सुखी घर (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

आपलं घर सुखी, समाधानी असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, अनेक घरांमध्ये ताणाचं, नकारात्मक वातावरण असतं. त्याचा मुलांवरही परिणाम होत असतो आणि नात्यांमध्येही भिंती तयार होतात. नकारात्मकता येणारच नाही, असं नाही; मात्र त्या नकारात्मक भावनांमधून बाहेर काढण्याचे मार्गही शोधले पाहिजेत. पालक योग्य वर्तन करायला शिकले, तर मुलं ते बघून हळूहळू शिकतील. नकारात्मक भावना येऊ नयेत म्हणून आपण कोणते प्रयत्न करतो, हे पालकांनी वाढत्या वयातल्या मुलांशी आवर्जून बोलायला हवं. अशा गोष्टींतूनच सुखी घराच्या चित्रात रंग भरता होऊ शकतील.

आपलं घर सुखी, आनंदी, समाधानी असावं, घरातल्या सर्व लहानमोठ्या माणसांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहावं, एकमेकांना मदत करावी, कधीही कोणीही एकमेकांवर आवाज चढवून बोलू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरातली काही माणसं यासाठी फारच प्रयत्नशील असतात. ही माणसं नेहमीच घरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

- "आता घरात वाद निर्माण होणार' अशी चिन्हं दिसायला लागली, की ही माणसं हातातलं काम सोडून वाद वाढू नये, याचा आधी प्रयत्न करतात.
- स्वत:चा इतरांशी वाद होऊ नये आणि घराचं वातावरण बिघडू नये म्हणून आधीच पराभव पत्करतात, स्वत: शांत राहतात. दुसऱ्यांना शांत करतात. अशी माणसं स्वत:बरोबर घराच्या प्रगतीचा विचार करतात.
- घरच्यांच्या कानावरून चांगले विचार जावेत, चांगलेच मार्ग त्यांना दिसावेत, योग्य दिशा कळाव्यात, यासाठी ती अखंड प्रयत्नशील असतात.

अशा माणसांमध्ये कदाचित आई असते, कदाचित बाबा. कदाचित आजी किंवा आजोबा. एखाद्या घरामध्ये अकरावी-बारावीतलं जरा मोठं होत असलेलं मूलही घराचा, घरातल्या माणसांचा खूपच विचार करताना दिसतं. अशा प्रयत्नांनंतरही घरामध्ये वादावादी होते. धुसफूस चालू होते. कोणाचं तरी घरातल्या इतरांशी मुळीच पटत नसतं, त्यामुळं चंद्र-सूर्यासारखं एक घरात आहे, तर दुसरा नाही; दुसरा गेल्यावरच पहिला घरात येणार, हे ठरलेलं असतं. त्यामुळं घर आनंदी नसतं.
काही घरांमध्ये भीती ही भावना मोठ्या प्रमाणात दिसते. घरातल्या एक-दोन व्यक्ती इतरांच्या मनात भीती निर्माण करण्यात यशस्वी होतात. उदाहरणार्थ, बाबा. ते घरी आले, की घरात कोणी कोणाशी बोलायचं नाही, टीव्ही मुकाटपणे त्यांच्या हवाली करायचा, सर्व गोष्टी त्यांच्या कलानं घ्यायच्या, त्यांना विचारल्याशिवाय कोणी काही करायचं नाही, अशी भीती काहींनी निर्माण करून ठेवलेली असते. असं झालं नाही तर मुलांवरच नव्हे, तर पत्नीवर हात उचलणारे अनेक महाभाग 2018 मध्येही आहेत- आपल्या आसपास आहेत. आपलं घर बदनाम होऊ नये म्हणून याबद्दल बाहेर वाच्यता केली जात नाही. वास्तविक आपल्याला कल्पनाही येणार नाही असा घरगुती हिंसाचाराचा प्रकार कित्येक घरांमध्ये दबल्या पावलांनी चालू आहे. काही घरांमध्ये उघडपणे हात उचलला जात नाही; पण वेगवेगळ्या प्रकारे घरच्यांना दहशतीखाली ठेवलं जातं. त्यांच्या प्रगतीच्या वाटा रोखल्या जातात. जास्त हसूनखेळून राहिलं, तरी भुवया उंचावल्या जातात.

ज्या घरांमध्ये भीती आहे, त्या घरातल्या माणसांचं "सुखी घराचं चित्र' कसं पूर्ण होणार? अनादराचा किडा अनेक नात्यांना पोखरत जातो. चेष्टा-मस्करी, थट्टा कुठं संपते आणि इतरांना घालूनपाडून बोलणं कुठं सुरू होतं, यात एक सीमारेष आहे. आपल्या घरातल्या इतर माणसांच्या सवयी, त्यांना मिळालेलं अपयश याचा इतक्‍या वेळा आणि प्रत्येक वेळा जास्तीत जास्त वाईट पद्धतीनं उल्लेख केला जातो, की लहान मुलांनाही हे लगेच समजतं. अशा वेळी काही घरांमधली मुलं ही ज्याच्याबद्दल/ जिच्याबद्दल सातत्यानं अनादर व्यक्त होतो, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी जवळीक साधतात. त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते आणि वाईट बोलणाऱ्याबद्दल अनादर निर्माण होतो. काही घरांमध्ये याच्या बरोबर उलटं घडतं. ज्याच्या/जिच्याबद्दल सतत अनादर व्यक्त केला जातो, तिच्याबद्दल सगळेच अनादर व्यक्त करतात. ती व्यक्ती एकटी पडते. स्वत:च्या मनातलं योग्य शब्दात मांडण्याचं कौशल्य तिच्याजवळ नसतं.

