प्रेमाचा गुंता मग ही तीन उदाहरणे वाचाच...

डॉ. सुचेता कदम
रविवार, 14 जुलै 2019

प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे

प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे
मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत असल्याने एकमेकांना मदत करणे, अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे, सुटीचा वेळ एकत्रित घालविणे, यातून आमचे चांगले नातेसंबंध झाले. मला त्याच्याविषयी अत्यंत ओढ वाटू लागली. यातून त्याला वारंवार फोन करणे, भेटण्यासाठी बोलावणे असे घडते. मागील वर्षापर्यंत तो माझे ऐकत असे. परंतु, तो पास होऊन माझ्या पुढे गेला, तसे त्याचे वागणे बदलले आहे. पूर्वीसारखा भेटायला येत नाही. फोन उचलत नाही. त्यामुळे मला दुःख होते. अभ्यासातले लक्षच उडाले आहे. आयुष्यात आपण अपयशी ठरलो, अशी भावना निर्माण झाली आहे. गावी पुन्हा जाण्याची इच्छा नाही. परंतु, पुण्यातही राहून काय करावे कळत नाही. स्पर्धा परीक्षा पूर्ण करता येईल, असे वाटत नाही. आत्महत्येचे विचार मनात येतात? मित्राला विसरू शकत नाही. यातून कसा मार्ग काढू?

लातूरसारख्या भागातून शिक्षणासाठी पुण्यात येऊन तू स्वतःच्या जबाबदारीवर शिक्षण घेत आहेस, यातून तुझी जिद्द, धाडस दिसून येते. आयुष्यातील पहिल्याच टप्प्यावर आलेल्या अपयशाने खचून जाऊ नकोस. कुटुंबातील जवळची माणसे सोबत नसल्यामुळे एकाकीपणा अधिक तीव्रतेने जाणवू शकते. प्रेमभंगामुळे तू अधिक निराश झाल्याने आत्महत्येचे विचार मनात येत असतील, तर सुटीच्या काळात गावी जाऊन कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटून ये. आई-वडील, लहान भावंडे तू पुण्यात शिक्षण घेत असल्याने तुझ्याविषयी त्यांच्या अपेक्षा, इच्छा काय आहेत ते जाणून घे. ती ऊर्जा तुला जगण्याचे बळ देईल. पुण्यात सर्वच कॉलेजमध्ये करिअर गाइडसाठी स्वतंत्र विभाग आहेत. तेथील तज्ज्ञांशी चर्चा, सल्लामसलत करून स्पर्धा परीक्षा द्यायची की इतर कोणते शिक्षण घ्यायचे, यावर मार्गदर्शन मिळू शकेल. अवांतर वाचनासाठी लायब्ररीचा वापर कर. तेथील वातावरण अभ्यासासाठी प्रेरणा देवू शकते. अपयश, अडचणींच्या काळात मदत न करणाऱ्या व्यक्तीविषयी विचार करण्यात आपण स्वतःचा वेळ वाया घालवायचा, की पुढील यश मिळण्यासाठी स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी कार्यप्रेरित होऊन रोजच्या दिवसाचे नियोजन करून शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास तू तुझे यश पाहू शकशील.

-------------------------------------------

पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत
मी ३२ वर्षांची विवाहिता आहे. मला सहा वर्षांचा मुलगा आहे. माझा जन्म व शिक्षण खेडेगावातील. घरातील सर्वजण अशिक्षित. परंतु, मामाने मला शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले. मी हुशार असल्याने ‘स्कॉलरशिप’च्या मदतीने उच्चशिक्षण पूर्ण करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागले. नोकरीच्या ठिकाणी परजातीय मुलाच्या प्रेमात पडल्यामुळे माहेरच्या सर्व लोकांना माझ्याशी संबंध तोडले. गेली दहा वर्षे माझा गावातील कोणाशीच संपर्क नाही. ज्या माणसासाठी मी माझ्या लोकांशी संबंध तोडून विवाह केला, तोच आज दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. मला नोकरी चांगली असल्यामुळे नवऱ्याला माझी व मुलाची कोणतीच जबाबदारी नाही. माझ्यावर आर्थिक ताण येतो. नवऱ्याला जबाबदाऱ्या कळत नाहीत. त्यात त्याचे प्रेमप्रकरण यातून आमच्यात खूप भांडणे होतात. तो मला घटस्फोट घेऊ म्हणत आहे. मला त्याचा प्रचंड राग येतो. तो घरात असला तर चिडचिड होते. परंतु, त्याला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करायला मोकळे सोडायचे नाही, यामुळे मी हा त्रास सहन करते. पण, मुलगा डिस्टर्ब होईल अशी भीती वाटते.

