दरारा, दुरावा आणि दुर्वर्तन (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

भीती दाखवल्याशिवाय मुलं सुधारणार नाहीत, हे आपल्या मनामध्ये कुठं तरी पक्कं असतं. अंधाराची भीती दाखवण्यापासून चटके देण्याची शिक्षा करण्यापर्यंत अनेक गोष्टी पालक करतात. भीती दाखवल्याशिवाय, शिक्षा केल्याशिवाय मुलं सुधारणारच नाहीत, असा ग्रह बहुतेक सगळ्यांच्या मनात असतो. त्यामुळंच अनेकदा मोठे लोकसुद्धा दंड, शिक्षा केल्याशिवाय शिस्त पाळताना दिसत नाहीत. त्यासाठी स्वयंशिस्तीची जाणीव मुलांमध्ये निर्माण करणं आवश्‍यक आहे. लहान मुलांच्यात ती रुजली, की आपोआपच सगळ्यांमध्ये रुजायला सुरवात होईल.

आपण मुलांना भीती दाखवत नाही तोपर्यंत ती सुधारणार नाहीत, हे आपल्या मनामध्ये कुठं तरी पक्कं असतं का? पालक म्हणून केवळ आपलीच अशी धारणा आहे असं नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचीच तशी धारणा आहे. कदाचित आपल्या सर्वांच्या बालपणात याच सगळ्या गोष्टी रुजून आणि रुतून बसल्या आहेत. कारण आपण मुलांना जिथंतिथं भीती दाखवत असतो. भीतीनं नियंत्रित करत असतो. आपल्याशी मोठी माणसं जशी वागली, त्याच अनुभवांचे पडसाद पुढे उमटतात.
याची पहिली सुरवात अगदी सहज होते ती म्हणजे अंधाराची भीती दाखवण्यापासून. "अंधार आहे', "अंधारात बागुलबुवा असतो', "अंधारात भूत असतं', अशी अनेक प्रकारची भीती दाखवतो. "तिकडं वाघोबा आहे', "कोपऱ्यावर बसलेला म्हातारबाबा तुला घेऊन जाईल,' असं काहीही बोलतो. हळूहळू मुलांना असं काही नसतं, हे एक दिवस कळतं आणि मग या गोष्टींची त्यांना भीती वाटेनाशी होते. यानंतर भीतीचा पुढचा अध्याय सुरू होतो. साधारणपणे सगळे जण पोलिसांची, डॉक्‍टरांच्या इंजेक्‍शनची भीती दाखवतात. "आपण चुकीचं वागलो, तर पोलिस आपल्याला घेऊन जातील', "आपण नीट जेवलो नाही, आई-बाबांचं ऐकलं नाही, आई-बाबांना किंवा आजी-आजोबांना लाथ मारली, तर पोलिस उचलून घेऊन जातात,' अशी भीती दाखवली जाते. यानंतर सुरू होते ती रागवण्याची आणि मारण्याची भीती. "मी तुला मारीन' असं म्हटलं, की आणि तसं करून दाखवलं, की मुलं आपोआप माराला भिऊन निमूटपणे ऐकतात. याशिवाय थोड्या वेगळ्या प्रकारच्या भीतीसुद्धा दाखवल्या जातात. यामध्ये "उदबत्तीचा, मेणबत्तीचा चटका देईन', "तू असं केलं, तर मी मरून जाईन, निघून जाईन,' असं म्हणताम्हणता एक दिवस एखाद्या मुलाला खरोखरच चटका दिला जातो. त्यानंतर त्या मुलाला ज्या वेदना होतात, त्या शारीरिक असतात- मानसिक असतात. त्याच्या मनात कायमस्वरूपी धक्का निर्माण होतो. आत्तापर्यंत प्रेमानं वागणाऱ्या आई-बाबांचा हा नवाच चेहरा लेकराला दिसतो. हा धक्का देणंच तर पालकांना अपेक्षित असतं. नाही का?

आयुष्यभर पुरून उरणारी अजून एक भीती म्हणजे देवाची भीती. "आपण जेव्हाजेव्हा चुकीचं वागतो, तेव्हा देव वरून बघत असतो आणि आपल्याला तो शिक्षा करतो,' या प्रकारची "सर्वधर्मीय' भीती इतकी जालीम आहे, की माणसं कितीही मोठी झाली तरीसुद्धा ही भीती मनातून जात नाही. ज्या वेळेला मूल मोठं होतं आणि आता ते आपल्या हाताबाहेर चाललं आहे अशी परिस्थिती निर्माण होते, त्या वेळेला देवासमोर मुलांना उभं करून केलेल्या पापांची, दुर्वर्तनाची कबुली घेतली जाते आणि मग त्या वेळेला योग्य वाटेल ती भीती आई-बाबा किंवा आजी-आजोबा मुलांना देवाच्या साक्षीनं घालतात.

