parents
parentssakal

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही!

आधीच्या आणि आताच्या पालकत्वात खूप फरक आहे. मला वाटतं आताच्या पालकत्वामध्ये संवाद कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो.

मुलांना वाढवणं म्हणजे एक जबाबदारी असते. त्याची ‘ऐक ना आई’ अशी हाक दुर्लक्षित करू नका. मुलांना तुम्हाला खूप काही सांगायचं असतं. त्याचं ऐकायला शिका. त्याचं मिनीटभराचं बोलणं तुम्ही टाळता आणि त्याची भरपाई म्हणून त्यांना मॉलमध्ये नेऊन आपल्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडता. ‘माझ्याकडे बघ’ असं म्हणून जेव्हा तुमचं मूल तुमच्या हनुवटीला हात लावून प्रेमळ आर्जव करतं ना तेव्हा त्यांचं जरूर ऐका. त्याच्याशी बोला. तोच खरा संवाद...

आधीच्या आणि आताच्या पालकत्वात खूप फरक आहे. मला वाटतं आताच्या पालकत्वामध्ये संवाद कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. पूर्वीच्या काळी मोबाईल किंवा इंटरनेटसारखी कोणतीही आधुनिक साधनं नव्हती. तेव्हा माणसा-माणसांतील संवाद हाच एक पर्याय होता.

आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांशी आपण बोलायचो. मग ते शाळेतील मित्र असोत, नातेवाईक असोत की अन्य मंडळी... तेव्हा आपापसांत मनसोक्त गप्पा व्हायच्या. आताच्या पिढीमध्ये मात्र खूप कमी होताना दिसतात. आताच्या मुलांचं पालकांशी बोलणं कमी होतंय.

त्यामुळे होतंय काय, की नात्यात एकमेकांविषयी जो विश्वास निर्माण व्हावा लागतो ना तो दिसत नाही... पूर्वीच्या काळी असं काही चित्र नव्हतं. एकमेकांविषयी आदर आणि विश्वास होता. त्यावेळी वडीलधाऱ्यांचा धाक वा ओरडणं हळूहळू समजण्यासारखं होतं, पण आता असं वाटतं की कुठेतरी काहीतरी वाचून रिअॅक्ट होतात माणसं...

मला असंही वाटतं, की समाजमाध्यमांचाही फार मोठा परिणाम पालकत्वावर होतोय. कारण, पालकत्वाबद्दल इतकं वाचलं, पाहिलं आणि ऐकलं जातं की त्यामुळे मनाचा पार गोंधळ उडतो. नेमकं काय करायचं तेच सुचेनासं होतं. अर्थातच मनावरील ताणतणाव वाढलेला आहे. या गोष्टीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी टोलनाक्यावर पुढची गाडी थोडा वेळ हलली नाही तर चालक एकदा हॉर्न द्यायचे.

आता सतत हॉर्न देतात... नाही तर सरळ गाडीच्या बाहेर येऊन एकमेकांची बकोटी पकडतात... तर हे कशामुळे होतं, तर वाढलेल्या ताणतणावामुळे... हा जो वाढलेला ताण आहे ना त्याचे पडसाद घरामध्ये आणि शाळेमध्येही उमटतात. म्हणजे विचार करा, की जेव्हा शाळेतला एक मुलगा किंवा शिक्षक एखादी भयानक कृती करतो तेव्हा तो स्वतः किती मानसिक तणावाचा सामना करत असेल?

आताचं पालकत्व शंभर टक्के जास्त तणावात आहे आणि आपण चुकतोय, असंही पालकांना वाटतं. पण त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही सापडत नाही. या सर्वांचं कारण मला तरी वाटतं की एकमेकांना दिला जाणारा कमी वेळ... मग काय होतं, की पालक कर्तव्यपूर्ती म्हणून मुलांना एखाद्या मॉलला किंवा फिरायला घेऊन जातात, पण त्यातही संवाद फारसा नसतोच. पूर्वी मुलांना गोष्टी वा गाणी सांगितली जायची... आता ती दाखवली जातात.

टीव्ही किंवा मोबाईल बघण्यातच आता मुलांचा वेळ जाऊ लागला आहे. ‘मी सांगतो...’ हा प्रकारच कमी झालाय. एकत्र गोल बसून बोलणं-जेवणं अपवादानेच दिसतं. मला नाही वाटत, की आताच्या कुटुंबातली मुलं आणि पालक जेवताना गप्पा मारत असतील. आजकाल कुणी टीव्ही बघत असतो, तर कुणी लॅपटॉपवर खेळत असतो... सध्या मुलं आणि पालकांतील संवाद कमी झालाय.

आधीच्या आणि आताच्या पिढीमधील पालकत्वाबद्दल नेमका बदल म्हणजे तुटक तुटक होत असलेला संवाद. कुटुंब एकत्र असो की विभक्त, त्यांच्यात संवाद असायलाच हवा. पूर्वी कुटुंबा-कुटुंबामध्ये अगदी मनापासून बोलणं व्हायचं. ख्याली-खुशाली विचारली जायची. तेव्हा मोबाईल वा लॅपटॉप नव्हता.

आता असं झालंय, की घरातही एका कुटुंबातील चार सदस्य व्हॉट्सअॅप ग्रुप करताहेत. अशाने तुमच्या मनातील ताण वाढत जातो आणि पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यावर संवाद न साधता थेट सहाव्या टप्प्यावर फक्त ‘बोलणं’वा ‘चर्चा’ होते.