आपल्याच घरातल्या एका व्यक्तीला अनादरानं वागवून सुखी घराचं चित्र पूर्ण होणार नाही, हे घरातल्या मोठ्या माणसांनी कायम लक्षात ठेवायला हवं. आपल्या घरात परस्परांबद्दल जिव्हाळा वाटत नसेल, तर याची कारणं शोधायला हवीत. केवळ वरवरची कारणं नाहीत, तर पूर्वीपासूनची कारणं शोधायला हवीत. राग, वाद, भीती, अनादर, असमाधान, कोणाच्या आजारपणामुळं घरात निर्माण झालेली खिन्नता, मूल वयात येत असताना उडणारे खटके, नोकरी-व्यवसायात खूप जास्त लक्ष दिल्यामुळं लहानग्यांची आपल्याकडून होत असणारी परवड, त्यातून मनात येणारी अपराधभावना, आर्थिक चिंतांमुळं झाकोळलेलं वर्तमान, "आपल्या हुशार- कलाकार मुलांना खूप काही द्यायचं आहे; पण देऊ शकत नाही,' या चिंतेनं ग्रासलेले आई-बाबा, वाढत्या वयातल्या मुलांच्या चैनीच्या, चंगळवृत्तीपुढं हतबल असणारे आईबाबा. आपली मुलं योग्य दिशेला जात नाहीयेत, त्यांची दिशा चुकताना दिसते आहे; पण काय करावं हे न समजणारे आणि त्या सगळ्याचा ताण स्वत:च्या जिवावर घेऊन प्रकृतीवर परिणाम करून घेणारे आई-बाबा. घरात अभ्यास करणारी मुलं आहेत हे माहीत असूनही यथेच्छ जोरात स्वत:च्या भांडणांचा आवाज वाढवणारी घरातली माणसंही आहेत. कधीकधी तर मोठी माणसंच अत्यंत बालिशपणे घरात वावरत असतात, की "आपण मोठे झालो आहोत म्हणजे नक्की काय,' असा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारावा. सुखी घरामध्ये कोणीतरी एक नाही, तर सगळे सुखी असतात.
सुखी घरामध्ये दु:ख येतंच नाही का? येतं! नकारात्मक भावना येतात; पण त्यांना दूर करण्यात यशस्वी ठरतं, ते खरं सुखी घर! यासाठी एकदा प्रामाणिकपणे स्वत:सह घराला एका मोठ्या आरशात बघा. स्वत:मधले गुण शोधा. दोष शोधा. स्वत:ला नकारात्मक भावनांमधून बाहेर काढण्याचे मार्गही शोधा. वाद, भांडणं, भीती, अनादर व्यक्त करणं, चिंतेत राहणं यासारख्या नकारात्मक भावनेतून नव्या नकारात्मक भावनाच जन्माला येणार आहेत, हे नक्की! आपण योग्य वर्तन करायला शिकलो, तर मुलं आपलं बघून हळूहळू शिकतील. कोणत्या नकारात्मक भावनेपुढं घरातल्या कोणीही अगतिक होऊन जायचं नाही, हे ठरवायला हवं. नकारात्मक भावना येऊ नयेत म्हणून आपण कोणते प्रयत्न करतो, हे वाढत्या वयातल्या मुलांशी आवर्जून बोलायला हवं. अनेकदा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट जमली नाही, तर तेही बोलायला हवं. त्यांचा सल्ला विचारायला हवा.

नकारात्मक भावनांमुळे आपल्या घरात आनंद नसेल, तर त्या भावनांवर कशी मात करायची हे सगळ्यांनी बसून ठरवा. मनात राग, भीती, चिंता असेल तर आपल्याही नकळत कशा चुका घडतात आणि त्या बदलणं कसं अवघड जातं, हे मुलांशी बोलायला हवं. सध्याची परिस्थिती आत्यंतिक ताणाची आहे. या ताणांमुळं आपण साधासाध्या गोष्टींमध्ये आनंद घेऊ शकत नाही. मुलांनी कायमच आपला दुर्मुखलेला चेहरा पाहिला, तर मुलं यातून काय बोध घ्यायचा तो घेतील. आपल्या मनासारखं नेहमीच घडत नसतं, हे खरं आहे; पण अशा परिस्थितीला वारंवार हाताळावं लागतं, त्याचे काय काय पर्याय असू शकतात, मार्ग कसे काढायचे, याची उदाहरणं त्यांच्यासमोर ठेवायला हवीत. अशाच प्रसंगातून पुढच्या काळात मुलांनाही जावं लागणार आहे. तेही असेच नकारात्मकतेच्या छायेत राहू नयेत, त्यांनी स्वत:चा सकारात्मक, आशावादी मार्ग काढावा, यासाठी त्यांना तयार करायची हीच संधी आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असतात. "फेसबुक', "इन्टाग्राम'वर "लई भारी फॅमिली फोटो' असतात. तेच सुखी घराचं चित्र प्रत्यक्षातही असायला हवं. त्यासाठी या दिशेनं जायला हवं ः
- नकारात्मक भावनांना ओळखता येणं
- त्या स्वीकारणं
- स्वीकारल्यानंतर जास्तीत जास्त लॉजिकल पद्धतीनं त्यावरचे उपाय सुचवणं
- उपाय अमलात आणणं
नव्या पिढीला नकारात्मकतेच्या चक्रात घालायचं नसेल, तर अशा भावना वारंवार येणारच आहेत, त्यांना पिटाळून कसं लावायचं, हे शिका आणि त्यांना शिकवा... तर ते "सुखी घरा'चं चित्र प्रत्यक्षात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com