
सामान्य-असामान्य : ‘बावर्ची महाराज’
- डॉ. संजय वाटवे
सारंग भावे सॉफ्टवेअर इंजिनिअर; पण चिंतारोगाची शिकार असल्यामुळे करिअरमध्ये रखडलेला. सुमारे बारा-तेरा वर्षांपूर्वी माझ्याकडून उपचार घेऊन पूर्ण बरा झाला. मग त्याचं रॉकेट वेगानं वर निघालं. तो अमेरिकेत स्थायिक असून तीन कंपन्यांचा मालक आहे. सात-आठ वर्षापूर्वी पुण्याला आला होता. प्रत्येक व्हिजिटप्रमाणे मला फोन केला. ‘माझा धाकटा भाऊ राजेशला घेऊन यायचंय, कसंतरी तयार केलंय; पण तो एकटा येईल. त्याला कोणी बरोबर नकोय.’
मी विचारलं, ‘मॅटर काय आहे?’ सारंग म्हणाला, ‘तो खूप हरहुन्नरी व हुशार आहे. तीन विषयातल्या डिग्रीजसुद्धा आहेत; पण करिअर स्थिर नाही. सारखे विचार बदलत असतात. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असल्यामुळे मुंबईला ‘द ताज’मध्ये काम करत होता. आता नोकरी सोडून घरी बसलाय. केटरिंगची छोटी कामं घेतो.’ मी विचारलं, ‘जॉब का सोडला?’ सारंग म्हणाला, ‘पगार जास्त देतात!’ पहिला दणका. आचार्य विनोबा भावे आणि ‘बावर्ची’मधला राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन पाहायला मी उत्सुक होतो.
राजेश भावे आला. वेटिंग रूममध्ये येरझऱ्या घातल्या आणि निघून गेला. सारंगचा मला फोन आला. ‘तुमच्यात काही झालंय का? कारण तो म्हणतो त्याला डॉक्टर आवडले नाहीत.’ मी म्हणालो, ‘तो बाहेरच्या बाहेर गेला.’ सारंगनं त्याला खूप झापलं आणि दुसरी अपॉइंटमेंट घेतली. त्या दिवशी राजेश आत आला, माझ्याकडे बघितलं आणि निघून गेला. पुन्हा सारंगचा फोन. मी म्हणालो, ‘आज त्यानं मला पाहिलंय. त्यामुळे तो डॉक्टर आवडले नाहीत असं म्हणू शकतो.’ घरच्यांनी अनेक प्रयत्न केले; पण राजेश तयार झाला नाही. त्यामुळे ट्रीटमेंट हा विषय तिथेच संपला.
काही दिवसांनी सारंगचा फोन. ‘अमेरिकेला परत चाललोय. राजेशचं काम काही झालं नाही.’ मी विचारलं, ‘‘पुढच्या आठवड्यात आमच्याकडे एक पार्टी आहे. ती राजेश करेल का?’ राजेश फोनवर आला. तो म्हणाला, ‘डॉक्टर, आपण आत्ता सकाळी बोलतोय. हा माझा संध्याकाळचा नंबर आहे. मी सकाळी बोलण्याचा नंबर देतो.’ मी सकाळी बोलण्याच्या नंबरवर फोन केला.
राजेश म्हणाला, ‘ही तारीख मोकळी आहे; पण मी एकदम हो म्हणणार नाही. तुमच्या घरी येणार, स्वयंपाकघर बघणार, अटी सांगणार. आपलं जमलं तर मी येईन.’ राजेश घरी आला. सर्व गोष्टींची छाननी केली. समारंभ, मेन्यूची माहिती घेतली. निम्म्याहून मेन्यू बदलला. ‘फळं, भाज्या तुम्हाला पारखता येणार नाहीत. मी आणीन,’ असं म्हणाला. ‘पाहुण्यांशी ओळख ‘शेफ’ म्हणून करून द्यायची नाही. ‘फॅमिली मेंबर’ म्हणून करून द्यायची,’ असं म्हणाला.
अखेर पार्टीचा दिवस उजाडला. सातच्या पार्टीला राजेश चार वाजताच आला. एकटाच! एका मोठ्या पिशवीत भाज्या, फळं, तांदूळ व इतर पदार्थ होते. लगेच कामाला लागला. सर्वांत आधी माझ्या बायकोला ‘तुमची लुडबूड नको’ असं सांगून किचनबाहेर काढले. एकहाती सर्व तयारीला लागला. आम्ही त्याच्या कामाकडे बघत राहिलो.
तो फळं कापताना बघणं हासुद्धा आनंदाचा भाग होता. पाहुण्यांचं स्वागत त्यानंच केलं. ‘मेन्यू मी फोडणार नाही. टेन स्टार्टर मेन्यू आहे. गप्पा मारत मारत एकेक पदार्थ एंजॉय करा. मी पुढचे पुढचे पदार्थ गरम गरम आणीन.’ एक एक नॉव्हेल पदार्थ बनवून आणत होता. आग्रहानं खाऊ घालत होता. सर्व पाहुण्यांनी आडवा हात मारला. ते तृप्त होऊन कौतुक करत घरी गेले.
मग राजेश जेवायला बसला. तो एकटा जेवणार नव्हता. आम्ही सगळ्यांनी शेजारी बसून गप्पा मारायच्या होत्या. माझ्याशी वैद्यकीय क्षेत्रावर बोलत होता. एकदा आमच्याकडे विक्रम गोखले जेवायला आले होते. तरीही पार्टीचा नायक राजेशच होता. त्यांच्याशेजारी जाऊन बसला. अभिनय कसा जिवंत असला पाहिजे, यावर मार्गदर्शन करू लागला. राजेश नाट्यक्षेत्राबद्दल आणि विक्रम पाककौशल्याबाबत अशा गप्पा बराच वेळ झाल्या.
पार्टी संपली, की सगळ्यात वैताग म्हणजे नंतरचं आवरणं. राजेशनं भांडी विसळून ठेवली. कट्टा स्वच्छ पुसला. शेगडी चकचकीत केली. मग एक कापडी पिशवी काढली. भाज्यांची देठं, फळांच्या साली, इतर कचरा भरला. ‘मी योग्य जागी टाकीन. तुम्हाला जमणार नाही,’ असं म्हणून पिशवीला गाठ मारली.
शेवटी हिशेब मांडत बसला. सर्वसाधारण केटरींगचा अनुभव बरेच जण येऊन पसारा करणार, चवीची खात्री नाही. निम्मं काम आणि आवराआवर आपण करायची आणि शेवटी भयंकर बिल.. असा होता. हा तर ‘द ताज’चा शेफ! त्याचा हिशेब झाला. नेहमीच्या केटरींग बिलाच्या एक तृतीयांश बिल हाती पडलं. मी त्याच्याकडे पाहिल्यावर ‘बरोबर लावलंय’ असं म्हणाला. वरचे १७ रुपये सुट्टे परत केले. पिशवी घेऊन निघाला. मी विचारलं, ‘कसा आलास?’ ऐटीत म्हणाला, ‘सायकलवरून.’ एकहाती सगळी पार्टी करून, आम्हाला लाजवणारं बिल घेऊन, तत्त्वनिष्ठ ‘महाराज’ थाटात सायकल मारत निघाला.