शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात

शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात

पुन्हा पुन्हा तेच ते... राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद झाल्या. पहिली लाट आली तेव्हापासून शाळा बंदच होत्या. त्यानंतर दुसरी लाट ओसरता ओसरता आता कुठे हिंमत करून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आधी मोठे वर्ग, मग हळूहळू इतर वर्ग सुरू करण्यात आले. त्यात आता ओमिक्रॉनची तिसरी लाट आली आणि पुन्हा शाळा बंद झाल्या आणि त्या पुन्हा कधी उघडणार, हा प्रश्नच आहे...

कोरोनाच्या लाटा पुन्हा येणार आणि पुन्हा शाळा बंद होणार, पण या शाळा सुरू होणार तरी कधी? या परिस्थितीत आज काही गोष्टी स्पष्टपणे समोर दिसत आहेत, ती म्हणजे कोरोनाचा शेवट हा कदाचित कधीच होऊ शकत नाही आणि सध्यातरी नाहीच नाही. अचानक तिसरी लाट आली की चौथी लाट कधी येईल, याचा काहीच भरोसा नाही आणि चौथी येणार नाही, असेदेखील ठामपणे सांगता येणार नाही. कारण हा विषाणू जितक्या वेगाने पसरतो, तितक्याच वेगाने तो बदलतोदेखील.

जगात जेवढे कोरोनाबाधित रुग्ण आहेत, त्यांच्या शरीरात जो विषाणू आहे, तो उद्या कोणत्या ना कोणत्या प्रकारात रूपांतरित होईल आणि त्या बदललेल्या विषाणूच्या प्रकारामुळे जगात पुन्हा एकदा तो किती हाहाकार माजवेल, या बद्दल काहीच शाश्वती देता येत नाही; परंतु आपण पाहिलं की ओमिक्रॉनची तिसरी लाटही सौम्य होती. रुग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या कमी आहे, आजाराची तीव्रता कमी आहे आणि त्याचबरोबर मृत्युदरही कमी आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे या लाटेच्या तीव्रतेचा परिणाम फारसा जाणवलेला नाही, पण समाजात इतर सर्वकाही सुरळीत सुरू असताना बंद झाल्यात त्या शाळा. एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थ्यांना बसवून पुन्हा एकदा संसर्ग वाढेल, या भीतीमुळे शाळा लवकरच सुरू होईल, असे काही वाटत नाही; मात्र शाळा सुरू न झाल्यास मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्याचा किती परिणाम होईल, याची भीती आता सर्वांनी ओळखली आहे. तसेच मध्यंतरी शाळा सुरू झाल्यावर मुलं शाळेत जायला तयार होत नव्हती आणि त्याची कारणेही स्पष्ट आहेत.

उदाहरणार्थ- ५ वर्षांचं मूल, जो वयाच्या तिसऱ्या वर्षी शाळेत जायला हवा होता, त्यावेळी कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. गेली दोन वर्षे तो शाळेत गेलाच नाही. त्यामुळे त्याला शाळेत अचानक कसंकाय जावंस वाटेल? अनेक मुलं दोन वर्षांपासून घरी सर्व सुखसोयी उपभोगत असताना, दप्तर घेऊन अनोळखी असलेल्या शाळेच्या ठिकाणी जायला सहसा तयार होणार नाहीत. अनेक मुलांना तर शाळेच्या अनुशासित जीवनाचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या शाळा सुरू राहिल्या असत्या, तर त्यांना ती सवय पुन्हा झाली असती. दुर्दैवाने अवघ्या काही दिवसांतच शाळा बंद झाल्या. त्यामुळे काही दिवस शाळा सुरळीत चालू राहिल्याशिवाय मुलांमध्ये शाळेबाबतच ओढा निर्माण होणार नाही.

