ताणविरहित अभ्यास (डॉ. सुखदा चिमोटे)

dr sukhada chimote
dr sukhada chimote

परीक्षा सुरू झाल्या, की विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांचाच गडबडगोंधळ वाढायला लागतो. ताण वाढतात आणि त्याचे पडसाद संपूर्ण घरावर उमटतात. परीक्षा अगदी तोंडावर आल्या असताना अभ्यासाचं कोणतं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या किंवा टाळल्या पाहिजेत आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

दर वर्षी फेब्रुवारीचा छोटासा महिना संपून कॅलेंडर मार्च महिना दाखवायला लागतं आणि बरंच काही बदलतं. आंब्याचा मोहोर दरवळायला लागतो, कोकीळ स्वर लावायला लागतात, बहावा नि गुलमोहोर फुलायला लागतो, ऊन तापायला लागतं; पण त्याहूनही तापायला लागतं ते घराघरातलं वातावरण...कारण मार्चसोबतच परीक्षाही येतात! आम्हाला मात्र मार्चची चाहूल लागते ती इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थच्या (आयपीएच) केंद्रात पालकशाळा आणि मुलांसाठी मोटिवेशनल प्रोग्रॅम्सची मागणी व्हायला लागली की! यंदाचा मार्चही अगदी उंबऱ्यापाशी येऊन ठेपला आहे आणि म्हणून आज तुमच्याशी "परीक्षा' या जिव्हाळ्याच्या आणि ऐरणीवर आलेल्या विषयावर थोड्या गप्पा!

परीक्षांचा कुठलाही फ्लेवर असला, तरी परीक्षांची काळजी, ताण आणि त्यासोबतच घराघरात जागृत होणारे ज्वालामुखी हे चित्र सगळीकडं सारखंच. फक्त मुलांची नाही, तर अख्ख्या घरादाराची परीक्षा असल्यासारखा माहौल असतो. आईस्क्रिम, शीतपेयं, जंकफूड बंद! मोबाइल किंवा कॉम्पुटर गेम्स बंद! टीव्ही, सिनेमा, नेटफ्लिक्‍स, प्राईमलाही टाळं! नक्की कोणाची असते हो परीक्षा? मुलांची, आई-बाबांची, आजी-आजोबांची, ट्युशन टीचर्सची? खरंतर ती परीक्षा विद्यार्थ्यांचीही नसते; ती असते, विद्यार्थी शिकत असलेल्या विषयात त्याची गती किती आहे याची. खरं तर बहुरंगी बुद्धिमत्ता (Multiple Intelligence) ही संकल्पना सिद्ध होऊन दशकं उलटून गेली, तरी अजूनही आपली हुशारीची व्याख्या, शालेय शिक्षणातल्या विषयांशी, विशेषत: गणित, विज्ञान या विषयांशीच येऊन थांबते. खेळ, संगीत, चित्रकला, त्रिमितीय निर्मिती हे सारे विषय आपण "ब' श्रेणी घेता यावी इतपतच महत्त्वाचे मानतो आहोत.
खरंतर कुठलीही नवी गोष्ट शिकताना, नवा मार्ग चालताना, आपण कुठवर येऊन पोचलो आहोत हे एकवार वळून बघणं जितकं स्वाभाविक, तितकंच ह्या परीक्षेचं महत्त्व; पण आपण त्या परीक्षेला आणि मार्कांना अस्तित्वाचा प्रश्न (existential crisis) बनवला आणि त्यामुळं आता या परीक्षांसोबतच "ताण' आपल्याला सप्रेम भेट मिळायला लागला आहे.

