चला, शाळेत जाऊ या !

मार्च २०२० पासून मुलांसाठी सर्वात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे शाळा उघडणं. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व हळूहळू सुरू झालं; पण शाळा मात्र बंदच होत्या.
School
SchoolSakal
Summary

मार्च २०२० पासून मुलांसाठी सर्वात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे शाळा उघडणं. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व हळूहळू सुरू झालं; पण शाळा मात्र बंदच होत्या.

येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. अगदी शिशूपासून दहावीपर्यंत. पुन्हा एकदा चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी तयार करू या. दप्तर, गणवेश, डबा आणि पाण्याच्या बाटल्या सर्व शोधून पुन्हा एकदा मुलांना शाळेत पाठवण्यासाठी सज्ज होऊ या.

मार्च २०२० पासून मुलांसाठी सर्वात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे शाळा उघडणं. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व हळूहळू सुरू झालं; पण शाळा मात्र बंदच होत्या. कारणं होती, कोरोनाबद्दल सुरुवातीच्या काळात असणारा माहितीचा अभाव, मोठ्यांमध्ये असलेली भीती, ऑक्सिजनचा अभाव आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती. या सगळ्यामुळे असं वाटू लागलं की कदाचित शाळा सुरू झाल्या की हा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल. खूप मोठी समस्या निर्माण होईल.

विज्ञान हे कधीच ठरलेलं नसतं, ते दिवसेंदिवस बदलत असतं. तीन लाटा येऊन गेल्या तरी सुदैवाने मुलांना होणारा कोरोनाचा संसर्ग आणि मृत्युदर फारच कमी आहे. त्याचबरोबर तिसरी लाट संपत आली आहे. त्यातही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, ओमिक्रॉनसारखा व्हेरिएंट हा येतच राहणार आहे. दोन-तीन महिन्यांनी कदाचित कोणतातरी दुसरा व्हेरिएंट येईल. पहिल्या दोन लाटांपेक्षा ओमिक्रॉन खूपच सौम्य होता आणि यापुढच्या लाटेमध्येही संसर्गाचं जे स्वरूप सौम्य स्वरूपाचं असेल. त्याला पँडेमिक म्हणण्यापेक्षा एंडेमिक अर्थात कोरोना संसर्गाचा शेवट असं म्हणू. कदाचित सामान्य सर्दी-तापासारखंच आपण त्याला पाहू आणि हा संसर्ग ज्या भागात किंवा ज्या देशात होईल तिथे तिथल्या गरजेनुसार किंवा परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील.

गेल्या दोन वर्षांत जगात जिथे जिथे शाळा सुरू करण्यात आल्या, तिथून कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला अशी एकही बातमी आलेली नाही. शाळेत जाणाऱ्या मुलांमुळे घरातील आजी-आजोबांना कोविडचा संसर्ग झाला असंही कुठे घडलं नाही. म्हणूनच वैज्ञानिकरीत्या शाळा सुरू केल्याने कोविडचा संसर्ग वाढल्याचं आढळलं नाही.

ओमिक्रॉन हा झपाट्याने पसरत गेला आणि जवळजवळ सगळ्यांनाच त्याचा संसर्ग होऊन गेलेला आहे. त्यामुळे समाजात एक हर्ड इम्यूनिटीचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे; पण लसीकरण करूनच मुलांना शाळेत पाठवलं पाहिजे असा काही नियम नाही.

गेली दोन वर्षं शाळा बंद असल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर तसेच मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड आघात झालेला आहे. मुलांना घरी बसून फक्त खाणं आणि झोपणं एवढंच करता आलेलं आहे. व्यायाम नाही, त्यामुळे मुलं आळशी झालेली आहेत. हे झालं शहरी भागातलं. ग्रामीण भागात मुलांना माध्यान्ह आहार मिळायचा, तोही बंद आहे. मुलांची मानसिक परिस्थिती एवढी बदलली की, मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसू लागलं आहे.

शाळा बंद ठेवून बाकी सर्व चालू केल्यामुळे मुलं बाहेर फिरायला, बाहेरगावी, बाजारात, शॉपिंग मॉलमध्ये, चित्रपट बघायला जातायत. अगदी नवीन वर्षाच्या पार्ट्यांनाही मुलं गेली आहेत. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून आलेलं आपण पाहिलं आहे.

गेल्या काही वर्षांत टीबीने झालेले मृत्यू हे कोविडने झालेल्या मृत्यूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून टीबीचा संसर्ग हा चालू आहे आणि तो झपाट्याने होणारा संसर्ग आहे. असं असेल तर टीबीच्या भीतीने शाळा सुरूच व्हायला नको होत्या. मुलांच्या शाळेत जाण्या-येण्याच्या व्हॅनचे अपघात पाहिले तर ते कोविडमुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत, म्हणून का शाळा बंद ठेवल्या होत्या का? हा आपण विचार करणं भाग आहे.

