परतीचा विलंबित प्रवास... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

dr shrikant karlekar
dr shrikant karlekar

परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी...

या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी तो दुर्बळ होण्याची चिन्हं नेहमीपेक्षा थोडी लांबली असल्याचं दिसून येत आहे. सामान्यपणे सप्टेंबर महिना हा मॉन्सूनच्या प्रवासाचा अखेरचा टप्पा असतो. मॉन्सूनचा परतीचा प्रवास हा कधीही एक सप्टेंबरच्या आधी सुरू होत नाही आणि याची सुरवात नेहमीच राजस्थानच्या पश्‍चिम टोकापासून होते. मॉन्सून ही एक सूत्रबद्ध घटना असली तरी त्याच्या आगमनाची आणि परतीची वेळ जाहीर करताना गेली काही वर्षं फारच काळजी घ्यावी लागत आहे. देशातलं शेतीचं सगळं वेळापत्रक या मोसमी पावसावरच अवलंबून असल्यामुळं त्याच्या आगमनाचे आणि निर्गमनाचे दिवस आणि त्या काळातल्या पावसाच्या प्रमाणाचं पूर्वानुमान इथल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं असतं. आज आपल्याकडं भारतातल्या पर्जन्याविषयीची मोठ्या कालखंडाची आकडेवारी उपलब्ध आहे. तिच्यावरून भारतातल्या मॉन्सूनच्या आगमनाचे आणि परतीचे नेमके आकृतिबंध जसे लक्षात येत आहेत, तशी त्याची अनिश्‍चितताही प्रकर्षानं पुढं येत आहे. ता. 17 सप्टेंबरपर्यंत भारतातल्या एकूण 36 हवामान विभागांपैकी 12 विभागांत सरासरीपेक्षा नऊ टक्‍क्‍यांनी पावसाचं प्रमाण कमीच होतं. यात पश्‍चिम राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात, उत्तर कर्नाटक, रायलसीमा, बिहार, झारखंड आणि संपूर्ण ईशान्य भारताचा समावेश होतो. या वर्षी ता. 23 सप्टेंबरपासून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. ता. 20 ते 22 सप्टेंबरदरम्यान पंजाब, राजस्थान आणि हरयानामध्ये पाऊसमान वाढेल असाही अंदाज आहेच. संपूर्ण भारतातून 25 सप्टेंबरनंतर किंवा कदाचित त्यानंतरही काही दिवसांनी मॉन्सून पूर्णपणे माघारी परतलेला असेल.

सन 2015 मध्ये मॉन्सूननं चार सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र, तेवढा अपवाद वगळता गेली काही वर्षं सातत्यानं हा काळ विलंबित (Delay) होत असल्याचंच जाणवतं आहे. भारताच्या वायव्य टोकापासून आरंभ होणाऱ्या या निर्गमनाची सुरवात ता. एक सप्टेंबरला अलीकडच्या काळात होतंच नाही. सन 2013 मध्ये नऊ ते 14 सप्टेंबर या काळात गंगानगर, बिकानेर आणि बारमेरपासून मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला होता. सन 2011 पासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास ता 23 सप्टेंबरनंतरच सुरू होतो आहे. असं असलं तरीही संपूर्ण भारतातून ऑक्‍टोबरच्या अखेरीपर्यंत मॉन्सून पूर्णपणे परतलेला असतो.

सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये एखाद्या प्रदेशात सलग पाच दिवस पाऊस न पडणं हे त्या भागातून मॉन्सूनचं पूर्ण निर्गमन झाल्याचं महत्त्वाचं लक्षण मानण्यात येतं. हवेतल्या आर्द्रतेत झपाट्यानं होणारी घट आणि तपांबराच्या (Troposphere )खालच्या थरात 850 हेक्‍टापास्कल किंवा त्याहूनही कमी वायुभाराच्या प्रत्यावर्ताचं अस्तित्व ही त्याची आणखी काही लक्षणं. ता. 23 सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर लंबरूपात प्रकाशत असतो. या दिवसाला शरदसंपात्‌ (Autumnal Equinox) असं म्हटलं जातं. त्यानंतर माथ्यावरच्या सूर्याचं भ्रमण विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे होऊ लागतं. खऱ्या अर्थानं यानंतरच मॉन्सून भारतीय उपखंडातून माघार घेऊ लागतो. कारण, याच काळात भारताच्या वायव्य प्रदेशावरची लघुभारप्रणाली दुर्बळ होऊ लागते. सप्टेंबरच्या अखेरीस नैर्ऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण अगदी नगण्य होतं. हवा अधिक स्वच्छ होते आणि आकाश निरभ्र होऊ लागतं. मॉन्सूनच्या परतीची ही प्रक्रिया संथ गतीनं होते. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून भारताच्या 60 ते 70 टक्के भागातून मॉन्सून पूर्णपणे संपलेला असतो. ता. 23 सप्टेंबरनंतर आंतरआयनिक अभिबिंदुता प्रदेशही (Inter Tropical Convergence Zone, ITC ) विषुववृत्ताच्या दक्षिणेकडं सरकू लागल्यामुळं उत्तरेकडच्या ध्रुवीय हवेचे प्रवाह विषुववृत्ताकडं येऊ लागतात. तपांबरातला पश्‍चिमी जेट प्रवाह हिमालयाच्या दक्षिणेला पुनर्स्थापित होतो.

