उंबरठा (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे drshrutipanse@gmail.com
रविवार, 2 डिसेंबर 2018

पालक मुलांसाठी खूप काही करत असले, तरी सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं होत नाहीत. घरापलीकडच्या अनेक गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करत असतात. त्यामुळं घरात मुलं समजा पालकांच्या मनासारखी वागत असली, तरी बाहेर वेगळंच काही करत असतात.
हे ज्या क्षणी समजतं, तो क्षण सगळ्यांसाठीच विचित्र असतो. मात्र, हा क्षण नवं नातं तयार करण्यासाठी एक संधीही असते. हा अत्यंत परीक्षेचा क्षण पालकांना पराकोटीच्या शांततेत आणि तर्कशुद्धपणे सोडवता आला, तर मूल निदान अजून घसरत नाही.

पालक मुलांसाठी खूप काही करत असले, तरी सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं होत नाहीत. घरापलीकडच्या अनेक गोष्टी मुलांच्या मनावर परिणाम करत असतात. त्यामुळं घरात मुलं समजा पालकांच्या मनासारखी वागत असली, तरी बाहेर वेगळंच काही करत असतात.
हे ज्या क्षणी समजतं, तो क्षण सगळ्यांसाठीच विचित्र असतो. मात्र, हा क्षण नवं नातं तयार करण्यासाठी एक संधीही असते. हा अत्यंत परीक्षेचा क्षण पालकांना पराकोटीच्या शांततेत आणि तर्कशुद्धपणे सोडवता आला, तर मूल निदान अजून घसरत नाही.

बालमानसशास्त्र या शाखेचा गेल्या चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी उगम झाला. सुरवातीला क्षीण असणारी ही गोष्ट आता चांगलीच रुजली आणि फोफावली. पालक शहाणे झाले. पूर्वी मुलांशी वागायचं म्हणजे ठोकशाहीने वागायचं असा एक सर्वसाधारण पायंडा होता. (सगळ्या घरांमध्येच हे घडत असेल असं नाही; पण अभ्यास केला नाही- ठोकायचं, खोटं बोलला- ठोकायचं, हा एकच मार्ग असल्यासारखा वापरला जायचा. अजूनही कित्येक घरात वापरला जातो.) बालमानसशास्त्र आल्यावर निदान काही घरांमध्ये हे चित्र बदलायला हळूहळू सुरुवात झाली. लोक नव्या नजरेनं आपल्या मुलांच्या वाढीकडे, त्यांच्या विकासाकडे बघू लागले. त्यांचे हट्ट, बेशिस्त, खोटं बोलणं अशा काही गोष्टींत एकदम टोकाची भूमिका न घेता, ती भूमिका विचारपूर्वक घेऊ लागले. कधी आई, तर कधी बाबा सामंजस्यानं पुढे होऊन हे प्रश्न सोडवायला लागले. हे प्रश्‍न शांतपणानं सोडवल्यामुळे काही प्रश्न सुटलेही. काही प्रश्नांसाठी अन्य व्यक्तींची मदत घ्यावी लागली असेल; पण प्रश्न सुटले. भिजत ठेवलेले प्रश्न सुटत नाहीत. उलट ते वेगळंच रूप घेऊन पुनःपुन्हा भेडसावतात. मात्र, बालमानसशास्त्राचा विचार करून आई-बाबांनी त्यांच्यासमोरचे प्रश्न विविध मार्गांनी सोडवायला सुरवात केली.

आपल्याशी आपले आई-बाबा कसे वागले, यांचंही विश्‍लेषण या नव्या पालकांनी केलं. कोणत्या प्रसंगांत त्यांनी समजून घेतलं, कोणत्या प्रसंगात शिकवलं, याचा विचार केला. आपल्याशी आपले आई-बाबा फारच "वाईट' वागायचे, हे ज्या नव्या पालकांना जाणवलं, त्यांनी "आपल्याला मुलं होतील तेव्हा आपण त्यांना "समजून' घ्यायचं, त्यांना दुखवायचं नाही,' असं ठरवलं. त्याप्रमाणं पालक वागलेही.