बरं हा ताण फक्त मुलांना नाही, तर सगळ्या घराला, आई-बाबांना येतो आहे. नकोनकोसे, पराकोटीचे विचार, त्याच्या जोडीनं मन दुःखी करणाऱ्या भावना येताहेत.. ताणात असताना क्षमता, कौशल्य, त्यांचा वापर करायला जाड जातं हे ठाऊक असूनही हा ताण आपल्या साऱ्यांच्या मनावर येतो आहे, आपण त्याला येऊ देत आहोत! भावनिक स्वास्थ्य तर बिघडायला लागलंच आहे; पण या साऱ्याचा शारीरिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो आहे. मुलांमधली स्थूलता, दुबळी प्रतिकारशक्ती, थकवा, ताणतणाव, जीवनसत्त्वांची कमतरता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अतिशय झपाट्यानं वाढणारं नैराश्‍य आणि अतिचिंतेचं प्रमाण ही सारी या परीक्षार्थी मुलांची "ऑक्‍युपेशनल हॅझार्डस्‌' आहेत.

आणि त्याहूनही मोठं नुकसान म्हणजे मुलं आणि पालक यांच्यातलं नातं गढूळ होतं आहे! अपेक्षा, तुलना, असमाधान, निराशा या दुष्टचक्रात मुलांचं आई-बाबांसोबत असलेलं नातं भरडलं जातं आहे. वयाच्या ज्या नाजूक टप्प्यावर मुलांना पालकांची, त्यांच्या विश्वासाची, मदतीची नितांत गरज असते (त्या वेळी ती मुलांना जाणवत नसली तरी), त्याच वेळी या परीक्षा आणि त्यांचे मार्क या नात्याला छेद देत आहेत. हे वाचताना काही पालकांच्या मनात असा विचार येईलही कदाचित, की "आम्हीदेखील या गुणांच्या, स्पर्धेच्या युगातच शिकलो, मोठे झालो. आमचं नाही झालं बुवा काही नुकसान!' खरंही असेल ते; पण त्याचा अर्थ असा तर नव्हे, ना की माझं मूलही त्या स्पर्धेला, त्या रेसला बिचकणार नाही? आणि तसं होत असेल, काही मुलं अडखळत असतील तर त्या परीक्षांच्या, मार्कांच्या भुतांशी लढणाऱ्या आपल्या मुलांसाठी हा प्रवास आपण अधिकच खडतर बनवतो आहे आहोत.

तर मग आता आपण पालकांनी थोडा "राईट टर्न' घेऊया? आपलीच काही गृहितकं तपासून पाहूयात का?
शिक्षणपद्धती आणि परीक्षा कशासाठी? आपल्या मुलांमधली अभ्यासू वृत्ती, एखादं काम तडीस नेण्याची शिस्त वाढायला. विविध विषय शिकत असताना, त्या विषयांमधले सामान धागे आणि गुंफण शोधता यावी, त्यातून सर्जनाचा आनंद त्यांना मिळावा म्हणून. एखाद्या विषयात सखोल ज्ञान मिळवावंसं त्यांना वाटावं, ज्ञान आणि कौशल्य विकसित करणं आणि त्याचं उपयोजन करायला शिकता यावं म्हणून. आणि मग या साऱ्या प्रवासासाठी टप्पे हवेत, शिक्षणाच्या वाटेवर आपला प्रवास कुठल्या दिशेने काय वेगानं सुरू आहे याचा अधूनमधून अदमास घेता यावा म्हणून परीक्षा हव्यात. खरंतर शिक्षण किंवा ज्ञानार्जन यासाठी प्रेरणा मिळावी आणि या प्रयत्नांना एक ढाचा मिळावा यासाठी परीक्षा. अर्थात ही परीक्षा म्हणजे आजच्या शिक्षणपद्धतीतली अपरिहार्यता आहे ही गोष्टही तितकीच खरी. मग पालक म्हणून, आपल्याला नक्की काय करता येईल? परीक्षा अनिवार्य आणि अपरिहार्य असली, तरी या परीक्षेच्या राक्षसाला अक्राळविक्राळ बनू न देणं आपल्याच हातात आहे. "मुलं विरुद्ध आपण' असा हा सामना होऊ न देता, टीमवर्कनं या परीक्षेचा तणाव काहीसा अधिक छान हाताळता येईल. सगळ्यांचा- विशेषतः पालकांचा परीक्षेचा ताण कमी होण्यासाठी हे काही कानमंत्र ः

