संकल्पांचं नियोजन

अनेकदा आपण काही गोष्टींची सुरुवात करतो आणि हा विचार करतो, की आपण त्याने कुठपर्यंत पोहोचणार आहोत; पण पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासात भाग घेणं हे खूप ...
संकल्पांचं नियोजन

अनेकदा आपण काही गोष्टींची सुरुवात करतो आणि हा विचार करतो, की आपण त्याने कुठपर्यंत पोहोचणार आहोत; पण पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासात भाग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण त्या प्रवासाने कुठेपर्यंत पोहोचणार आहोत किंवा त्यात माझा फायदा काय याचा विचार करण्यापेक्षा त्या प्रवासात येणारा अनुभव हा अधिक महत्त्वाचा असतो.

आपण सहजपणे एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असतो. नवीन वर्ष म्हटलं की आदल्या रात्री धमाल मजामस्ती करणं आणि दुसऱ्या दिवशी गंभीरपणे नव्या गोष्टींचा संकल्प करणं. तसं पाहिलं तर ३१ डिसेंबरच्या रात्री काही विशेष नसतं आणि १ जानेवारीला आपण जो निश्चय करतो, त्याचीही काही विशेष अंमलबजावणी करत नाही. तरीही आपण दरवर्षीप्रमाणे तेच करत असतो; मात्र लहान मुलांमध्ये आपण ही धमाल करतानाच काही वेगळं घडवून आणू शकतो. कारण मुलांमध्ये बालपणात प्रचंड कौतुक आणि उत्साह असतो. खास करून सण आणि नवीन वर्षाचं प्रचंड कौतुक असतं. त्यांना प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा असतो आणि या गोष्टींचा आपण योग्य वापर केला किंवा समजून घेतलं तर मुलांच्या जीवनात फार मोठा बदल घडवून आणू शकतो. खरं तर या दिवसांची हीच खास उपलब्धी असते.

साधारण १५-२० वर्षांपूर्वी मी एक चित्रपट पहिला. ‘द पोलार एक्सप्रेस’. टॉम हँग्स नावाच्या सुप्रसिद्ध नायकाचा हा चित्रपट. त्यात नाताळविषयी बरंच काही दाखवलं आहे. नाताळ, सांताक्लॉज आणि उत्तर ध्रुवाला लहान मुलांना घेऊन जाणारी गाडी, असं सर्व काही छानपैकी दाखवलं आहे. दोन-अडीच तास आपण भान हरपून जातो तो चित्रपट पाहताना. आपण जरूर मुलांबरोबर हा चित्रपट पहिला पाहिजे. पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे नाताळ साजरा करताना मुलांना खूप चांगला संदेश दिला आहे. त्यातून छोटे-छोटे प्रश्न विचारून आपण मुलांना चित्रपटात दिलेला संदेश पटवून देऊ शकतो. मुलांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते, केवळ त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यायचं असतं. त्यातून ते स्वतः त्या गोष्टींची कल्पना करून त्या अमलात आणू शकतात; परंतु त्यासाठी ते सांगायची पद्धत खूप महत्त्वाची असते. मग तो सण नाताळ असो दसरा असो दिवाळी असो वा ईद. या सणांच्या धार्मिक बाजू सोडून सामाजिक बाजू आपण त्यांना समजावून सांगू शकतो.

अर्थातच नववर्ष आलं की आपण नवनवीन संकल्प करतो; पण ते आपण स्वतःच दोनतीन दिवसांत विसरून जातो. आपण मुलांसोबत बसून त्यांना पुढच्या वर्षात काय काय करायचं आहे हे पटवून देऊ शकतो. त्यात आपण मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश करू शकतो. मागील वर्षी ज्या गोष्टी केल्या नाहीत किंवा करू शकले नाहीत, त्याचाही समावेश आपण करू शकतो, तसेच त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल यावरही लक्ष दिलं पाहिजे. ‘द पोलार एक्सप्रेस’ चित्रपटात खूप चांगले संदेश दिले आहेत, त्यातील महत्त्वाचा संदेश म्हणजे- ‘बऱ्याचदा आपण काही गोष्टींची सुरुवात करतो आणि हा विचार करतो, की आपण त्याने कुठपर्यंत पोहोचणार आहोत; पण पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासात भाग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे’. म्हणजे आपण त्या प्रवासाने कुठपर्यंत पोहोचणार आहोत किंवा त्यात माझा फायदा काय याचा विचार करण्यापेक्षा त्या प्रवासात इतरांबरोबर येणारा अनुभव किंवा काही गोष्टी उपभोगता येतात, त्या महत्त्वाच्या असतात.

