विचारवाही प्रतिमासृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विचारवाही प्रतिमासृष्टी

सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या वतीने २२ ते २८ मार्चदरम्यान मुंबईतील जहांगीर कलादालनात आजच्या प्रतिक्रांतीच्या काळाचा वेध घेणाऱ्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते.

विचारवाही प्रतिमासृष्टी

- डॉ. सुनील अभिमान अवचार

सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या वतीने २२ ते २८ मार्चदरम्यान मुंबईतील जहांगीर कलादालनात आजच्या प्रतिक्रांतीच्या काळाचा वेध घेणाऱ्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनाच्या आयोजनाला विचारवाही भूमिका आहे. कलाकृतींमध्येही तोच धागा गुंफला गेला. या चित्रांचा आशय, विषय, प्रतिकं पूर्णपणे नवी आहेत. क्रांती-प्रतिक्रांतीच्या जगाला सर्जनशील कलावंतांनी दिलेला हा उत्कट प्रतिसाद आहे, त्याविषयीची रंगचर्चा...

क्रांती आणि प्रतिक्रांती हे संपूर्ण भारतातल्या विविध भागांतील ग्रामीण तसेच शहरांतील कलाकारांचे तसेच आंबेडकरी विचारांवर चर्चा करणाऱ्यांचे समूह प्रदर्शन होते. यात साठ कलाकारांच्या चित्रकला, शिल्पकला, मांडणी शिल्प, छायाचित्र, व्हिडीओ आणि कविता अशा सुमारे नव्वद कलाकृतींचा समावेश होता. मूलतत्त्ववादी विचाराने मानवी मूल्यावर पसरलेली काळी काजळी साफ करण्याचे काम या प्रतिभावंत कलावंतांच्या कलाकृतींमधून साधलेले आहे. त्यातील आशय विषय बघता काही बाबी प्रकर्षाने समोर येतात. श्रावस्ती मोगलन यांनी बुद्ध आणि त्यांचा क्रांतीचा काळ आपल्या कलाकृतीतून अधोरेखित केला आहे. अजय मेश्राम यांनी ‘दी बुद्धा’ला शांतीचे प्रतीक म्हणून साकारले आहे. बाळासाहेब पाटील यांनी ‘द इथिकल पाथ’ बुद्ध आणि युद्ध यांच्यातील ताण अधोरेखित केला आहे. मोहशील माखाल यांनी बाबासाहेबांचे गंभीर पोट्रेट केले आहे. प्रभाकर कांबळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतीकांच्या होणाऱ्या भगवीकरणाकडे लक्ष वेधले आहे. राजू पटेल यांनी बिरसा मुंडाचे पोट्रेट केले आहे. उत्तम घोष यांनी ‘इचिंग ऑन मीटर’मधून सत्तेला अंतर्मुख करणारा आरसा दाखवला आहे.

व्ही. दिवाकर यांनी ‘गेमचेंजर’ या छायाचित्रामधून बुद्ध, आंबेडकर, व्यवस्थेवर निशाणा धरत गुल्लेल या प्रतिमांमधून पर्यायी संस्कृतीचा संकेत दिला आहे. विक्रांत भिसे यांनी ‘लेबर लिडर’ बाबासाहेब आणि कामगारांचे नाते अधोरेखित केले आहे. तेजस्विनी सोनवणे यांनी महिलांच्या विस्थापनाकडे लक्ष वेधले आहे. पिसुर्वी यांनी धम्मचक्र परिवर्तनाचा सोंदर्यबोध दिला आहे. मालविका राज यांनी मधुबनी शैलीत पिचलेल्यांचे जग साकारले आहे, प्रशांत कुवार यांनी सत्यशोधकांचे प्रतिमा चित्र साकारले आहे. मी ‘पाणी आणि बाई’ या चित्रामधून चवदार तळ्याचा संघर्ष भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षातही सुरू आहे तो अद्याप संपला नाही याचे राजकीय विधान करणारे चित्र चितारले होते. संजीव सोंनपिपरे यांनी संविधानिक मूल्यांची बाजू लावून धरली आहे. रामचंद्र खरातमल यांनी कावळ्याच्या गोंगाटात शांतीचे पाखरू संघर्ष करीत आहे, हे अधोरेखित केले आहे. प्रभाकर भिसे यांनी ‘दलित पँथर’चा संघर्षशील इतिहास आविष्कारला. खांडका ओडिदा यांनी ‘आम्ही धनगर’ या लघुपटाद्वारे धनगरांच्या विस्थापनाच्या वेदना मांडल्या. प्रतीक जाधव यांनी ‘डू नॉट स्पीक’ या मांडणी शिल्पामधून असहमतीच्या आवाजाचे काय झाले? असा निकराचा प्रश्न उभा केला.

