चौकटीपलिकडील वैचारिक स्वातंत्र्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकटीपलिकडील वैचारिक स्वातंत्र्य
चौकटीपलिकडील वैचारिक स्वातंत्र्य

चौकटीपलिकडील वैचारिक स्वातंत्र्य

आपण विचार करतो, तसाच विचार आपल्या मुलांनीही केला पाहिजे, हा अट्टहास त्यांच्या प्रगतीतील मोठा अडसर ठरू शकतो. अगदी छोट्या गोष्टीतूनही मुलांचे समुपदेशन करणे शक्य आहे. चौकटीतले विचार मुलांवर न लादता मुक्तपणे विचार करू दिल्यास त्यांच्यातील इंद्रधनुष्य खऱ्या अर्थाने बहरू लागेल.

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना चांगलं आणि वाईटातला फरक करायला शिकवतातच असे नाही. मग मुलांनी केलेल्या गोष्टी चूक की बरोबर हे सांगण्याच्या नादात, मुलांना चांगला आणि वाईटातला फरक पालकांच्या बोलण्यातून जाणवू लागतो. यातून मुलांचे मत काही विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत तयार झालेले असते. त्यांनाही चांगले आणि वाईट समजते; पण त्यांचा तो विचार बरोबर असेलच, असे अजिबात नाही.  यासाठी पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

एकदा एका मुलीचे पालक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘आमची मुलगी खोटं बोलू लागली आहे, आम्हाला तिच्या कोणत्याच गोष्टी खऱ्या वाटत नाहीत आणि सतत खोटं बोलत असते. आम्ही खूप त्रासलेले आहोत.’ दुसरे एक पालक आले व म्हणाले, ‘डॉक्टर, आमचा मुलगा चोरटा होणार आहे, कारण त्याने बाबांच्या खिशातून ५० रुपयांची नोट चोरली. त्याला मारल्यावरदेखील तो नकार देत होता. अखेर सीसी टीव्हीत पाहिल्यावर लक्षात आलं की त्यानेच चोरी केली आहे.’ मी त्यांना विचारलं की तुम्ही त्याला मारलं कशाला? त्यावर ते म्हणाले, की हा जर मोठा होऊन चोर बनला, तर आमच्या नावाची काय इज्जत राहील. बऱ्याचदा अशा तक्रारी असतात की माझा मुलगा किंवा मुलगी खोटं बोलते किंवा चोरी करतो किंवा करते.

अशा गोष्टींवरून पालक असं निदान लावतात की मोठा होऊन माझं मूल खोटं बोलत राहील किंवा चोर होईल; परंतु पाच ते सहा वर्षांच्या मुलाने किंवा मुलीने असे केल्यानंतर लगेच असे निदान करणे योग्य नाही. याचे मुख्य कारण म्हणजेच मनुष्याचा मेंदू हा तुलनात्मक विचार करत असतो. लहानपणापासून आपण जे बघतो, जे अनुभवतो, तेच गृहीत धरतो. त्याची मेंदूत एक फ्रेमवर्क तयार होते. त्यानंतर अनुभवलेल्या गोष्टींकडे पूर्वीच्या अनुभवलेल्या गोष्टींनुसार बघतो. म्हणूनच या सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने हाताळल्या जाव्यात, यासाठी आपल्या मेंदूत काही टेम्पलेट्स बसलेले असतात. सामान्यपणे या टेम्पलेट्सच्या दोनच बाजू शिकवल्या किंवा दाखवल्या जातात. पांढरा आणि काळा या दोघांमधला इंद्रधनुष्य कधीच दाखवला जात नाही. म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीचा एकाच चौकटीत विचार करत असतो.

आपले विचार आणि जगणं सोपं होतं म्हणून आपण सगळ्यांना जज करत असतो. दुसऱ्यांना बोलून मोकळे होतो की हा खूप जजमेंटल व्यक्ती आहे, पण काही वेळा आपण बोलून दाखवत नाही, पण आपली स्वतःची वृत्ती जजमेंटल असते. मुलांना जेव्हा आपण याप्रकारे बघायला लागतो, तेव्हा लेबल चिकटवतो. आपल्याला भीती वाटते, की पुढे जाऊन त्या लेबलप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल. सात वर्षांची मुलगी जर घरात खोटं बोलत असेल, तर ती खोटं बोलत नाही आहे. त्या परिस्थितीला सामोरं कसं जावं, हे नेमकं तिला माहिती नाही म्हणून ती खोटं बोलते. काळा रंग आणि सफेद रंग यांच्यातला मोठा राखाडी रंग हा नैसर्गिकरीत्या त्यांच्या मनात शाबूत असतो. आपण वाढत जातो तसे आपल्याला त्रास नको म्हणून हा मधला राखाडी रंग कमी करत जातो. कारण ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये आपल्याला विचार करणं सोपं पडतं. सर्वचजण ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये विचार करायला लागले, तर प्रगती होणार तरी कशी? प्रगती ही राखाडी रंगातून होते, पालक म्हणून मुलांच्या मनातील हा राखाडी रंग काढायचा प्रयत्न करतो.

राम हा रावणापेक्षा चांगला आहे, रावण कधी रामापेक्षा चांगला असूच शकत नाही, असे विचार त्यांच्या मनात बिंबवून आपण त्यांना एका दिशेने विचार करायला लावतो. निसर्गाने आपल्याला एक मोठा कॅनव्हास दिला आहे. त्यात आपण हवे ते रंग भरू शकतो, पण मुलांना ती भरारी घेऊ न देता आपण सुरुवातीलाच त्यांचे पंख कापून टाकतो. तेव्हा पालकांनो, आपली मुलं आपल्यासारखाच विचार करतील, असा विचार करू नका. आपला विचार हा वयाप्रमाणे खुंटलेला असतो. समाजाने आपल्याला कसं वावरायचं, हे शिकवलं तर आपण कोण होतो, याचा विसर पडतो. त्यांच्यासोबत लहान-सहान गोष्टींवर चर्चा करा, त्यातून आपण त्यांचं खऱ्या अर्थाने समुपदेशन करू शकतो. पालकांनी स्वतः त्यांच्याशी चर्चा करून एका चौकटीतले विचार त्यांच्यावर न लादता त्यांना मुक्तपणे विचार करू द्या. अशा रीतीने त्यांच्यातील इंद्रधनुष्य खऱ्या अर्थाने बहरू लागेल.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत)

loading image
go to top