आपले आई-वडील आपल्याला पूर्वी विचारायचे, की काय झालं तुला... तू आज जेवत का नाहीस... पाणी का पीत नाहीस? तेव्हा पालकांना मुलांचं मन समजत होतं. त्यांच्या भावना जाणून घेता येत होत्या. आता काय होतंय, की एखाद्या दिवशी आपला मुलगा रडायला लागल्यावर समजतं की त्याला काहीतरी होतंय. मग त्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरायचं...

पालकांनाही सर्व काही शाळेवर ढकलून चालणार नाही. म्हणजे मुलांचा होणारा सर्वांगीण विकास, शिक्षण आणि त्यांना घडवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे. मुलांना मारण्याविषयी बोलायचं झालंच तर मला असं वाटतं, की पालकांनी किंवा कोणीच कोणत्याही वयातील मुलाला केवळ तो त्या क्षणी दुर्बल आहे म्हणून त्याच्यावर हात उचलण्यात काहीच पॉईंट नाही. त्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की, मुलांवर आवाज चढवणंही योग्य नाही.

कारण तुम्ही आवाज चढवला की त्या माणसासाठी तो क्षण कायम ‘वाईट’ म्हणून लक्षात राहतो आणि तो राग मग कुठेतरी दुसरीकडे बाहेर पडतो. मी पूर्णपणे समजावून सांगण्याच्या मताचा आहे. कुठलाही प्रश्न बोलून सुटत नाही, असं मला वाटत नाही. संवादाने सगळेच प्रश्न सुटत असतात... म्हणूनच म्हणतो, की मुलांशीही मनापासून बोला आणि त्यांचे प्रश्न सोडवा.

मुलांच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासूनच पालकांनी आणि शिक्षकांनी विचार करायला हवा. त्यांचे ताणतणाव आणि त्यांना सतावणाऱ्या प्रश्नांबाबत पालक अन् शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा... शिक्षकांबाबत बोलायचं झालं, तर अर्थातच ते त्यांच्या संख्येवर अवलंबून आहे.

कारण एका वर्गात किती विद्यार्थी आहेत, शिक्षकांना त्यांची नावं माहीत आहेत का, शिक्षक आपल्या पेशाकडे नक्की कोणत्या पद्धतीने बघतात... नोकरी म्हणून की कर्तव्य म्हणून, अशा काही मुद्द्यांवर त्यांचा मुलांशी संवाद अवलंबून आहे. शिक्षकांनी शिक्षकी पेशा पॅशनेटली जपला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की बदल कशामुळे झाला, तर आजूबाजूची परिस्थिती एवढी बदलली आहे, की सध्या माणूस एकमेकांना भेटतही नाही.

वर्गवारीनुसार तो टक्क्या-टक्क्यांमध्ये भेटतो. मला माझ्या आईचा सहवास शंभर टक्के मिळायचा. आताच्या मुलांना तो मिळतो का? किंवा उलटप्रश्नी, मुलगा आईसाठी किती वेळ देतो? शाळेतून घरी आल्यावर तो फक्त त्याच्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर अॅक्टिव्ह असतो आणि स्नॅपचॅटवर टाकतो ‘आय एम डिप्रेस...’ तर या सर्वांचं मूळ इथेच आहे, की तुम्ही रोज एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलता की नाही? म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, मीडियाचा आणि रस्त्यावर घडणाऱ्या घटनांचा सर्वांचा परिणाम सध्या होतोय तर...

पूर्वी आमच्या वेळी पालकांचा जो धाक होता, त्याची कधी भीड अशी वाटायची नाही. असं वाटायचं, की ते जे सांगत आहेत ते आपल्यासाठीच आहे. आताचा धाक मात्र ‘निगेटिव्ह’ होत चाललाय. त्याच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. कोणतीही गोष्ट जेव्हा सातत्याने आणि नियमित असते तेव्हा त्याचा गोंधळ होत नाही. अचानक एक दिवस तुमचे वडील तुमच्यावर ओरडतात.

इतर वेळी त्यांचं तुमच्याकडे लक्ष नसतं... असं नाही ना चालत. प्रत्येक गोष्टीत सातत्य हवं. मुलाचे मार्क्स कमी आले की पालक प्रगतिपुस्तक घेतात आणि फेकून देतात... मग मुलांवर ओरडतात, पण त्या आधी तुम्ही कधी मुलाचा रोज बसून अभ्यास घेता का? जर असेल तरच तुम्हाला अधिकार आहे प्रगतिपुस्तक फेकण्याचा... म्हणजे, जबाबदारी घ्या आणि मग तुम्ही धाक दाखवा!

माझा मित्र संदीप खरे याच्या कवितेतली एक ओळ आहे... ‘द्यायची असेल तर तुमच्यासाठी द्या खुशी... मिजास नको तिला लालनपालनाची.’

त्यातला मथितार्थ समजून घ्या... मध्यंतरी एका टीव्ही वाहिनीवर माझा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एक वाक्य होतं, की तुम्ही त्याच्याकडे संधी म्हणून बघितलं तर तुम्हाला हे प्रश्न वाटणारच नाहीत. तुम्ही त्याच्याकडे दबाव म्हणून बघितलं तर तिथे तुमची भाषा बदलते...

मुलंसुद्धा तणावामध्ये आहेत तर ती रिॲक्ट होणारच. दरवेळी मुलं बरोबर असतात किंवा पालक योग्य असतात असं नाही, पण सर्वच बाजूंनी विचार केला तर आपल्यातील कमी झालेला संवाद हे त्यामागचं कारण आहे, हे आपल्याला दिसतं... म्हणूनच म्हणतो, जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही...

चला दोस्तहो, मुलांवर बोलू काही!

(लेखक प्रसिद्ध गायक, संगीतकार असून, विविध विषयांवर लेखन करतात.)

Musicdirectorsaleel@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com