हिंदवी स्वराज्याची पहिली विजयभूमी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirwal People

शिरवळ हे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या दक्षिण तीरावरील गाव. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचं गाव. आदिलशाही, निजामशाही, मराठा, ब्रिटिश आणि भोर संस्थानची राजवट या गावानं पाहिली.

हिंदवी स्वराज्याची पहिली विजयभूमी !

राजगडावर स्वराज्याच्या उभारणीचा संकल्प सुरू असतानाच विजापूरच्या बादशहाच्या आदेशानुसार मुस्तफाखान आणि बाजी घोरपड्यांनी शहाजीराजांना पकडलं या बातमीनं सुन्न झालेल्या राजगडावर दुसरी खबर आली की, मिनादशेख, शरीफशेख, मुसेखान, असरफ शाह, बाळाजी हैबतराव, बजाजीराजे नाईक-निंबाळकर यांना घेऊन विजापूरहून मोठ्या फौजेसह फत्तेखान स्वराज्यावर चालून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब आणि मुत्सद्दी मंडळी चिंताक्रांत झाली. ही निकराची वेळ लक्षात घेऊन फत्तेखानाशी लढण्याचा निर्णय घेतला. पुरंदरवरून आपण हे अधिक चांगल्या प्रकारे करू, हे लक्षात घेऊन महाराज गडावर गेले. राजांसाठी गडाचा दरवाजा उघडला. इकडे फत्तेखानाबरोबर आलेला बाळाजी हैबतराव शिरवळचं ठाणं घेऊन सुभानमंगळ किल्ल्यात घुसला. खानाला आणि बाळाजीला धडा शिकवायचा असेल तर सुभानमंगळ जिंकलाच पाहिजे, असं महाराजांनी मनोमन ठरवलं. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी अन्‌ भैरोजी चोर असे दोन्ही बंधू, कावजी मल्हार यांच्यावर सुभानमंगळ स्वराज्यात आणण्याची जबाबदारी सोपवली. कावजींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अत्यंत आवेशाने, बेधडकपणे किल्ल्यावर चाल केली. बाळाजीचं सैन्य भेदरलं. पराक्रमाची शर्थ करून मराठे किल्ल्यात घुसले. कावजींच्या भाल्याने बाळाजी हैबतरावचा जीव घेतला. शिवरायांच्या सैन्याला जबर विजय मिळाला. सुभानमंगळ किल्ला हिंदवी स्वराज्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ही पहिल्या लढाईची विजयी भूमी म्हणून सुभानमंगळ आणि शिरवळचं महत्त्व ऐतिहासिक आहे. (दि. ८ ऑगस्ट १६४८, संदर्भ : राजा शिवछत्रपती - लेखक - बाबासाहेब पुरंदरे)

शिरवळ हे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या दक्षिण तीरावरील गाव. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचं गाव. आदिलशाही, निजामशाही, मराठा, ब्रिटिश आणि भोर संस्थानची राजवट या गावानं पाहिली. भोर संस्थानच्या संग्रहात दोन संस्कृत लिपीतील ताम्रपट आहेत. इ.स. ७८० आणि इ.स. १०७९ मधील हे ताम्रपट, राष्ट्रकूट आणि चालुक्य वंशातील राजांनी दिले असून, त्यात शिरवळचा उल्लेख आढळतो. १४ व्या शतकातील भीषण दुष्काळानंतर इ.स. १४७० ते १५१५ या काळात नीरेच्या तीरावरील ‘चित्र बेट’ या टेकाडावर सुभानमंगळ कोट बांधण्यात आला. १६ एकर क्षेत्रावरच्या या कोटाची काही जागा पुढे वीर धरणाच्या पाणलोटाखाली गेली. इ.स. १७२० पर्यंत हा कोट अभंगपणे उभा होता. श्रीमाल, सिरिवलय आणि आता शिरवळ अशा नावानं ओळखलं जाणारं शिरवळ हे ऐतिहासिक गाव. अफझलखान वाईला राहून इथला कारभार पाहायचा. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीच्या अखेरीपर्यंत सुभानमंगळवर १७ अंमलदार होऊन गेले. त्यातल्या मिया महंमद रहीम आणि शहाजी महाराजांच्या पदरी असलेला जायण्णापंत लिंगरस यांचा उल्लेख बऱ्याच वेळा होतो.

नीरा, कानदी, वेळवंडी, गुंजवणी आणि शिवगंगा या पंचनद्यांच्या परिसरातील शिरवळ हा समृद्ध प्रदेश. त्याच्या उत्तरेस पुरंदर आणि कात्रज घाट, दक्षिणेस खंबाटकी घाट, तर पश्चिमेस वरंधा घाट. जवळच पांडवदऱ्याची लेणी, चौफाळ ही पुराणकालीन वास्तू आणि मांढरदेवी देवस्थान हीदेखील या परिसराची ओळख. निगडे देशमुख, देशपांडे, देशकुलकर्णी, वाळिंबे, जोशी, मांडके, मोने, काझी, नायकवडी अशा इथल्या ऐतिहासिक घराण्यांमधून शिरवळचा इतिहास ज्ञात होतो.

