आहार संस्कार

मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं म्हणजे त्यांचं खाण्याचं प्रमाण किती आहे, त्यात कॅलरीज किती, व्हिटामिन्स किती? प्रोटीन किती आहेत? हे पाहणं गरजेचं आहे.
Child Food
Child FoodSakal

मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं म्हणजे त्यांचं खाण्याचं प्रमाण किती आहे, त्यात कॅलरीज किती, व्हिटामिन्स किती? प्रोटीन किती आहेत? हे पाहणं गरजेचं आहे. त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे, त्यांच्यात आहार संस्कार रुजवणं. ते संस्कार त्याला आपण कशा सवयी लावतो, यावर अवलंबून असतात.

मुलाच्या संगोपनात सर्वात मोठी गोष्ट जी भारतीयांना वाटते ती म्हणजे आहार. जाहिरातींमध्ये दही-दुधाने माखलेलं तोंड आणि गुटगुटीत बाळ दाखवलं जातं आणि ते पाहून पालकांना त्याप्रमाणेच आपलंही मूल व्हावं, असं वाटतं. मुलाची वाढ आणि विकास यात फरक आहे. वाढ म्हणजे उंची, केस किंवा शारीरिक बदल हे आहेत. विकास म्हणजे मुलाने शिकलेल्या कला किंवा टप्पे म्हणजेच ते चालायला लागतं, धावायला लागतं, बोलायला लागतं. यामध्ये आपण वाढीवर जास्त लक्ष देतो. वजन आणि उंची याचं एक प्रमाण असतं. साधारणतः भारतात जन्माला आलेलं मूल हे अडीच किंवा साडेतीन किलो वजनाचं असतं. त्यात मुलाचं आणि मुलीचं वजन वेगळं असतं. पाच महिन्यांत ते वजन दुप्पट होणं अपेक्षित आहे. जी मुलं कमी वजनाची जन्माला येतात, त्यांच्या आई-वडिलांना चिंता असते की माझं मूल ती कमी भरून कशी काढेल? एका संशोधनात असं आढळून आलं की, ज्या मुलांचं वजन कमी आहे, त्यांना जबरदस्तीने जर खायला देऊन वजन वाढवण्यास प्रवृत्त केलं तर अशा मुलांना कमी वयात हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता असते. जे वजन निसर्गाने त्या बाळाला दिलेलं आहे, त्यात फेरफार न करता नैसर्गिकरीत्या त्याची वाढ होऊ देणं महत्त्वाचं आहे.

पालिका दवाखाने किंवा आपण कोणत्याही बालरोगतज्ज्ञाकडे गेल्यावर आपल्याला लसीकरणाचं एक कार्ड मिळतं. त्यात वाढ कशी झाली पाहिजे, हे लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे आपण त्याचं युनिट निश्चित करू शकतो. जर ते त्या युनिटच्या खाली असेल आणि जर ते भराभर वर जात असेल तर पुढे जाऊन त्याला स्थूलतेचा विकार होऊ शकतो.

डॉक्टरकडे येणारे पालक विचारत असतात, की मुलाला आहार काय द्यावा? तर सहा महिन्यांपर्यंत त्याला फक्त आणि फक्त आईचं दूध दिलं पाहिजे. त्यानंतर हळूहळू त्याला घरातलं मऊ अन्न दिलं पाहिजे. मुलाला उभं करूनच स्तनपान किंवा खायला दिलं पाहिजे, कारण त्याच्या छातीत ते अडकण्याची शक्यता असते. मूल खायला लागल्यावर त्याला घरात जे पदार्थ खाल्ले जातात, तेच दिलं पाहिजे.

स्तनपान करताना त्याचं पोट भरलं की ते स्तनपान करणं बंद करतं. भूक लागली की रडायला लागतं. तसंच इथेही आहे. मुलांना ठरवू दे की, त्यांना किती खायचं आहे. जबरदस्तीने त्यांना खायला दिल्यावर त्यांना खाण्याचा तिटकारा येऊ शकतो. सतत खायला दिल्यामुळे स्थूलता येऊ शकते. जेव्हा घरचं न खाता मूल वेफर्स, चॉकलेट खातात तेव्हा ते मेनू ठरवत असतात.

मुलं जरा मोठी झाली की त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि पद्धती बदलतात. एक वर्षाचं बाळ तर दिवसभर झोपून असतं. हळूहळू ती झोप कमी होते. तीन वर्षांपर्यंत मूल दिवसभर जागतं आणि रात्री झोपतं. त्याचप्रमाणे अगदी दीड ते दोन तासांनी स्तनपान करणारं बाळ, दोन वर्षांनंतर स्तनपान बंद करून फक्त वरचं खाणं सुरू ठेवतं. मूल दिवसभरात नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण असं चार ते पाच वेळा खाऊ शकतं. त्यामध्ये आपण मध्येच खाऊ देत असतो. हा खाऊ घरातल्याच वस्तूंपासून बनवला पाहिजे. आमचे मित्र डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. अर्चना जोशी या दोघांनी मुलांच्या आरोग्यासाठी प्रचंड काम केलेलं आहे. ते म्हणतात की, घरात एक कोपरा खाऊचा असला पाहिजे. तिथे चणे, शेंगदाणे याचा समावेश असावा. मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते मूठभर चणे, शेंगदाणे काढून ते स्वत:च खातील. चॉकलेट, वेफर्स देण्यापेक्षा हे खाद्यपदार्थ त्या एका कोपऱ्यात ठेवले तर त्याचा चांगला परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यातून कुपोषण टाळता येऊ शकते.

मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं म्हणजे त्यांचं खाण्याचं प्रमाण किती आहे, त्यात कॅलरीज किती, व्हिटामिन्स किती? प्रोटीन किती आहेत? हे पाहणं गरजेचं आहे. त्याहूनही जास्त गरजेचं आहे ते म्हणजे एक सामाजिक क्रियाकलाप. आपण फक्त तोंडात जेवण घालत नसतो, तर त्याची एक पद्धत असते. आपण सर्वांसोबत एकत्रित बसतो. एकत्र जेवतो. एवढंच नाही तर जेवण बनवण्याचीही पद्धत असते आणि जेऊन झाल्यावर ताट उचलून ठेवण्याचीही पद्धत असते.

आपण बाजारात जातो, खरेदी करतो तेव्हा त्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. त्यांना त्या भाजीविषयी सांगा. भाजी कशी विकतात, तेही बघू द्या. कधीकधी शेतात घेऊन जा. त्यांना ती भाजी कशी वाढते, तेदेखील बघू द्या. मुंबईतील आपण घरातील बाल्कनीत तुळशीसोबत थोडंसं कडधान्य वगैरे लावू शकतो. ते घरात खाण्यापिण्यासाठी पुरेसे असतील असं नाही; पण मुलांना आहार नेमका येतो कुठून ते कळेल. घरी एखादा पदार्थ आणल्यानंतर आपण जेव्हा तो फ्रिजमध्ये ठेवत असतो, त्यापूर्वी स्वच्छ करतो. जेवण बनवताना भाज्या कापतो. या प्रक्रियेतही मुलांना सहभागी करून घ्या. पण, गॅस आणि चाकू यासारख्या गोष्टींपासून जपा. जेवल्यानंतर ताट उचलणे, स्वत:चे झाल्यानंतर आजी-आजोबांचे ताट उचलणे या सर्व गोष्टी मुलांना शिकवणे खूप गरजेचे आहे. कारण, मी म्हटल्याप्रमाणे जेवण करणे ही एक सामाजिक गोष्ट आहे. यातून सामाजिक बांधिलकी तयार होते. या सर्व गोष्टी केल्यानंतर मुलांना आपोआप भूक लागतेय, याची जाणीव होते. जेवताना फक्त पोटालाच नव्हे तर मनालाही सुख मिळते. आपण असं म्हणतो की, जेवण शरीराला लागते, ती हीप्रक्रिया आहे.

पालक विचारतात की, मुलांना बाहेरचं खाणं खूप आवडतं. पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स, बिस्कीट्स आवडतात. बऱ्याचशा स्वदेशी आणि परदेशी साखळ्या तयार झाल्या आहेत. पण आपण घरीही बर्गर, पिझ्झा बनवू शकतो. घरी बनवल्याने ते स्वच्छ वातावरणात तयार केलं जाईल याचीही खात्री असते. त्यात कोणत्या भाज्या घालतोय त्यावरही आपलं नियंत्रण असतं. जमलं तर आठवड्याच्या जेवणात एखादा दिवस पिझ्झा ठेवायला हरकत नाही, पण तो एकच दिवस. इतर दिवशी आईने ठरवलेला जेवणाचा मेन्यू आणि एक दिवस मुलांनी ठरवलेला मेन्यू, जो आपण घरी तयार करू शकतो. नाहीच जमलं तर एखाद्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन ते खाता येऊ शकतं; पण, त्यासाठीही एक पद्धत असली पाहिजे. आपण समजा रविवारी हॉटेलमध्ये जाऊन दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करू शकलो तर त्याचेही नियम असले पाहिजे. कधीही मनात आलं आणि उठलं आणि हॉटेलला गेलं तर मुलांच्या सवयी बिघडतात. हीच सवय त्यांना लागते. सर्वात वाईट गोष्ट मी सध्या पाहतोय ती म्हणजे मुलं घरचा आहार खाणं तर सोडूनच द्या, बाहेरचे पदार्थ खाणंही सोडून द्या, त्याला किमान मर्यादा असतात. पण हल्ली मुलं ज्या गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होतात, त्या तीन ते चार वर्षांची मुलंही ऑनलाईन मागवायला लागली आहेत. आई-वडील घरी नसतात. कामाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. मुलांना कार्ड किंवा गुगल पे वगैरे माहिती असते. यातून ते घरबसल्या ऑर्डर करतात. आज आपली मुलं आपल्या पाठी मोबाईलवर काय बघतायत याहून जास्त आपल्या पाठी मोबाईलवर ऑर्डर करून काय मागवून खात आहेत हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. या सर्व गोष्टींसाठी आई-वडिलांनी आधी स्वत:चं, त्यातून संपूर्ण घराचे नियंत्रण केलं तर नक्कीच मुलांच्या बिघडणाऱ्या सवयींवर आणि वाढत्या स्थूलतेवर आळा घालू शकतो.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com