ज्यांना ते सातत्यपूर्ण पद्धतीनं करायला- वागायला जमलं, त्यांची मुलंही त्यांच्याशी चांगली वागताना दिसायला लागली. काही पालकांना मुलं टीनएजमध्ये येईपर्यंत चांगलं वागायला जमलं. पुढं जेव्हा, टीनएजचा वादळी काळ जवळ यायला लागला, तसं पालकत्वही जास्तच वादळी होत गेलं. आत्तापर्यंत ऐकणारं मूल अचानक कोणतंही कारण नसताना ऐकेनासं होतं, स्वत:चं (पालकांना ठाम चुकीचं वागणारं) मत दामटून रेटायला बघतं आणि हे फक्त मताच्या पातळीवर न राहता, कृतीत उतरवायला बघतं, तेव्हा तर सगळा बांध फुटतो. रणकंदन सुरू होतं.
आजपर्यंत प्रेमानं वागणाऱ्या आई-बाबांना अचानक झालं तरी काय, हे मुलांना समजत नाही. काही मुलं आपलं काहीतरी चुकलंय हे समजून जातात, तर काही मुलाच्या मनात येतं, की "हा माझ्यावर अन्याय आहे. तुम्ही माझ्याशी असं वागूच कसं शकता? तुमची एक "टीम' आहे आणि मी बाहेरचा/ बाहेरची आहे.' असे विचार मनात येऊन ते आई-बाबांशी तुटक वागायला लागतात. कधीकधी घरापासून तुटतातही. काही मुलांच्या मनात "माझ्याशी वाईट वागणारे सगळे दुष्ट आहेत. मी या जगात एकटाच आहे. मला कोणी नाही. माझे आई-बाबासुद्धा माझे कोणी नाहीत.' अशा प्रकारांची आवर्तनं मनात रेंगाळायला लागतात.

...आणि इथंच आई-बाबांना वाटायला लागतं ः "आपलं नक्की काय चुकलं? आपण मुलांना छान समजून घेतलं, आपल्या परीनं जे जे शक्‍य होईल ते सगळं पुरवलं, कुवतीपेक्षा चांगल्या शाळेत घातलं, क्‍लासला घातलं. आईनं तर उत्कृष्ट आणि आदर्श बालसंगोपनासाठी नोकरी केली नाही किंवा असलेली चांगली नोकरी सोडली. तरीही मुलं अशी का वागतात? हेच का फळ?' असं वाटायला लागलं, तर त्यात चुकीचं काही नाही. बालमानसशास्त्रानुसार, आई-बाबा हे मुलांचे मदतनीस असायला हवेत, मित्र असायला हवेत. आई-बाबांना मुलांशी मैत्री करायची असते; पण मुलं कुठं तयार असतात? यात आई-बाबांनी समजून घ्यायला हवं, की तंत्रज्ञानातली बहुदिश क्रांती ही नात्यांवर परिणाम करते आहे. याचे काही चांगले परिणाम आहेत, तसेच याचे वाईट परिणामही आहेत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांना वाढवताना आपण याचा विचार केला नव्हता. आणि करणार तरी कसा? कारण ही संपूर्णपणे नवी गोष्ट आहे. त्याची व्याप्ती आणि खोली आपल्याला आधीच कशी कळणार होती?