एकमेकांच्या अपेक्षा ज्या नात्यामध्ये पूर्ण होतात ते नाते दृढ होत जाते. पण, ज्या नात्यामध्ये अपेक्षांची पर्वाच नसते, त्या नात्यामध्ये तणाव व पर्यायाने दरी वाढत जाते. चांगुलपणाचा फायदा अनेकवेळा आपल्या जवळची, प्रेमाची माणसेच घेतात. ती प्रेमाची माणसे आपण दूर लोटू शकत नाही. परंतु, ती गैरफायदाच घेत असतील तर यातून मार्ग कसा काढायचा याचा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. नवऱ्याच्या वागण्याने तुमची चिडचिड होत आहे. परंतु, तो बदलण्यास तयार नाही. मग तुम्हाला स्वतःच्या वागण्या-बोलण्याची व स्वतःच्या मनस्थितीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रेम हे दुबळे करणारे नसावे. प्रामाणिकपणे वागूनही जवळची माणसे लबाडपणे वागत असतील तर धूर्तपणाने त्याचा सामना करावा लागतो. धूर्तपणा म्हणजे स्वतःच्या हुशारीचा व्यवहारात वापर करून स्वतःसाठी योग्य ते निर्णय घेता येणे. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणे शक्‍य असते. हा बदल का व कसा करायचा. जेणेकरून तुमच्या नात्यातील तणाव कमी होईल व संवाद वाढू शकेल. यासाठी स्वतःचा स्वभावाचा अभ्यास करणे, तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, वैचारिक मानसशास्त्रीय पुस्तकांचा वापर करून जीवनविषयक कौशल्य शिकण्याची तयारी ठेवा. जेणेकरून तुमचे प्रश्‍न चांगल्या पद्धतीने सोडवू शकाल.

-------------------------------------------
मुलाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत
आम्ही पती-पत्नी ज्येष्ठ नागरिक आहोत. मला पेन्शन मिळते. स्वतःचे छोटे घर आहे. एक मुलगा व मुलगी आहे. मुलगी सासरी आहे. परंतु, मुलगा वाया गेला. त्याने शिक्षण पूर्ण न करता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. परंतु, त्याचे उत्पन्न स्थिर नाही. मागील ५-६ वर्षे त्याचे नवऱ्याने सोडून दिलेल्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. मागील वर्षापासून ते भाड्याने घर घेऊन एकत्रच राहतात. अशा महिलेला सून म्हणून घेणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही त्या महिलेला घरात घेतलेले नाही. त्या दोघांमध्ये भांडणे झाली, की मुलगा आमच्याकडे येऊन राहतो. त्या वेळी ती महिला आमच्याशी येऊन भांडते. तुमचा मुलगा माझा नवरा आहे, त्यामुळे या घरावर माझा हक्क आहे. मी तुम्हाला सोडणार नाही, अशा धमक्‍या देते. मुलाला समजावून सांगितले. पण हे घर माझ्या नावावर करा म्हणजे ती तुमच्याशी भांडणार नाही, असे म्हणतो. काय करावे सुचत नाही.

तुम्ही दोघेही ज्येष्ठ आहात. या वयात सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्तता व्हावी, मुलांचे यश, कर्तृत्व यामध्ये समाधान मानावे, अशा अपेक्षा सहाजिकच असतात. परंतु, तुमच्या मुलाचे शिक्षण पूर्ण न करणे, व्यवसायात स्थिर नसणे, विवाहात स्पष्टता नसणे या सर्वच बाबी बेजबाबदार वर्तन दर्शवितात. पालक म्हणून मुलाची काळजी वाटणे सहाजिकच आहे. परंतु, आंधळेपणाने त्याच्या चुकीच्या वागण्यास प्रोत्साहन मिळेल, असे निर्णय घेणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. सर्वप्रथम तो ज्या महिलेसोबत राहत आहे, तिच्या पहिल्या लग्नाचा कायदेशीर पुरावा मुलाकडे मागा. ते पेपर त्याच्याकडे असल्यास त्याचे लग्न कायदेशीर आहे, असे म्हणता येईल. अन्यथा त्या स्त्रीने तुमच्याशी भांडणे, धमकी देणे याविरोधात तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. मुलालादेखील समज द्या. त्याच्या आयुष्याचे निर्णय त्याने घेतलेले आहेत, त्यामुळे ते निभावणे त्याची जबाबदारी आहे. तो ज्या महिलेसोबत राहतो, तेथेही प्रामाणिकपणे नाते निभावत नाही, असे त्याचे वर्तन आहे का? यासाठी वकिलांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. sucheta kadam article