वायव्य भारत पूर्णपणानं प्रत्यावर्ती (Anticyclonic) हवेच्या प्रभावाखाली आल्यामुळं पश्‍चिमेकडून कोरडे वारे वाहू लागतात. ईशान्येकडून येणारे वारे बंगालच्या उपसागरावरून येताना बाष्पानं संपृक्त होतात आणि आंध्र व तामिळनाडूच्या किनारी पट्ट्यात भरपूर पाऊस देतात. सामान्यपणे सप्टेंबरमध्ये बरेच वेळा रिमझिम पावसाची वृत्ती आढळते, तर काही वेळा भरपूर पाऊसही पडतो. मॉन्सून परतीचा होऊ लागला की मग मात्र विजांचा गडगडाट, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस ह्या घटना हमखास दिसून येतात. पावसाची समाप्ती, ढगांच्या आवरणात होणारी घट, हवेत होणारे बदल, आर्द्रतेत होणारी घट, तापमानात होणारी वाढ आणि राजस्थानात प्रत्यावर्ती प्रणालीला सुरवात असे या परतीच्या प्रवासाचे निकष मानण्यांत येतात. हे सर्व घटक अभ्यासून नंतरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरवात हवामान खात्यामार्फत जाहीर केली जाते. उन्हाळ्यात नैर्ऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचं चक्र बदलून ऑक्‍टोबरनंतर वारे ईशान्येकडून वाहू लागणं

हे भारतीय मॉन्सूनचं महत्त्वाचं लक्षण आहे. मॉन्सूननं भारतीय उपखंडातून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर हवेत हळूहळू लक्षणीय बदल होऊ लागतात. उष्ण पावसाळी ऋतूचं रूपांतर कोरड्या हिवाळी ऋतूत होऊ लागतं. परतीच्या मॉन्सूनची गेल्या काही वर्षांची तऱ्हा मात्र वेगळीच असल्याचंही लक्षात येतंय. कधी सकाळपासून, कधी दुपारी, नाहीतर संध्याकाळी आणि रात्री-बेरात्री परतीचा हा मॉन्सून नुसता ओतत असतो. वाजत-गाजत येणारा मॉन्सून जातानाही पूर्वीसारखाच वाजत-गाजतच जाईल खात्री देता येत नाही!

महाराष्ट्रातून सामान्यपणे ता. एक ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान मॉन्सूनचं पूर्ण निर्गमन झालेलं असतं. गेल्या वर्षी ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत लांबलं होतं. या वर्षी भारतात आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणं परतीच्या मॉन्सूनच्या तडाख्यात सापडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परतीच्या मॉन्सूनच्या काळात बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागावर आणि पश्‍चिम बंगाल व ओडिशावर तीव्र लघुभार तयार होतो व बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत दोन हजार मीटर उंचीवर लघुभाराची द्रोणी (Depression) तयार झाल्यामुळं पावसाचा जोर वाढलेला असतो. त्यामुळं या काळात मध्य भारतापासून महाराष्ट्रापर्यंत वादळी वृष्टीची शक्‍यताही असते. परतीच्या अखेरच्या दिवसांत पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होते व मॉन्सून वर्षभराकरता देशातून निरोप घेतो. अर्थातच हे एका विलक्षण अस्थिर व काहीशा क्‍लिष्ट; पण शास्त्रशुद्ध यंत्रणेबद्दल केलेलं भाकीत असतं हे विसरून चालणार नाही. संपूर्ण मॉन्सूनप्रमाणेच त्याच्या परतीची यंत्रणाही शिस्तबद्ध असली तरी तीत अनिश्‍चिततेचं प्रमाणही तेवढंच मोठं आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com