शाळा सुरक्षित सुरू ठेवू

सकाळी दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेशात बघून आनंद वाटतो. जवळपास दोन वर्षांनंतर सर्व गोष्टी सामान्य वाटू लागल्या आहेत.
School
SchoolSakal
Summary

सकाळी दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेशात बघून आनंद वाटतो. जवळपास दोन वर्षांनंतर सर्व गोष्टी सामान्य वाटू लागल्या आहेत.

शाळा एकदाच्या सुरू झाल्या. मुलांच्या आणि त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बरं वाटतंय. मुलं शाळेत गेली, शिक्षणाला सुरुवात झाली, याचा आनंद शिक्षक-विद्यार्थ्यांएवढाच पालकांनाही आहे. सर्व नियमांचे पालन केले तर शाळा अशाच सुरू राहतील आणि शिक्षण आनंददायी होईल.

सकाळी दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना गणवेशात बघून आनंद वाटतो. जवळपास दोन वर्षांनंतर सर्व गोष्टी सामान्य वाटू लागल्या आहेत. अर्थात शाळा परत सुरू केल्यानंतर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारच्या पेडियाट्रिक कोविड टास्क फोर्सच्या आणि शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात काही सूचना पालक आणि शिक्षकांसाठी आहेत. एकावेळेस मुलांची संख्या शाळेत कमी असली पाहिजे. सोशल डिस्टन्स्टिंग कायमच पाळलं गेलं पाहिजे. हे करताना शाळेच्या वेळा वेगवेगळ्या किंवा पर्यायी दिवसांमध्ये (अल्टरनेट डे) ऑनलाईन आणि ऑफलाईन याप्रमाणे वेळापत्रक करता येणार आहे. क्लास रूममध्ये दोन बाकांमध्ये जास्त जागा ठेवता येईल. एका बाकावर एकाच मुलाला बसण्याची व्यवस्था असेल.

शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे लशीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे आहे. लिफ्टमध्ये वगैरे एकत्र जाणं-येणं टाळले पाहिजे. एका वेळेस कमी लोकांनी लिफ्टचा वापर करावा. त्याचबरोबर पालकांची पीटीए बैठक घेऊन शाळा सुरू होता होता त्यांना या सर्व प्रक्रियेची माहिती खासकरून ग्रामीण भागातील पालकांना देणे गरजेचे आहे. शाळा अनेक दिवस बंद असल्याने पूर्ण परिसर स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त खिडक्या उघड्या ठेवणे, पंखे चालू ठेवणे आणि एसी बंद ठेवणे गरजेचे आहे. हवा खेळती असेल तर त्यात कोविडचा जास्त प्रसार होत नाही, असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे एसी बंद ठेवणे हे उपयुक्त ठरेल.

सॅनिटायझर पॉईंट्स असले पाहिजे. शाळेच्या प्रवेशद्वारावर, कॅन्टिंगमध्ये किंवा बाहेर जाताना गेटवर अशा अनेक ठिकाणी हे पॉइंट्‌स असावे. शिवाय, एक वर्ग सुटला की दुसरी मुले त्या वर्गात येण्याआधी पूर्ण वर्ग सॅनिटायइझ किंवा स्वच्छ करून घेण्याच्या सूचना आहेत. शाळेतील एखादी जागा ‘स्कूल हेल्थ क्लिनिक’ म्हणून ठेवली पाहिजे. तिथे रुग्णालय हवे, असे नाही पण; जमलं तर एखादी सहाय्यक नर्स किंवा एका प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करावी, ज्यातून मुलांचे तापमान कसे घ्यायचे, ताप आहे का, दम लागतोय का? श्वासाचा दर मोजण्यासाठी, नाडी तपासून पल्स रेट किती आहे हे तपासून पाहिले तरी पुरेसे आहे. शाळेतील शिक्षकांना याविषयी प्रशिक्षण देण्यास हरकत नाही. तिथेच एक पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, पॅरासिटॉमॉलसारखी औषधं, ओआरएसने भरलेला फस्ट एड बॉक्स ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे कोविड वागणूक जसे की, मास्क घालणे, सोशल डिस्टन्स्टिंग, स्वच्छता याबद्दल बऱ्याचशा ऑनलाईन साईड्‌सवर पोस्टर्स उपलब्ध असतील, ते डाऊनलोड करून शाळेत लावू शकतो. जर क्लिनिकमध्ये एखाद्याला आजार आहे, असे आढळले तर जवळच्या रुग्णालयाशी किंवा क्लिनिकशी संपर्क साधून ठेवणे गरजेचे आहे. म्हणजे ताबडतोब मुलांना तिकडे पाठवले जाईल. रुग्णवाहिकेचा संपर्क क्रमांक, डॉक्टरांचा संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांचे दैनंदिन आरोग्य तपासणी करून रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे.