आपण प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, कोविडची परिस्थिती संपूर्ण जगभर, देशभर किंवा राज्यभर सारखी नसणार आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी वेगळेपण हे असेलच. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायती किंवा महापालिकांनी ठरवले पाहिजे. स्थानिक संसर्गाचे प्रमाण किंवा रुग्णसंख्या पाहून निर्णय घेतले पाहिजेत. त्यासाठी पालकांशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला पाहिजेत. एखाद्या भागात रुग्णसंख्या अगदीच कमी आहे, तेथील पालकांनी शाळेशी संपर्क साधून ती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्य सरकारने किंवा स्थानिक प्रशासनानेही त्याला मान्यता दिली पाहिजे. याचा अर्थ असा की शाळेबाबतचा निर्णय हा स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यात यावा. जर आपल्याला पुढील वर्षभर कोविडशी सामना करायचा असेल आणि त्यातही शाळेच्या बाबतीत आपल्याला या परिस्थितीप्रमाणे जुळवून घेता आले पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला, तरीही तिथल्या शाळा-महाविद्यालये नियमित सुरू आहेत. कारण तिथे मुलांच्या चाचण्या आणि लसीकरण चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. कोविड चाचणीच्या किट्स शाळेतच उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

आपल्यालाही शाळा सुरू करायच्या असतील, तर तीन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांची तयारी असली पाहिजे. म्हणजेच शाळेसोबतच पालकांनीही मुलांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जसं की मुलं शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळतात का, मास्क वापरतात का, आदी. आपलं मूल आजारी असेल तर त्याची होम टेस्टिंग करून पॉझिटिव्ह आल्यास त्याला दोन आठवडे आपण शाळेत किंवा बाहेर पाठवणार नाही. त्यामुळे इतर नागरिकही सुरक्षित राहू शकतील. दुसरा मुद्दा म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जेवढ्या नागरिकांचे लसीकरण वेगात होईल, समाजात तेवढीच हार्ड इम्युनिटी वाढेल. आणि म्हणूनच पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर जाऊन लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे. म्हणजेच एक प्रकारचे सुरक्षाकवच आपल्याला सर्वांना मिळेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पुढचे काही दिवस परिस्थिती ही अशीच राहणार आहे. घरात शिस्त लावणे, घरी एका वेळापत्रकाप्रमाणे काम करणे ही महत्त्‍वाची बाब राहणार आहे. म्हणूनच आधीपासून ‘अवतरणा’त म्हटल्याप्रमाणे मुलांच्या वेळापत्रकानुसार मोठ्यांचेही वेळापत्रक निश्चित करणे फार गरजेचे आहे. कारण वेळापत्रकामुळे बऱ्याचशा विसरणाऱ्या किंवा टाळत आलेल्या गोष्टीही करता येतात. घरातले वातावरण केवळ अभ्यासमय नव्हे तर अधिक ताण न येणारे आणि आनंदी करता येईल.

हल्ली सर्वात मोठी गरज मुलांना शिस्त लावण्याची आहे. कारण, मी बघतो की, हल्ली मुले कधीही उठतात, कधीही टीव्ही बघतात, कधीही आणि कितीही जेवतात. कितीतरी तास मोबाईलवर असतात. या सर्व परिस्थितीला दोन आता वर्ष झाली आहेत. प्रत्येकाला नैराश्य, मानसिक ताण, थकवा आलेला आहे. तरीसुद्धा पालकांनी ही जबाबदारी सोडून चालणार नाही. आता आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देऊन मुलांचा घरी अभ्यास किती होतोय? त्याप्रमाणे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांमध्ये स्थूलता ही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. टीव्ही, मोबाईलचे व्यसन प्रचंड वेगाने वाढत आहे. ऑनलाईन खाणं मागवण्याची पद्धत वाढली आहे. यावर जर आळा घालायचा असेल तर मुलांना एक वेळापत्रक आणि त्या वेळापत्रकात टीव्ही आणि खाणे या व्यतिरिक्त मनोरंजनाच्या इतर गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

लॉकडाऊन किंवा निर्बंध शिथिल झाल्यानंतर गर्दी न करता घराबाहेर जाणे, सकाळी चालायला जाणे, योग्य तो व्यायाम करणे, मित्रांच्या घरी जाणे, मुलांच्या मित्रांना आपल्या घरी बोलावणे, या सर्व गोष्टी आपण पुन्हा सुरू केल्या पाहिजेत. स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्यावर शाळा लवकरात लवकर पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे २०२२ मध्ये पुढची वाटचाल केली पाहिजे.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :schoolDr Samir Dalwai
loading image
go to top