परतीचा फराळ (डॉ. सतीश देसाई)

Dr-Satish-Desai
Dr-Satish-Desai

परतीच्या पावसाच्या वेळी ढगांचा गडगडाट वाढतो, तर परतीच्या फराळाच्या दिवसांत स्वयंपाकघरात डब्यांचा खणखणाट वाढतो.  हे तसं फसवं लक्षण असतं. परतीचा फराळ सुरू झाला असल्याचं हा खणखणाट सांगत असला तरी अजून काही दिवस फराळ असेल याची खात्री बाळगा; पण परतीच्या पावसात वातावरण अचानक ढगाळ होतं आणि तरीही कोणता ढग पाऊस आणणारा आणि कोणता तसाच जाणारा हे सांगता येत नाही, तसंच स्वयंपाकघरातल्या डब्यांबाबत झालेलं असतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परतीचा पाऊस यंदा काहीसा लांबलाच; पण त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’ न जाणवताच दिवाळी आली. या वेळची दिवाळी कमी दिवसांची वाटली. दिवाळी आली, फराळाची घाई झाली म्हणेपर्यंत ‘परतीचा फराळ’ सुरू झालाही. हो, परतीच्या पावसासारखाच परतीचा फराळही! दिवाळीच्या फराळाइतक्याच या परतीच्या फराळाच्या आठवणी असतात मनात. परतीच्या पावसासारखाच हुरहूर लावतो हा परतीचा फराळ.  

या परतीच्या फराळाची मौजच असते. दिवाळीच्या फराळाइतकाच हा परतीचा फराळ जुना आहे. ही परंपरा किती दीर्घ असावी? काही अंदाज? अगदी उपनिषद्काळापासून वेगवेगळ्या रूपांत हा फराळ सिद्ध होताना दिसतो! अकराव्या शतकातल्या ‘भोजनकुतूहल’ या ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख येतो. साधारणतः याच काळात भारतभेटीवर आलेला जगप्रवासी अल्बेरुनी यानं या दिवाळी-उत्सवाचं आणि त्यानिमित्तानं केल्या जाणाऱ्या फराळाचं वर्णन केलं आहे. आता अकराव्या शतकात दिवाळीत फराळ केला जात असेल म्हणजे परतीचा फराळ असणारच ना तेव्हाही. पण गंमत बघा, गेल्या हजार वर्षांत दिवाळीच्या फराळाचं वर्णन करणाऱ्या कुण्याही लेखकाला या परतीच्या फराळाविषयी लिहायला सुचलं नाही! दिवाळीच्या दिवसांत ‘परातीतील फराळा’वर यथेच्छ हात मारणाऱ्या कुण्याही लेखकानं ‘परतीच्या फराळा’सारख्या नाजूक हळव्या विषयाला हात घातलेला दिसत नाही. त्यासाठी एकविसाव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली. असा काही परतीचा फराळ असतो याची ‘मुखपुस्तका’त आणि ‘कायप्पा’त दोन वर्षांपूर्वी पहिली नोंद झाली. डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ‘ज्ञानकोशा’त किंवा राज्य सरकारकृत ‘मराठी विश्वकोशा’तही नसणाऱ्या नोंदी या दोन ‘नव्या विश्वकोशां’तच सापडतात हे वेगळं सांगायला नको.

एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? इथं  आम्ही आमच्याही नकळत ‘आम्ही’ असं लिहून गेलो! हा दिवाळीच्या फराळातल्या अंगभूत मेदवृद्धिगुणवर्धनाचा परिणाम बरं का! दिवाळीचा फराळ सेवन करताना ‘मी’पणा जाऊन सहजतः ‘आम्ही’पणा येण्याइतकं तन-मन विशाल होतं. काही मूळ शब्द अर्थासह याच काळात उमगतात. उदाहरणार्थ : ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ असं आपण म्हणतो; पण खरं तर ‘लिटरेचर’ हा अपभ्रंश आहे. मूळ शब्द ‘लिटर रिचर’ असा आहे. ‘परातीतील फराळ’ आणि ‘परतीचा फराळ’ या दोन्ही याद्यांत नसलेली बासुंदी लिटर लिटर रिचवणारी माणसं पेशवाईपर्यंत होती. ब्रिटिशांना त्याचा अचंबा वाटायचा आणि ते या मंडळींना ‘डॉक्टर ऑफ लिटर रिचर’ असं कौतुकानं म्हणत. चकित झालात ना! आमच्या संशोधनानं व सल्ल्यानं चकित होणारे तुम्ही काही पहिलेच नव्हेत. मराठीच्या प्राध्यापिका असलेल्या सासूबाईंनी ‘मन्मथांचे बोधामृत’ कुठं मिळेल अशी पृच्छा मजपाशी एकदा पंचामृत करता करता केली होती, तेव्हा ‘ ‘डोंगरे बालामृत’ अधिक चांगलं असतं,’ असं उत्तर आमच्याकडून मिळताच, त्याही अशाच चकित झाल्या होत्या. तर मंडळी आपण परतीच्या फराळाकडे परत येऊ या. परतीच्या पावसाच्या वेळी ढगांचा गडगडाट वाढतो, तर परतीच्या फराळाच्या दिवसांत स्वयंपाकघरात डब्यांचा खणखणाट वाढतो. हे तसं फसवं लक्षण असतं.