लहान मुलांबरोबर संकल्प करताना त्यांना मदत करून नियोजन करणे हे पालकांचं काम असतं. त्यांना कोणते वाद्य वाजवायचे असतील किंवा सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील, तर या सगळ्यांचे नियोजन केले पाहिजे. त्यासाठी मुलांसोबत वेळ घालवला तरच त्यांचा उत्साह टिकून राहील आणि मनापासून ते ती कामं करतील. तसेच ते काम करताना वाटेत येणाऱ्या अडचणींना ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये प्रथम नसते. त्या ओळखून आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. एखादी गोष्ट सुरू केली की त्यांना होणारा त्रास आणि त्यामधल्या अडचणी ओळखून त्यांना ती गोष्ट करण्यास मदत केली पाहिजे. सुरुवातीला दोनतीन दिवस मुलांना प्रचंड उत्साह असतो. तो कमी होतोय का हे पाहिलं पाहिजे आणि ते नेहमी कसं कौतुकाने किंवा उत्साहाने केलं जाईल याकडे लक्ष दिल पाहिजे.

काही मुलांचा त्यांच्या कामात उत्साह कायम राहतो. त्यांचं कौतुक केलेलं त्यांना आवडते. मुलांना असं वाटतं की बाबांना किंवा आईला ही गोष्ट माहिती नव्हती, मी त्यांना ते सांगितले आणि म्हणूनच क्लासला जातानाही तो तत्पर असतो की मला हे शिकून इतरांना सांगता येईल; पण इतरांनी त्यात सहभाग दाखवला पाहिजे. त्यामुळे मुलं कायम प्रेरित राहतात. चुका या होतातच; प्रसंगी त्यामुळे उत्साह कमी होऊ शकतो. कोणालाही अगदी काटेकोरपणे काम करायला आवडत नसते, पण अशा उत्साहात मसाला किंवा नवनव्या गोष्टी टाकत राहिलो, तर या गोष्टी पुढे चालत राहतात आणि एका ठराविक काळानंतर मुलांना त्याची सवय लागते. एकदा का त्या क्लासची किंवा त्या क्रियेची मुलांना सवय लागली, की त्यांच्यावर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही.

बऱ्याचदा मला पालक सांगतात, की मुलासाठी स्केटिंगचे शूज आणले, महागडी टेनिस रॅकेट आणली, पण तो चार दिवसही क्लासला गेला नाही. त्याचे कारण म्हणजे आपण सुरुवातीपासूनच योग्य नियोजन केले नाही आणि ते केल्यानंतर जे खतपाणी घालायचे काम होते, ती भूमिका पालकांनी नीट पार पाडली नाही. जे उत्साहाचे प्रश्न विचारायचे होते, ते त्याला विचारले नाहीत. म्हणून मुलाचा उत्साह कमी झाला. त्याचबरोबर रिव्ह्यूचा (पुनरावलोकन) प्रश्न असतो. रिव्ह्यू म्हणजे काही दिवस उलटून गेल्यानंतर आपण खरं तर मुलांसोबत बसून तो काय काय त्या गोष्टीतून शिकला याची सविस्तरपणे विचारपूस केली पाहिजे. विचारपूस करताना हिशेबाचा विचार न करता खरोखर तू काय शिकलास? शिकत असताना काही त्रास होतोय का? तुझे सर छान शिकवतात का?, असे प्रश्न निरागसपणे मुलांना विचारले पाहिजेत. हे सर्व तुम्हाला सांगत असताना मला माझ्या सरांची आठवण झाली. त्यांनी मला संगीत शिकवले. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा ड्रम्स शिकायचो. चारुहास दळवी असे त्यांचे नाव. संगीत शिकवताना दळवी सरांचा उत्साह एवढा असायचा, की त्यांना पाहून आपला उत्साह द्विगुणीत व्हायचा.

आपण ज्या गोष्टी करतोय, त्याबाबत चिंतन करणे, चर्चा करणे खूप गरजेचे आहे. आपण अनेक मोठमोठे शब्द ऐकतो- माईंडफुलनेस, वगैरे. सामान्य भाषेत त्याला तुम्ही जे काही करताय त्याच्याबद्दल तुमची जागरुकता, त्याच्याबद्दल तुमची विचार प्रक्रिया, त्यावर चिंतन करणे हा होतो. शेवटी आपण जे पुनरावलोकन करतो, तोही त्याचाच प्रकार आहे. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करतोय, त्याच्यात बरे-वाईट, योग्य-अयोग्य याचा सर्वाधिक विचार आपण स्वत:चा करू शकतो. त्यामुळे आपले कुठे चुकत असेल, तर स्वत:ला नियंत्रित करण्याची ती चांगली पद्धत असते. म्हणून आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. या सवयी आपण मुलांनाही लावून देऊ शकतो. एखादं लहान रोपटं लावत असतानाही खूप उत्साहाने लावत असतो, पण त्यालाही नियमित खतपाणी घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, असे करता करता लहानसं रोपटं फार मोठं झाड होऊ शकतं, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

samyrdalwai@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com