मुलं शाळेत पोहोचणार कशी, याकडे खास लक्ष दिले पाहिजे. मुंबईत आपण बघतो की, एका बसमध्ये किंवा गाडीत मुलांना अक्षरश: कोंबले जात होते. या गोष्टी आता अजिबात चालणार नाहीत. जर शाळा लांब नसेल, जसे ग्रामीण भागात जशी मुले शाळेत चालत जातात त्यानुसार, मुलांनी शाळेत चालत जाण्याला प्राधान्य द्यावे. आम्हीही आधी तसंच करायचो; पण आता शाळाही घरापासून दूर असल्याकारणाने मुलांना गाडीने जावे लागते. शाळेची बस असेल तर एसी सुरू न ठेवता बसच्या खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. शाळा शिफ्टनुसार किंवा पर्यायी दिवसांमध्ये ठेवणार असू तर बसमध्ये बसण्याच्या क्षमतेचे नियोजन करता येऊ शकते. प्रत्येक ट्रिपनंतर बसची स्वच्छता झाली पाहिजे. मुलांनी मास्क घालणे गरजेचे आहे.

सॅनिटायझर असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हजेरी घेणारे आणि बसच्या चालकाचे लसीकरण झालेले पाहिजे. त्याचप्रमाणे कर्मचारी आणि शिक्षकांना थोडेफार प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मुलं शाळेत आल्यानंतर त्यांचे थर्मामीटरने तपासणे, सॅनिटायझेशन करणे, मास्क व्यवस्थित कसे घालायचे आणि ते तासंतास कसे वापरायचे याबद्दलही शिकवले पाहिजे. यासह कापडाचे मास्कही पुरेसे संरक्षण देऊ शकतात; पण त्याने नाक आणि तोंड झाकलं पाहिजे. नाकाच्या खाली घातलं की काहीच अर्थ नाही आणि अतिरिक्त मास्कचा साठा शाळेत असणं गरजेचे आहे. मुले मास्क पाडणार, हरवणार म्हणून मास्क शाळेत ठेवून द्यावे. दिवसांतून एक-दोनदा तरी मुलांना मास्क घालायला, सोशल डिस्टन्स्टिंगची आठवण करून द्यायला हवी. डब्बा खाण्याच्या वेळेतही सोशल डिस्टन्स्टिंग पाळले जाईल, याची शहानिशा करावी. डब्बा खाण्याची वेळ ही शक्यतो वेगवेगळी असावी. मुलांचा घोळका होऊ नये, एकमेकांचा डब्बा खाऊ नये, त्यातून संपर्क टाळला जाणे हा उद्देश आहे. ते मुलांना समजावून सांगितले पाहिजे. खाण्याच्या परिसरासह टॉयलेटमध्येही स्वच्छता राखली पाहिजे. २४ तास पाणी नसेल तर सॅनिटायझर ठेवले पाहिजे. खेळणे टाळावे असे नाही, पण जवळचा संपर्क येणार नाही असे खेळ खेळले पाहिजेत. मैदानात जाऊन मुले धावत असतील तर काही हरकत नाही, पण त्यादरम्यान मास्क घातला पाहिजे.

शिक्षकांना मूल आजारी आहे, हे ओळखायला शिकवलं पाहिजे. मूल शाळेत शांत असेल, अंग गरम लागत असेल, श्वासाचा रेट वाढलेला असेल, अंगावर पुरळ दिसत असेल, खोकला असेल, डोळे लाल झालेले असतील, उलट्या होत असतील, पोटात दुखत असेल, जुलाब सुरू असेल तर मुलांना ताबडतोब डॉक्टरांकडे पाठवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आता गेली दीड ते दोन वर्ष घरी बसून ऑनलाईन अभ्यास करून मुलं शाळेत परतत आहेत. सर्वच मुलं खूप आनंदात असतील असं नाही. काही मुलांना शाळेत जाण्याची सवयदेखील नसेल आणि त्यांना कदाचित आवडणार नाही. आई-वडिलांची दोन वर्षे सवय झाली असेल, घरात आणि आईच्या मांडीवर बसून खायची सवय झालेली आहे. त्यामुळे मुलं कदाचित सुरुवातीला राग, नैराश्य, भीती दाखवतील. त्यांची चिडचिड होईल. त्यांना इतर लोकांनी सांगण्याची सवयच पूर्णपणे सुटलेली आहे. काही मुले इतरांमध्ये मिसळत नसतील. परत मोठी मुलं अंगठा चोखत असतील. खूप जास्त खात असतील, कमी खात असतील, वर्गात झोपत असतील, घरी राहून ऑनलाईन शाळा असेल तर नऊ वाजताच उठायचं आणि पांघरुणाच्या आतच फोन किंवा लॅपटॉप चालू करून व्हिडीओ ऑफ ठेवून झोपायचं या सवयी होत्या, त्या आता बदलण्यास सुरुवात होईल. त्याकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे.