शाळेत तर शिस्त लावण्यासाठी भीती पाहिजेच. भीतीचं प्रमाण वाढतं, प्रकार बदलतात आणि परिणाम जास्त गहिरे होत जातात. शाळेतल्या सर्व शिक्षा आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेत. पूर्वीसारख्या शारीरीक शिक्षा आता कमी झाल्या असल्या, तरीसुद्धा शिस्त लावण्यासाठी शिक्षा हाच एकमेव उपाय आपल्याकडे सर्रास वापरला जातो.

अशा वेळेला प्रश्न निर्माण होतो, की लहान मुलांच्या जगात आपण खरंच त्यांचे मित्र आहोत, मदतनीस आहोत, पालक आहोत, शिक्षक आहोत की फक्त अधिकारी आहोत? आपण कायम दुसऱ्या कोणाची भीती दाखवण्यात धन्यता बाळगतो. मोठ्या माणसांनी मुलांशी कायम मोठ्या आवाजात, रागावून, डोळे वटारून, धमकीच्या सुरात बोललं पाहिजे, असा काही नियम आहे का? जोपर्यंत आपण असं बोलत नाही तोपर्यंत मुलं आपलं ऐकणारच नाहीत? मुलांना शिक्षा करण्याची भीती दाखवली नाही, तर मुलं पूर्णपणे बिघडतील, कोणाचंही ऐकणार नाहीत, त्यांना कसलंही वळण लागणार नाही, हे आपण गृहीत धरून चाललो आहोत का? शिक्षा केल्याशिवाय मुलं सुधारत नाहीत, असं वाटत असेल तर मुलांना स्वयंशिस्त अजिबातच लागत नाही त्याचं काय?
आसपास, रस्त्यावर, कॉलेजेसमध्ये, घरी मुलं सुधारलेली दिसताहेत का? अन्य देशांमधली तरुणाई जास्त शिस्तीची का दिसते? ते लोक इकडंतिकडं कचरा का टाकत नाहीत? सार्वजनिक सेवा आणि वस्तू प्राणपणानं का जपतात? वेळ का पाळतात? माणूस म्हणून ते काही वेगळे आहेत का? इतर देशांमध्ये किती स्वच्छता पाळली जाते, हे एकमेकांना सांगण्यातच आपल्याला धन्यता वाटते; पण या गोष्टी आपण का करू शकत नाही?... या सगळ्याचं मूळ "जे सांगितलेलं आहे, तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही,' या आपल्या वाक्‍यामध्ये आहे का हे एकदा तपासून बघण्याची गरज आहे.

शिस्त लावण्याचं महत्त्व कोणीच नाकारत नाही. घरीदारी सर्वत्र शिस्त असायला हवी. ती सगळ्यांनी पाळायला हवी. नियम केला म्हणून शिस्त पाळली जातेच असं नाही; पण शिक्षा केली, की मग मात्र ती पाळली जाते हे आपल्या मनामध्ये इतकं घट्ट रुतून बसलेलं आहे, की त्यामुळंच साधेसाधे नियमसुद्धा आपण पाळत नाही. शेवटची तारीख येत नाही तोपर्यंत आपण इन्कम टॅक्‍स भरण्याचे कष्ट घेत नाही. एका सिग्नलला पोलिस आहेत म्हणून आपण झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडं गाडी थांबवतो; मात्र तिथून पुढं गेल्यावर दुसऱ्या सिग्नलजवळ पोलिस नसल्यास आपली गाडी सरळ पुढं जाते. अशा वेळेला मनात कोणतीही चलबिचलसुद्धा होत नाही. जोपर्यंत शिक्षा नाही, दंड नाही तोपर्यंत आपण नियम पाळत नाही. हे दुसऱ्याची भीती असल्यामुळंच. हा "दुसरा' तिथं नसेल, तर नियम मोडणं तसंच चालू राहतं. "दुसऱ्या कोणासाठी तरी नाही, तर मला स्वत:ला बेशिस्त, अस्वच्छता, उशीर चालत नाही, म्हणून मी स्वत:हून शिस्त पाळणार, स्वच्छता ठेवणार,' ही भावना मुलांमध्ये निर्माण करणं आवश्‍यक आहे.
हे कसं घडून येईल?
- मोठ्या माणसांच्या अनुकरणातून.
- स्वयंशिस्तीनं वागणाऱ्या माणसांच्या गोष्टी सांगून
- प्रत्येक गोष्ट "अशी' केली जाते, अजून चांगल्या पद्धतीनं करायची असल्यास "कशी' केली जावी, याचा विचार त्यांनाच करायला लावून.
- जबाबदारी देऊन.
आपण दरारा निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्यात यशस्वी होतो; पण यामुळं स्वयंशिस्त निर्माण होत नाही. दुरावा मात्र वाढतो. तो काय कामाचा? परीक्षेत भरपूर मार्क्‍स कसे पडतील, याची आपल्याला काळजी असते; पण मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकास कसा होईल इकडं लहानपणापासून लक्ष द्यायला हवं. "योग्य वेळी', "कमीत कमी शब्दांत', "मुलांच्या भावनिक पातळीवर जाऊन' बोलणं आणि स्वत: तसं करणं- हे पथ्य आपल्याला पाळता आलं, तर बरीच मजल मारता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com