चूक अन्‌ गुन्हा

एखादा मुलगा आपल्या दारावरची बेल वाजवतो आणि पळून जातो. असं तो कदाचित वारंवारही करतो. कधीतरी आपल्याला सापडतो.
Mistakes
Mistakessakal

एखादा मुलगा आपल्या दारावरची बेल वाजवतो आणि पळून जातो. असं तो कदाचित वारंवारही करतो. कधीतरी आपल्याला सापडतो. तेव्हा त्याच्याशी आपण कसे वागावे, हे समजून घेण्याची गरज आहे.

मुंबईच्या एका लहान सोसायटीमध्ये माझं क्लिनिक होतं. आता ते क्लिनिक बंद आहे; पण तो फ्लॅट मी वापरतो. काही दिवसांपासून कोणीतरी दारावरची बेल वाजवायचं आणि बाहेर जाऊन पाहिलं तर कोणीच नसायचं. कालही असंच झालं. बेल वाजली आणि बाहेर जाऊन बघतो तर कोणीच नाही. मग मला खालच्या जाळीतून एक लहान मूल पळत जाताना दिसलं. मी त्याच्या मागे जाऊन हाक मारली आणि त्याला विचारलं की, तू बेल वाजवून का पळालास? तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो घाबरला. म्हणाला, सॉरी, माझी चूक झाली. मी म्हणालो, हरकत नाही. तुला काही हवं आहे का? त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव हरवला होता. त्याने चूक केली होती, हेही त्याला समजलं होतं.

बरेचदा पालकांचंही असं आपल्या मुलांबाबत होतं की, माझा मुलगा चोरी करतो. खोटं बोलतो. मारामारी करतो. दुसरं कोणतं मूल असं करतं तेव्हा आपण त्याला बोलतो की, मी तुझ्या बाबांना किंवा आईला नाव सांगेन. मीही त्या मुलाला जर असं म्हणालो असतो की, थांब तुझ्या बाबांना नाव सांगतो, तर त्याची बदनामी झाली असती. कोणीही बेल वाजवली, तर याच मुलाने वाजवली असेल, असं लेबलिंग त्याला लावलं गेलं असतं. त्याला त्या सोसायटी किंवा बिल्डिंगमध्ये त्याच नजरेने बघितलं गेलं असतं.

हे सर्व मी फक्त ‘तुला काही हवं असेल तर मला सांग’ एवढं बोलून टाळलं. याचा अर्थ मी कोणी उदार माणूस आहे आणि तो जे काही मागेल ते त्याला मी दिलंच पाहिजे, असं नाही; पण त्याच्या मनाला थोडा आनंद मिळेल आणि त्याला काही सांगायचं असेल, तर तो मला सांगू शकतो, हे त्याला समजलं. ते त्याने वाईट भावनेने केलं असेल, असाच त्याचा अर्थ होत नाही.

मुलं सगळ्या गोष्टी जाणते किंवा अजाणतेपणाने करत असतात. कधी कोणाचं बघून किंवा मित्राचे अनुकरण करून ते करतात. जेव्हा आपण त्यांना पकडतो, तेव्हा त्याला आपण गुन्ह्याचं स्वरूप देऊन मोकळे झालेलो असतो. छोट्याशा गोष्टीला किंवा चुकीला आपण गुन्हा ठरवतो. अशा प्रकारे त्यांचं लेबलिंग न करता ती चूक खरंच एवढी मोठी आहे का, हे आपणच समजून घेतलं पाहिजे. कारण, उद्या त्यांच्याबाबतीतही असं घडलं तर आपण त्यांच्याशी जसं वागतो तसंच ते त्या व्यक्तीशी किंवा मुलाशी वागतील.

एकमेकाला मदत करण्यावर आपला विश्वास नसेल किंवा वृत्तीवर विश्वास नसेल तर समाजात जगणं मुश्किल होईल. चूक आणि गुन्हा यांच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण त्यांना गुन्हा केल्यासारखं वागवलं तर त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. त्याउलट त्यांना जर समजून घेतलं आणि पुन्हा असं करू नकोस असं सांगितलं, तर पुन्हा ती चूक करण्याची शक्यता खूप कमी होईल. लहान मुलं चुकतात; पण त्याला कसं समजावून सांगायचं, हे त्याच्यासह आपल्यालाही कळणं गरजेचे आहे.

कधी कधी ते गंमत म्हणून करतात; पण त्यांना हे लक्षात आणून दिलं की, ही गंमत दुसऱ्यांना त्रासदायक ठरू शकते, तेव्हा ते समजूतदारपणे त्या गोष्टी करणे टाळतील. त्यातून आपण बालगुन्हेगारीही टाळू शकतो. यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या चुका समजूतदारीने घेतल्या पाहिजेत आणि त्यांना गुन्ह्याचं नाव न देता, चूक आणि गुन्हा यातला फरक समजून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com