कोविडच्या अगोदर चांगला अभ्यास करणारा एखादा विद्यार्थी त्याचे कमी मार्क येत असतील किंवा मूल जर सारखं रडत असेल अगदी नैराश्य दाखवत असेल तर या मुलांना आपण ताबडतोब रेफर केले पाहिजे. पहिले दोन ते तीन आठवडे अभ्यासाचा एकदम पाचवा गिअर टाकू नका. अगदी सुरुवातीच्या पहिल्या दोन ते तीन आठवड्यांत मुलांना एकमेकांशी बोलू द्या, गाणी गाऊ द्या, ऐकू द्या, अंताक्षरी खेळू द्या, गेल्या दोन वर्षांचा एकमेकांचा अनुभव एकमेकांना सांगू द्या, असे केल्याने मुलं पुन्हा एकमेकांच्या जवळ येतील. मुलांना प्रेम दाखवा, ओरडू नका, कुठलीही चूक झाली जसे की गणवेश बरोबर नाही, अभ्यास केला नाही अशी कोणतीही चूक झाली तर एकदम रागावू नका. नकारात्मक परिस्थिती निर्माण करू नका. फक्त सकारात्मक संदेशच त्याला द्या. एखाद्या मुलामध्ये समस्या जाणवत असतील तर त्याला रेफर करा. पालकांशी बोलून त्यांनाही हे समजवा की त्यांचीही जबाबदारी तेवढीच आहे, जेवढी शाळेची आहे. कारण शाळेत कोविड नियम पाळण्यात पालकांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. पालकांना व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय सांगा, त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे द्या. सर्वात जरुरी आहे की जर तुमच्या मुलाला काहीही आजार असेल जसे की ताप, खोकला, पुरळ, सर्दी असे काही असेल तर शाळेत त्याला अजिबात पाठवू नका. पण डॉक्टरांकडे तत्काळ घेऊन जा. पूर्णपणे बरा झाल्याशिवाय १० ते १५ दिवस त्यांना शाळेत पाठवू नका, त्यांची ऑनलाईन शाळा सुरू राहू द्या.

घरी मास्कचे किमान तीन ते चार सेट असले पाहिजे. गणवेशची एकच जोडी असेल तर शाळेत रोज गणेवश घालण्याची सक्ती करू नका. घरातून निघताना पालकांना खास सूचना केली पाहिजे. शाळा सुरू झाली की वेळापत्रक नवीन बनवा. उठण्याच्या वेळा ठरवून घ्या. शाळेत जाण्यासाठी किमान एक ते सव्वा तास आधी मुलांना उठवण्याची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सकाळची जी कामे असतात, जसे नाश्ता, टिफिन बॉक्स, दप्तर भरणे ही कामे सुटसुटीत करता येतील. पुस्तकांचं वजन कमी असेल याची दक्षता घ्या. शाळेतून आल्या आल्या आधी मुलांना अंघोळ घाला, त्यांचे कपडे बदला. त्यामुळेच जर एकच गणवेश असेल तर शाळेने रोज गणवेशात येण्याची सक्ती करू नये. गणवेश चांगल्या पद्धतीने धुणे, मास्क धुणे आणि सुकायला ठेवण्याची सवय लावा. मुलं घरी आल्यावर पालकांनी त्यांना प्रेमाने विचारावे की आज काय केलं, काय मज्जा केली, उद्या काय करणार?

काहीही झालं तरी आपल्याला शाळा कायम सुरू ठेवायच्या आहेत. एक गोष्ट पुढे येतेय ती नकारात्मक आहे. बऱ्याचशा शाळा मुलांना आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतरच शाळेत घेऊ, यासाठी सक्ती करत आहेत. मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, कोविड टास्क फोर्स, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अशी कोणतीही मागणी किंवा नियम केलेला नाही. त्यामुळे शाळांना ज्या काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याच शाळांनी पाळाव्यात. स्वत:च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरटीपीसीआर चाचणी वगैरे सक्तीची करून त्यात आणखी गोंधळ तयार करून मुलांची आणि पालकांची समस्या वाढवू नये. शाळांसोबत पालकांनी सहकार्य करून शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com