गोव्यातील पक्षीवैविध्य

गोवा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते तेथील समुद्रकिनारे, कॅसिनो, पब्ज आणि मौजमजा करणारी माणसं...पक्षीनिरीक्षकांना गोव्याची वेगळीच ओळख
Dr Sudhir Gaikwad Inamdar writes Bird Diversity in Goa
Dr Sudhir Gaikwad Inamdar writes Bird Diversity in Goasakal
Summary

गोव्यात आम्ही २०१४ मध्ये गेलो ते पक्ष्यांच्या छायाचित्रणासाठी. या टूरमध्ये तब्बल १०७ पक्ष्यांचे छायाचित्रण केले. गोव्याचे पक्षीवैविध्य इतके प्रचंड आहे, की पुन:पुन्हा गेलो तरी नवा अनुभव, नवे पक्षी भेटतात. त्या टूरमध्ये आम्ही अनेक दुर्मिळ पक्ष्यांना कॅमेऱ्यात कैद केले. आजही ती छायाचित्रे गोव्याची आठवण करून देतात.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

गोवा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते तेथील समुद्रकिनारे, कॅसिनो, पब्ज आणि मौजमजा करणारी माणसं. गोवा म्हणजे जुने चर्च आणि गोवा म्हणजे मंगेशीचे मंदिरदेखील, पण आम्हा पक्षीनिरीक्षकांना गोव्याची वेगळीच ओळख आहे. भारताच्या दक्षिण-पश्चिम भागातील महत्त्वाचे व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाच्या अंतर्गत गोव्याचा समावेश होतो. ३७०२ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या या छोट्या राज्याच्या या क्षेत्रफळापैकी तब्बल १४२४ चौरस किमी इतके क्षेत्रफळ वनक्षेत्र आहे. सलीम अली पक्षी अभयारण्य, भोंडला अभयारण्य, मोल्लेम, कटिगो, मदाई, नेत्रावली, भगवान महावीर अभयारण्य तसेच तांबडी सुरला व झुआरी नदी ही पक्षीनिरीक्षणाकरिता असलेली महत्त्वाची ठिकाणे. तब्बल २७५ प्रजातींच्या पक्ष्यांची अधिकृत नोंद गोव्यात करण्यात आलेली आहे. यांची ओळख ‘बर्डस ऑफ गोवा’ या गोवा राज्य सरकारच्या प्रकाशित पुस्तकात करण्यात आलेली आहे.

गोव्याला लाभलेल्या अथांग सागरातदेखील अनेक समुद्री पक्षी पाहता येतात, ज्यांना आपण पेलाजिक बर्डस् म्हणून ओळखतो. त्यामुळे साहजिकच गोव्याला पक्षी छायाचित्राणाला जाण्याची इच्छा झाली. २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात जाण्याचे ठरले. लोवेन परेरा या निष्णात पक्षी मार्गदर्शकाच्या मालकीचे बॅकवूड्स हे तांबडी सुरला जंगलात अगदी निसर्गाच्या कुशीत असलेले रिसॉर्ट बुक केले. लोवेनकडे सतत विदेशी पर्यटक पक्षीनिरीक्षणाकरिता आपल्या खासगी छोट्या विमानाने येत असतात आणि बॅकवूड्सचा परिसर दाट झाडी-झुडपांचा असल्यामुळे परिसरातच अनेक दुर्मिळ पक्षी पाहता येतात. लोवेनने प्रमोद मडकईकर यांना आमच्यासोबत दिले. प्रमोददेखील अतिशय तेज पक्षीनिरीक्षक व मार्गदर्शक; त्याचबरोबर अतिशय मितभाषी. अगदी काही मिनिटांतच आम्हाला आपलेसे केले.