परतीचा फराळ सुरू झाला असल्याचं हा खणखणाट सांगत असला तरी अजून काही दिवस फराळ असेल याची खात्री बाळगा; पण परतीच्या पावसात वातावरण अचानक ढगाळ होतं आणि तरीही कोणता ढग पाऊस आणणारा आणि कोणता तसाच जाणारा हे काही सांगता येत नाही, तसंच स्वयंपाकघरातल्या डब्यांबाबत झालेलं असतं. दिवाळीच्या दिवसांत ओळखीचे वाटणारे डबे अचानक मागं-पुढं होतात आणि कोणते डबे फराळ देणारे आणि कोणते डबे नुसतेच फसवणारे हे लक्षात येत नाही. आपण मोठ्या अपेक्षेनं एखादा डबा उघडावा तर गृहिणीनं बेसनाचे लाडू गायब केलेले असतात आणि त्या डब्यातून तिखट शंकरपाळी समोर येतात. 

तमिळींची त्यांच्या लिपीप्रमाणेच वेटोळी असलेली मुरुक्कू महाराष्ट्रात येताच मराठियांच्या स्वभावाप्रमाणे थोडी काटेरी आणि खमंग-कुरकुरीत झाली. आम्ही ‘उपनिषदातली चक्रिका म्हणजे हीच’ असं म्हणत तिला चकली म्हणू लागलो. या चकल्यांवर सगळ्यांचाच डोळा. चकल्यांना मागणी अधिक. गृहिणीचा डोळा चुकवून एखादी जादाची चकली खाल्लेली असते प्रत्येकानं. त्यामुळे पूर्ण चकल्या आधी संपल्या, मग एकेक वेटोळं कमी झालेल्याही संपल्या. चकलीचे तुकडेही संपले. संपला नाही तो त्यांनी दिलेला आनंद आणि ना संपली ‘अजून हवी एखादी तरी’ ही इच्छा. उत्तर प्रदेशातली गुजिया ही गूळ-पुरणाऐवजी ओल्या खोबऱ्यानं गोबरी होत महाराष्ट्राची लाडकी करंजी झाली. तिचं ते गोडुलं रूप मनात-पोटात साठवून ठेवण्याआधीच ती आठवणीत गेलेली असते. पोट रिकामं आणि मनही अतृप्त. तिच्या केवळ आठवणी उरतात. कोकणात दिवाळीत पहिल्या दिवशी पोह्यांचे विविध प्रकार केले जातात. उर्वरित महाराष्ट्रात पोहे चिवड्यातून समोर येतात. खमंग चिवड्याचे बकाणे भरले जात असले तरी त्यातील काजूगर, बेदाणे, खोबऱ्याचे तुकडे आधी संपतात. डब्यात तळाशी मीठ-मसाला जास्त आणि पोहे कमी असा चिवडा बाकी उरतो. तोवर शेवेचा अजून एक घाणा काढून झालेला असतो. मग कविसंमेलनात शेवटी शेवटी ज्येष्ठ कवींनी जुन्या कविता नव्या उत्साहानं ऐकवाव्यात, तसा पोहे -कम-मसाला चिवडा शेवेसह तर्रीत बुडून टोमॅटो-कांद्याचा साज लेऊन मिसळ म्हणून समोर येतो...तेव्हा समजायचं की आता हा खरंच परतीचा फराळ आहे. पदार्थांची ‘एक्स्पायरी डेट’ संपायच्या आधी परतीचा फराळ संपवतेच कुशल गृहिणी.  

दिवाळी मागं गेली. आता घराघरातला परतीचा फराळ संपेल. मग पुन्हा डोळे लावायचे पुढच्या दिवाळीकडं, दिवाळीतल्या परातीतल्या फराळाकडं. तोवर, चित्रीचीही डिश न देखावी!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com