आता शाळा चालू केल्या म्हणून संसर्ग होणार नाही का? तर असं नाही. संसर्ग हा होणारच आहे. दरवर्षी सर्दी खोकल्याची लाट आली की ती सगळ्यांनाच संक्रमित करते. त्यात आता कोविडचीही भर पडणार आहे. जगातल्या जवळजवळ सर्वच देशांनी हे मान्य केलं आहे की, कोविडला न घाबरता आपण स्थानिक पातळीवर त्याचा विचार केला पाहिजे. एखाद्या भागात जर रुग्णसंख्या खूपच वाढली, बेड्स कमी पडू लागले, ऑक्सिजनची जास्त गरज वाटू लागली तरच आपण लॉकडाऊनचा विचार करायला हवा. सध्या जे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत त्यांच्यात ऑक्सिजनची गरजही खूप खूप कमी आहे. मुलांना ओमिक्रॉनमुळे सर्दी खोकल्याची लागण होण्याची शक्यता आहे; पण त्यामुळे घात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शाळा सुरू होणार, या निर्णयाचे स्वागत आहे.

डिसेंबरमध्येही काही काळासाठी ग्रामीण भागात पाचवीच्या पुढे आणि शहरी भागात आठवीच्या पुढचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पण मुलांना शाळेत पाठवणे अनेक पालकांना धोकादायक वाटले. जर पुन्हा अशीच भीती पालकांच्या मनात आताही असेल तर ती खूप मोठी चूक ठरेल.

सोमवारपासून महाराष्ट्रात आणि २७ जानेवारीपासून मुंबईत माझं पालकांना आवाहन आहे की, आपण आपल्या मुलांना त्यांचे लसीकरण झाले असेल किंवा नसेल, त्यांना कोविड झाला असेल किंवा नसेल, त्यांना सध्या सर्दी, ताप, खोकला झाला नसेल तर त्यांना नक्की शाळेत पाठवा. शाळेचे जे निर्बंध आहेत, ज्या मार्गदर्शक सूचना असतील त्या तुमच्या शाळेत तुम्हाला साांगितल्या जातील. सरकारच्या संकेतस्थळावरही ही माहिती उपलब्ध आहे.

मास्क घालणे, स्वच्छता पाळणे, अंतर राखणे या सर्वांबाबत माहिती देऊन मुलांना शाळेत पाठवा. आरोग्य हा एक संवेदनशील विषय आहे. खासकरून मुलांच्या आरोग्याचा विषय सरकार दरबारीही गंभीर आहे. कुठल्याच सरकारला आरोग्याशी आणि त्यांच्या जीवाशी खेळू शकत नाही. म्हणूनच सरकार नेहमी मुलांच्या आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलत असेल. त्यांना पालकांचा पाठिंबा मिळाला नाही तर शाळा सुरू होणार नाहीत. म्हणूनच ग्रामीण भागातील, शहरी भागातील, उच्च शिक्षित वर्गातील किंवा अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या सर्वच पालकांनी स्वतः पुढे येऊन एका आवाजात आम्हाला आमच्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे, असेच म्हणण्याची गरज आहे. आम्‍ही नियम पाळू, आम्ही खबरदारी घेऊ, आम्ही शाळेची मदत करू, ही जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. कदाचित एक दिवसाआड शाळेत जावे लागेल. एका बाकावर एकाच मुलाला बसवल्यामुळे रोज प्रत्येकाला शाळेत जाता येणार नाही. हरकत नाही. जे निर्बंध असतील ते सर्व पाळून आपण एकदा शाळा सुरू करू या आणि सुरूच राहतील याकडे लक्ष देऊ या.

काही पालक आजही असे आहेत ज्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची भीती वाटत असेल. त्यांना वैद्यकीय उत्तर देऊन, काही अहवाल त्यांच्यापुढे मांडून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. हे सर्व करून आणखी एखादा ग्रुप असेल, ज्यांना मुलांना शाळेत पाठवायचे नसेल तर अशांना अजूनही सरकारने सक्तीचे केलेले नाही. एवढे समजवल्यानंतरही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसतील आणि भीती वाटत असेल तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार मुलांना शाळेत पाठवू नका; पण याचा अर्थ चुकीचा लावून इतर पालकांवर, शिक्षकांवर किंवा सरकारवर चुकीचा दबाव आणू नका. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे, असा ग्रुप खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांना तशी संधी मिळालीच पाहिजे.

शाळेत गेल्यावर अभ्यासक्रम कसा होईल? अचानकपणे शाळा बंद झाल्याने मुलांच्या सवयी बिघडल्या असतील, या आणि अशा बऱ्याच प्रश्नांवर आपण पुढच्या ‘अवतरणा’त चर्चा करू. आता शाळा सुरू होत आहेत, मुलांना शाळेत जाऊ द्या.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com