संध्याकाळच्या विमानाने उशिरा गोव्यात पोहोचलो. प्रमोद आधीच मिनी बस घेऊन विमानतळाबाहेर आमची वाट पाहत होता. सर्वांची ओळख झाल्यावर कुणाला कुठले पक्षी पाहायचे आहेत, असा गुगली प्रश्न विचारला. ज्याला जी नावे माहीत होती, त्यांनी ती सांगितली; मात्र डॉ. रजनीश यांच्याकडे मोठी यादी होती. अशाच गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलेच नाही व आमची बस मुख्य रस्ता सोडून एका छोट्या अरुंद मार्गावर आली. ‘आलेच हो बॅकवूड्स’, प्रमोद म्हणाला. दोन्ही बाजूस गर्द झाडी होती. बसचा वेग अतिशय मंदावला. चालकाने पुढे बोट दाखवले. झाडीतून एक साळिंदर बाहेर आले व अचानक आलेल्या आमच्या बसमुळे गांगरून गेले. बसपुढे रस्त्यावर तुरु तुरु दौडू लागले. आमचे सर्वांचे कॅमेरे बॅगेत होते; त्यामुळे सर्वांनी त्या दुर्मिळ व लाजऱ्या प्राण्याला फक्त डोळाभर पाहून घेतले. टूरची सुरुवात तर धम्माल झाली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच सर्व तयार होते. हसऱ्या चेहऱ्याने सर्वांना गुड मॉर्निंग म्हणत प्रमोद हजर झाला. बसमध्ये बसून थोड्याच अंतरावर असलेल्या महादेव मंदिर परिसरात आम्ही पोहोचलो. दर्शन घेऊन परिसरात तासभर छायाचित्रण केले. नंतर तिथून थोडे पुढे पाट वाहत होता. त्याच्या कडेने सावकाश पुढे सरकलो. इथेच आम्हाला नीलकर्णी खंड्या (ब्ल्यू इयर्ड किंगफिशर), मलबार नील कस्तुर, शेकरू दिसले. तास-दीड तास पक्षी छायाचित्रण करून बॅकवूड्सला परतलो. नाश्ता केला व प्रमोदच्या सूचनेची वाट पाहू लागलो. आता आपण मोल्लेम अभयारण्य परिसरात जाऊ, चला गाडीत बसा असे प्रमोद म्हणाला.

तिथे पोहोचून बसमधून उतरताच आम्हाला मलबारी कवड्या धनेश (मलबार पाईड हॉर्नबिल), मलबारी राखी धनेश, पिचू पोपट, शिंजीर असे एक ना अनेक पक्षी दिसले. चालत चालत एका घरापाशी आलो व प्रमोदने तोंडावर बोट ठेवून सर्वांना शांत राहायला सांगितले. छोटा कोळीखाऊ (लिटिल स्पायडर हंटर) आहे अशी माहिती पुरवली. घराच्या मागील बाजूस गेला आहे पुन्हा येईल. इतक्यात आमच्या समोर असलेल्या केळीच्या झाडावरच्या केळफुलावर एक शिंजीर (सन बर्ड) येऊन बसला, पण थोडा वेगळा वाटला. हा लिटिल स्पायडर हंटर असल्याचे प्रमोदने सांगितले. चोच पाहा सन बर्डपेक्षा लांब आहे. हा बऱ्याचदा केळफुलावर दिसतो. एक दुर्मिळ पक्षी आमच्या समोर होता. सर्वांनी पटापट कॅमेऱ्याची ट्रिगर दाबली व भरपूर छायाचित्रे टिपली. जेवणाची वेळ झाली होती व भूकही लागली होती. त्यामुळे रिसॉर्टला परतलो. जेवणानंतर दोन तास विश्रांती केली व ऊन थोडे कमी झाल्यावर पुन्हा छायाचित्रणाला बाहेर पडलो. त्या व पुढच्या दिवशी दुपारपर्यंत वनपक्ष्यांचे छायाचित्रण करून बॅकवूड्स सोडले. झुआरी नदी परिसरात पोहोचलो. त्या संध्याकाळी व पुढच्या दिवशी सकाळी झुआरी नदीवर बोट सफारी केली. येथे सहा प्रकारच्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजाती, कैकर (ऑस्प्रे), समुद्री गरुड (व्हाईट बेलिड सी र्इगल) असे अनेक पक्षी टिपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com