प्रतिक्रांतीच्या विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचा एक भाग म्हणून प्रा. गौतमीपुत्र कांबळे, भरत होळके यांच्या नेतृत्वात ‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ विविध प्रांतातील ६० कलावंताना सोबत घेऊन ऐतिहासिक काम करीत आहे. फुले-आंबेडकरी विचारधारेतील आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या ‘सेक्युलर’ विचाराला प्रेरणा मानून त्याचा सर्व प्रकारच्या साहित्य आणि दृश्यकलांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करणारी चळवळ म्हणजे ‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ म्हणता येईल. सेक्युलर आर्टची भूमिका स्पष्ट करताना प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणतात, ‘‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट, कलाकृतीमधील केवळ रचनासौंदर्याचा आविष्कार हा दुय्यम मानते; तर आशयसौंदर्याच्या मांडणीला अधिक महत्त्व देते. जीवनमूल्ये हीच कलामूल्ये आणि तीच सौंदर्यमूल्ये असंही मानते. मानवी जीवनातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी आकाशस्थ काल्पनिक शक्तीकडे भक्तिभावाने याचना न करता इथल्या अन्यायी व्यवस्था बदलून समस्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा सेक्युलर साहित्य आणि दृश्यकला देते. साहित्य आणि दृश्यकलांच्या माध्यमातून सर्व धार्मिक व्यवस्थांमधील सर्व प्रकारच्या श्रद्धांना नकार देते. आणि प्रज्ञाधारित सार्वत्रिक नैतिकतेचा आग्रह धरते. फुले-आंबेडकरी विचारधारेला आणि भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सेक्युलर समाजनिर्मितीसाठी अन्यायी सर्व धार्मिक व्यवस्थांमध्ये हस्तक्षेप करणारी चळवळ म्हणजे सेक्युलर आर्ट मुव्हमेंट होय!’’ या प्रदर्शनाचे क्युरेटर प्रभाकर कांबळे म्हणतात, ‘‘कलेची विशिष्ट प्रकारे व्याख्या करता येत नाही आणि ती कोणाचीही मक्तेदारी नाही; ती वैयक्तिक आहे आणि सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय बदलासाठी एक मजबूत पर्यायी संस्था म्हणून आम्ही जाणीवपूर्वक त्याकडे पाहतो.’’

सदर प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृतींबाबत आशय आणि सौंदर्यबोधाच्या दृष्टीने खूप काही सांगता येऊ शकते. तशा या खूप साऱ्या जागा आहेत. या चित्रांचा आशय, विषय, प्रतीक पूर्णपणे नवे आहेत. क्रांती-प्रतिक्रांतीच्या जगाला सर्जनशील कलावंतांनी दिलेला हा उत्कट प्रतिसाद आहे. या देशात सेक्युलर विचार जसजसे मुरत जातील, तसतसे कलावंतांच्या कलाकृतीला इहवादी सौंदर्य प्राप्त होईल. ते सौंदर्य अधिकाधिक खुलेल, अधिकाधिक बहरेल, अशी अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही.

(लेखक मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

Web Title: Dr Sunil Abhiman Avchar Writes Art Exhibition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :artexhibitionsaptarang