मुलांच्या दृष्टीनं विचार केला, तर आपल्या आई-बाबांनी आपल्याला बालमानसशास्त्राच्या तत्त्वानुसार शिकवलंय की नाही, याच्याशी मुलांना काही एक देणंघेणं नसतं. आपल्या आईनं आपल्यासाठी नोकरी/ हवा तो व्यवसाय केला नाही, हे तर त्यांच्या गावीही नसतं. (निदान या वयात. पुढं त्यांना याची निश्‍चित जाणीव होते.) मुलं त्यांना योग्य वाटतं, तशीच वागतात. त्यांच्यावर केवळ आई-बाबांनी नाही, तर समाजातल्या विविध घडामोडींनी चांगला-वाईट परिणाम केलेला असतो.
आपलं मूल हे आपलं मूल असतंच. काही एका मर्यादेपर्यंत घराचं वळण त्यांना असतंच; पण आपल्या नियंत्रणापलीकडच्याही काही गोष्टी असतात. या खऱ्या कारणांपर्यंत जायची आपली तयारी आहे का? उदाहरणार्थ, लहान वयात शाळेत जायच्या/ यायच्या रस्त्यावरचा रिक्षा आणि व्हॅनचा प्रवास मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. यावर कोणाचंच कसलंच नियंत्रण नसतं. आहाराच्या चुकीच्या सवयी, मोबाईल, गेम्स, नवे ट्रेंड्‌स, मोठ्या वर्गातल्या मुला-मुलींची आपसातली वेगळी होत जाणारी मैत्री या सगळ्याचे साक्षीदार ही लहान मुलं असतात. दुसरं म्हणजे आपल्याला कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी टीव्ही शिकवत असतो. तिसरं, मोबाईलदेखील शिकवतो आणि करवून घेतो, त्याला तर काहीच अंत नाही. चौथी गोष्ट- सामाजिक परिस्थितीत प्रत्येक बाबतीत होत जाणाऱ्या बदलांवर आपलं काहीच नियंत्रण नसतं. उदाहरणार्थ, आसपासचं वातावरण गढूळ होत जाणं, पैसा हीच महत्त्वाची गोष्ट ठरणं, आपण सर्वांच्या कसं पुढं आहोत हे प्रत्यक्ष भेटीत किंवा समाजमाध्यमांवर हिरीरीनं सांगणारी उदाहरणं- या काही अलीकडच्या काळातल्या गोष्टी आहेत.

पाचवी गोष्ट म्हणजे, टीनएजमध्ये येताना समवयस्क मित्रमैत्रिणींच्या सहवासामुळे मुलांना मजा वाटते; पण हाच सहवास त्यांच्या मनावर कसली कसली ओझीही टाकत असतो. आई-बाबा तर काय आपलेच आहेत, ते आपल्याला समजून घेतीलच; पण हे नवे मित्रमैत्रिणी- त्यांच्यात स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी, फुलवण्यासाठी काय काय फंडे करावे लागतात, ते त्यांचं त्यांनाच माहीत! ते सर्व आपल्या दृष्टीपलीकडं, म्हणूनच आपल्या नियंत्रणापलीकडचं असतं. मुलं या वयात वेगळ्या दिशेनं चालायला लागतात. कदाचित वेड्यावाकड्या मार्गावर जाऊ शकतात. बिथरल्यासारखी वाटतात. यातून मुलं बाहेरच्या मित्र-मैत्रिणींशी नातं जोडू बघतात- असलेलं नातं अजून घट्ट करू बघतात.

एकूणात, पालकांना जे अपेक्षित आहे, ते मुलांकडून घडून येत नाही. मुलं घरी, पालकांसमोर, त्यांना हव्या तशा, आदर्शांच्या चौकटीत वागतात; पण बाहेर आपल्याला हवं तेच करतात. हे समजतं तो क्षण सर्वांच्या दृष्टीनं विचित्र असतो. अशा प्रसंगी आई-बाबा आणि शिंगं फुटलेलं मूल यांना नातं सावरण्याची अजून एक संधी मिळते. हा अत्यंत परीक्षेचा क्षण, पराकोटीच्या शांततेत आणि तर्कशुद्धपणे सोडवता आला, तर मूल निदान अजून घसरत नाही. हा क्षण पालकांनी व्यवस्थित हाताळला, तर मुलं "जाहल्या तिन्हीसांजा' हे लक्षात घेऊन परत "घराकडे आपुल्या फिरू' शकतात! मैत्री टिकून राहू शकते!

Web Title: dr shruti panse write article in saptarang