असल्याने या गावाचंच नामकरण ‘सैनिक टाकळी’ असं झालं.
त्याचाही इतिहास प्रेरणादायी आहे. लष्करी सेवेत दाखल होण्याची या गावाची परंपरा शंभरपेक्षा अधिक वर्षांची. एकाच घरातल्या चारही पिढ्या लष्करी सेवेत. आपल्या कुटुंबातील कुणी शहीद झालं तर जिद्दीने त्याच कुटुंबातील दुसरा तरुण लष्करात भरती होतो. पोलिस दलातही या गावचे तरुण आहेत. तिन्ही सेनादलांमध्ये कार्यरत असलेल्या टाकळीतील जवानांची संख्या पाहिल्यास लक्षात येतं की, इथला जवान नाही असा भारतातला बहुधा एकही लष्करी तळ नसावा. पांढऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरची ‘टाकळा’ नावाची वनस्पती बाजूला काढून इथं वस्ती वसवण्यात आली, म्हणून या गावाला टाकळी नाव पडलं, असं सांगितलं जातं. कुस्तीच्या मैदानातदेखील इथले जवान आपली ताकद दाखवायचे, म्हणून या गावाला ‘पैलवान टाकळी’ असंही म्हटलं जात असे.
पण १९६८ मध्ये एका घटनेमुळे या गावचं वेगळंच, प्रेरणादायी असं पुन्हा नामकरण झालं. ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार त्यांनी पंचगंगा साखर कारखान्याच्या एका शेतीपाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनासाठी थेट लष्करप्रमुख कुमारमंगलम यांनाच बोलावलं होतं. टाकळीत आजी-माजी सैनिकांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. लष्करी गणवेशात रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या अनेक जवानांच्या या स्वागतामुळे ते भारावले. या गावाची माहिती आणि लष्करासाठीचा प्रेरणादायी इतिहास पाहून त्यांनी या गावालाच ‘सैनिक’ ही उपाधी दिली. तेव्हापासून हे गाव ‘सैनिक टाकळी’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
आजपर्यंत वेगवेगळ्या युद्धांमध्ये या गावातील अठरापेक्षा अधिक जवानांनी हौतात्म्य पत्करलं आहे, तर युद्धातील उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेकांना सन्मानित करण्यात आलं आहे. सैनिक टाकळी हे वीरमातांचं गाव आहे. एक मुलगा शहीद झाला तर दुसऱ्या मुलालाही लष्करात भरती करणाऱ्या इथल्या वीरमातांना कायमच नमन करायला हवं. पहिल्या (१९१४-१९१८) आणि दुसऱ्या महायुद्धात (१९३९-१९४५) ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे इथले जवान शहीद झाले. काहीजण जखमी, तर काही परागंदा. युद्ध संपलं तरी काही जवानांना ब्रिटिशांनी भारतात आणलंच नाही. इथल्या लोकांनी सांगितलं की, वाट पाहून अखेर आपला माणूस युद्धात कामी आला आहे असं समजून, घरच्यांनी त्यांचं उत्तरकार्यही केलं. काहीजणींना विधवा म्हणून जीवन जगावं लागलं, तर काहीजणींनी पतीचं प्रेत पाहिल्याशिवाय कपाळावरचं कुंकू पुसणार नाही असं धाडस दाखवलं. ज्यांचं उत्तरकार्य घातलं गेलं, त्यांतले काहीजण ५-६ वर्षांनी गावी परतले, मग त्यांच्या बायकांनी पुन्हा कपाळावरचा मळवट भरला असंही घडल्याचं मला मनोहर भोसले यांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितलं. अजून अंगावरची हळद निघाली नाही, तेवढ्यात मोहिमेवर गेलेले जवान शहीद झाल्याची बातमी त्या घरात कशी सोसली जात असेल? हा अक्षरशः काळीज चिरणारा प्रश्न आहे.
इ.स. १९११ मध्ये सुमारे दीड हजार लोकसंख्या असताना १९२० पर्यंत ६० जण, १९३१ ते ४० पर्यंत १५० जण, १९४१ ते ५० पर्यंत २५० जण अशा संख्येने इथले जवान लष्करात भरती होऊ लागले, ही परंपरा कायम आहे. आझाद हिंद सेनेत आणि अगदी अलीकडच्या कारगिल युद्धातही इथले जवान सहभागी झाले होते.
सैनिक टाकळीसारखी काही गावं आपल्याला राज्याच्या अन् देशाच्या अनेक भागांत दिसून येतील. ही आपली प्रेरणास्थळं आहेत. ही देशभक्त शहिदांची भूमी आहे. सैनिक टाकळीसारखी गावं ही आपण नव्या पिढीसमोर आणायला हवीत. ‘शौर्य’ या पुस्तकाच्या निमित्ताने तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमोर हे योगदान मला मांडता आलं, हे माझं खूप मोठं भाग्य असं मी समजतो. अशा धाडसी देशभक्तांच्या, शहीद जवानांच्या स्मृती जपत जपत पुन्हा देशसेवेसाठी आपल्या गावातून जवान तयार व्हावेत यासाठी योगदान देणाऱ्या सैनिक टाकळीसारख्या गावांची कहाणी आपल्या पाठ्यपुस्तकांमधून यायला हवी. त्यावर लघुपट, चित्रपट, मालिका निघायला हव्यात. निराशेची सर्वदूर पसरणारी जळमटं अशा त्यागाच्या प्रेरणादायी उदाहरणांमुळे दूर होतील, निदान कमी तरी होतील.
(सदराचे लेखक पत्रकार व शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.