अवांतर संधीकडे द्या लक्ष (डॉ. श्रीराम गीत)

डॉ. श्रीराम गीत
शनिवार, 11 मे 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "Edu" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या
कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच आहे. मात्र त्यानंतर चांगली नोकरी, चांगली करिअर करायची गरज असल्यास त्या ‘तशा’ पदवीची कागदाचे एक भेंडोळे या पलीकडे मूल्य जात नाही.

मग ही मूल्यनिर्मितीसाठीची तीन वर्षे जी मुले-मुली नीटपणे उपयोगात आणतात त्यांची फक्त बी.कॉम. असूनही करिअर सुरू होते. कार्यानुभव असा मोठा शब्द वापरायची जरूर नाही. मात्र, घरातून बाहेर पडल्यापासून घरी परतेपर्यंत दिसणाऱ्या, घडणाऱ्या विविध गोष्टींची किमान नोंद घेऊन त्यावर विचार सुरू करणे ही एक सुरवात असते. 

भेळ खाल्ली, पिझ्झा खाल्ला, थिक कॉफी प्यायलो. दिलेले बिल व तो व्यवसाय करणारा, त्याला झालेला नफा याचा विचार डोक्‍यात घेऊन घरी येणारा विद्यार्थी कॉमर्स शिकत असतो. अन्यथा, एकशेवीस रुपयांचा स्पेशल डोसा खाऊन ढेकर देणारा फक्त विचारतो, ‘मम्मा पुन्हा कधी जायचे?’ खरेदी, विक्री, नफा, टॅक्‍सेस, खतावणी हे पुस्तकी ज्ञान त्याच्या डोक्‍यात व क्‍लास भरतच असतात. मात्र, स्वतःच्या आवडत्या दुचाकीत भरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे बदलते भाव चौकसपणे समजून घेणारा विद्यार्थी करिअर करतो. फक्त एअरटेल, आयडिया, जिओच्या डेटावर घनघोर चर्चा करणारे सर्वत्र सापडतातच. टीव्हीवरच्या आकर्षक जाहिराती सीझननुसार, चॅनलनुसार, वेळेनुसार कशा बदलतात व त्याच जाहिरातींचे स्वरूप वृत्तपत्रात कसे दिसते हे जाणून घेतले तर एक फार मोठे विश्‍व शिकायला मिळत असते. नाहीतर दीपिका, आलिया, वरुण, रणवीर यांच्यावर खिळवून हाती रिकामी पदवीच मिळणार असते. 

जमले तर उमेदवारी करा. त्यासाठी इव्हेंट कंपन्या, पर्यटन कंपन्या, मुलांचे ट्रेक नेणाऱ्या संस्था आहेत. डॉक्‍टर, वकील, टॅक्‍स कन्सल्टंट, रिटेल स्टोअर यांच्याकडे फ्रंट ऑफिस हाताळणे, सांभाळणे हे तर नक्की शक्‍य असते आणि हो कॉम्प्युटरवर काम करणे नक्की शिका. खेळणे नको. त्यात आपण १२ वर्षे घालवलीच आहेत ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Shriram Geet article Give attention to the opportunity