दहा-बारा हजारपेक्षा अधिक लोकवस्तीचं भोर संस्थानातलं भोरनंतर महत्त्वाचं गाव म्हणजे शिरवळ. संस्थानकाळी विचित्रगड तालुक्याचं मुख्य ठाणं आणि कचेऱ्या इथंच होत्या. संस्थानच्या धान्यखरेदी-विक्रीची व्यवस्था पाहणारे मध्वराज व्यंकटेश शिंगरे यांच्या पुढाकारानं १९४४ मध्ये शिरवळला भोर स्टेट बॅंकेची स्थापना झाली. इथल्या ऐतिहासिक घराण्यांची कागदपत्रं अभ्यासून वसंत अण्णाजी देवधर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आणि मोहनराव देशपांडे यांनी शिरवळवर तयार केलेल्या लघुपटातून ही माहिती आपल्याला मिळते.

केदारजी नाईकांसारखे कुलवंत देशमुख आणि त्याच घराण्यातल्या तुकाई, गुजाई, येसाई यांसारख्या कर्तबगार महिला, श्री नारायणस्वामींसारखे सत्पुरुष, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रांसह ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ यांसारख्या ग्रंथांचे लेखक वि. स. वाळिंबे, महाभारतावरचे १८ खंड लिहिणारे डॉ. रा. शं. वाळिंबे, त्यांचे बंधू डॉ. स. शं. वाळिंबे, ज्ञानेश्वरीवरील व्याख्याते प्रभाकर वाळिंबे, ज्येष्ठ विचारवंत स. ह. देशपांडे इथलेच. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या कन्येचा कमलाबाईंचा विवाह शिरवळच्या रावबहाद्दूर नारायण गणेश देशपांडे यांचे पुत्र गोपाळराव यांच्याशी १९१० मध्ये झाल्यावर कमलाबाईंनी स्त्रीशिक्षणाच्या कार्यास वाहून घेतलं. १९३१ मध्ये युरोपमधील प्राग विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवल्यावर त्या हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेत प्राचार्या होत्या. १९२२ मध्ये त्यांनी सातारच्या कन्या शाळेची स्थापना केली. याशिवाय आचार्य अत्रे यांचे गुरू नाटककार वासुदेव रंगनाथ शिरवळकर देशपांडे, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे हेही इथलेच.

प्रभू रामचंद्रांवरील कीर्तनाने प्रसिद्ध झालेल्या रामचंद्र अनंत शिरवळकर बुवांनी ६० वर्षं कीर्तनाने समाजसंस्कार केले, पुण्यात श्रीहरी कीर्तनोत्तेजक संस्थेची स्थापना केली. कोपरकरबुवा, निजामपूरकरबुवा, राईलकर यांच्यासारखे नामवंत कीर्तनकार त्यांनी तयार केले. त्यांची परंपरा चालवणारे दामोदरबुवा शिरवळकर आणि आघाडीचे रहस्यकथाकार सुहास शिरवळकर हे याच घराण्यातले. समर्थ सेवा मेडिकल फाउंडेशनमार्फत रुग्णालय चालवणारे डॉ. विनय व डॉ. शीला जोगळेकर, शिरवळचा चालता-बोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे डी. जी. काका कुलकर्णी, पुण्याचे माजी महापौर माउली शिरवळकर हेही इथलेच.

भोरच्या महाराजांचं निवासस्थान आणि कचेरीचा वाडा, १९४४ मध्ये सुरू झालेलं आदर्श विद्यालय, ग्रामदेवता अंबाबाई, केदारेश्वर, श्रीमंडाई देवी, श्रीराम मंदिर, श्रीरामेश्वर, श्री रत्नाबाई, खंडोबा मंदिर, दत्त, विठ्ठल, मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर, सुभेदारांचा वाडा, रामदास स्वामींचा मठ, केदारबाव, बाजीबुवा तांबे यांची समाधी; तसंच रयत शिक्षण संस्था, एम. ई. एस. सोसायटी, ज्ञानसंवर्धिनी या शाळा, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, १९२० मध्ये स्थापन झालेलं मोफत वाचनालय या इथल्या काही महत्त्वाच्या वास्तू आणि इतिहासाच्या खुणा. वाईला जसा कृष्णामाईचा उत्सव होतो, तसा इथला नीरामाईचा उत्सव प्रसिद्ध होता; पण आता राष्ट्रीय महामार्गावरचं मोठं गाव, उद्योग-आस्थापना आणि पर्यटकांचं थांबण्याचं ठिकाण म्हणून शिरवळची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

(सदराचे लेखक पत्रकार व शिक्षण क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Dr Sagar Deshpande Writes Shirwal Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :villageShirwalsaptarang
go to top