- मनात येणाऱ्या विचारांकडं मी अधिक सजगतेनं बघेन. आपले विचार परीक्षा या गोष्टीला महाभयंकर रूप देताहेत का? ("कमी मार्क मिळाले की संपलंच सगळं' किंवा "माझ्यासारख्या हुशार माणसाच्या मुलाला अमुक इयत्तेतलं गणित कठीण जातं हे मला मान्यच नाही!') असे विचार येत असतील, तर प्रयत्नपूर्वक हे विचार विवेकी आहेत का, सत्य आहेत का हे मी तपासून बघेन.
- या विचारांच्या जोडीनं येणाऱ्या भावना (निराशा, भीती, न्यूनगंड, वैफल्य, अतिचिंता) मी ओळखायचा प्रयत्न करीन. यापैकी मदत करणाऱ्या भावना कुठल्या (उदाहरणार्थ, परीक्षेचा थोडा तणाव, तब्येतीची वाटणारी रास्त काळजी) आणि त्रासदायक/ अपायकारक भावना कुठल्या (अतिचिंता, अतिभीती, नैराश्‍य वगैरे) हे ओळखून त्यातल्या मदत करणाऱ्या भावनांवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करेन.
- "तुझी परीक्षा ही तुझ्या गणितातल्या किंवा इतिहासातल्या स्किलची आहे, त्यात मिळणारं यश किंवा अपयश यावर तू किती चांगला किंवा वाईट हे ठरत नाही,' हे मी आधी स्वतःला आणि मग माझ्या मुलाला नीट समजावून सांगीन.
- एखादा विषय मुलाला कठीण गेला किंवा कमी मार्क मिळाले, तरी माझं मुलावर/ मुलीवर असलेलं प्रेम तसंच राहणार आहे. "तुझ्या मार्कांवर, परीक्षेतल्या परफॉर्मन्सवर आपलं नातं अजिबात अवलंबून नाही,' असा विश्वास माझ्या कृती आणि उक्तीतून माझ्या मुलाला द्यायचा प्रयत्न करीन.
- नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या शुभेच्छा देतानाच, अकारण टेन्शनही वाढवत असतात. त्यांना मुलांपासून थोडं दूर ठेवीन किंवा सजगपणे असा परिणाम होणं कमी करीन.
- घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवीन, जेणेकरून मुलांची अस्वस्थता कमी होईल, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम राहायला मदत होईल.
- "शेवटच्या क्षणी घाबरून न जाता, जे जे केलं आहेस ते नीट आठवून लिही, तुला नक्की जमेल,' असा विश्वास मुलांना देईन.

आपण सगळे ही नवी भाषा शिकू या... सध्या मार्च महिन्यात शिस्त, रागावणं, चुका दाखवणं टाळून, मुलांना प्रोत्साहित करू या. परीक्षेच्या वेळी हताश किंवा अतिशय काळजीत असणाऱ्या आपल्या मुलाला, "आधीपासूनच करायला हवा होता अभ्यास!' किंवा "मला माहितीच होतं, की तुझं काही खरं नाही या परीक्षेत!' असे डायलॉग ऐकवून काय साध्य होतं नक्की? काळजी, प्रेम खरं असलं, तरी या अशा उद्‌गारांनी अधिकच खच्चीकरण होतं, नात्यात दरी पडायला लागते. त्याऐवजी "मार्क्‍स किती मिळावेत हे तुझ्या किंवा माझ्या हातात नाही; पण सध्या परीक्षांची वेळ शांतपणे निभावून नेऊ या,' अशी भूमिका घेता येईल. परीक्षेनंतरच्या काळात प्रोत्साहन, चुकांची दुरुस्ती, उपाय या सगळ्यावर मोकळेपणी बोललं तर त्याचा जास्त फायदा होईल.
मार्कांची, स्पर्धेची, तुलनेची, ऍडमिशनची भाषा सोडून गणिताची, भाषेची, विज्ञानाची, इतिहासाची मजा घ्यायला आपल्या मुलांना शिकवू या. परीक्षेला एक सहज टप्पा म्हणून गाठून, ओलांडून पुढं जायला शिकू या. आहात सारे या परीक्षेला तयार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com